सीतायन - वेदना - विद्रोहाचे रसायन'' हे डॉ. तारा भवाळकर यांचे नवे पुस्तक अतिशय वाचनीय, माहितीपू्र्ण व एका दृष्टीने खळबळजनक आहे.
रामायणाकडे लोकगीते, लोककथा यांच्या समग्र लोकवेदाने नेहमीच ''सीतायन'' म्हणून पाहिले आहे. भारतभरच्या सर्व भाषांतील पारंपरिक स्री गीतांतून, जात्यावरच्या ओव्यांतून सीतेविषयी विलक्षण आत्मीय सहानुभाव आहे. रामायणातील सीतेशी भारतीय भूमिकन्यांचे आतड्याचे नाते असावे, अशा जिव्हाळ्याने आणि आत्मोपम्यभावाने स्त्रिया मुखर झालेल्या दिसतात.
सर्वत्र समान आढळणारी बाब म्हणजे सीतेविषयी विलक्षण सहानुभूती, कळवळा, आदर आणि ह्या पतिव्रता स्त्रीचा गरोदरपणी त्याग करणाऱ्या रामाविषयी निषेध, अनादर आणि धिक्कार!
राम म्हनु राम, राम नाही सीतेच्या तोलाचा
हिरकणी सीतामाई, राम हलक्या दिलाचा
अशा शब्दांत रामाला दूषण दिले आहे.
भारतीय लोकवेद रामाला हलक्या दिलाचा म्हणतो याचे कारण असे की लंका विजयानंतर राम सीतेचा स्वीकार करत नाही. तो सीतेला उद्देशून म्हणतो, "मी आत्मसन्मानाच्या प्रतिस्थापनेसाठी रावणाचा पराभव केला आहे. तुझी सुटका करणे हा दुय्यम हेतू आहे. रावणाकडे अनेक महिने वास्तव केलेल्या तुझा मी स्वीकार करू शकत नाही. तुझी इच्छा असेल त्याप्रमाणे तू शत्रुघ्नासमवेत राहू शकतेस, सुग्रीव किंवा बिभिषणाबरोबर राहू शकतेस.
शत्रुघ्ने वा सुग्रीवे राक्षसे निवेशम वा बिभिषणे
मनः सीते यथा वा सुखमामना
तुला जिथे सुख वाटेल तिथे तू रहा
लक्ष्मण लवकुशांना त्यांची ओळख विचारतो तेव्हा लोकवेद म्हणतो
लक्षुमण पुसे तुम्ही कुणाचे बाळक
सीतामाई आमची माता, नाही पित्याची ओळख
सीता लवकुशांना घेऊन अयोध्येत येते तेव्हा त्या जुळ्या मुलांना पाहून अयोध्यावासी चकित होतात. जुळ्या मुलांना जन्म देणाऱ्या स्त्रीने दोन पुरुषांशी संग केलेला असला पाहिजे असा तत्कालीन समाजाचा अपसमज होता. त्यामुळे कैकयी सीतेला विचारते
एक पुत्र रामाचा, दुसरा आणलास तू कोणाचा
होतीस वरले वनी संग केला कोणाचा
लक्ष्मण सीतेला वनात सोडायला जातो तेव्हा सीता लक्ष्मणाला म्हणते
सीतामाई म्हने, नव्हं ही माहेराची वाट
तिथं केळीचं बनं, इथं बन दिसते अचार
ही नव्हे माहेराची वाट, इथे बाभळी बन बहु दाट
माझ्या गं माहेराच्या वाटे, केळीचं बन बहु दाट
लोकवेद पुढे म्हणतो
सीता पतिव्रता, नाही रामाला कळलं
वनाच्या वाटेवरी, चाक रथाचं गळलं
डाॅ. तारा भवाळकर यांनी एक अत्यंत दाहक सत्य सांगितले आहे. त्या म्हणतात, "अजूनही मिथिलेची मुलगी अयोध्येच्या मुलाला दिली जात नाही." रामाच्या मनात सीतेविषयी संशय निर्माण करण्यासाठी कैकयी सीतेला रावणाचे चित्र काढण्यास सांगते तेव्हा लोकवेद म्हणतो
चित्र काढिले जानकीने
अंगुष्ठ काढून दाखविला
या परता रावण
नाही मी दृष्टीने देखिला
मी रावणाचा केवळ अंगठा पाहिला आहे. त्याचे तोंड पाहिले नाही. या अंगठ्यावरून कैकयी रावणाचे पूर्ण चित्र काढते व ते सीतेने काढले असे रामाला भासवते. लोकवेद अभ्यासक डाॅ. रा. चिं. ढेरे यांना उद्धृत करून डाॅ. तारा भवाळकर म्हणतात
"भारतातील सीतांची वेदना कधी संपेल? ती वेदना संपण्यासाठी नुसता रावण संपून चालणार नाही तर निष्करुण पद्धतीने सीतेचा विचार करणारा रामही संपला पाहिजे."
आता किमान स्त्रियांनी तरी ''जय श्री राम'' म्हणू नये!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.