Gomantak Bhandari Samaj Dainik Gomantak
ब्लॉग

Bhandari Community Goa: कोणता झेंडा घेऊ हाती? भंडारी समाज

Bhandari Community Goa: गोव्यातील भंडारी समाजाचे बौद्धिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, प्रशासकीय, व्यावसायिक सर्वेक्षण व त्याअनुषंगाने राजकीय अधिकार व निर्णय, सत्तेचे मूल्यमापन अजून झालेलेच नाही.

दैनिक गोमन्तक

Bhandari Community Goa: माझा विरोध आहे; पण मी विरोध करणार नाही, या अगतिकतेतून हा समाज बौद्धिक अस्वस्थतेत गुरफटलेल्या अवस्थेत आहे. या पार्श्वभूमीवर ‘संगीत मानापमान’ चाललेय ते पाहता गालातल्या गालात हसणारे आणि भंडारी समाजाचा भांडवल म्हणून ‘टीआरपी’ वाढवणाऱ्यांचे सुगीचे दिवस आलेले आहेत.

तर कधीकाळी आत्मनिर्भर, स्वयंपूर्ण, कृषिसंपन्न समाज मात्र सुगीच्या दिवसांत जमिनीपासून आणि पर्यायाने संस्कृतीपासूनही तुटून विवेक अभाव बौद्धिक दिवाळखोरीत जात असतानाच या समाजाला समाजभान निर्माण करू देणारी माणसे फेकून दिली जाताहेत किंवा त्यांच्या आर्त हाका विविध राजकीय झेंडे, वृथाभिमानाचे न शोभणारे व न पेलणारे फेटे, डोळस वृत्तीलाच नाकारणारे गॉगल्स घालून रस्यावर ढोल बडवणारे व हाती दिलेले विविध रंगांचे झेंडे घेऊन हा बहुसंख्य कोंकणी समाज दिशाहीन होत जाताना सामूहिक यातना होतात.

सामूहिक पुरुषार्थ हवा

गोव्यातील भंडारी समाजाचे बौद्धिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, प्रशासकीय, व्यावसायिक सर्वेक्षण व त्याअनुषंगाने राजकीय अधिकार व निर्णय, सत्तेचे मूल्यमापन अजून झालेलेच नाही. सामूहिक पुरुषार्थ जागा करण्यासाठी सामूहिक स्वाभिमान जागा झाला पाहिजे. त्यासाठीच शिक्षण संघटन आणि संघर्ष अटळ आहे, याचे काळभान व मूल्यभान ठेवून नियोजनबद्धरीतीने काम करण्याची गरज आहे. असे नियोजित कार्यक्रमानुसार निरपेक्ष काम करणाऱ्यांची कुवत व संख्या लक्षणीय आहे, हे त्यांच्या समाजोत्तर कार्यातून बघता येते.

अधिकार व निर्णय सत्ता महत्त्वाची

राजकीय पद, अधिकार सत्ता व निर्णय सत्ता या एकामेकांशी संबंद्धित आहेत. मुक्तीनंतरच्या राजकीय सत्तेचे या समाजाचे वरील तीन घटकांच्या संदर्भात काटेकोर मूल्यमापन केल्यावर या तीन घटकांच्या बाबतीत बरीच तफावत व विरोधाभास दिसून येतो. आपल्या अधिकार सत्तेत जी निर्णय व्यवस्था नियोजित वेळेत पेरली गेली त्याचे आकलन व अगतिकता ही निश्चितच अस्वस्थ करणारी आहे. हा चक्रव्यूह भेदण्याची क्षमता आपण कशी निर्माण करणार आहोत, याकडे आपला कल हवा.

मंडल आयोगाची अंमलबजावणी व आव्हाने

जवळच्या महाराष्ट्र राज्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रात सामाजिक प्रबोधनाचे फार मोठे कार्य करीत बहुजन समाजातील घटकांना जागृत केले. अगदी कालपरवाची मराठ्यांची महाकाय सभा बघितल्यावर एक प्रेरणा आपण घेऊ शकतो आणि आपल्या अधिकारांबरोबरच घटनात्मक कर्तव्यांचे पालन करून या समाजाला निश्चित दिशा दाखवू शकतो. मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार आपण काय साध्य केलंय? याचा शोध आणि बोध घेता येईल का? आर्थिक मागास घटकाचे निकष पूर्ण करून आरक्षण मिळविलेल्यांचे सामाजिक सर्वेक्षण एक नमुना अभ्यास म्हणून कोणी करू शकतो का?

बटाटवडा, पाव, पाण्याची बाटली व नोट

वरील उपशीर्षक भंडारी समाजासाठी वापरता येते का? या प्रश्नाचे उत्तर भंडारी आपला वापर करू देतो का? या स्वतःलाच केलेल्या प्रश्नात आहे. विविध पक्षांतील इतर चतुर तसेच भंडारी समाजातील धूर्त धुरिणांनी ‘गरीब, बिचारी कुणीही हाका’ या उक्तीप्रमाणे या समाजाचा वापर करून घेतला आहे. या समाजासाठी सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी साडेपाच हीच कार्यालयीन वेळ माहीत असते. आपले कल्याण करणारे वेळापत्रक त्यांना या कार्यालयीन वेळापरिपत्रकाबाहेर आहे हे पुराव्यानिशी पटवून देण्याची वेळ आली आहे.

फक्त देवमाणूस नको!

देवाने सांगणे आणि देवाला सांगणे, या दोन परस्पर संकल्पना आहेत. बहुसंख्य भंडारी समाज हा लोकतत्त्वीय अधिष्ठान मानणारा आहे, त्यामुळेच त्याच्या श्रद्धेवर काहीजणांकडून नियोजनबद्धरीतीने सांस्कृतिक आक्रमणे करून त्यांना लोकतत्त्वीय अधिष्ठानापासून तोडून त्यांचे मतपरिवर्तन व मनपरिवर्तन करण्याचा घाट घातला जातोय. हा समाज आपल्याला माथेफिरू होऊ देता कामा नये. कुठलाही झेंडा किंवा अजेंडा हाती घेताना आपण सावध असायलाच हवे. फक्त देवमाणूस नको. ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी’ म्हणणारा डोळस श्रद्धेवर भर देणारा तुकराम आपल्याला हवाय.

भंडारी समाजाचा इतिहास लिहिण्याचे आव्हान

आपण इतिहास घडविण्यात असतो; पण आपण तो लिहून मात्र ठेवण्यात महाआळशी व बेफिकीर असतो. अर्थात हे सर्वच बाबतीत सत्य असते असेही नाही. प्रसंगानुरूप आपण त्याची नोंद घेतलेली आहे. भंडारी समाजाची व्युत्पत्ती गोव्यातील त्यांचे स्थान व कर्तृत्व याविषयी अनेक अभ्यासकांकडून लिहिले गेलेले आहे. बा द. सातोस्कर, शणै गोंयबाब, संदेश प्रभुदेसाय, युगांक नायक, विष्णू वाघ तसेच साप्ताहिक विवेकचा भंडारी विशेषांक, गोमन्तक भंडारी समाजाचे विशेषांक, विद्यापीठ अभ्यासातील काही संदर्भ वगळता या समाजाचा समग्र वस्तुनिष्ठ अभ्यास अजून होत नाही, ही आमची बौद्धिक दिवाळखोरीच म्हणावी लागेल. निदान आपण भंडारी परिचय कोष निर्माण करू शकतो ना? भंडारी समाजातील उच्च शिक्षितांनी याकामी स्वयंपूर्ण पुढाकार घ्यावा, ही इच्छा व्यक्त करण्यात काय गैर आहे?

जमीन, भाषा आणि संस्कृती टिकविण्याचे आव्हान.

साहित्य अकादमीच्या कार्यक्रमात सिंधी भाषक लोक भेटतात त्यावेळी ते एक गोष्ट प्रकर्षाने आम्हाला पटवून देतात की निदान तुम्ही तुमची जमीन राखून ठेवण्यात यशस्वी ठरलात. प्रादेशिक अस्मिता ही जमीन, भाषा, संस्कृतीशी निगडित असल्याने तिचे जतन, संवर्धन करणे हे बहुसंख्य भंडारी समाजाचेही कर्तव्य आहे, हे समाजभान असणे महत्त्वाचे आहे. तपोभूमीचे पीठाधीश पद्मश्री ब्रह्मेशानंद स्वामी यांच्याकडे एका अनौपचारिक चर्चेवेळी बोलताना ते म्हणाले, आपली मूळ संस्कृती कुठली याचा मुळाहून शोध घेतला पाहिजे. संक्रमण अवस्थेत आपण आपल्या मुळांचा शोध घेणार की मुळापासून उपटून जाणार?

- प्रो. डॉ. प्रकाश वजरीकर, वजरी, साखळी-गोवा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

Goa Baby Day Care Centre: नोकरदार पालकांसाठी खुशखबर! गोव्यात ९ ठिकाणी सरकारतर्फे पाळणाघर; केंद्रांची यादी, नियमावली वाचा

U19 Cooch Behar Trophy: द्विशतकी भागीदारीनं गोव्याला सतावलं, ॲरन-सिद्धार्थच्या शानदार खेळीच्या जोरावर हैदराबादनं गाठला मोठा टप्पा

Indian Super League 2024: ०-१ ने पिछाडीवर असलेल्या सामन्यात एफसी गोवाचं जबरदस्त कमबॅक, 'पंजाब'ला 'दे धक्का'

Goa Live Updates: २८ कोटीच्या इफ्फी खर्चाबाबत मुख्यमंत्र्यांनी खुलासा करण्याची गरज; आणि गोव्यातील काही रंजक बातम्या

SCROLL FOR NEXT