दिवाळीच्या (Diwali) दिवसात दिव्यांच्या आरसीबरोबरच रांगोळ्यांचे महत्त्वही तितकेच असते. दिव्यांभोवती, घराच्या उंबरठ्यावर, तुळशीवृंदावनासमोर रांगोळ्यांचे शुभशकुनी आकार प्रसन्नचिन्हानी दिवसांचे प्रहर सजवत असतात. भारतीय उपखंडात रांगोळीची परंपरा फार जुन्या काळापासून चालत आलेली आहे. चुनखडा, गेरू, तांदळाचे पीठ, रंगीत वाळू, काचमाणी, फुलांच्या पाकळ्या, रंगीत खडे इत्यादी माध्यमातून रांगोळी साकार होते. रांगोळीच्या रचनांना कुठलेही विशिष्ट बंधन नसले तरी बहुतेकदा पारंपारिक रांगोळ्यात पूर्वापार चालत आलेल्या रचनांचाच वापर मुख्यत्वेकरून होतो. ‘बिंदू’ आणि ‘रेषा’ या अगदी सामान्य भौमितिक घटकांचा वापर करून विलक्षण देखण्या रांगोळ्या तयार होऊ शकतात. आपल्या गोव्यात गणेश चतुर्थी आणि दिवाळी हे मुख्य उत्सव आहे ज्यात रांगोळयांना महत्त्वाचे स्थान आहे. दक्षिणेकडच्या राज्यानी तर दर दिवशी सकाळी स्नान विधी आटोपल्यानंतर घरातली स्त्री घराच्या उंबरठ्यावर नेमाने रांगोळीची नित्य नवी रचना साकार करते.
असेही मानले जाते की रांगोळीत वापरण्यात येणारी चुनखडी किंवा धान्ये ही घरात शिरकाव करू पाहणाऱ्या किटाणूना दारावरच्या उंबरठ्यावरच अडवून ठेवतात. अर्थात, रांगोळीच्या उगमाचे हे कारण असले तरी आज रांगोळीने दारात आणि घरात अत्यंत प्रतिष्ठेचे स्थान मिळवले आहे. घरात चित्रकला कुणाला अवगत नसली तरी वर नमूद केल्याप्रमाणे बिंदू आणि रेषा या अगदी मूलभूत आकारांच्या मदतीने घरातला एखादा तरी सदस्य रांगोळीची निर्मिती उत्साहाने करतोच आणि घरातल्या इतरांच्या कौतुकाचा धनीही बनतो.
भारतात अलीकडे ‘संस्कार भारती’च्या रांगोळ्यानी अनेक उत्सवा-समारंभात मानाचे आणि आकर्षणाचे स्थान प्राप्त केले आहे. विद्याप्रबोधिनी शाळेत चित्रकला शिक्षक असलेले मोहन खवणेकर हे अनेकदा रांगोळी कार्यशाळेत इच्छुकांना रांगोळी शिकवतात. ते सांगतात, संस्कार भारतीची रांगोळी पाच बोटांनी रेखली जाते. हाताच्या पाच बोटांपैकी अंगठा हा ताकदवान तर शेवटची करंगळी ही कमकुवत मानली जाते. मधली बोटे हा मधला दुवा असताे. ताकद आणि कमकुवतपणा ही दोन्ही टोके एकत्र आणून आणि मधल्या सामान्य शक्तीला मदतीला घेत, एकमेकांच्या सहकार्याने पुढे जात सुंदर निर्मिती तयार व्हावी असा प्रतीकात्मक अर्थ या पाचबोटी रांगोळी मागे असतो.परंपरागत रांगोळी ही बहुदा एकाच व्यक्तीकडून घातली जाते. मात्र संस्कार भारतीची रांगोळी ही बहुतेकदा संघ अविष्कार असतो. खवणेकर सांगतात, संस्कार भारतीच्या रांगोळीचा विस्तार आपण हवा तितका वाढवू शकतो. एकमेकांच्या सहकार्याने साकार होणारी ही रांगोळी आहे.
संस्कार भारतीच्या रांगोळीत भारतीय संस्कृतीत रुढ झालेली चिन्हे वापरण्यात येतात. रांगोळीत बिंदू जमून येणे महत्त्वाचे असते. तरच रांगोळीचा पुढचा ओघ नीट जमून जातो. खवणेकर सांगतात, रांगोळीची पावडर जाड आणि दाणेदार असायला हवी तरच ती बोटातून नीट ओघळली जाते. बाजारात अशी रांगोळी पावडर ‘पाचबोटी रांगोळी’ या नावाने ओळखली जाते. संस्कार भारतीने रांगोळीच्या अनेक नवीन रचनांची ओळख सामान्य जनांना करून दिली आहे.
खास भारतीय कलाप्रकार असलेल्या रांगोळीचे वैशिष्ट्य आणि सौंदर्य आज इतके मान्यताप्राप्त झालेले आहे की सामान्य घरापासून सुरू झालेली ही कला आज कॉर्पोरेट क्षेत्राने, पंचतारांकित हॉटेलनीदेखील स्वीकारली आहे. रांगोळी या स्वतंत्र कला प्रकाराच्या स्पर्धा असंख्य ठिकाणी आज आयोजित होत असतात. ते सारे स्वागतार्ह आहेच पण अजूनही घरातली कर्ती-सवरती स्त्री आपल्या देखण्या बोटांनी घराच्या दरवाजावर जेव्हा रांगोळी रेखाटते तेव्हा घर शुभ्र स्नेहांकित होऊन जाते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.