<div class="paragraphs"><p>Aguada Jail</p></div>

Aguada Jail

 

Dainik Gomantak

ब्लॉग

अग्वाद किल्ल्यातील काळरात्र..!

दैनिक गोमन्तक

शेकडो वर्षे पोर्तुगीजांच्या वरवंट्याखाली भरडणाऱ्या गोमंतकीय जनतेने गोवा मुक्तिलढा यथाशक्ती चालू ठेवला होता. गोमंतकीयांवरील अत्याचारांची, त्यांच्या हालअपेष्टांची कल्पना पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यानांही होती. पण हा प्रश्न अहिंसक मार्गाने, समंजसपणाने सोडवण्यावर त्यांचा भर होता. गोवा प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्यासाठी पोर्तुगाल सरकारने धूर्तपणे एक चाल रचली होती. 1 जुलै 1955 रोजी कायद्यांत बदल करून पोर्तुगाल देशाचे नामकरण 'उल्ट्रामार पोर्तुगीज' असे करण्यात आले. या नामकरणात पोर्तुगीज हा बहुखंडीय देश बनला आणि गोवा, दमण, दीव त्या देशाचे भाग बनले.

गोवा मुक्तीचा (Goa Liberation) प्रश्न सोडवण्यास आपले अहिंसावादी धोरण असफल ठरत असल्याचे पंतप्रधान नेहरू आणि भारत सरकारच्या लक्षात येऊ लागले. अंजदीव बेटावरील पोर्तुगीज सैनिकांकडून, भारतीय नौसेनेवर झालेल्या हल्ल्यानंतर भारत सरकारने गोव्याबाबतचे आपले धोरण बदलले. गोवा मुक्तीसाठी लष्करी कारवाई करणे भारत सरकारने निश्चित केले. डिसेंबर 1961 मध्ये हाती घ्यायच्या या लष्करी चढाईचे सांकेतिक नांव 'ऑपरेशन विजय' असे ठेवण्यात आले.

'ऑपरेशन विजय' अंतर्गत पोर्तुगीजव्याप्त गोवा प्रदेशावर हल्ला करण्यासाठी 16 डिसेंबर हा दिवस मुक्रर करण्यात आला. शक्यतो सशस्त्र लष्करी कारवाई टाळण्याकडे कल असलेल्या भारताने आंतरराष्ट्रीय समुदायामार्फत पोर्तुगीज सरकारचं मन वळवण्याचे प्रयत्न शेवटपर्यंत केले. अठरा डिसेंबरच्या भल्या पहाटे गोव्याच्या वेगवेगळ्या सीमाभागाहून भारतीय सेनेने गोव्यात प्रवेश केला. जनरल ऑफिसर कमांडिंग इन चिफ लेफ्ट. जन. जे. एन. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मेजर जनरल के.पी. कँडेथ यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन विजय राबविण्यात आले.

भारतीय लष्कराच्या विविध तुकड्या, उत्तर, उत्तर-पूर्व, आणि दक्षिण गोव्याच्या सरहद्दी ओलांडून गोव्यात प्रवेशकर्त्या झाल्या. 2, शीख लाईट इन्फन्ट्री या लष्कराच्या तुकडीने दोडामार्ग या लष्कराच्या उत्तर-पूर्व दिशेच्या सरहद्दीतून गोव्यात प्रवेश केला. या इन्फन्ट्रीच्या तुकडीचे नेतृत्व मेजर- शिवदेव सिंग सिद्धू करीत होते. मेजर सिद्धू यांच्या तुकडीने पहाटे 5.15 वाजता- गोव्याच्या दिशेने कूच केली. दोडामार्गहून ही तुकडी अस्नोडा गावात पोचली. त्याच दिवशी पहाटे पोर्तुगीज सैन्याने अस्नोडा नदीवरील पूल स्फोटकांद्वारे उदध्वस्त केला होता. स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने एक तात्पुरता कॉजवे तयार करून भारतीय सेनेने नऊच्या दरम्यान अस्नोडा पार केले. अस्नोडाहून थिवी तेथून कोलवाळ व म्हापसा, अशी गावे काबीज करीत भारतीय सेना पथक बेती येथे पोचले. राजधानी पणजीच्या अलीकडल्या किनाऱ्यावर वसलेल्या बेती गावी पोचेस्तोवर संध्याकाळचे पाच वाजले होते. समोर पोर्तुगीज गोव्याचा ध्वज सचिवालयावर फडकत होता. तो ध्वज खाली ओढून भारतीय तिरंगा फडकवण्यासाठी भारतीय सैनिकांचे हात शिवशिवत होते. पण सैनिक मुख्यालयांकडून पुढील आदेश येईपर्यंत बेतीच्या किनाऱ्यावरच थांबणे भाग होते.

ऐलथडीचे बेती गाव आणि पैलथडीची पणजी राजधानी यांच्या मध्ये साडेपाचशे मीटरचे मांडवी नदीचे पात्र. मांडवी नदी ओलांडण्यासाठी सैनिकाना बोटींची गरज होती. बेती गावात तळ ठोकताच मेजर सिद्धू यानी हवेत गोळीबार करून मांडवीच्या नदीपात्रात असलेल्या बोटीना आहे त्याच जागी स्थिर राहण्याचे आदेश दिले. त्या आदेशाला न जुमानता पळून जाण्याच प्रयत्न करणाऱ्या एका बोटीवर गोळीबार करून, सैनिकानी त्या बोटीला जलसमाधी घडविली. हा गोळीबार ऐकून गव्हर्नर जनरलच्या सचिवालयावरील पोर्तुगीज झेंडा खाली उतरवून त्या जागी सफेद ध्वज फडकविण्यात आला. रात्री आठ वाजता पणजीहून (Panjim) पाद्री ग्रेगरीओ आंताव हे पणजी शहराच्या कमांडरने पाठवलेले शरणागतीपत्र घेऊन बेती येथील भारतीय छावणीत दाखल झाले. मेजर शिवदेव यांनी हे पत्र आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याना दाखवून पुढील आदेश देण्याची विनंती केली. वरिष्ठांनी त्याना पुढील आदेश येईपर्यंत बेती किनाऱ्यावरच रहाण्याचे निर्देश दिले.

मेजरल सिद्धू वरिष्ठांची भेट घेऊन आपल्या तळावर परत येताच, दोन संशयित पोर्तुगीज सैनिकाना भारतीय सेनेच्या जवानांनी अटक केल्याची वर्दी आली. आम्ही पोर्तुगीज सैनिक नसून रेईश मागूश या गावातील स्थानिक नागरिक आहोत, असा त्या दोघांचा दावा होता. रेईश मागुश हा गाव बेतीपासून दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे. त्या भागाची पाहणीही करता येईल आणि संशयित अनोळखी इसमांच्या दाव्याची पडताळणीही होईल या उद्देशाने मेजर शिवदेव सिंग आपल्या काही निवडक सहकाऱ्यांसमवेत रेईश मागुश येथे रवाना झाले. रात्री साडेदहा वाजता रईश मागुश येथे निघालेल्या त्या ट्रकमध्ये सहा सैन्य अधिकारी आणि तीन सैनिक होते. त्याच्याकडे शस्त्रसाठाही जेमतेम असाच होता. गावी पोचताच स्थानिक नागरिकानी अटक केलेल्याना ओळखले आणि ते त्यांच्याच गावातील रहिवाशी असल्याचं भारतीय सैनिकाना सांगितले.गावकऱ्यांकडून खात्री करून घेताच, भारतीय सैनिकांनी त्यांना मुक्त केले. या गावातील नागरिकानी मेजर सिद्धू याना जवळच्याच आग्वाद किल्ल्यातील जेलसंबंधीची माहिती दिली. किल्ल्यांत पन्नास ते साठ राजकीय कैदी शिक्षा भोगत असून, त्यांची सुटका केली नाही तर पोर्तुगीज सैनिकांकडून त्यांची हत्या होण्याची शक्यता गावकऱ्यांनी वर्तविली. त्या गोमंतकीय राजकैद्यांचे प्राण वाचविण्यासाठी भारतीय सेनेने त्वरित आग्वादवर हल्ला करून- राजकैद्यांची सुटका करावी, अशी विनंती करत या किल्ल्यावर फक्त पाच ते सहा पोर्तुगीज सैनिक असल्याची माहीती गावकऱ्यांनी मेजरना पुरवली. निरपराध भारतीय नागरिकाना वाचविणे हे आपके आद्य कर्तव्य आहे, या भावनेने मेजर सिद्धू यानी त्वरित आग्वादच्या दिशेने मार्गक्रमण केले.

18 डिसेंबरच्या रात्रीच्या भीषण अंधारात साडेअकरा वाजता मेजर शिवदेव सिंग आपल्या सहकाऱ्यांसमवेत आग्वाद किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यासमोर पोचले. आपल्या समवेत असलेल्या वाटाड्या आणि दुभाष्याद्वारे मेजर सिद्धू यानी पोर्तुगीज पहारेकऱ्यास किल्ल्या बाहेर येण्यास सांगितले. पणजी येथील पोर्तुगीज लष्कराने शरणागती पत्करल्याचेही त्याला सांगण्यात आले. पण किल्ल्यातील पोर्तुगीज सैनिक शरणागती पत्करण्यास तयार नव्हते. त्यानी भारतीय सैनिकांवर गोळीबार करण्यास सुरवात केली. शत्रुपक्षाच्या स्वयंचलित बंदुका, रायफल्स, ग्रेनेडस लहान तोफा भारतीय सेनेच्या दिशेने आग ओकू लागल्या. अचानक झालेल्या या भयंकर हल्ल्याने भारतीय सैनिक गांगरले.

पोर्तुगीज सैन्यांच्या माऱ्यास तोंड देण्याची भारतीय सैन्याची शस्त्रसज्जता नव्हती, तरीही हाती असलेल्या शस्त्रास्त्रांसह त्यांनी पोर्तुगीजांवर प्रतिहल्ला चढविला. पोर्तुगीजांच्या हातबाँब, ग्रेनेडसच्या माऱ्यांत भारतीयांचा सैन्यट्रक उध्वस्त झाला. मेजरनी आपल्या एका सैनिकाला बेती येथे माहिती देण्यासाठी पाठविले. ग्रेनेड्‌सच्या हल्ल्यात कॅप्टन सहगल आणि स्वत: मेजर शिवसिंग सिद्धू जखमी झाले. जखमी अवस्थेतही मेजर सिद्धू स्टेनगन चालवीत शत्रूशी झुंजत राहिले.

मध्यरात्र उलटून गेली होती. 19 डिसेंबरच्या उत्तररात्रीचे पावणेदोन वाजले होते. पोर्तुगीज सैनिकानी फेकलेला एक ग्रेनेड मेजर सिद्धू यांच्या जवळ फुटला आणि त्या स्फोटाने जबर जखमी झाले. काही मिनिटांतच त्याना वीरमरण प्राप्त झाले. एव्हाना भारतीय तळावर आग्वाद येथील चकमकीची वार्ता पोचली होती. पूर्ण तयारीनिशी भारतीय सेनेने आग्वाद किल्ल्यावर हल्ला केला. 19 डिसेंबरच्या पहाटे सहा वाजता पोर्तुगीज सैनिकानी शरणागती पत्करली आणि आग्वाद किल्ला भारताच्या ताब्यात आला. त्यानंतर काही तासांतच 2,शीख लाईट इन्फट्रीच्या जवानांनी पणजीवर चाल केली आणि राजधानीचे शहर ताब्यात घेतले. संध्याकाळी पोर्तुगीज सरकारने भारतीय सैन्यापुढे सपशेल शरणागती पत्करली आणि रात्री आठ वाजता पोर्तुगीज गव्हर्नर जनरल वासाल द सिल्वा यानी शरणागती पत्रावर सही केली.

ऑपरेशन विजय ही मोहीम फक्त चाळीस तासांत फत्ते झाली. शत्रूच्या सामर्थ्याची कल्पना न घेता केलेल्या आग्वाद येथील हल्ल्यात दोन कुशल सेनाधिकाऱ्यांचे हकनाक बळी मात्र गेले. मुंबईहून आलेल्या नातेवाईकांना आग्वाद किल्ला दाखवण्यासाठी काल संध्याकाळी तिथे गेलो होतो. गोवा मुक्तिदिनाच्या हीरक महोत्सवी वर्षांत आग्वाद जेलचे रूपांतर संग्रहालयात करण्यात आले आहे. सिकेरीहून किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण चालू आहे. किल्ल्याच्या आवारात अनेक मजूर राबत होते. समुद्रात डुंबणाऱ्या सूर्याच्या साथीने पर्यटक आपले फोटो काढण्यात मग्न होते. मी कुटुंबियांसमवेत तो मनोहर परीसर न्याहाळत होतो. पण माझ्या डोळ्यासमोर उमटत होती ती मुक्तीच्या पहाटेपूर्वीची बरोबर साठ वर्षांपूर्वीची भीषण काळरात्र. किल्याच्या प्रवेशद्वारावर मला दिसत होते रक्ताने माखलेले कॉप्टन सहगल आणि मेजर शिवदेव सिंग यांचे मृतदेह. माझ्याही नकळत डोळ्यात अश्रु उभे राहिले. नुकताच सूर्यास्त झाला होता. अश्रू गालावरून ओघळून मातीत टपकले. सूर्याच्या साक्षीने त्या तेजस्वी शूरवीराना वाहिलेले ते अर्घ्यदान होते.

-अरुण कामत

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

E-Vehicle : ई-वाहन खरेदीकडे ग्राहकांची पाठ; दरमहा ८२४ वाहनांची नोंद

Land Grabbing Case: गोवा जमीन हडप प्रकरण; ईडीची 36 जणांविरोधात मनी लाँड्रिंगची तक्रार

Goa And Kokan Today's Live News: जेनिफर ऑलिवेरा यांचे सरपंचपद अबाधित

SSC Result Sanguem : सांगे तालुक्यात सरकारी शाळांची बाजी; दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव

Nepal: नेपाळनेही एव्हरेस्ट, MDH मसाल्यावर घातली बंदी; धोकादायक केमिकलबाबत केली कारवाई

SCROLL FOR NEXT