Monsoon And Food Culture
Monsoon And Food Culture Dainik Gomantak
ब्लॉग

Monsoon And Food Culture: पावसाळा आणि सुक्या मासळीची चव

गोमन्तक डिजिटल टीम

मनस्विनी प्रभुणे नायक

पावसाळा सुरू होताच गोमंतकीय स्वयंपाकघरात एक वेगळी लगबग सुरू असते. मे महिन्यात भरपूर मेहनत घेऊन बनवलेल्या ’पुरूमेंत’ (पावसाळ्यातील बेगमी)मधील अनेक गोष्टी गृहिणींना खुणावत असतात.

पुरूमेंत उपयोगात आणण्याची हीच तर संधी असते! ऋतू बदल होताच रोजच्या जेवणातील पदार्थ, त्या पदार्थांची चवदेखील बदलते. स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या जिन्नसांमध्ये पुरूमेंतातील वेगवेगळ्या नव्या जिन्नसांची भर पडते.

जून महिन्याच्या सुरुवातीला मासेमारी बंदीचा काळ सुरू होतो. हा काळ साठ दिवसांचा असल्यामुळे ताजी मासळी ताटात दिसणे कठीण असते. आकाराने फार मोठी मासळी मिळत नाही. छोट्या मासळीवर समाधान मानावे लागते.

खोल समुद्रात जाऊन मासेमारी करायला बंदी असली तरी पारंपरिक पद्धतीने मासेमारी सुरू असतेच. खोल समुद्रातील मासेमारी बंद असल्यामुळे मोठी मासळी दुर्लभ होते. पण छोटी आणि चविष्ट अशी मासळी, याची कमतरता भरून काढते.

याशिवाय स्वयंपाकघरात वर्षभर फार क्वचित दिसणाऱ्या सुक्या मासळीचा ताटात प्रवेश होतो. पावसाळा सुरू होताच इतके दिवस डब्यात बंद असलेली सुकी मासळी बाहेर निघते.

सुकी मासळी खाण्यासाठीदेखील हा उत्तम काळ. याकाळात घराघरांत सुक्या मासळीचे पदार्थ शिजू लागतात. पावसाळा म्हटले की सुकी मासळी स्वयंपाकघरात आलीच.

पुण्याला चिंचवडमधील पुरंदरे वाडा सोडून आम्ही गावाबाहेर बिजलीनगरला नव्या घरी राहायला गेलो. पुरंदरे वाड्यात सगळेच शाकाहारी होते. शाळेला जायच्या रोजच्या रस्त्याला मासळी बाजार दिसायचा आणि तेव्हा नजरेस जेवढी मासळी दिसायची तितकीच मासळी माहीत होती.

बाकी तसा मासळीशी काहीच संबंध आला नाही. बिजलीनगरला आमच्या शेजारी शिकारखाने काका-काकू राहायचे. काका सातारचे होते, तर काकूंचे माहेर कोकणातले. बिजलीनगरचे बाकी सगळे शेजारी शाकाहारी, तर शिकारखाने काका-काकू मांसाहारी होते.

मात्र काकूंच्या हातच्या भाज्या वेगळ्याच चवीच्या असायच्या. काकूंच्या हातची खोबरे वाटून घातलेली कोबीची रस्सा भाजी पहिल्यांदाच खाल्ली होती. काकूंच्या माहेरून कोणी आले की काकूंना ़‘स्पेशल खाऊ’ घेऊन यायचे. यात सुकी मासळी असायची.

एकदा कधीतरी त्यांनी त्या सुक्या मासळीचे काहीतरी बनवले आणि त्या पदार्थाचा वास सर्वत्र पसरला. बाकी सगळ्या शाकाहारी मंडळींनी नाक मुरडायला सुरुवात केली. आजूबाजूला सगळेच शाकाहारी असतील तर मासळी खाणाऱ्यांचे हाल होतात. ते मोकळेपणाने खाऊ शकत नाहीत. त्यावेळी शिकारखाने काका -काकूंचे असेच झाले असणार.

पुढे त्यांनी स्वतःचे सुंदरसे घर बांधले आणि ते तिकडे राहायला गेले. पण आता लक्षात येते की आमच्या शेजारी राहताना त्यांना मांसाहारी पदार्थ मोकळेपणाने बनवता आले नसतील, मोकळेपणाने खाता आले नसतील. चवीने ताजी मासळी खाणाऱ्याला सुकी मासळी देखील तितकीच प्रिय असते. पण हे समजायला बराच काळ जावा लागला.

सलग पाच सहा दिवस संततधार पडणाऱ्या पावसामुळे कुंद झालेल्या वातावरणात हमखास सुक्या मासळीचा बेत असतो. मग कधी सुक्या बांगड्याचे हुमण, सुक्या सुंगटाची किसमूर बनवली जाते. माझ्या सासू फार चविष्ट असे सुक्या मासळीचे वेगवेगळे पदार्थ बनवतात. घरात मी सोडून सगळेजण सुक्या मासळीचे चाहते आहेत.

सासूबाई सुक्या बांगड्याचे दोन तीन प्रकारे हुमण बनवतात. एक तिरफळे घालून आणि दुसरे कैरी-कांदा घालून. सासूबाईंनी सुक्या बांगड्याचे बनवलेले हुमण सगळेजण मोठ्या चवीने खातात. याशिवाय सुक्या मोरीचे (मासळीचा प्रकार) तोंडीलावणे, ‘मोतियाळे’चे दबदबीत (गरम मसाल्याची ग्रेव्ही असलेलं) या पावसाळी वातावरणात एकदा झालेच पाहिजे.

गरम गरम वाफाळलेला भात आणि त्यासोबत सुक्या बांगड्याचे हुमण, सुक्या सुंगटाची किसमूर, भाजलेला डांगर (पापडाचा प्रकार) इतके ताटात असले की पुरे. सगळे अगदी आनंदाने जेवतात. मासळीला सुकवताना मीठ लावून सुकवलेले असते, त्यामुळे याचा कोणताही पदार्थ बनवताना मिठाचे प्रमाण कमीच ठेवावे लागते.

नाहीतर हमखास तो पदार्थ खारट झालाच म्हणून समजा. सुक्या मासळीचा कोणताही पदार्थ बनवण्यापूर्वी सासूबाई ती मासळी साफ करून गॅसवर मंद आचेवर भाजून मग त्याचे तुकडे करून वापरतात. सुक्या सुंगटाचे हुमण बनवताना सुक्या सुंगटाचा तोंडाकडचा भाग काढून सुंगटे थोडावेळ पाण्यात भिजवून ठेवतात.

मी खात नसले तरी त्या ते कसे बनवतात याचे निरीक्षण करत असते. त्यांच्या मते बाणावलीचे ‘खारें नुस्ते’ (सुकी मासळी) सर्वात चांगले. गेली कित्येक वर्षे त्या बाणावलीचेच खारे नुसते घेतात.

सुक्या मासळीचा वास उग्र असतो त्यामुळे ताजी मासळी परवडली पण सुकी नको असे मासळी न खाणाऱ्या व्यक्तीला वाटू शकते. पण पट्टीच्या खाणाऱ्याला असे कोणतेही मोजमाप लावता येत नाही. लहानपणापासून जिभेला चवीचे जे संस्कार झाले असतील ते पदार्थ खायला आवडतात.

सुक्या मासळीबाबत तसेच आहे. याची चव पटकन पचनी पडत नाही. सुक्या मासळीचा कोणताही पदार्थ बनवायला घेतला की, तुम्ही आज काय रांधलेय हे कोणाला सांगण्याची गरज राहत नाही, त्याची ‘गंध’वार्ता आपोआप सर्वांपर्यंत पोहोचते!

सुकी मासळी भाजताना, तव्यावर थोड्याशा तेलावर तळून घेताना, शिजवताना त्याच्या सुटणाऱ्या वासाने मला असह्य होते. पण हाच वास बाकीच्यांच्या तोंडाला पाणी आणणारा असतो. अशावेळी मला साधासा ’तूप - मीठ - भात’देखील पंचपक्वान्नासारखा भासतो.

सुक्या बांगड्याचा भाजलेला तुकडा, ज्यावर अगदी थोडेसे टाकलेले खोबरेल तेल आणि यासोबत उकड्या तांदळाची पेज हे तर अनेकांचे आवडते जेवण. रात्रीच्या जेवणात एवढेच पुरेसे होते. सुकी-मासळीप्रेमी मंडळी एकत्र आली की यांच्या फक्त गप्पा ऐकाव्यात.

अगदी रसाळ वर्णन सुरू होते. जिवंत मासळीसाठी होणारी तडफड मी बघितलीय पण सुक्या मासळीवर जीव ओवाळून टाकणे म्हणजे काय हेदेखील अनुभवतेय.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Live Update: चिखलीत इनडोअर स्टेडियमची भिंत कोसळली

Jammu & Kashmir Terrorist Attack: कठुआमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; भारतीय लष्कराचे 4 जवान ठार, 6 जखमी

Nilesh Cabral: निलेश काब्राल यांचा थेट CM पदावरच डोळा?; मंत्रिमंडळ फेररचनेच्या पार्श्वभूमीवर मोठे विधान

Goa Rain Update: राज्यात पावसाचा हाहाकार! कुशावती नदीची पातळी वाढली; पारोडा रस्ता दुसऱ्या दिवशीही पाण्याखाली

Mumbai Goa Highway: निवारा शेडविना प्रवाशांचे हाल; पेडणे तालुक्याची समस्या

SCROLL FOR NEXT