Goa | Jal Jeevan Mission Dainik Gomantak
ब्लॉग

Jal Jeevan Mission: गोव्याचे 'जल जीवन मिशन' अन् त्याची 100 टक्के सफलता

Jal Jeevan Mission: गोव्याला स्वरुपसुंदर निसर्ग, सगळीकडे वनराई, बारमाही वाहणाऱ्या नद्या असे अप्रतिम नैसर्गिक वरदान लाभलेले आहे.

दैनिक गोमन्तक

Jal Jeevan Mission: गोवा एक समुद्रकिनारी वसलेले छोटेखानी सुंदर राज्य. एका बाजूला उंच पश्चिमी घाट तर दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र. गोव्याला एक अप्रतिम नैसर्गिक वरदान लाभलेले आहे. स्वरूपसुंदर निसर्ग, सगळीकडे वनराई, हिरवळ, भरपूर पाऊस, बारमाही वाहणाऱ्या नद्या.

पाणी म्हणजे जीवन. जिवंत राहायला अन्नाबरोबर पाणी हे हवेच. पूर्वीच्या काळात सगळ्या सभ्यता नदीकाठीच वसलेल्या होत्या. गोवा याबाबतीत एकदम भाग्यशाली आहे. समुद्रसपाटीवरचा प्रदेश असल्यामुळे इथे भरपूर प्रमाणात पिण्यालायक गोड भूजल एकदम उथळ पातळीवर उपलब्ध असते.

पूर्वी प्रत्येक घरांत किंवा वाड्यांवर उथळ विहिरी असल्याने पाणी बारा महिने मुबलकपणे उपलब्ध असायचे व आहे. काही डोंगराळ व दुर्गम भाग वगळता गोव्यात कधी पाण्याची टंचाई व दुर्भिक्ष झाल्याचे ऐकिवात नाही. गोव्यात वर्षाला एकशेवीस ते दोनशे इंच पाऊस पडतो, जो जास्तीत जास्त समुद्रात वाहून जात असे. जलसंवर्धनाची अशी काहीही योजना नव्हती किंवा तिची गरज भासलेली नव्हती.

गोव्यामध्ये नियोजित योजनेखाली नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याची योजना पहिल्यांदा ओपा-खांडेपार इथे खांडेपार नदीवर पोर्तुगीज सरकारद्वारे बसवली गेली. खांडेपार नदी ही मांडवीची उपनदी. तेथे 1953 साली जलशुद्धीकरण प्रकल्प राबवला गेला व 1957 साली कार्यान्वित केला गेला.

जगप्रसिद्ध स्थापत्य अभियंता भारतरत्न श्री. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी त्याची संरचना केली. तेव्हा त्याची क्षमता होती 1.76 दशलक्ष गॅलन प्रतिदिन व त्याद्वारे फक्त तीन मुख्य शहरे पणजी, फोंडा व मडगाव यांना पाणीपुरवठा व्हायला लागला. ओपा प्रकल्पाची क्षमता उत्तरोत्तर वाढवली गेली व आज क्षमता आहे प्रतिदिन 121 दशलक्ष लीटर. पणजी व फोंडा शहरांशिवाय आता ओपाचा पाणीपुरवठा धारबांदोडा व वाळपईतील गावांनाही करण्यात येतो.

1989 साली दक्षिण गोव्यात सांगे तालुक्यातील साळावली येथे मोठे धरण बांधण्यात आले. त्यामुळे, इथे एक प्रचंड जलाशय तयार झाला ज्याची क्षमता आहे दोनशे पस्तीस दशलक्ष घनमीटर. यात शेती व पिण्यासाठी पाणी पुरवठा करण्याची क्षमता व तरतूद होती.

सरकारने इथे एक मोठा जलशुद्धीकरण व पुरवठा प्रकल्प स्थापन करायचे ठरवले. हा प्रकल्प 1989 साली पूर्ण होऊन कार्यान्वित झाला व तेव्हाची त्याची क्षमता होती 160 दशलक्ष लीटर प्रतिदिन. सुरुवातीला फक्त मडगाव व वास्को शहरांना हा पुरवठा व्हायचा. हळूहळू काणकोण तालुका सोडून जवळपास संपूर्ण दक्षिण गोव्याला पुरवठा व्हायला लागला.

1,400 मिमी व्यासाची जी मूळ पाइपलाइन होती ती काँक्रीटची असल्याने पाण्याच्या मोठ्या दबावामुळे परत परत फुटू लागली व पुरवठ्यात व्यत्यय यायला लागला. नंतर सरकारतर्फे सांगे ते मडगावपर्यंत पूर्ण पाइपलाइन बदलून लोखंडाची केली गेली. तेव्हापासून दक्षिण गोव्याचा पाणीपुरवठा चांगल्यापैकी सुरळीत झाला व वाढला.

वाढत्या लोकसंख्येमुळे शेवटी जेव्हा हा पुरवठासुद्धा अपुरा पडू लागल्याने जयका या योजनेखाली आणखी शंभर दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेचा शुद्धीकरण प्रकल्प व पाइपलाइन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला व 2015 साली पूर्ण करण्यात आला. आज या एकूण एक साळावली प्रकल्पाद्वारे दक्षिण गोव्याला रोज 285 दशलक्ष लीटर एवढा पाणी पुरवठा होतो.

राज्याच्या ज्या भागांत वरच्या दोन मुख्य प्रकल्पाद्वारे पाणी पुरवठा करणे शक्य नव्हते तिथे जागच्या जागी अनेक मध्यम ते छोटे प्रकल्प म्हैसाळ, काणकोण, शिवडे, शिगाव, दाबोस, पोडोसे, चांदेल व अस्नोडा येथे उभारण्यात आले, जे त्या त्या भागाला पाणीपुरवठा करतात.

याशिवाय अनेक छोटे छोटे ग्रामीण पाणीपुरवठा प्रकल्प बांधले गेले आहेत, जे वरच्या प्रकल्पाद्वारे शक्य नाही, त्या भागांत पाणीपुरवठा करतात. त्यामुळे गोव्याची आजची एकंदर पाणीपुरवठा क्षमता आहे 650 दशलक्ष लीटर.

याशिवाय दक्षिण गोव्यात जलसंसाधन खात्यातर्फे रोज 30 दशलक्ष लीटर प्रक्रिया न केलेले कच्चे पाणी अवजड उद्योगधंद्यांना थेट साळावलीहून पुरवले जाते. वाढती लोकसंख्या, सततचे औद्योगिकपण व इतर क्षेत्रांतील वाढत्या गरजांमुळे पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढतच असते. त्यामुळे, शक्य आहे तिथे प्रस्थापित क्षमतेची वृद्धी करणे किंवा नवे प्रकल्प नियोजित करणे हे कार्य सतत चालूच असते.

गोव्यात भरपूर नैसर्गिक जलसाठा आहे व भूजल उथळ पातळीवर उपलब्ध आहे. गोव्यातील भूजल प्रदूषण न झाल्यामुळे अतिशय स्वच्छ व शुद्ध असते व थेट पिण्याच्या योग्यतेचे असते. त्याच्यावर कसलीच प्रक्रिया करण्याची एरवी गरज पडत नाही. त्यामुळे शुद्धीकरण प्रक्रिया नाममात्र होऊन जाते. पण, तसा धोका पत्करला जाऊ शकत नाही.

तसेच पावसाळ्यांत जेव्हा पाणी गढूळ होऊन जाते तेव्हा ते स्वच्छ व शुद्ध करणे गरजेचे बनते. त्यात शुद्धीकरण प्रक्रियेवर ताण येऊन क्षमता कमी होऊन जाते. तसेच साळावलीसारखा जलाशय खाण क्षेत्रांत असल्यामुळे इथल्या कच्च्या पाण्यात मँगॅनिजचे प्रमाण थोडे जास्त असते. पण शुद्धीकरणाद्वारे त्याचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.

सर्वसाधारण शुद्धीकरण प्रक्रियेत एरेशन, फ्लॉक्युलेशेन फिलट्रेशन व क्लोरीनेशन या चार मुख्य प्रक्रिया वापरल्या जातात. पण या सगळ्या प्रक्रियेत विरघळलेले सूक्ष्म किंवा अतिसूक्ष्म पदार्थ काढून टाकणे शक्य होत नाही, पण पाणी पिण्यायोग्य होऊन जाते. जागतिक मानकांप्रमाणे पिण्याचे पाणी जसे असायला हवे त्याहून कितीतरी शुद्ध व स्वच्छ दर्जाचे पाणी, गोव्याच्या पाणीप्रकल्पात असते.

एकदम अद्ययावत अशा प्रयोगशाळेत अशा पाण्याची रोज रासायनिक चाचणी व पृथ:करण केले जाते. मध्ये साळावली जलाशयात सूक्ष्म प्लास्टिक असल्याचा शोध कोणातरी एका संस्थेने लावला होता. एक पूर्ण नैसर्गिक व वनक्षेत्रात परिघांत असलेल्या व पूर्ण नैसर्गिक स्रोत असलेल्या पश्चिम घाटातल्या या जलाशयाच्या पाण्यात हे प्लास्टिक कुठून आले हे एक नवलच आहे व त्याच्यावर संशोधन होणे गरजेचे आहे.

गोव्यामध्ये पूर्वीपासून सधनता असल्यामुळे व शहरीकरण झाल्याने पुष्कळ घरांना नळजोडण्या झाल्या होत्या. त्यानंतर अलीकडे केंद्र सरकारतर्फे ‘जल जीवन मिशन’ ही योजना मोठ्या प्रमाणात राबवली गेलेली आहे, जिच्यामुळे गोव्यातील नळजोडण्या शंभर टक्के झाल्याचे समजले जाते व त्यासाठी पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदी व केंद्र सरकारने गोव्याचे खास अभिनंदन केले होते.

दक्षिण गोव्याच्या मुख्य शहरांत पाणीपुरवठा दिवसाला वीस तासांपेक्षा जास्त असतो. सर्वसाधारण शहरी पुरवठा आठ तास असतो, तर दुर्गम भागांत कमीत कमी ते एक ते दोन तास. पिण्यासाठी व उद्योगधंद्यांसाठी लागणाऱ्या पाण्याबाबत गोवा राज्य एकदम स्वयंपूर्ण तर आहेच, त्याशिवाय नळजोडण्यांत शंभर टक्के उद्दिष्टही गाठलेले आहे. याशिवाय या पाण्याचे दर अतिशय स्वस्त व सर्वसाधारण जनतेला सहज परवडण्यासारखे आहेत जे इतर राज्ये किंवा मोठ्या महानगरांपेक्षा स्वस्त आहेत.

पाण्याच्या क्षेत्रांत शंभर टक्के सफलता मिळवून आत्यंतिक गरजेच्या अशा मूलभूत व पायाभूत क्षेत्रांत गोवा राज्याने केलेली ही एक अप्रतिम व नेत्रदीपक प्रगती आहे व त्याला तोड नाही. (हा लेख लिहिण्यास श्री. विराज पाटील, साबांखा अभियंता यांचे अत्यंत मौल्यवान साहाय्य झाले, त्याबद्दल त्यांचे अत्यंत आभार)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांनी गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

SCROLL FOR NEXT