Goa Asgaon House Demolition Dainik Gomantak
ब्लॉग

पुण्याचे डॉ. खेडकर प्रकरण गोवेकरांना धडा!

ट्वीट व्हायरल झाल्यावर या ट्वीटचे इंग्रजीत भाषांतर करून एका इंग्रजी वर्तमानपत्राने बातमी केली व नंतर इतर माध्यमांनी हे प्रकरण उचलून धरले. तिकडे पुण्यातील प्रसिद्ध आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी उत्सुकतेपोटी डॉ. पूजा खेडकर व तिच्या कुटुंबियाची सार्वजनिक रूपात असलेल्या प्रमाणपत्राची जुळवाजुळव करून सामाजिक मध्यामावर टाकली. प्रसारमाध्यमांनी यातील एक एक धागा पकडून स्वत:चे शोधकार्य असे सुरू केले.

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात जसे पूजा शर्मा यांचे नाव मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे तसे राष्ट्रीय स्तरावर डॉ. पूजा खेडकर हे नाव चर्चेत आहे.

खरे की खोटे या वादात न जाता, आयपीएस वा आयएएस अधिकारी, आपल्या कुटुंबियासाठी किंवा मित्रपरिवासाठी मदतीसाठी संपूर्ण प्रशासकीय व्यवस्था अशी वेठीस धरू शकतात अशा आशयाची वेगवेगेळ्या स्वरूपाची दोन उदाहरणे. जशा गोव्यातील वृत्तपत्रात पूजा शर्माच्या बातम्या पहिल्या पानावर झळकत आहेत तशाच तऱ्हेने डॉ. पूजा खेडकरच्या बातम्या महाराष्ट्राततील वर्तमान पत्रात झळकत आहेत.

तशातच या प्रकरणात थेट संबंध असलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी मुदतीपूर्वीच राजीनामा दिल्याचे पुढे आल्याने, आता हा राष्ट्रीय विषय झाला आहे. या प्रकरणात गोवेकरांनी काय शिकण्यासारखे आहे ते पाहूया.

डॉ. पूजा खेडकर प्रकरणाची सुरवात ६ जुलै एका साध्या ट्वीटपासून झाली. पुण्यातील वैभव कोकाट याने आपल्या एक्स हॅंडलवर मराठीतून केलेला तो ट्वीट होता. यात वर लाल-निळा असलेला सफेद आलीशान गाडीचा फोटो व त्याच्या खाली ‘प्रोबेशनरी IAS वापरतायेत AUDI कार?..’ असा मथळा असलेला संदेश टाकला होता.

यात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रोबेशनवर रुजू असणाऱ्या 2022 बॅच IAS डॉ. पूजा खेडकर यांनी VIP नंबर असलेल्या खासगी ऑडी गाडीला महाराष्ट्र शासन असा बोर्ड लावणे, वरिष्ठ अधिकारी शासकीय कामासाठी मुंबईला मंत्रालयात गेले असताना त्यांचे अँटी चेंबर बळकावून त्यांचे सामान बाहेर काढून तिथे स्वतःचे कार्यालय थाटणे व स्वतःच्या नावाचा बोर्डसुद्धा लावणे, याविषयी माहिती दिली होती. तसेच त्यांच्या या वर्तनाबद्दल पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी अप्पर मुख्य सचिव मंत्रालय यांच्याकडे अहवाल दाखल केला असल्याचा दावा त्यांनी केला होता.

या संदेशात मुख्यत: डॉ. पूजा व तिचे वडील, ही दोघे मिळून प्रशिक्षण काळात तरतूद नसलेल्या सोयी व सवलती मिळवून घेण्यासाठी कशी दादागिरी याचे वर्णन व प्रोबेशनवर असणाऱ्या या अधिकाऱ्याची वर्तणूक प्रशासकीय अधिकाऱ्याला शोभेल अशी नाही. जिल्ह्यातील शासकीय कामकाज व्यवस्थित चालण्यासाठी त्यांना प्रशिक्षणासाठी जिल्हा बदलून द्यावा'' असा शेरा जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अहवालात दिला असल्याची माहिती होती.

प्रत्यक्षात अहवालाची प्रत अपलोड केली नव्हती. याविषयी ट्वीट बोलताना वैभव कोकाट यांनी एका मुलाखतीत संगितले आहे, प्रत्यक्षात त्यांना हा फोटो व जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालाची प्रत एका सरकारी अधिकाऱ्याकडूनच मिळाली होती व त्याच आधारावर हे ट्वीट होते. प्रकरण एवढे भयंकर असेल याची कल्पना नव्हती.

ट्वीट व्हायरल झाल्यावर या ट्वीटचे इंग्रजीत भाषांतर करून एका इंग्रजी वर्तमानपत्राने बातमी केली व नंतर इतर माध्यमानी हे प्रकरण उचलून धरले. तिकडे पुण्यातील प्रसिद्ध आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी उत्सुकते पोटी डॉ. पूजा खेडकर व तिच्या कुटुंबियाची सार्वजनिक रूपात असलेल्या प्रमाणपत्राची जुळवाजुळव करून सामाजिक माध्यमावर टाकली. प्रसारमाध्यमानी यातील एक एक धागा पकडून स्वत:चे शोधकार्य असे सुरू केले.

त्यातून फक्त खेडकर कुटुंबियाचा पर्दाफाश झाला नाही तर उच्चभू पदस्थाची एकूण व्यवस्थाच नागडी झाली. त्याच डॉ. पूजाच्या आईने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी वादावादी केल्याने, तेथील प्रसारमाध्यमांनी त्या एका शेतकऱ्याला पिस्तूल दाखवून धमकी देत असलेला एक जुना विडियो समोर आणला. यावरून एक एक गुन्हा नोंद होऊन त्या सध्या पुण्यात पोलिस कोठडीत आहे. माजी सनदी असलेल्या तिच्या वडिलाचेही नोकरी दरम्यानचे कारनामे समोर आले असून, त्यांचीही कायदेशीर चौकशी सुरू झाली आहे.

तिकडे, डॉ. पूजा विरुद्ध बनावट जात व वैद्यकीय प्रमाणपत्रे सादर केल्याप्रकरणी केंद्रीय लोकसेवा आयोगाने फौजदारी गुन्हा दाखल करून निवड रद्दबादल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आयोग आपली प्रतिमा स्वच्छ ठेवण्यासाठी कठोर पावले उचलत आहे असे दिसतानाच आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिल्याची माहिती पुढे आली. यावर कोंग्रेस नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहता बहूचर्चीत नीट घोटाळ्याच्या सोबत हेही प्रकरण संसदेत गाजणार असे दिसते. यात विश्लेषणाचे मूळ मुद्दे बाजूला राहून, एकूण प्रकरण राजकीय चिखलफेक जास्त होईल.

मुळात या प्रकरणाचा डॉ. पूजा, तिचे आईवडील यांच्या बाहेर जाऊन विचार करणे गरजेची आहे. कारण असे करणारे खेडकर एक एकमेव कुटुंब नसावे. तसा पाहिल्यास जन्मतः अंध असलेला धृतराष्ट्र व डोळ्यावर पट्टी बांधलेली त्याची पत्नी गांधारी हे महाभारतातले खेडकर दांपत्य. यांना एरवी आणखी काही दिसत नव्हते तरी आपल्या मुलासाठी भविष्यात राज्यासन दिसते. याला आपण ‘दृष्टिहीन अपत्य प्रेम’ म्हणूया. डॉ. पूजा यांचे वडील व आजोळचे आजोबा हे महाराष्ट्रातील मोठे सनदी अधिकारी. तिच्या निवृत्त आजोबांना प्रशासनात व जनमानसात बऱ्यापैकी मान होता.

याच्या उलट तिचे वडील हे भ्रष्टाचाराच्या आरोपावरून दोनदा निलंबित झालेले तरी निवृत्तीपर्यंत वजनदार पोस्टिंग मिळविलले नावाडगे अधिकारी. तिची आई होमिओपॅथी डॉक्टर आहे पण ती प्रॅक्टीस करीत नसल्याने एका गावची सरपंच अशीच तिची ओळख आहे. अशा कुटुंबाचे अपत्य डॉक्टर, इंजिनीअर व सनदी अधिकारी बनणे हा त्याच्या स्टेटसचा भाग असतो. त्यासाठी ही कुटुंबे पाण्यासारखा पैसा खर्च करायला मागेपुढे राहत नाही.

डॉ. पूजा खेडकरचा वादग्रस्त प्रवास याला अपवाद नाही. या कुटुंबाने आपल्या मुलीला ॲलोपॅथी डॉक्टर बनविण्यासाठी एक नव्यानेच सुरू झालेले खाजगी मेडिकल कॉलेज जवळ केले व मॅनेजमेंट कोटातून दुर्बल इतर मागास वर्गीय श्रेणीतून प्रवेश घेतला. २००७ मध्ये हे कॉलेज सुरू झाले व पहिल्या बेचमध्ये अॅडमिशन झाले. यावर्षी सरकारने निर्धारित मर्यादेच्या बाहेर जाऊन सर्वात जास्त फी आकारणारी कॉलेज म्हणून या कॉलेजचे नाव चर्चेत होते, यावरून खेडकर कुटुंबियाचा किती पैसा कामी आला असेल हे वेगळे सांगायला नको.

लाखोची नियमित फी व कॅपिटेशन फी देऊ शकणाऱ्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न क्रिमीलेयरच्या खाली कसे असू शकेल हा साधा प्रश्न आहे. तिकडे सोडा, आपल्या गोव्यातही असे कितीतरी ‘लखपती वा करोडपती’ लोक आहेत ज्यांना अशी प्रमाणपत्रे सहज मिळतात व जे खरेच या मर्यादेखाली येतात त्यांना मात्र अडचणी येतात. येथे पूजाचे वडील सनदी अधिकारी असल्याने त्यांचे खरे उत्पन्न कळणे साहजिक होते.

त्यासाठी या कुटुंबाने वेगळीच क्लृप्ती लडविली. उत्पन्न दाखला अर्ज करताना आपले आई वडील विभक्त झालेले असून आपण आईकडे राहत आहे जिचे उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी आहे, असे अफलातून प्रतिज्ञापत्र पूजाने दिले. एकदा कॉलेज प्रवेश झाला की कोण प्रमाणपत्रांना आव्हान देतो. पुढे २०१२ साली ती एमबीबीएस झाली. पदव्युत्तर शिक्षण घेतले नाही पण आपण सुपरस्पेशालिस्ट असल्याचे सांगत होती असे पुढे आले आहे.

पुढील आठ दहा वर्षे या कुटुंबाने आपल्या मुलीला सनदी अधिकारी करायची मोहीम राबविली. दहा बारावेळा परीक्षा देऊनही पास झाल्याने नियमित परीक्षा संधीसंख्या वाढवून घेण्यासाठी विविध प्रकारची अपंगत्व प्रमाणपत्रे व नावात फेरफार करून तयार केलेले वेगवेगळे जन्मदाखले वापरले. एवढा अवैध आटापिटा करून मिळवलेली नोकरी पदरी पडूनही या कुटुंबाचे समाधान झाले नाही. तोरा, दरारा, रुबाब यांच्या हौशी पोटी, आडमार्गाने हाती आलेले सगळे एकाचवेळी गमवण्याची पाळी या कुटुंबावर आली आहे.

आता अशी हौस याच कुटुंबाला आहे असे नाही. गोव्यात येणारे कितीतरी प्रोबेशनरी अधिकारी अशा विचित्र तऱ्हेने वागताना मी पाहिले आहे. रुबाब, दरारा ही त्यांची एक चटक असते. एकापेक्षा जास्त जन्मदाखले तयार करून ठेवणारी कुटुंबे मी गोव्यातही पाहिली आहे. काही वर्षापूर्वी गोव्यातील युवा क्रिकेट खेळाडूचे वय तपासणीसाठी आमच्याकडे आणले होते. तपासणीत काहींचे वय दाखल्यापेक्षा जास्त मिळाले, तेव्हा आमची चाचणी चुकली काय असा प्रश्न निर्माण झाला.

थोडी खोदून विचारल्यावर कळले की त्यांचे खरे जन्मदखले वेगळे होते तर खेळासाठी कमी वयाचे दाखले आधीच तयार करून ठेवले होते. तीच गोष्ट अपंगत्व प्रमाणपत्राचे. आमच्याकडे असे प्रमाणपत्र वापरून मेडिकलमध्ये प्रवेश घेतलेल्या एक विद्यार्थ्याची परत चाचणी करण्याचा प्रसंग आला होता. डॉ. पूजा खेडकरची विरोधाभास दाखविणारी पुण्यातील डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल ते दिल्लीचे एम्स हॉस्पिटल अर्धा डझन वेगेवेगळी अपंगत्व प्रमाणपत्रे सार्वजनिक स्वरूपात उपलब्ध आहेत.

ज्या राखीवतेचा जन्म दुर्बलाच्या उद्धारासाठी झाला त्या राखीवतेच्या सशक्तकडून आज चिंधड्या उडविल्या जात आहेत. जसा पोलिस तपास पुढे जाईल तेव्हा या फेरफेरीत गुंतलेल्या अनेक जणांची नावे पुढे येतील.

डॉ. पूजा खेडकर प्रकरण म्हणजे आपल्या अपत्याविषयी धृतराष्ट्री महत्त्वाकांक्षा ठेवणाऱ्या पालकाचे ऑल इन वन पॅकेज आहे. मॅनेजमेंट कोटाच्या नावाखाली पैसेवाल्याची खेडकरसारखी अपात्र मुले आडमार्गाने डॉक्टर होतात म्हणून आज चर्चेत असलेली नीट प्रवेश परीक्षा आली. मॅनेजमेंट कोटातून प्रवेश घेतलेल्या डॉ. पूजाचे आतापर्यंतचे कारनामे पाहता अशी मुले फक्त अपात्र नाहीतर मेडिकलसारख्या प्रोफेशनसाठी ‘नालायक’ ठरतात. सनदी अधिकाऱ्याचे जगच वेगळे असते.

डॉ. पूजाची आई बाऊन्सरसोबत पिस्तूल घेऊन एका शेती जमिनीवर ताबा घेण्यासाठी एका शेतकऱ्यावर पिस्तूल रोखते तर येथे गोव्यात अशाच बड्या अधिकाऱ्याची पत्नी असलेली पूजा शर्मा एक घर खाली करण्यासाठी असेच बाऊन्सर वापरते. पुण्या मुंबईसारख्या महानगरात आपल्या मुलाचे अपराध पोटात घालण्यासाठी लाखो रुपये खर्च करून कसे वैद्यकीय अहवाल बदलले जाऊ शकतात याचा प्रत्यय हल्लीच पुण्यात झालेल्या बहुचर्चित पोरशे अपघात प्रकरणातून पुढे आले आहे. डॉ. पूजाचे उपलब्ध वैद्यकीय अहवाल एकमेकाशी विरोधाभासी असल्याने, कुठलातरी अहवाल अशाच मार्गाने तयार झाला असावा असे मानण्यात नक्कीच वाव आहे.

थोडक्यात काय तर, गैरमार्ग रोखण्यासाठी कायदे कितीही तयार करा पण पैसेवाले त्यातून पळवाटा शोधणारच. पण पैशाने सगळीच व्यवस्था विकत घेणाऱ्याचा या पैसेवाल्याचा फुगा एक दिवस वैभव कोकाटसारख्या साध्या माणसाच्या ट्वीटने फुटू शकतो, हे आजच्या प्रगत समाजमाध्यमाचे सामर्थ्य आहे.

व्यवस्था विकत घेणाऱ्याचा या पैसेवाल्याचा फुगा एक दिवस वैभव कोकाटसारख्या साध्या माणसाच्या ट्वीटने फुटू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Manoj Bajpayee At IFFI: 'वेळेत पूर्णविराम आणि संवादात मौन हवे'; मनोज वाजपेयीने सांगितले अभिनेत्यांबाबतीत दोन टप्पे

Indian Navy Goa: गोव्यात नौदलाच्या जहाजाचा अपघात; मच्छिमारांच्या बोटीला धडक, दोन बेपत्ता, 11 जाणांना वाचविण्यात यश

IFFI 2024: इफ्फीच्या पहिल्या दिवशी ‘All We Imagine As Light’ ची चर्चा! छाया कदम, कानी कसूरती, दिव्या प्रभा यांचा सशक्त अभिनय

Saint Francis Xavier Exposition: जुन्या गोवेत देशी-विदेशी भाविकांची गर्दी! कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांनी प्रार्थना घेऊन केला शुभारंभ

Electricity Tariff Hike: वीज दरवाढीच्या शिफारशींना ‘जीसीसीआय’चा आक्षेप; पर्यटन व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होण्याची शंका

SCROLL FOR NEXT