अनिल पाटील
पुष्पधारी फाल्गुनातील वसंतात नखशिखांत पुष्प परिधान करणाऱ्या मध्यम आकाराचा साजशृंगारी वृक्ष म्हणजे पांगारा किंवा पांगिरा होय. उन्हाळ्याच्या सुरुवातीला, किनारपट्टी सोडून पश्चिम घाटाकडे वळले की हा आपले लक्ष वेधून घेतो किंवा सहज नजरेत भरतो. याला कारण असते याची पर्णहीन फांद्यांवरची लांबलचक लालभडक फुले.
याच्या अनेक जाती असल्या तरी आपल्याकडे प्रामुख्याने याच्या तीन प्रजाती दिसतात. साधा पांगिरा( एरिथ्रीना व्हॅरीएगाटा), रानपांगिरा (एरिथ्रीना स्ट्रिकटा )आणि तिसरा बुचपांगिरा (एरिथ्रीना सुबेरोसा). हे एकमेकांचे सख्खे भाऊबंद. एरिथ्रीना म्हणजे लाल फुले धारण करणारा.
यातील साधा पांगीरा किनारपट्टीत दिसतो पण रान पांगिरा आणि बूच पांगिरा यांचे पुष्पवैभव मात्र अवर्णनीय असते. या तिन्ही जाती अगदी हिमालयापासून खाली तामिळनाडू, कन्याकुमारीपर्यंत दिसतात. पळसाप्रमाणे यालाही तीन पाने असतात. दिसायला हा पळसासारखाच. त्यांची फॅमिली पण फॅबेसीच आहे. याचे संस्कृत नाव आहे, कंटकी पलाश म्हणजे काटेरी पळस. वसंत ऋतूमध्ये निष्पर्ण पांगिराची झाडे सौंदर्यानं नटून जातात. फुलांचा पुष्पकोष एका बाजूने फाटलेल्या तिरक्या तोंडाच्या नळीसारखा दिसतो. लालभडक अतिमुलायम पाकळ्यांची वैशिष्ट्यपूर्ण रचना फारच नयन मनोहारी असते. हा पुष्पसोहळा महिनाभर चालू असतो. या फुलांमध्येही पुष्परसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने नानाविध प्रकारचे पक्षी, भुंगे, मधमाशा आणि विविध प्रकारचे कीटक फुलातील पुष्परसासाठी फुलांभोवती गुंजी घालतात आणि आपसूकच परागकण प्रक्रियेस हातभार लावतात. त्यामुळे अशी झाडे पक्षी निरीक्षकांसाठी एक पर्वणीच असते. ज्येष्ठ पक्षी निरीक्षक डॉ. सुरेश गायकवाड यांनी या एका झाडावर संशोधन करताना, एकाच झाडावरच्या ४२ पक्षांच्या नोंदी केल्या आहेत.
आयुर्वेदात, सुश्रुताचार्यांच्या काळापसून या वृक्षाच्या सालीचा आणि पानांचा औषधांमध्ये मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. सांधेदुखी. सूज, व्रणावर त्यांचा लेप लावला जातो. काही ठिकाणी फुलांचा वापर विषबाधेवर उतारा म्हणूनही करतात. पांगिराचे लाकूड हलके, पांढरट रंगाचे आणि बऱ्यापैकी चिवट आणि टिकाऊ असते त्यामुळे खेळणी तयार करण्यासाठी, हलकी खोकी, काडीपेट्या बनवण्यासाठी याचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. त्यामुळे तो, एक अतिशय सुंदर आणि बहुगुणी असा वृक्ष ठरतो. कोणत्याही घाटमाथ्यावर, रस्त्याकडेला पांगिरा सहज नजरेत भरतो. ताळगाव ते मेरशी रस्त्यावर, गावडोंगरी भागातही तो सहज दिसतो आहे. सध्या तो फुलोऱ्यात असल्याने हे पुष्पवैभव पाहण्याची संधी सोडू नये.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.