रेती, जांभा दगड व रबल यांची टंचाई आहे. असे असले तरीही, आधुनिक तंत्रज्ञानाने आपल्याला काही पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. ज्यांचा वापर आपण उपयुक्ततेनुसार करू शकतो. आज गोव्याच्या बांधकाम क्षेत्रात तीन मुख्य कच्च्या मालांची पूर्ण टंचाई झाली आहे. ते म्हणजे रेती, जांभा दगड व रबल.
तिन्हीच्या उत्खननाने पर्यावरण बाधित होत असल्याच्या कारणामुळे कायदेशीर प्रतिबंध लागलेला आहे. त्यामुळे, अख्खे गोव्याचे बांधकाम क्षेत्र अडचणीत आलेले आहे. म्हणून यावर आपण पर्यायी साहित्य काय व कसे वापरू शकतो हे वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा लेखनप्रपंच.
१) रेती
रेती किंवा वाळूचा उपयोग बांधकामात अपरिहार्य आहे. ती जवळपास सर्वत्र वापरली जाते. नैसर्गिक रेती नदीच्या पात्रातून उत्खनन करून काढली जाते. समुद्रकिनाऱ्यावरची वाळू सहसा वापरली जात नाही, कारण ती खारट असते व लोखंड गंज पकडू शकते.
सध्या गोव्यात रेती उत्खनन करायला पूर्ण बंदी आलेली आहे. नाही म्हणायला महाराष्ट्रातून चांगली दर्जेदार रेती येते, पण ती पुष्कळ महाग असते. त्याशिवाय तिला जोरदार मागणी आल्यामुळे ती मिळायलाही खूप वेळ लागतो.
त्यामुळे रेतीला तांत्रिकी पर्याय काय आहेत ह्याची आपण शहानिशा करू:-
रेती हा रासायनिकदृष्ट्या सुप्त पदार्थ आहे. ती सिमेंटसारखी कुठल्याही रासायनिक प्रक्रियेने भाग घेत नसते. तिचे काम आहे अक्षरशः पोकळ जागा भरून काढणे व सिमेंट वाचवणे. शुद्ध निव्वळ सिमेंट तांत्रिकदृष्ट्या स्वतंत्र हाताळले जाऊ शकत नाही व त्याला चांगली सुसंगत यायला रेतीची जोड लागते. पण, नैसर्गिक रेतीच्या जागी कसल्याही पद्धतीचा पदार्थ चालतो.
फक्त तो त्याच आकारमानाचा असला पाहिजे (4.75 मिलिमीटर किंवा लहान). त्याच्यात काही हानिकारक घटक असता कामा नये. त्यात कमीत कमी गाळ व रासायनिकदृष्ट्या एकदम सुप्त व निष्क्रिय असला पाहिजे. तंत्रज्ञानाची प्रगती झाल्यामुळे, पाषाणी खडक फोडून त्याचा चुरा करण्याची अद्ययावत यंत्रे आता बाजारांत उपलब्ध आहेत.
त्यामुळे पाषाणी खडकाचा रेती एवढा चुरा केला जाऊ शकतो व तो रेतीच्या जागी पर्याय म्हणून चांगल्या शास्त्रोक्त पद्धतीने वापरला जाऊ शकतो. याला चुरा केलेली किंवा उत्पादित रेती म्हणतात. हे वापरायचे अनेक फायदे आहेत. एकूण एक यंत्राद्वारे खडक फोडून केली असल्यामुळे त्याच्यात कसला गाळ, घाण, कचरा किंवा क्लोराईड व सल्फेटसारखे विघटक क्षार असत नाहीत.
फक्त तिचा सूक्ष्म आकार व भौतिक गुणधर्म सर्वसाधारण रेतीपेक्षा किंचित वेगळ्या पद्धतीचे असल्याकारणाने तिच्या मिश्रणाची संरचना थोड्या वेगळ्या पद्धतीने हाताळावी लागते व ते सहज शक्य आहे. असली रेती लोखंडयुक्त काँक्रिटात वापरल्याने गंजण्याची प्रक्रिया पण कमी होऊन जाते.
२) जांभा दगड
दुसरे गोव्याच्या बांधकामात सर्रास वापरले जाणारे साहित्य म्हणजे जांभा दगड. याला इंग्रजीत लॅटराइट स्टोन किंवा कोकणीत चिरा म्हणतात. चिरा हा किनारी क्षेत्रांतच उपलब्ध असतो. त्यामुळे, अनंत काळापासून गोव्यात सगळी बांधकामे चिऱ्यानेच केली जातात.
मग, तो पुरातन किल्ला व चर्च असो किंवा अद्ययावत इमारत. पण हल्लीच त्याचे उत्खनन प्रतिबंधित झाल्याने तो एकदम महागला असून त्याचा दर आवाक्याबाहेर गेलेला आहे. यालाही पुष्कळ पर्याय उपलब्ध आहेत व ते खालीलप्रमाणे आहेत.
अ) काळ्या विटा (फ्लाय ॲश ब्रिक्स)
गोव्याच्या सर्वसाधारण मातीच्या विटांचा दर्जा एकदम खराब असतो. गोव्याची माती विटा करायला पोषक नाही. त्या मानाने घाटावरचा विटा एकदम चांगल्या दर्जाच्या असतात. पण ही सगळी उणीव आता या काळ्या विटांनी भरून काढलेली आहे. त्यात कोळशाची भुकटी (फ्लाय ॲश) घालून त्या भक्कम व मजबूत बनवलेल्या असतात.
त्यामुळे त्या सहसा फुटत नाहीत व पाण्यात पण विरघळत नाहीत. त्या आतल्या किंवा बाहेरच्या भिंतींना सहज वापरल्या जाऊ शकतात व ह्यांच्यावर 3 मजल्या पर्यंत भारवाहक (लोड बेअरिंग) इमारत बांधली जाऊ शकते.
ब) पोकळ चिरे ( हॉलो ब्लॉक)
हे आतून पोकळ असतात, त्यामुळे वजनाने हलके असतात. हे काँक्रीट किंवा मातीचे असू शकतात. हे वापरण्याचे अनेक फायदे आहेत. ते म्हणजे कमी वजनामुळे संरचनात्मकतेत बचत होते.
तसेच पावसाचे पाणी आत झिरपण्यास प्रतिबंध होतो व ओलसरपणा येत नाही व कुठल्याही ऋतूत आतील हवामान चांगले नियंत्रित होते. ह्याचा एकच तोटा म्हणजे विजेची किंवा पाण्याची पाईप यात बसवली जाऊ शकत नाही,जशी ती भरीव भिंतीतून कापून बसवली जातात व यांच्यावर भारवाहक इमारत बांधली जाऊ शकत नाही.
क) काँक्रीट/मातीचे अखंड चिरे
हे सर्वसाधारण काँक्रीटपासून किंवा स्थिर संकुचित मातीपासून बनवलेले असतात. त्यामुळे चांगलेच जड असतात (2,000 ते 2,400किलो/घनमीटर). यामुळे इमारतीचे वजन वाढून तिला संरचनात्मकतेत जास्त लोखंड लागते. फक्त यांचा मुख्य फायदा म्हणजे ते जागच्या जागीसुद्धा छोट्या सुटसुटीत यंत्राद्वारे सहज बनवले जाऊ शकतात व भार पेलण्याची शक्ती बऱ्यापैकी असते.
ड) हलके चिरे
हलके चिरे ही एक अद्ययावत तंत्रज्ञानाची करामत आहे. त्यांना इंग्रजीत लाइट वेट ब्लॉक म्हणतात. त्यांचे वजन अवघे 450 ते 650 किलो/ घनमीटर असते, जे चिर्याच्या मानाने फक्त 25% व काँक्रीटच्या मानाने फक्त 20% आहेत व भार पेलण्याची क्षमताही भरपूर असते. हे चिरे पाण्यावर तरंगतात व महाग असतात. हलके चिरे वापरण्यास भरपूर फायदे आहेत.
आपण जर अभियंत्याला जर पूर्वकल्पना दिलेली असली तर आपल्याला इमारतीच्या संरचनात्मक सांगाड्यात भरपूर बचत होऊ शकते. कारण सगळ्या भिंतीचे वजन फक्त २५% भरते. जेवढी इमारत जास्त उंच तेवढी जास्त बचत. त्याशिवाय, त्यांचा दर्जा व त्यांची परिमाणे बिनचूक असतात व त्यामुळे बांधकाम सांधे व गिलावा यावर पुष्कळ सिमेंटची बचत होते.
याशिवाय ते भारवाहक इमारतीत सहज वापरले जाऊ शकतात. म्हणून जरी हे चिरे महाग असले तरी संपूर्ण प्रकल्पावर एकूण एक चांगली बचत पण होते व काम पण चांगल्या दर्जाचे होऊन जाते.
३) रबल
रबल म्हणजे घट्ट जांभा दगडाचे वेडेवाकडे तुकडे जे जास्तीत जास्त इमारतीचा पाया किंवा रस्त्यांवर डांबराच्या थराखाली भरले जातात. भरपूर मागणी असल्यामुळे ते चांगल्या दर्जाचे मिळत नाहीत. मिळतात ते टिकाऊ असत नाहीत. त्याला पर्याय म्हणजे पाषाणी खडकांचे तुकडे जे एकदम शक्तिशाली व टिकाऊ असतात, थोडे महाग असतात, पण सहज उपलब्ध आहेत.
बांधकामाला जो कच्चा माल असतो तो सगळा नैसर्गिकच असतो. पण रेती व जांभा दगड हे पर्यावरणदृष्ट्या जास्त संवेदनशील स्रोतातून आलेले असल्यामुळे आज त्यांच्यावर पुष्कळ प्रतिबंध लागलेला आहे व दुसरा पर्यायी माल वापरणे अनिवार्य ठरलेले आहे.
त्यामुळे आपण हीच संधी घेऊन चांगल्या पर्यावरणपूरक इमारती बनवून पर्यावरणाचे चांगले जतन करू शकतो व बांधकामाचा दर्जा व आयुर्मानसुद्धा वाढवू शकतो.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.