सध्या लग्न सोहळ्यांचा मोसम आहे. खरे तर आता लग्नसोहळ्याचे स्वरूपच बदलले आहे. लाखो रुपये या सोहळ्यावर खर्च होत आहेत. लग्न करण्याकरिता एवढ्या पैशांची खरेच आवश्यकता आहे की काय, असे वाटायला लागले आहे. यात खरे म्हणजे लग्नाची नजाकतच लुप्त व्हायला लागली आहे.
कोरोनाने आपल्याला काही चांगल्या गोष्टी शिकविल्या. त्यातली एकच महत्त्वाची गोष्ट म्हणजे डामडौल कमी करा. कोरोनाकाळात लग्न सोहळ्यावर बंधन आले होते. त्या दिवसांत फक्त 40-50 लोकांच्या उपस्थितीत सोहळे उरकून घेतले जात असत.
लग्नसोहळे असेही साजरे करता येतात हे आम्हांला महामारीने शिकविले. उरलेले पैसे पालकांनी नवविवाहित जोडप्यांना दिले. म्हणजे खऱ्या अर्थी हे पैसे सार्थकी लागले. मानवी विवेकबुद्धीला जे सहज सुचले पाहिजे, ते एका लहानशा विषाणूने केवळ सुचवलेच नाही, तर करवूनही घेतले.
खरे तर रजिस्ट्रारकडे जाऊन वधू-वराने सही करणे हेच खरे लग्न असते. कायद्यानेही याच लग्नाला मान्यता असते. मग हा एवढा थाट कशाकरता, हा प्रश्न उपस्थित व्हायला लागतो. हजारो लोकांना बोलविणे, जेवणावळी घालणे, मेहंदी साखरपुडा यासारख्या अनावश्यक बाबींना प्रोत्साहन देणे यातून काय साध्य होते हेच कळत नाही.
त्यात परत आता ‘प्री-वेडिंग’ नावाचे एक भलतेच फॅड जन्मले आहे. यात लग्न विधी होण्याआधीच वधू-वरांना वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन सिनेमासारखे चित्रीकरण केले जाते. लग्नाचे विधी करतानासुद्धा हे चित्रीकरण सुरूच राहते. लग्नसोहळ्यात कधी, काय व कसे करा हे भटजीपेक्षा कॅमेरावालाच जास्त सांगतो. त्या भटजींना बाजूला सारून कॅमेऱ्यावाल्याचे ऐकलेही जाते.
त्यामुळे विधी राहतात एका बाजूला फक्त कॅमेऱ्याकडे बघून कॅमेरामॅनला हव्या तशा ‘पोझ’ द्याव्या लागतात. ‘विधी नको पण कॅमेरा आवर’ अशी परिस्थिती होऊन जाते. यात शास्त्रोक्त विधिवत विवाह व्हावा, संस्कार व्यवस्थित व्हावा, ही जी धार्मिक भावना असते तीच लोप पावायला लागली आहे. ‘संस्कार’ हा मुख्य हेतूच नष्ट होताना दिसत आहे.
मजा म्हणजे एकटा करतो म्हणून दुसरा करायला लागला आहे. कर्ज काढूनसुद्धा हे सोहळे होताना दिसायला लागले आहेत. खरे तर यात हाती काहीच लागत नसते. हा एक किंवा दोन दिवसांचा खेळ असतो. प्री-वेडिंगचे चित्रीकरण तर स्वतः वधूवरसुद्धा पुन्हा आयुष्यात बघत नसतात. काही वर्षांपूर्वी लग्नाच्या सोहळ्याचे व्हिडिओवर चित्रीकरण केले जायचे.
पण नंतर या कॅसेट वाळवी लागून बाद व्हायला लागल्या. हे पाहता आपण निरर्थक खर्च करतो हे सिद्ध होते. सध्या या प्री-वेडिंगवरच लाखो रुपयांचा खर्च होतो. ‘पैसे माझे आहेत मी हवे तसे खर्च करेन’ असे म्हणणारे लोक आहेत. पण, यामुळे सवंगपणा येतो. त्याला कोण जबाबदार? याबाबतीत हल्ली झालेल्या माझ्या एका मित्राच्या मुलीच्या लग्नाचे उदाहरण देता येईल.
चांगली परिस्थिती असूनसुद्धा त्याने आपल्या मुलीचे लग्न अगदी कमी खर्चात केले. या लग्नात कोणताच फापटपसारा नव्हता. उरलेले पैसे त्यांनी एका समाजसेवी संस्थेला वधू-वरांच्या नावाने दान केले. हाच सकारात्मक दृष्टिकोन प्रत्येकाने अंगीकारला पाहिजे.
अर्थात त्याकरता वधूवर पक्षाने एकत्र यायला पाहिजे. लग्न म्हणजे दोन मनाचे मीलन असते हे विसरता कामा नये. म्हणूनच त्यात बटबटीतपणा येता कामा नये. याकरता माझ्या मित्राचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवले पाहिजे. असे जेव्हा व्हायला लागेल तेव्हाच ते खऱ्या अर्थाने लग्न ठरू शकेल हेच खरे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.