Argentina: गोवा अन् अर्जेंटिनाचे जगज्जेतेपद

गोव्यात मैदाने भरपूर आहेत, प्रशिक्षकही आहेत, पण दर्जा उंचावत नाही हे खेदजनक आहे.
Argentina
ArgentinaDainik Gomantalk
Published on
Updated on

कतारची राजधानी दोहा शहरातील अल दायेन भागातील भव्यदिव्य लुसैल स्टेडियमवर अर्जेंटिनाचा संघ सरस ठरला आणि फुटबॉलचा सुपरस्टार लिओनेल मेस्सी याचे विश्वकरंडक जिंकण्याचे स्वप्न साकार झाले.

मेस्सी आणि अर्जेंटिनाचे ऐतिहासिक यश अनुभवताना, साजरे करताना जागतिक फुटबॉलमध्ये भारत आणि गोवा कुठे, हा प्रश्न उपस्थित होणे साहजिकच आहे, विश्वकरंडक पात्रता ही तर खूप दूरची गोष्ट झाली. मेस्सीच्या संघाने जगज्जेतेपद पटकाविल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दक्षिण अमेरिकन संघाचे अभिनंदन केले.

हा खिलाडूवृत्तीचा भाग झाला. प्रत्यक्षात विचार करता, अर्जेंटिनाप्रमाणे भारत फुटबॉलमध्ये महासत्ता का बनू शकत नाही, हा प्रश्न विचारला जाणारच. विश्वकरंडक स्पर्धा संपली आहे, काही दिवसांतच भारतातील फुटबॉलचा जिव्हाळा कमी होईल, पुन्हा क्रिकेटचेच गुणगान गाण्यात सारे रंगून जातील. आणखी चार वर्षांनी देशात फुटबॉलज्वर येईल. स्वाभाविकच आहे, आपल्या देशात फुटबॉल संस्कृती आहेच कुठे?

विश्वकरंडक पात्रतेचा विचार भारतीयांच्या मनास शिवणे हासुद्धा एक विनोदच मानला जातो. देशातील फुटबॉलचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न कायम आहेत, परंतु प्रगतीचा सुसाट वेग काही दिसत नाही. आशिया करंडक स्पर्धेसाठी पात्रता मिळविताना भारतीय संघाला धाप लागते.

रात्र जागवून टीव्हीवरील युरोपातील फुटबॉलचा आनंद लुटणारे भारतात लाखो आहेत, परंतु आपल्या राष्ट्रीय संघाला प्रोत्साहन देणारे मोजकेच सापडतील. त्यामुळे, क्रिकेट सामन्यांना गच्च भरणारे स्टेडियम भारताच्या फुटबॉल लढतीत ओस पडलेले दिसतात.

युरोप, दक्षिण अमेरिका आणि आता आफ्रिकेतही फुटबॉल अकादमीचे महत्त्व वाढत चालले आहे. लहान वयातच मूल फुटबॉल अकादमीत येते, तेथेच त्याचे आयुष्य बहरते. सतरा-अठराव्या वर्षी हा मुलगा दर्जेदार फुटबॉलपटू बनूनच मैदानावर अवतरतो. मेस्सीही असाच घडला!

एखाद्या भारतीय, गोमंतकीय मुलास युरोपातील फुटबॉल अकादमीत जाऊन कौशल्यसंपन्न फुटबॉलपटू बनणे शक्य होईल का, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. फुटबॉलमध्ये यशस्वी होण्यासाठी प्रचंड ऊर्जा, शारीरिक क्षमता, वेग, उच्च कोटीची तंदुरुस्ती यांची गरज भासते.

Argentina
CM Pramod Sawant: आता पुरे झाले पोकळ इशारे; प्रत्‍यक्ष कृती करुन दाखवा!

भारतीय खेळाडू हे निकष पार करतील तेव्हाच सुपरस्टार फुटबॉलपटू बनू शकतील. भारताचा नावाजलेला फुटबॉलपटू सुनील छेत्रीने खूप प्रयत्न केले, युरोपातही तो खेळण्यास गेला. तरीही ठरावीक मर्यादेत राहिला.

‘शीत, कडी आणि फुटबॉल’, अशीच गोमंतकीयांची जगभर ओळख करून दिली जाते. त्यात तथ्यही आहे. 1883 साली गोव्यात आलेला ब्रिटिश पाद्री फादर विल्यम रॉबर्ट लायन्स यांनी हा सुंदर खेळ गोमंतभूमीत रुजविला आणि अल्पावधीत या भूमीत बहरला. गोव्यातील प्रत्येक गावातील मैदानात, शेतमळ्यातही फुटबॉलचा सामना संध्याकाळच्या सत्रात रंगलेला दिसेल.

गोव्याने भारताला कितीतरी उच्च श्रेणीचे फुटबॉलपटू दिले. क्रीडाक्षेत्रातील गोव्याचा पहिला अर्जुन पुरस्कार विजेता, पद्मश्री सन्मानित खेळाडू फुटबॉलपटूच आहे. ब्रह्मानंद शंखवाळकर यांच्यानंतर आणखी एक फुटबॉलपटू ब्रुनो कुतिन्होही अर्जुन पुरस्काराचा मानकरी ठरला. दोघांनीही देशाचे आंतरराष्ट्रीय मैदानांवर नेतृत्व केले.

भारतातर्फे आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेले गोमंतकीय खूप आहेत. काही वर्षांपूर्वी देशाच्या फुटबॉल संघात अर्धेअधिक गोमंतकीय होते. मात्र महेश गवळी, समीर नाईक, क्लायमॅक्स लॉरेन्स यांच्यानंतर भारतीय संघातील गोमंतकीय गुणवत्तेला उतरती कळा लागली. आता फार तर एक-दोन गोमंतकीय भारतीय फुटबॉल संघातून महत्प्रयासाने खेळताना दिसतात. सुवर्णकाळ सरला हे ठळकपणे दिसून येत आहे.

असे का घडावे, हा प्रश्न येतोच. कारणे भरपूर आहेत. दशकभरापूर्वी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी राज्य विधानसभेत फुटबॉलला राज्य खेळ घोषित केले. कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून गोवा फुटबॉल विकास मंडळाची (जीएफडीसी) स्थापना केली, तरीही दहा वर्षांच्या कालखंडात राज्यातील फुटबॉलचा दर्जा घसरतानाच पाहायला मिळाला.

यास गोवा फुटबॉल असोसिएशनही (जीएफए) तेवढेच जबाबदार आहे. युवा विकास कार्यक्रम फक्त कागदोपत्रीच आहे. गोव्याने संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा पाच वेळा जिंकलेली आहे, तर आठ वेळा उपविजेतेपद मिळविले. मात्र, शेवटच्या वेळेस गोवा राष्ट्रीय विजेता ठरला या घटनेस खूप वर्षे उलटली आहेत.

2008-09 मध्ये राष्ट्रीय विजेतेपदानंतर गोव्याने 2016-17 मध्ये घरच्या मैदानावर गोव्याने संतोष करंडक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली, पण बंगालचा संघ वरचढ ठरला. गतवर्षी संतोष करंडक स्पर्धेत गोव्याचा संघ पश्चिम विभागीय फेरीतच गारद झाला. ही मोठी नामुष्की ठरली. फुटबॉलमध्ये विशेष परिचित नसलेल्या गुजरातने गोव्याला हरविले!

चर्चिल आलेमांव व त्यांचे कुटुंबीय नेहमीच आपल्या कौटुंबिक फुटबॉल परंपरेचे गुणगान करतात दिसतात, पण ते फक्त एक संघ चालवतात. या संघाची अकादमी नाही, युवा गुणवत्ता विकास कार्यक्रम दिसत नाही. 2018 ते 2022 या कालावधीत चर्चिल आलेमांव गोवा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष होते, त्यांच्याच कार्यकाळात राज्यातील फुटबॉलचे जास्त प्रमाणात अधःपतन पाहायला मिळाले. दोन वर्षे कोविड महामारी व संबंधित निर्बंधात गेली.

Argentina
Goa Government: विधानसभेत संख्याबळ असूनही; सरकारला एवढी भीती कसली?

मात्र त्यापूर्वीच्या दोन वर्षांत जीएफएचे पायाभूत फुटबॉलकडे दुर्लक्ष झाल्याचे जाणवले. त्याचा राग क्लबांनी यावेळच्या कार्यकारी समिती निवडणुकीत काढला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत चर्चिलपुत्र सावियो यांना पराभूत व्हावे लागले. कायतान फर्नांडिस व त्यांचा गट मोठ्या फरकाने विजयी झाला. या नव्या नेतृत्वाकडून गोमंतकीय फुटबॉलला फार मोठ्या अपेक्षा आहेत.

2017 साली भारतात 17 वर्षांखालील मुलांची विश्वकरंडक स्पर्धा झाली. यावर्षी ऑक्टोबरमध्ये देशात 17 वर्षांखालील मुलींची विश्वकरंडक स्पर्धा रंगली. दोन्ही स्पर्धा प्रतिष्ठेच्या, परंतु भारतीय फुटबॉल संघात एकही गोमंतकीय चेहरा दिसला नाही. या प्रकरणी राज्य संघटनेने हात झटकले, सरकारही अनभिज्ञ दिसले. राज्यात जीएफडीसी कार्यरत आहे, त्यांची राज्यभरात एकूण 36 केंद्रे आहेत.

राज्यातील फुटबॉलप्रेमाचे वर्णन भारावल्यागत केले जाते. येथील फुटबॉल प्रशिक्षण, साधनसुविधा यांची चर्चा होते, पण दर्जा कुठेच दिसत नाही. खासगी गुंतवणूकही खूपच मर्यादित आहे. सेझा फुटबॉल अकादमीचे कार्य स्पृहणीय आहे. धेंपो स्पोर्टस् क्लबने राष्ट्रीय प्रवाहातून माघार घेतली, मात्र श्रीनिवास धेंपे यांनी फुटबॉलप्रेम आटू दिले नाही. एला-जुने गोवे येथील त्यांची फुटबॉल अकादमी दर्जेदार आहे.

आयएसएल स्पर्धेत खेळणारा एफसी गोवा संघ व्यावसायिकता जोपासण्याचा प्रयत्न करतो. काही मोजकी उदाहरणे. मात्र इतरांकडून फुटबॉलच्या विकासात अपेक्षित आर्थिक गुंतवणूक होताना दिसत नाही आणि पुरस्कर्तेही हात आखडता घेताना दिसतात. फुटबॉल प्रगतीत अर्थकारण निर्णायक ठरते.

त्यामुळेच, गुणवत्ता ठासून भरलेली असली, तरी खेळणारे गोमंतकीयांचे पाय मागे हटताना दिसतात. फुटबॉलचा विकास, प्रगती यासाठी केवळ सरकारच काम करेल असे म्हणणे चुकीचे आहे. फुटबॉल खेळण्याऐवजी पोटापाण्यासाठी परदेशात जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. गोव्यात मैदाने भरपूर आहेत, प्रशिक्षकही आहेत, पण दर्जा उंचावत नाही हे खेदजनक आहे.

फुटबॉलमधील उदासीनता दूर करण्यासाठी संघटित प्रयत्न हवेत. राज्य सरकार, जीएफडीसी, जीएफए, भारतीय फुटबॉल महासंघ यांचा समन्वय, खासगी आर्थिक गुंतवणूक या बळावर कधीतरी एखादा मेस्सी गोव्यातून निपजू शकतो, आपण फक्त आशा बाळगायची!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com