डॉ. मधू घोडकिरेकर
धार्मिक सलोखा हा विषयच मुळी अर्धा भरलेला ग्लास व अर्धा रिकामा असा आहे. परक्यांविरुद्ध आम्ही एकशेपाच अशी स्थिती सर्वच धर्मांमध्ये आहे. घटनेमागे धर्माचे कारण असेल, तर ते नेमकं कारण काय हे समजून घेण्यासाठी हजारो वर्षांचा आशय समजावा लागतो.
रूडॉल्फ हिटलरने वर्णद्वेषाला एका भलत्याच उंचीवर (अर्थात नकारात्मक दृष्टीने) नेऊन ठेवले. त्यांनी पहिल्या विश्वयुध्दानंतर ‘माझा लढा’ या आत्मचरित्रात ज्यू विषयीच्या वर्णद्वेषासाठी आपले स्पष्टीकरण दिले आहे.
पुढील काळात नाझी पक्ष सत्तेत आल्यावर त्याने लाखो ज्यू नागरिकांचा नरसंहार केला. आपल्या आत्मचरित्राच्या ‘वंश व लोक’ या प्रकरणात हे स्पष्टीकरण दिले आहे. त्याच्या मते वर्णभेद हा निसर्ग समतोल राखण्यासाठी निसर्गानेच केलेला नियम आहे.
म्हणून जे उच्चवर्ण आहेत, त्यांचे कनिष्ठ वर्णाशी संकरण होऊ नये. त्यासाठी ते स्वतःच्या आर्य वंशाचे समजतात, त्या आर्य वर्णाचेच उदाहरण देताना ते म्हणतात, ‘जेव्हा जेव्हा आर्यानी कनिष्ठ वंशाशी संकर केला, तेव्हा या श्रेष्ठ संस्कृतीच्या लोकांचा (आर्याचा) ऱ्हास झाला. उत्तर अमेरिकेतील लोक प्रामुख्याने ब्युटोनिक आहेत.
त्यांचा कनिष्ठ वंशाशी कमी प्रमाणात संकर झाला आणि म्हणून मध्य व दक्षिण अमेरिकेपेक्षा आपणाला तेथे निराळ्याच गुणधर्माचे आणि सुधारणेचे वास्तव दिसून येईल. म्हणूनच ट्यूटोनिक लोकांचे उत्तर अमेरिकेवर वर्चस्व राहिले आहे. रुडॉल्फ हिटलरच्या स्वतःच्या तत्त्वज्ञानातून ‘वंशभेद’ व ‘धर्मवाद’ असे दोन विवाद समोर येतात.
श्वेत-अश्वेत असे थेट रंगभेदी वर्ण; तर युरोपियन (कोकंशिन) व आशियाई (मंगोलियन) असे देहयष्टीवर आधारित दोन जागतिक वर्ण. या लोकांच्या स्थळाकारावरून अनेक उपवर्ण तयार झाले. प्रत्येक उपवर्णाची नाळ शेवटी मूळ वर्णाशी जोडली जाते. ज्यू धर्मकर्त्यांनी जेजू ख्रिस्तचा का अंत केला याचीही नाळ याच गोष्टीकडे नेतात.
ते म्हणतात की, जेजू ख्रिस्त हे आर्यवंशात होते म्हणून ज्यू धर्मगुरूंची कर्मपद्धत त्यांना आवडली नाही, त्याचा विरुद्ध आवाज उठविला व ज्यू धर्मगुरूंनी त्याचा आवाज कायमचा बंद केला. हिटलर ख्रिश्चन धर्माला मानत होते पण पाद्र्यांच्या राजकारणात ढवळाढवळी त्यांना आवडत नव्हती. या लेखाचा विषय ‘गोमंतकीय धार्मिक सलोखा’ असा असताना जर्मनीच्या हिटलरची येथे चर्चा का हा प्रश्न येतोय.
हिटलर ही वंशप्रेमाचा उद्रेक करणारी एक प्रतीकात्मक व्यक्ती ठरली आहे. आर्य लोकांचे भारतातील कथित अतिक्रमण (हवं तर स्थलांतर म्हणूया) व येथील मूळ संस्कृतीवर त्यांचा प्रभाव यावर स्वतंत्र इतिहास उपलब्ध आहे.
जर्मनीप्रमाणेच आज भारतात आर्य हा स्वतंत्र धर्मवर्ण राहिलेला नाही. पण काही जाती समुदाय आपण आर्यवंशीय असल्याचे मानतात. या वंशीय अभिमानाचा पगडा आजही इतका जबरदस्त आहे, आजही इथल्या घराघरांत हिटलरचे भूत आईबाबांच्या मानगुटीवर बसते.
एरव्ही जातीभेद कसा वाईट आहे असे लोकांना सांगणारे हे आईबाबा आपला मुलगा किंवा मुलगी कनिष्ठ जातीच्या मुला-मुलीशी लग्न करू पाहते हे समजल्यावर हिटलरसारखे निष्ठुर होतात. हिटलरने लाखो ज्यू लोकांचा जीव जर्मनीत घेतला. पण, आजही भारतात हजारो जीव या वंश अभिमानापोटीजातात.
जागतिक धर्मीकरण
आतापर्यंत जी जागतिक स्तरावरील चर्चा केली, त्यावरून एक गोष्ट समोर येते की, व्यक्तिगत स्तरावर असो वा राष्ट्रीय स्तरावर वा आंतरराष्ट्रीय स्तरावर असो! आपण जी काही भूमिका घेतो त्याचे मूळ मानसशास्त्र हजारो वर्षांमागे जाते.
जागतिक समाज रचनाच अशी आहे. शे-पाचशे वर्षात यासंबंधीचा मानव स्वभाव बदलू शकत नाही. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आपण मूळ गोमंतकीय जेव्हा युरोपियन राज्यकर्ते धर्मप्रेमापोटी धर्मविस्ताराच्या महत्त्वाकांक्षेने आंधळे झाले होते, तेव्हा पोर्तुगीजाच्या रूपात ते आपल्या गोव्यात पोहोचले.
धर्मसक्तीचे हिटलरी अमानुष छळ तीनशे साडेतीनशे वर्षे चालविला. सक्ती म्हणा वा आमिष दाखवून त्यांनी स्वतःचा ख्रिश्चन धर्म येथे पसरविला. पण युरोपियन वंश येथे टिकला नाही. हिटलरचे वंशप्रेम व पोर्तुगीज धर्मप्रेम, दोन्हीही चुकीचेच; पण विरुद्ध प्रकारच्या मानसशास्त्राचे अमुक एका वंशामुळे आपला मूळवंश संपला, बाकी राहिला तर उरला सुरलाही संपेल म्हणून या वंशाला जगातून संपवायची ही हिटलरी मानसिकता.
तर, तुमचा वंश कुठलाही असू दे, जगायचे असेल तर आपल्या धर्माने जगा ही सालाझारी मानसिकता हिटलरच्या क्रुरतेमुळे विरळीत असलेले ज्यू एकत्र आले, स्वतःचा छोटासा देश तयार केला. वंशप्रेमातून देशप्रेमाचे उत्तुंग उदाहरण ते जगाला देत आहेत. येथे याच वंश अभिमानामुळे गोव्याचा पोर्तुगाल झाला नाही.
गोव्यातील धर्मांतरित ख्रिश्चनांच्या वंशप्रेमापुढे रोमलाही हात टेकावे लागले. ज्या धर्मात मूर्तिपूजा वर्ज्य आहे त्याच धर्मातील गोवेकर सातेरीची पूजा करावी तशी सायबिणीची पूजा करतात. येथे अजूनही धर्मांतर पूर्व जाती मानल्या जातात. हे चर्च शिकवणीच्या विरुद्ध आहे; पण डोळ्यासमोर दिसतात.
धर्मगुरू काहीच करू शकत नाहीत. गोव्यातील समाजरचनेकडे पाहता, स्थलांतर, अतिक्रमण, धर्मांतर या जागतिक पातळीवर घडलेल्या सगळ्याच स्थित्यंतरांचे प्रतिबिंब येथे दिसते. येथील कुळागरातील जमीन रचना पाहा, येथील मोठमोठी आंब्यासारख्या लागवडीची झाडे पहा, या सर्वांचे वय सहज तीन ते चार हजारापर्यंत पोहोचते.
येथल्या चर्च इमारती किंवा ख्रिश्चन बांधवांची घरे पाचशे वर्षांच्या आतील आहे. काही आदिवासींची घरे हजार वर्षे वयाची आहेत. यातूनच गोमंतकीयाचा एक वंश तयार झाला आहे. ज्यू लोक कुठेही असले तरी इस्रायल संकटात असेल तर आहे तिथून इस्रायलकडे धाव घेतात, त्याचप्रमाणे केरळपर्यंत जाऊन स्थायिक झालेले गोमंतकीय आपले मूळ शोधत कमीत कमी आपल्या कुलदैवताकडे तरी पोहोचतात.
आशय व आभास
धार्मिक सलोखा हा विषयच मुळी अर्धा भरलेला ग्लास व अर्धा रिकामा असा आहे. परक्यांविरुद्ध आम्ही एकशेपाच अशी स्थिती सर्वच धर्मांमध्ये आहे. घटनेमागे धर्माचे कारण असेल, तर ते नेमकं कारण काय हे समजून घेण्यासाठी हजारो वर्षांचा आशय समजावा लागतो.
तेवढा आशय शोधून काढण्याइतपत कुणाकडे हल्ली वेळ नाही. धार्मिक सलोख्याची चर्चा व चिंता व्यक्त होत आहे ती आभासी माध्यमातून. या आभासी माध्यमातील चर्चेतील चर्चेचा सूर घटना क्रमिक व्यक्ती, क्रमिक बदलत राहतो.
इस्रायल पॅलेस्टीन वादात ज्याला इस्रायलरूपी ज्यू जवळचा वाटतो त्याला इंग्रजरूपी इंग्लंडच्या विरुद्ध हिटलर जवळचा वाटतो. खरे तर ज्यू लोकांबद्दल ज्याला सहानुभूती वाटते, त्यांना हिटलरचा तिरस्कार वाटायला हवा. पण तसे होत नाही. कारण त्याला आर्यवंशावरचे प्रेम जवळचे वाटते.
एकंदरीत यामागचा आशय काय याचे आभासी जगात आपली ‘टिवटिवाट’ करणाऱ्याला देणे घेणे नसते. त्यांची आपलेपणाची व्याख्या व्यक्तीनुरूप व घटनानुरूप बदलते. तात्पुरते सांगायचे झाल्यास आजच्या घडीला आपण जो आपला धर्म मानतो आहे तो कधीतरी आपण अंगीकारला आहे.
आम्हा सर्वांना स्वतःचा वंश आहे, त्यानुसारच आपली स्वभावघडण तयार झाली आहे. संघर्षाची वेळ येते तेव्हा हा वंशस्वभाव नकळत उफाळून येतो. सोशल मीडियावर आभासी संघर्षातही त्याचे दर्शन घडते आहे. खरेच विषय विचार करण्यासारखा आहे, विचार करून पाहा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.