राजेंद्र पां. केरकर
दिवा हे प्रकाश आणि तेजाचे प्रतीक असून, दिवसा आकाशातल्या सूर्यामुळे मानवी जीवनात प्रकाश आणि तेजाचे आगमन झाले. परंतु रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात जेव्हा आकाशात चंद्राचे आगमन होते.
तेव्हा पौर्णिमेच्या दिवशी टिपूर चांदण्याची बरसात होऊन, मानवाला आल्हाददायकता लाभते. परंतु त्यानंतर प्रत्येक रात्रीला चंद्राचे चांदणे क्षीण होत जाते आणि पंधरावड्यानंतर अमावस्या आल्यावरती काळोख परिसराला झाकोळून टाकतो.
आणि अशावेळी माणसाला जेव्हा कृत्रिम रित्या निर्माण होणार्या प्रकाशाची गरज भासली तेव्हा त्यांच्या जीवनात दिव्यांचे पदार्पण झाले. कालांतराने त्याने गरजेनुसार वेगवेगळ्या आकाराचे दिवे तयार केले आणि सण, उत्सवाप्रसंगी त्यांच्या उपयोगास प्राधान्य दिले. भारतीय धर्म आणि संस्कृती प्रकाश पूजक असल्यानेच, या मातीतून उदयास आलेल्या सर्व धर्मांनी दिव्याला विशेष महत्त्व दिलेले आहे.
माती, दगड, धातू, पीठ अशा नानाविविध घटकांचा वापर करून दिवे प्रकाशमान करण्यात इथल्या लोकमानसाने धन्यता मानली. तेल, तुप, चरबी आदींचा उपयोग करून पेटवले जाणारे दिवे प्रकाश आणि उष्णता देत असतात.
मंदिर, देव्हारा, तुळशी वृंदावन, स्वागतकमानी आणि दरवाजाचे कोनाडे येथे दिवे प्रकाश निर्माण करण्यासाठी लावले जातात आणि संध्याकाळच्या वेळेत दिवा लावून, त्याला नमस्कार करण्याची परंपरा आपल्या संस्कृतीत रुढ आहे. माती आणि दगडाच्या विविध आकारातल्या पणत्याचा वापर करण्याबरोबर तांबे, पितळ,
चांदी आदी धातूच्या समई किंवा निरांजने वापरली जातात. मंदिराच्या गाभाऱ्यात अहोरात्र तेवणारा नंदादीप शुभदायी मानलेला आहे. दिवा हे अग्नीचे व तेजाचे रूप असून, नवाश्म युगात अग्नीच्या शोधामुळे मानवी जीवनात विलक्षण क्रांती आली. सुरुवातीच्या काळात दगडाचे किंवा शिंपाचे दिवे, वापरले जाऊ लागले.
दीपपात्राचा आकार अर्ध्यपात्रासारखा असे व त्याला एका बाजूला वात पेटवण्यासाठी चोच केलेली असे, असा दिवा पणती म्हणून लोकमान्य झाला. कालांतराने दिव्याच्या आकाराला कलाकुसर आली आणि त्यामुळे कुठे पशुपक्ष्याच्या, माशाच्या आणि लावण्यवती स्त्रिया मुखकमलांच्या आकारात दिवे समूर्त होऊ लागले. दीपमाला प्रज्वलित करण्यासाठी दीपमाळा लाकडाच्या, दगडाच्या स्तंभ स्वरुपात तयार झाल्या. या स्तंभावरती विविधांगी नक्षीकाम करून, त्यातून पुढे दीपवृक्षाची संकल्पना निर्माण झाली.
दीपवृक्ष म्हणजे एका स्तंभाला अनेक फांद्या निर्माण करून वृक्षाच्या आकाराचा दीपगुच्छ तयार करण्यात आला. दिवा हे आमच्या संस्कृतीने केवळ प्रकाशाचे आणि तेजाचे प्रतीक मानलेले नसून त्याला बुध्दीचे आणि ज्ञानाचे प्रतिक मानलेले आहे. इतकेच नव्हे तर त्याला आयुष्याशी जोडलेले आहे.
विविध आकारातले दिवे तयार करणारे कारागिर भारतातल्या विविध प्रदेशात निर्माण झाले. परंतु असे असले तरी गोवा, महाराष्ट्रात तांबे, पितळी या धातूपासून वेगवेगळ्या कलाकुसरीने युक्त दिवे तयार करणारे कासार उदयाला आले. गोव्यात लोह,
मॅगनीज सारख्या खनिजाची उपलब्धता असून, तांब्याच्या प्राप्तीसाठी इथल्या कासार समाजाला शेजारच्या कर्नाटक राज्यावरती अवलंबून रहावे लागायचे. राजस्थान, झारखंड, मध्यप्रदेश या राज्यांत तांब्याच्या खाणी असून, गोवा, महाराष्ट्रातल्या कासारांना तांब्याची भांडीकुंडी, दिवे करण्यासाठी अन्य राज्यातून जे तांबे आणले जायचे, त्याच्यावरती अवलंबून रहावे लागे.
प्राचीन काळात पश्चिम सागर किनाऱ्यावरती वसलेला गोवा देशविदेशाशी जोडल्या गेलेल्या जलमार्गांशी संबंधित असल्याकारणाने सोनार, लोहार, कुंभार आदी कारागिरांप्रमाणे गोव्यात कसारांची पूर्वापार वस्ती होती, डिचोली तालुक्यात असलेल्या लांटबार्सेतले कासारपाल आणि पेडणेतले कासारवर्णे गाव.
एकेकाळी इथे वास्तव्यास असणाऱ्या कासारांची प्रचिती आणून देते. पितळी, तांबे यांच्यापासून विविध तऱ्हेचे दिवे इथले कासार तयार करत होते. विविध भागांतून येणाऱ्या तांब्याच्या प्राप्तीसंदर्भात जेव्हा अडथळे निर्माण झाले तेव्हा कासारपाल, कासारवर्णे येथील कासारांनी काचेपासून बांगड्या तयार करण्याच्या व्यवसायात लक्ष केंद्रित केले. फोंडा येथील केरी काचेपासून बांगड्या तयार करणाऱ्या कासाराच्या वास्तव्यामुळे ‘काकाण केरी’ म्हणून नावारुपास आली.
तांबे आणि पितळीच्या धातूपासून भांडीकुंडी आणि दिवे तयार करण्याच्या कलेत गोव्यात डिचोली शहराने विशेष नावलौकिक मिळवला. कासारपाल, कासारवर्णे येथून स्थलांतरीत झालेल्या कासाराच्या एकंदर कलाकौशल्याला भतग्रामात आश्रय लाभला आणि त्यामुळे इथले पितळीचे दिवे प्रसिध्दीस पावले.
कधीकाळी भाताच्या पैदासीमुळे नावारुपाला आलेली भतग्रामाची भूमी एकापेक्षा एक सुंदर दिव्यांमुळे दिवचल, डिचोली म्हणून नावारुपास आली असावी. गोव्यातल्या मंदिराच्या गाभाऱ्यात आणि लग्नादी मंगलकार्यात उपयुक्त ठरलेला नंदादीप,
समई, पंचारती, एकारत, पणत्या आदी विविध प्रकारच्या पितळी दिव्यांच्या सुंदर, सुबकतेसाठी डिचोलीतल्या कासार समाजाने पूर्वापार लौकिकता मिळवली होती. त्यामुळे १९८७ साली गोवा जेव्हा राज्य म्हणून अस्तित्वात आले तेव्हा राज्यमुद्रेचा विचार करताना, डिचोलीतल्या कासारांनी निर्माण केलेल्या वृक्षदीपाला प्राधान्य देण्यात आले.
सण, उत्सवाप्रसंगी मंदिरासमोर जी दीपमाळ उभी असते, ती प्रकाशमान होऊन भाविकांच्या अंतःकरणात भक्तीभावना निर्माण करण्यास कारणीभूत ठरले आणि त्या दीपमाळेशी साधर्म्य असणारा वृक्षदीपाला गोव्याची राज्यमुद्रा म्हणून सन्मान लाभला.
डिचोलीतल्या कासार कारागिराच्या संकल्पनेतून निर्माण झालेला वृक्षदीप राज्यमुद्रा म्हणून स्वीकारताना भारतीय संस्कृतीने दिव्याला तेज, प्रकाश, बुध्दी आणि ज्ञान यांचे प्रतीक म्हणून जे पूर्वापार स्थान दिलेले आहे ते अधोरेखित केलेले आहे.
ज्ञानाच्या प्राप्तीमुळे माणसाची बुध्दी विकसित होत असल्याने वृक्षदीपाच्या भोवताली माडाच्या आवळ्याची कलाकुसर राजमुद्रेत वापरण्यामागे गोव्यातले सौंदर्य आणि सुबत्ता प्रदर्शित करण्याला प्राधान्य देण्यात आलेले आहे.
वृक्षदीपाच्या वर संस्कृत भाषेतल्या ‘सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्र्चिद् दुःखमाप्रुयात’ या सुभाषिताचा वापर करण्यात आलेला आहे. प्रत्येक जण चांगले पाहो आणि कोणाला दुःखाचा त्रास न होवो असा या सुभाषिताचा अर्थ आहे.
गोव्याच्या राज्यमुद्रेच्या शीर्षस्थानी भारतीय राजमुद्रा वापरण्यात आलेली आहे. भारताच्या पहिल्या प्रजासत्ताकदिवशी सारनाथ येथील ज्या अशोकस्तंभावरती अगदी वरच्या बाजूला चार उभे आशियाई सिंह कोरलेले असून, त्याच्या खालच्या पट्टीवर पूर्वेकडे हत्ती, पश्चिमेकडे घोडा, दक्षिणेकडे बैल आणि उत्तरेकडे एक सिंह कोरलेला आहे. त्याची राजमुद्रा म्हणून स्वीकार करण्यात आलेली आहे.
हे संपूर्ण शिल्प एका उलट्या कमळावर उभे असून, प्रत्येक जोडीमध्ये एक अशोकचक्र कोरलेले आहे. या अशोकचक्राला २४ आऱ्या असून, त्यातून अविरतपणे कार्य करण्याचा संदेश मिळतो.
१९ डिसेंबर १९६१ रोजी गोवा पोर्तुगीजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि त्यानंतर १९६१ ते १९८७ पर्यंत गोवा, दमण आणि दीव संघप्रदेश म्हणून केंद्रशासित राहिला होता. ३० मे १९८७ रोजी, गोवा राज्य म्हणून दमण आणि दीवपासून वेगळे झाले आणि भारतीय संविधानानुसार अस्तित्वात आले.
नव्या राज्याच्या निर्मितीमुळे गोव्याची राज्यमुद्रा ठरवताना इथल्या लोकमानसात दिव्याला जे स्थान आहे आणि या भूमीला हिरव्यागार निसर्ग सौंदर्याचा जो समृध्द वारसा लाभला त्याला महत्त्व देण्यात आले आणि त्यातूनच गोमंतकीयांच्या स्वाभिमानाचा मानदंड म्हणून वृक्षदीपाला राज्यमुद्रेचा गौरव प्राप्त झाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.