गोव्यातील मंगेशी मंदिराचा सर्वात ऊंच दीपस्तंभ

मंगेशी मंदिर लता मंगेशकरांनी बांधले होते अशी चुकीची माहिती देऊन अनेक पर्यटक मार्गदर्शक देशी पर्यटकांची दिशाभूल करतात
Mangeshi temple in Goa
Mangeshi temple in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

मंगेशी येथील मंगेश मंदिर हे गोव्याच्या पर्यटन स्थळांपैकी एक प्रमुख स्थळ आहे. वर्षभरात देशी -विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने या मंदिराला भेट देतात. फोंडा तालुक्यातील प्रियोळ नामक गावात हाडिये नावाचे एक छोटेसे खेडे आहे. या खेड्यातील मंगेशी या ठिकाणी मोहक असे हे मंदिर वसलेले आहे. हे मंदिर लता मंगेशकरांनी बांधले होते अशी चुकीची माहिती देऊन अनेक पर्यटक मार्गदर्शक देशी पर्यटकांची दिशाभूल करतात, ही एक दुर्दैवी गोष्ट आहे. त्यामुळे या मंदिराच्या इतिहासावर प्रकाश टाकणे इथे समर्पक ठरेल.

16 व्या शतकापर्यंत मुरगाव तालुक्यातील कुठ्ठाळी म्हणजेच पूर्वीचे कुशस्थळी किंवा कोठ्ठीकय्या या गावात या मंदिराचे मूळ स्थान होते. मुरगाव हा भाग तत्काली सासष्टी तालुक्याच्या अंतर्गत यायचा. 1560 सालच्या नोव्हेंबर महिन्यात म्हणजेच ‘इन्क्विझिशन’ काळात मूर्तीभंजक वृत्तीच्या पोर्तुगीज मिशनऱ्यांपासून या मूर्तीचे पावित्र्य- विडंबन टाळण्यासाठी आणि ही मूर्ती वाचविण्यासाठी हाडिये - प्रियोळ येथे या मूर्तीचे स्थलांतरण करण्यात आले.

Mangeshi temple in Goa
चांदरच्या शिव मंदिरावरुन गोव्यात मंदिर बांधण्याची विशिष्ट पध्दत प्रचलीत

या काळात पोर्तुगीजांनी त्यांच्या ताब्यात असलेले ‘वेल्हास कॉन्क्विस्तास’ म्हणजेच जुन्या काबिजादीतील तिसवाडी, बार्देश आणि सासष्टी हे प्रदेश अनुक्रमे डॉमिनिकन, फ्रान्सिस्कन आणि जेझुइट यांना दिले होते. ख्रिस्ती धर्माची शिकवण गोमंतकिय जनतेपर्यंत पोहोचविणे आणि धर्मांतरण सुनियोजित व्हावे असे हेतू घेऊन पोर्तुगीजांनी ही खेळी खेळली होती. भगवान मंगेश किंवा मांगिरीश या नामाचा अर्थ पर्वतांची किंवा पर्वतावरील देवता असा घेता येतो. कारण ‘गिरी’ म्हणजेच पर्वत होय. तर, भगवान मंगेशाच्या भक्तांनी रात्रीच्या वेळी गुप्तपणे या मूर्तीला जुवारी नदीच्या पलीकडे तत्काली आदिलशाही राजवटीखाली असलेल्या प्रियोळ या खेड्यात स्थलांतरित केले. प्रियोळ गावच्या कुशीत श्री मंगेशाच्या मूर्तीला सुरक्षित स्वर्ग गवसला.

जानेवारी 1561 मध्ये भगवान मंगेशाची मूर्ती स्थापन करण्यासाठी त्याठिकाणी एक छोटेसे मंदिर बांधण्यात आले. शेवटी समकालीन महालसा मंदिराच्या जनकांनी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहू महाराज यांनी सातारा दरबारातील आपले गोमंतकिय मंत्री श्री. रामचंद्र मल्हार सुखठणकर यांच्या विनंतीवरून 1744 साली भव्य अशा मंदिराची बांधणी केली. वास्तुकलेच्या दृष्टीने हे मंदिर फारच सुंदर आहे. मंदिराला सुबक अशी तळी आहे, नगारखाना आहे त्याचबरोबर मूळकेश्वराचे एक मंदिरही या आवारात स्थित आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराचा भव्य दीपस्तंभ गोव्यातील सर्वात ऊंच दीपस्तंभ आहे. या मंदिराच्या पायथ्याशी आणि मांगिरीश विवाह मंडपाला लागूनच दिनानाथ मंगेशकर यांचे घर होते.

Mangeshi temple in Goa
मांद्रेचे भारत माता मंदिर

पणजीहून फोंड्याकडे येणाऱ्या जुन्या रस्त्याला लागूनच असलेले भव्य प्रवेशद्वार आपल्याला मंगेशी मठाकडे त्याचप्रमाणे विवाह किंवा मुंज करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मंडपाकडे नेते. इथूनच दोहोबाजूंना शुभ्र छोट्या खांबांनी सजलेली लांब खिंडीसारखी छोटीशी वाट काही पायऱ्या काढून मंदिराच्या फाटकापर्यंत पोहोचते. फणसाचे आणि आंब्याचे साठ, करमलांचे मसालेदार लोणचे असे काही खास गोमंतकिय खाद्यपदार्थ इथे विकले जातात. भगवान मंगेशाला अर्पण करण्यासाठी स्थानिक महिला सुंदर स्थानिक फुले आणि नारळ विकतात. डुलणारे माड आणि विलक्षण हिरवळ यांचा अंतर्भाव या प्रसिद्ध मंदिराच्या नैसर्गिक आकर्षणात आणि सौंदर्यात भर टाकतो. मंगेशीची जत्रा प्रसिद्ध आहे. भगवान मंगेशाचे भक्त संपूर्ण गोव्यात त्याचप्रमाणे गोव्याबाहेरही पसरले आहेत.

हे मंदिर गोव्याचे सांस्कृतिक संचित आहे आणि त्याची ख्याती जगभर पसरली आहे. 1560 सालच्या नोव्हेंबर महिन्यात म्हणजेच ‘इन्क्विझिशन’ काळात मूर्तीभंजक वृत्तीच्या पोर्तुगीज मिशनऱ्यांपासून या मूर्तीचे पावित्र्य- विडंबन टाळण्यासाठी आणि ही मूर्ती वाचविण्यासाठी हाडिये - प्रियोळ येथे या मूर्तीचे स्थलांतरण करण्यात आले.

प्रजल साखरदांडे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com