
विकास कांदोळकर
स्थापत्य कला मानवी कल्पकता, सांस्कृतिक उत्क्रांती आणि पर्यावरणाशी संवाद साधत सभोवतालच्या परिसराशी एकरूप होत, मानवी गरजा पूर्ण करताना हवामान, संस्कृती आणि नवोपक्रमाने आकार घेतलेल्या विविध शैलींचे प्रदर्शन करते. प्राचीन जागतिक स्थापत्यकलेत मानवी संस्कृतीच्या खुणा स्पष्टपणे दिसून येतात.
इजिप्शियन लोकांनी गिझाच्या ‘ग्रेट पिरॅमिड’ बांधताना खगोलीय पिंडांशी जुळवून घेण्यासाठी अचूक अभियांत्रिकी वापरून, वैश्विक सुसंवादाचा मार्ग दाखविला. मेसोपोटेमियामध्ये, मानवी महत्त्वाकांक्षा, आध्यात्मिक आकांक्षांच्या मीलनाचे ‘झिग्गुरॅट्स टेरेस स्ट्रक्चर्स’ उदयास आले. सममिती आणि प्रमाणावर भर देणारे, ग्रीक स्थापत्यकलेचे ‘डोरिक-आयोनिक-कोरिंथियन’ क्रम ‘पार्थेनॉन’-अथेन्समध्ये आढळून आले.
रोममध्ये कमानी, ‘व्होल्ट’मधील प्रगत अभियांत्रिकीमुळे ‘कोलोझियम’ आणि जलवाहिनी संरचना सक्षम झाल्या. आशियामध्ये, ‘फोर्बिडन सिटी’त चिनी वास्तुकलेतील लाकडी चौकटी आणि टाइल केलेल्या छतांचा वापर झाला.
‘माया’सारख्या ‘मेसो-अमेरिकन’ संस्कृतींनी खगोलशास्त्र-संबंधित ‘चिचेन इट्झा’चे ‘एल कॅस्टिलो’सम पायऱ्या असलेले पिरॅमिड बांधले. युरोपात मध्ययुगात ‘नोट्रे-डेम-डी-पॅरिस’ गॉथिक कॅथेड्रलला असलेल्या टोकदार कमानी ‘रिब्ड व्हॉल्ट’, ‘फ्लाइंग बट्रेस’ आणि रंगीत काचा दैवी-संबंध प्रस्थापित करते.
१३व्या-१४व्या शतकात ‘अल्हम्ब्रा’सदृश इस्लामिक वास्तुकला गुंतागुंतीच्या टाइलवर्क आणि घुमटांनी भरभराटीला आल्या. पुनर्जागरण वास्तुकलेचे जनक ब्रुनेलेस्चीने फ्लॉरेन्सच्या ‘डोम’ची रचना केली. निसर्गाशी सुसंवाद साधणाऱ्या ‘फॉलिंगवॉटर’चे निर्माते, फ्रँक लॉयड राइट स्थापत्यकलेमध्ये ‘मिनिमलिझम आणि कार्यक्षमता’ स्वीकारतात.
आज, शाश्वत स्थापत्यकला पर्यावरणपूरक ‘डिझाइन्स’ना प्राधान्य देते. मिलानमधील ‘बॉस्को व्हर्टिकेल’, एक उभे जंगल असून शहरांत हिरवळीची निर्मिती करते.
अजिंठा-वेरूळमधील दगडांत कोरलेल्या लेण्यांमध्ये बौद्ध- हिंदू-जैन ‘सौंदर्यशास्त्रा’च्या नैसर्गिक लँडस्केपचा समावेश आहे. सिंधू संस्कृतीत मोहेंजोदारो-हडप्पा, शहरांमध्ये ‘ग्रिड लेआउट आणि ड्रेनेज सिस्टम’चे नियोजन दिसते. शास्त्रीय काळात मंदिर स्थापत्यकला भरभराटीला आली. दक्षिण भारतातील, तंजावरमधील बृहदेश्वर द्रविड मंदिरामध्ये वैश्विक तत्त्वांशी जुळवून घेणारे उंच गोपुरम आणि गुंतागुंतीचे कोरीवकाम होते.
खजुराहोचे कंदरिया महादेव, इत्यादी उत्तर भारतीय मंदिरांनी शिल्पकलेच्या तपशिलांवर भर दिला. कालातीत भव्यता दर्शविणारा ताजमहाल इंडो-इस्लामिक-पर्शियन वास्तुकला आणि भारतीय कारागिरीचे दर्शन घडवितो. वसाहतवादी राजवटीने ‘इंडो-सारासेनिक’ स्थापत्यकला सादर केली. मुंबईतील व्हिक्टोरिया टर्मिनसच्या रचनेत ब्रिटिश- इस्लामिक-भारतीय घटक आहेत. चार्ल्स कोरियासारख्या वास्तुविशारदांनी गांधीस्मारक संग्रहाला आधुनिकतावादी भारतीय डिझाइनचा पाठिंबा दिला.
गोव्यातील स्थापत्यकला भारतीय-पोर्तुगीज-स्थानिकतेचे मिश्रण आहे. वसाहतपूर्व गोव्यात उष्णकटिबंधीय हवामानासाठी बनवलेल्या हिंदू मंदिरांबरोबर माती-कौलारू-गवताची घरे होती. व्हरांडा आणि वायुवीजनासाठी अंगणाचा वापर होई.
इंडो-पोर्तुगीज वास्तुकला ‘बॅसिलिका-ऑफ-बॉम-जीझस’सम चर्चमध्ये दिसून येते, ज्यामध्ये ‘बारोक’ दर्शनी-भाग आणि टाइल केलेले छप्पर जोरदार पावसाळ्याशी सामना करते. पारंपरिक गोव्यातील घरे किंवा बंगले, लॅटराइट दगड, चुना प्लास्टर आणि उतार असलेल्या छतांचा वापर केल्यामुळे हिरव्यागार ‘लँडस्केप’शी सुसंगती साधतात.
अलंकृत ‘बॅलस्ट्रेड’ आणि ‘ऑयस्टर-शेल’ खिडक्या असलेल्या बाल्कनी स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेत पोर्तुगीज ‘सौंदर्यशास्त्रा’चे दर्शन घडवितात. ‘जेरार्ड दा कुन्हां’सारख्या वास्तुविशारदांच्या नेतृत्वाखालील आधुनिक गोव्यातील वास्तुकला, शाश्वततेवर भर देते.
सध्याच्या गोवा सरकारच्या विकासाच्या ‘विध्वंसक’ दृष्टिकोनाने, राज्याच्या नैसर्गिक पर्यावरणाशी स्थापत्यकला सुसंगत करण्याऐवजी, जलद शहरीकरणाला प्राधान्य दिल्यामुळे, गोव्याची ‘अद्वितीय’ पर्यावरणीय आणि सांस्कृतिक ओळख ‘संपुष्टात’ आली आहे.
‘लॅन्ड माफिया’, गोवा सरकार आणि केंद्र सरकारने, ‘बनावट कागदपत्रांद्वारे’ ‘नीज गोंयकारांच्या’ जमिनी ‘बळकावण्याचे कारस्थान’ राबवले आणि अजूनही राबवताहेत. लाखो चौरस मीटर बागायती जमिनी आणि भातशेती व्यावसायिक प्रकल्पांसाठी रूपांतरित केल्या गेल्यामुळे, गोव्याचे सौंदर्य आणि पर्यावरणीय संतुलन बिघडून चैतन्यशील, निसर्ग-एकात्मिक डिझाइनची जागा अतिसामान्य आधुनिकतावादी संरचनांनी घेतल्यामुळे, स्थापत्यकलेत पर्यावरणीय आणि सांस्कृतिक संवर्धनापेक्षा, ‘कॉर्पोरेट’ हितांना प्राधान्य दिले जाते.
यामुळे राज्याचे अद्वितीय ‘गोंयकारपण’ संपुष्टात आले आहे. असेही दिसते की गोव्यातील शहरी लोकांनी ‘ओवाळून’ टाकलेले प्रकल्प आजवर गोव्यातील पेडणे-काणकोण-सत्तरी-सांगे सारख्या ‘साध्या-भोळ्या’ लोकवस्तीच्या दुर्गम भागांवर लादलेले आहेत आणि अजूनही लादले जात असून, स्थानिकांना त्यांचा काहीच फायदा नाही.
पंचतारांकित हॉटेल्स, गोल्फ, कॅसिनो, हॉस्पिटल खाजगीकरण, महामार्ग, इलेक्ट्रॉनिक सिटी, स्मार्ट सिटी, हाउसिंग प्रोजेक्ट, टुरीजम, देवळांचे ‘सुशोभीकरण’?!, रोपवे, मोपा विमानतळ, आणि इतर ‘गोंयच्या’ स्थापत्यकलेशी सुसंगत नसलेल्या, ‘घातक’ पायाभूत-सुविधा प्रकल्पांमुळे पर्यावरणाचा आणि पारंपरिक इंडो-पोर्तुगीज-स्थानिक स्थापत्यकलेचा ‘सत्यानाश’ झाला आहे.
वरील साधन-सुविधा, ‘स्थानिकांच्या’ जागा बळकावलेल्या गोव्यातील ‘धूर्त आणि कोट्यधीश’ राजकारणी आणि ‘दिल्लीश्वरांसाठी’च आहेत. पूर्वापार ‘आत्मनिर्भर’ असलेल्या ‘गोमंतकीय’ खेड्यातील लोकांनी जुगाऱ्यांचे ‘चोचले पुरविण्यात’ आणि त्यांची ‘उष्टी-खरकटी काढण्यात’ धन्यता मानावी काय? ‘डॉर्मंट’ स्थितीतील ‘नीज-गोंयकारांनो’ जागे व्हा!!!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.