Mussoorie british homes Dainik Gomantak
ब्लॉग

मर्मवेध : वारसा

मसुरी हे हिल स्टेशन ब्रिटिशांच्या वारसा प्रेमाची साक्ष देत आज पर्यटकांना आकृष्ट करीत असले तरी अतिहव्यासामुळे आपण या स्वप्ननगरीचा विचका करून टाकतो आहोत. ब्रिटिशांनी या भागाचा ‘शोध’ लावला, तेथे पहिले घर बांधले, एवढेच नव्हे तर मसुरीचे खूप लाड केले...

Raju Nayak

हा रस्ता स्वर्गात जातो का, एक तरुणी वाटसरूला विचारते.

तो म्हणतो, हो! परंतु स्वर्गलोक पाहून झाल्यावर तुला परत यायचीही वाट सापडेल. कारण हा भूभाग पृथ्वीतलावरच आहे.

एका नितांतसुंदर हिल स्टेशनचे वर्णन करताना ही अशी कविकल्पना मांडण्यात आली आहे. ब्रिटिशांनी मसुरी किंवा नैनितालचे वर्णन करताना हीच संकल्पना वापरली असेल. मसुरीसारखी हिल स्टेशन जगात अनेक आहेत. ब्रिटिश भारतात आल्यावर त्यांना थंड हवेची ठिकाणे विकसित करण्याची आंतरिक ओढ जाणवलीच असणार.

सैन्यात काम करणाऱ्या अधिकारी वर्गाला तर आपल्या कुटुंबीयांना घेऊन सुट्टी साजरी करण्यासाठी अशा थंड हवेच्या, निवांत स्थळांची आवश्‍यकता होतीच. त्यांनी या स्थळांचा ‘शोध’ लावला असे म्हणण्याची प्रथा असली तरी स्थानिकांनीच त्यांना या जागा शोधून दिल्या. दिल्लीत बसून आठवडाभर काम केल्यानंतर अधूनमधून डोके शांत करण्यासाठी त्यांनी सहली घडविल्याच असतील.

कुटुंबीय, मित्रमंडळींसह ते येथे आले व मायदेशीच्या आठवणींमध्ये रमले. ब्रिटिशांनी नैनितालचा, मसुरीचा ‘शोध’ लावला? याचा काट्याकूट करण्याऐवजी या प्रश्‍नाचे सोपे उत्तर शोधायचे असेल तर खुल्या दिलाने आपण म्हणू शकतो की या दोन्ही ‘हिल स्टेशनना’ लोकप्रियता मिळवून दिली, त्यांनीच. त्यांनी या टेकड्या राखल्या. त्याच्या नैसर्गिक सौंदर्याचे जतन, संवर्धन केले. तेथे घरे बांधली. प्रकृतीशी साधर्म्य राखणारी स्थापत्यकला जोपासली. कमीत कमी कॉंक्रीट वापरले. स्थानिक दगड आणि चुना वापरला. इमारतींसाठी लाकडाचा सर्वात जास्त वापर होता. आज ब्रिटिशांची नामोनिशाणी जर कोणत्या स्वरूपात येथे शिल्लक असेल तर ती या स्थापत्यकलेतूनच आहे. नैनितालमध्ये जागोजागी त्यांची ही प्रतीके उभी आहेत.

ब्रिटिशांनी परत जाताना आपण प्राणपणाने जपलेल्या या वास्तू खात्रीशीर लोकांकडे सुपूर्द केल्या. काही प्रॉपर्टी तर कवडीमोलाने विकल्या गेल्या. अनेक मालमत्ता त्यावेळच्या राजेमहाराजांनीही विकत घेतल्या. त्यानंतर काळाच्या ओघात त्या श्रीमंत रईसजाद्यांकडे आल्या. त्यातील अनेक वास्तू त्यांनी अजून जतन केलेल्या आहेत. आम्ही ज्या सुंदर हवेलीत वास्तव्य केले, ती मुंबईच्या एका व्होरा कुटुंबाने गेली ६० वर्षे सांभाळली आहे. या कुटुंबाच्या प्रतिनिधी आज ८२ वर्षांची महिला आहे. तिला या वास्तूत येऊन वास्तव्य करायला आवडते. ती जेव्हा २० वर्षांची होती व नवीनच लग्न करून या कुटुंबाचा भाग बनली तेव्हा तिला ही हवेली प्राप्त झाली. त्यानंतर पाचेक वर्षांनी त्या कुटुंबाने या हवेलीचे वारसा हॉटेलात रूपांतर केले.

महत्त्वाचे म्हणजे तिचा या वास्तूत जीव जडला आहे. येथे खूप पर्यटक येतात, परंतु प्राप्ती होते, त्याहून अधिक पैसा या वास्तूच्या देखभालीत जातो. २०-२५ वर्षे तेथेच काम करणारे कर्मचारी आहेत. ब्रिटिशांचा चोखंदळपणा असा की त्यांनी वास्तू बांधताना त्यातील प्रत्येक गोष्टीचा तपशील नोंदवून ठेवला. झुंबरांपासून टांगलेल्या हरणांच्या प्रतिकृती व छतापासून फरशा याचा तपशील त्यांनी जतन केला व नव्या वारसदारांकडे सुपूर्द केला. म्हणूनच या वास्तू आज २०० वर्षांच्या झाल्या असल्या तरी त्या जतन, संवर्धन करताना या तपशिलाचा फायदा होतो. ब्रिटिशांच्या या दृष्टिकोनाची निश्‍चित तारीफ केली पाहिजे. काळाच्या ओघात अनेक वास्तू जीर्ण झाल्या. त्यांची देखभाल होऊ शकली नाही.

काही वास्तू तर भग्नावस्थेत आहेत, परंतु अनेक इमारती, हवेल्या, वारसा वास्तू ब्रिटिशांची दृष्टी, कल्पकता, सद्‍सद्विवेकबुद्धी यांची प्रतीके बनली आहेत. येथील पर्यटकांच्याही नजरेस ते येते. ब्रिटिशांनी देश सोडला, परंतु आपल्या अनेक आठवणी येथे मागे ठेवल्या. ब्रिटन, आयर्लंड, जर्मनी येथील स्थानांची नावे अजून लोकांनी जतन केली आहेत. ब्रिटिश साम्राज्याशी नव्हे तर येथे येऊन वास्तव्य केलेल्या पाहुण्यांचे संस्मरण व गोड स्मृतींना लोकांनी वाहिलेली ती आदरांजलीच आहे. तरी अतिपर्यटनाने मसुरीचे बरेच लचके तोडले आहेत. तेथील रमणीय पर्वत कॉंक्रीटच्या बांधकामांनी बीभत्स बनले आहेत. काही पर्वत तर झाडी, हिरवळ जाऊन कॉंक्रीटचे विकृत ओंगळवाणे प्रतीक बनले आहेत. वसाहतवादाचे पंख छाटून टाकलेले हे पर्वत ओकेबोके वाटतात, कान देऊन ऐकले तर त्यांचे हुंदकेही ऐकू येतील...

आम्ही गोवेकर आमच्या सुट्टीमध्ये कुठे जातो असा प्रश्न गोव्यात येणाऱ्या अनेक पर्यटकांना पडत असतो. आम्हाला जेव्हा ते प्रश्न विचारतात तेव्हा आमच्याकडून एक सहज उत्तर जाते ते म्हणजे आम्ही गोव्यातील उकाडा टाळण्यासाठी एखाद्या टेकडीवर थंड हवेच्या ठिकाणी जाणं पसंत करतो. गोव्यामधला आमचा पाच-सहा जणांचा एक गट आहे. लेखक, पत्रकार अशा समविचारी लोकांच्या या गटामध्ये काही बाबतीत निश्‍चितच एकवाक्यता आहे. एप्रिलमध्ये जेव्हा आम्ही गोव्याचा उकाडा टाळण्यासाठी एखादं हिल स्टेशन गाठण्याचे ठरवलं तेव्हा आमच्या डोळ्यासमोर दोन-तीन जागा आल्या.

त्यामध्ये एक स्थळ होते मसुरी. मसुरी एवढ्यासाठी कारण मसुरीमध्ये कधीही उकाडा होत नाही. मसुरी ही भारतीय टेकड्यांची राणी गणली जाते. ब्रिटिशांनी १९व्या शतकामध्ये जेव्हा मसुरीचा ‘शोध’ लावला - तेव्हा तेथे वास्तव्य करण्यासाठी ही जागा त्यांनी निवडली - याचं एकमेव कारण धकाधकीच्या जीवनापासून दूर जात सुटी घालवण्यासाठी एखादं थंड हवेचे ठिकाण जो आनंद त्यांना आयर्लंड, स्कॉटलंड ब्रिटनमध्ये गवसत होता - तो भारतातही त्यांना मनमुराद लुटता यावा. त्यानंतर जेव्हा जेव्हा युरोपमधून लोक इथे येऊ लागले तेव्हा त्यांना ही जागा एवढी पसंत पडली की अनेकांनी स्वतः येथे जमिनी घेऊन तेथे आपली टुमदार घरे बांधली.

भारतात आज थंड हवेच्या ठिकाणी विशिष्ट टेकड्यांवर जाण्यासाठी पर्यटकांची एकच झुंबड उडालेली असते. पर्यटन एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे की आता शांत आणि निर्जन अशा टेकड्याच राहिलेल्या नाहीत. भारतीय माणूस फिरू लागला तसा त्याने अनेक थंड हवेच्या जागांचा शोध घेतला. विशेषतः उष्ण प्रदेशांमध्ये राहणाऱ्या लोकांना टेकड्यांवर जाणं पसंत पडू लागलं. आज दिल्ली, पंजाब किंवा आसपासच्या भागांमधून मोठ्या प्रमाणावर मसुरीला जाण्यासाठी लोकांची रीघ लागलेली असते.

मसुरी एवढ्यासाठी कारण येथील हवा बारमाही थंड असते. तेथे अजूनही मोठ्या प्रमाणावर झाडी, हिरवळ आहे. अत्यंत खोल दऱ्या व उंच टेकड्यांवर विनाप्रदूषित हवा. थंड हवा हे मसुरीचे एक वैशिष्ट्य मानले गेले पाहिजे. आजही मसुरी जरी मोठ्या प्रमाणावर बांधकामे आणि काँक्रीटीकरण याचा सामना करत आपली रया गमावून बसलेली असली तरी मसुरीने ‘थंड हवेचे ठिकाण’ हे आपले बिरुद अजूनही टिकवून ठेवले आहे. मसुरीमध्ये अजूनही ही थंडी तुम्हाला अनुभवायला मिळते, जी आता मनाली किंवा इतर ठिकाणी अभावानेच अनुभवता येते. अनेक ठिकाणी वाढत्या कॉंक्रीटीकरणाने पर्यावरणाचा ऱ्हास झाला. काश्‍मीरमध्ये तर सफरचंदाच्या बागा आता उंच जागी हलवाव्या लागत आहेत.

मसुरी हे नाव कसे पडले? या संदर्भात माहिती गोळा करताना एक माहिती हाती लागली. अनेक प्रकारच्या वनस्पती, औषधी वनस्पती आणि कंदमुळे येथे मुबलक सापडत. त्यांना स्थानिक भाषेत मन्सूर म्हटले जाई. त्याचे पुढे ब्रिटिशांनी मसुरी असे नामकरण केले.

मसुरीचा इतिहास रंजक आहे. नितांत सुंदर उत्तराखंडच्या देवभूमीमध्ये वसलेल्या गढवाल हिमालयीन टापूमध्ये मसुरी येते. जेव्हा पृथ्वीतलावर देवदेवतांचा वावर होता असं मानलं जातं त्यावेळी हे देवदेवता स्वतः विश्रांतीसाठी मसुरीमध्ये येत अशी आख्यायिका सांगितली जाते. आजही मसुरीमध्ये वेगवेगळे पंथ आणि वेगवेगळ्या वंशाचे समाज राहतात. त्यांची कृषी हेच उपजीविकेचे मुख्य साधन असले तरी सध्या मसुरीमध्ये स्थानिक माणूस मुख्य स्थळापासून बाहेर फेकला गेलेला आहे. कारण मसुरीमधल्या मुख्य टेकड्यांवरती हॉटेलांचा संपूर्ण कब्जा आहे. आता केवळ दृष्टिपथास येतात ती हॉटेले आणि अशा प्रकारच्या मोठ्या हवेल्या, ज्यांचेही आता हॉटेलमध्ये रूपांतर करण्यात आलेले आहे.

परंतु या हॉटेलांमध्ये किंवा या बांधकामांमध्ये जुन्या ब्रिटिशकालीन इमारती व वारसा इमारतींची सावली अजूनही नजरेत भरते आणि या काही वारसा इमारती किंवा हवेल्या छान झाडाझुडपांमध्ये हिरवळीमध्ये वसलेल्या आहेत. एकेकाळी गुराखी आपली जनावरे या टेकड्यांवरती चरायला घेऊन येत. त्यानंतर ब्रिटिशांनी मसुरीचा शोध लावला तेव्हा तेथे पहिले घर ब्रिटिशांनीच येथे बांधले असे सांगितले जाते. पूर्वी चंद किंवा गुप्ता या राजवटींची येथे साम्राज्ये होती. १८०३ मध्ये गुरखांनी देहरा आणि गडवाल भागांवरती ताबा मिळवला. तेथे त्यांच्याकडून ब्रिटिशांना हे भाग ताब्यात घेण्यासाठी मोठी लढाई करावी लागली. दोन्ही शक्तींनी आपली ताकद पणाला लावली.

१८१५ मध्ये गुरख्यांना माघार घ्यावी लागली. १८२३ मध्ये ब्रिटिशांची सत्ता स्थापन झाल्यावर मुलींकर या भागात आपली घरे बांधायला सुरुवात केली. अनेक ब्रिटिश अधिकारी विशेषतः सैन्य दलातील अधिकारी इथे जमिनी, घरे घेऊ लागले. युरोपियन आणि मोठ्या हुद्यांवरील अधिकारी मोठ्या प्रमाणावर आपली सुट्टी घालवण्यासाठी किंवा उन्हाळा टाळण्यासाठी या भागाकडे धाव घेऊ लागले.

ब्रिटिशांनी मसुरीमध्ये आपली सत्ता स्थापन केल्यानंतर येथे काही भागांमध्ये लष्करी तळ उभारला. आजही ब्रिटिशांच्या अनेक पाऊलखुणा या भागात आहेत - ज्यांच्या आठवणी स्थानिक काढतात. त्यांनी स्थापन केलेल्या शाळा आजही भारतामध्ये नाव मिळवून आहेत. डून स्कूल आणि इतर प्रकारच्या अनेक शैक्षणिक-प्रशिक्षण संस्था येथे अजूनही आपला दिमाख मिरवत असतात. त्याशिवाय आयएएस ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जी भारतामध्ये एक अनोखी संस्था मानली जाते तिनेही आपला संसार याच टेकडीवर उभारला.

आज देशांमधील आयएएस ट्रेनिंग संदर्भातील ती प्रमुख संस्था मानली जाते. त्याशिवाय इथल्या अनेक वसाहतवादी इमारतींमध्ये जुन्या चर्चेस आहेत, सरकारी कार्यालये आहेत आणि स्थानिक ग्रंथालय अजूनही जवळजवळ १०० वर्षांच्या वर आपला इतिहास सांगत अजूनही मोठ्या दिमाखाने येथे उभे आहे. त्यांची काही प्रमाणात डागडुजी केली आहे. आम्ही इथल्या क्राईस्ट चर्चमध्ये गेलो तेव्हा या चर्चचे सुंदर नूतनीकरण झालेले आम्हाला पाहायला मिळाले. तेथील प्रोटेस्टंंटची संख्या कमी होत चालली असली तरी दर रविवारी माससाठी ३०-४० लोक उपस्थित असतात, परंतु चर्चचे देखणे स्वरूप त्यांनी जतन करून ठेवले आहे. हल्लीच निवर्तलेल्या ब्रिटिश राणी एलिझाबेथ यांच्या मातोश्रींनी याच चर्चच्या प्रांगणामध्ये लावलेल्या एका रोपट्याचा आज डेरेदार वृक्ष झाला आहे व त्या क्षणाची साक्ष देत उभा आहे. त्याला आज जवळजवळ शंभर वर्षांहून अधिक काळ लोटला आहे.

अजूनही हे झाड खूप सुंदर पद्धतीने स्वतःच्या अस्तित्वाची मिजास मिरवत तिथे उभे आहे. मसुरीच्या दारू गाळण्याच्या इतिहासाबद्दलही खूप चांगल्या पद्धतीने सांगितले जाते. तिथे पहिली ओल्ड ब्रीवरी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी सुरू केली. बियर कंपनी इथे स्थापन झाली. त्यानंतर काही वेळा बंद पडून ती पुन्हा सुरू झाली. त्यानंतर इथे व्हिस्कीही चांगल्या प्रकारे तयार केली जात असे, याचे दाखले आहेत. आज त्यांचा काही मागमूसही नाही, परंतु याच भागातील मॉल रोडवर काही त्या काळात बदलीवरच्या अधिकाऱ्यांसाठी चित्रपटगृहे सुरू करण्यात आली होती. ओळीने अनेक अशी चित्रपटगृहे होती. त्यांच्याचमधली एका चित्रपट प्रक्षेपण यंत्रणा इथेच मॉल मार्गावर छान प्रकारे जतन करून ठेवलेली आम्हाला पाहायला मिळाली. स्थानिकांचे वसाहतवादी स्वरूप तुटले, परंतु हातातून सुटून चाललेला वारसा-इतिहास त्यांनी कसोशीने जपण्याचा प्रयत्न चालविला आहे.

मसुरीमध्ये गेल्यानंतर तेथील टेकड्या आणि त्यावर व्यापलेली काँक्रीटची बांधकामे पाहिली की मनामध्ये काही शंका जलद उपस्थित होतातच. विशेषतः उत्तराखंडमधील जोशीमठ या भागाची अनियोजित विकासामुळे ज्या प्रकारे अस्तित्वाची लढाई सुरू आहे. ह्या टेकड्या खचू लागल्या आहेत तशीच पाळी काही वर्षांनंतर मसुरीवर तर येणार नाही ना अशा शंका मनात दाटतात. दुर्दैवाने येथील तज्ज्ञांनी वारंवार इशारा देऊनही सरकारने मसुरीमधील बांधकामांवर नियंत्रण आणण्यासाठी कोणतेही उपाय योजलेले नाहीत. नैनितालमध्ये उच्च न्यायालयाचे खंडपीठ असल्याने अशा बांधकामांवर लगेच हातोडा बसतो. मसुरीकडे मात्र कोणाचे लक्ष नाही. वसाहतवादाचे पंख तुटल्यावर ते अगदीच पोरके झाले आहे. ज्या प्रकारे जोशीमठमध्ये घडले, मोठ्या प्रमाणावरती डोंगरशिखरांवर इमारती उभ्या करण्यात आल्या. तेथील सांडपाणी व्यवस्था निकामी झाली.

डोंगर मोठ्या प्रमाणावर कापण्यात आल्याने हा संपूर्ण भाग असुरक्षित बनलाय, त्यामुळे आज जोशीमठ कधीही कोसळून पडू शकेल अशी परिस्थिती आहे. जमिनीला आणि रस्त्यांना, इमारतींना मोठ्या प्रमाणावरती भेगा पडलेल्या आहेत. मसुरीचा त्याच दृष्टिकोनातून विचार झाला पाहिजे. येथील बांधकामांवर नियंत्रण यायला पाहिजे एवढेच नव्हे तर यापुढे बांधकामे किती प्रमाणात होऊ द्यावी या संदर्भातही काही निर्बंध लागू होण्याची गरज आहे. नुकत्याच जोशीमठासंदर्भात पर्यावरणीय अभ्यास हाती घेण्यात आलेला आहे त्यातून तेथील भीतीदायक परिस्थिती सामोर आली आहे. ताबडतोब जर काही उपाय योजले नाहीत तर जोशीमठमधील परिस्थिती आणखी वाईट होईल. या अभ्यासानुसार भूकंपप्रवण क्षेत्रांमध्येच हा संपूर्ण भाग येतो. पुढच्या काही काळात जर एखादा भूकंपाचा मोठा धक्का बसला तर जोशीमठ संपूर्णतः भूस्खलन होऊन खाली येऊ शकेल. तशीच काहीशी परिस्थिती मसुरीची होऊ शकते असा इशारा आता तज्ज्ञ देऊ लागले आहेत. हा भाग हिमालयाच्या वरच्या टापूमध्ये येतो. त्यामुळेच हे भूभाग अति तीव्र हवामान बदलांना सामोरे जाऊ शकतात, अशा तऱ्हेचा हा इशारा आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर यापूर्वीही डोंगर खचलेले आहेत. त्यातून मोठ्या दुर्घटना घडलेल्या आहेत.

हिमालयाच्या उंच टापूमध्ये आज घरे किंवा बांधकामे उभारण्यासाठी निर्बंध लागू झालेले आहेत. दुर्दैवाने हे निर्बंध काटेकोरपणे पाळले जात नाहीत. त्याशिवाय रस्ते किंवा पायाभूत सोयी निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती डोंगर कापण्यात आले. मोठ्या प्रमाणावर जंगलतोड हाती घेण्यात आली. मोठ्या प्रमाणावर भुयारी मार्गही या भागात तयार झालेले आहेत. उत्तराखंड येथे मोठ्या प्रमाणावरती जलविद्युत प्रकल्प उभारण्यात आले आहेत. जंगल भागांमध्ये रस्ते तर मोठ्या प्रमाणावर तयार झाले. त्याचा परिणाम आपण जोशीमठ येथे बघतो आहोत. तेथे मोठ्या प्रमाणावरती टेकड्या कोसळू लागल्या. जोशीमठ येथे पहिली मोठी दुर्घटना १९३९मध्ये घडली होती. त्यानंतर १९७६मध्ये जो अभ्यास हाती घेण्यात आला त्यावेळी अशा तऱ्हेचे डोंगर खचण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडतील त्यामुळे बांधकाम आणि बांधकामांवरती निर्बंध लागू करण्याची मागणी करण्यात आली होती.

आपल्या देशात अशा इशाऱ्यांकडे पर्यावरणवाद्यांचे थेर म्हणून पाहण्याची सवय आहे. निसर्गाकडे पाहण्याचा ब्रिटिशांचा वारसा मात्र आपल्याला कधी जतन करता आला नाही. पाश्‍चिमात्त्यांचे सगळे वाईट,अशी एक विचारसरणी आपल्याकडे रुजवली जात आहे, ती आणखीन् वाईट. अतिहव्यासासाठी मसुरीचाही ‘घास’ आपण नजीकच्या काळात घेणारच आहोत!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

IFFI मध्ये Goan Director's Cut चे आकर्षण! सगळ्या गोमंतकीय सिनेमांची माहिती घ्या एका क्लिकमध्ये

Goa Today's News Live: 'कॅश फॉर जॉब प्रकरण'; काँग्रेस युथ पदाधिकाऱ्यांची म्हार्दोळ पोलिस स्थानकावर धडक!

Nagarjuna At IFFI 2024: नागार्जुन यांचा इफ्फीत जलवा! दाखवली नृत्याची झलक; स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाबाबत म्हणाले की..

SCROLL FOR NEXT