वाळपई Goa Liberation Day : सत्तरी तालुक्यात राणे समुदायाने पोर्तुगीज सत्तेविरोधात जे उठाव केले, त्या उठावांना बंड म्हणणे चुकीचे आहे. बंड स्वकियांविरोधात केले जाते. पोर्तुगीज परकीय होते आणि सत्तरीच्या राणे समुदायाने जे उठाव पोर्तुगीज सत्तेविरोधात केले ते स्वातंत्र्य संग्राम होते. असे एकूण 22 रणसंग्राम पोर्तुगीज सत्तेविरोधात सत्तरीच्या राणे समुदायाने केले, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते तथा इतिहास अभ्यासक ॲड. शिवाजी देसाई यांनी केले.
सत्तरी तालुक्यातील ऐतिहासिक नाणूस किल्ल्यावर सम्राट क्लब साखळीच्या वतीने गोवा (Goa) स्वातंत्र्याच्या हीरक महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या ‘क्रांतिवीर दीपाजी राणे आणि सत्तरीचा इतिहास’ या विशेष कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी सम्राट क्लब साखळीचे अध्यक्ष क्रिष्णा गावस आणि इतिहासप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी देसाई म्हणाले, सत्तरीच्या राणे समुदायाने जे पोर्तुगीज सत्तेविरोधात संग्राम केले, त्यात संग्रामांना इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यातील दीपाजी राणे आणि दादा राणे यांनी केलेले संग्राम विशेष महत्त्वपूर्ण आहेत. पोर्तुगिजांच्या अत्याचाराला कंटाळून रयत एकत्र आली आणि 1852 साली दीपाजींना मिळाली. दीपाजींना नेतृत्व करण्याची विनंती केल्यावर सर्वांनी मिळून नाणूस किल्ल्यावर आक्रमण केले. 26 जानेवारी 1852 रोजी तो ताब्यात घेतला. यावेळी झालेल्या युद्धात असंख्य पोर्तुगीज मारले गेले. दीपाजींचा पराक्रम संपूर्ण गोव्यात गाजला आणि अखेर पोर्तुगीज (Portuguese) सत्तेला तह करून नमते घ्यावे लागले.
शेवटचा उठाव राणे समुदायाने केला. जवळपास दोनशे सैनिकांचा त्यात सहभाग होता. पोर्तुगीज जरी व्यापार करण्यासाठी गोव्यात आले तरी त्यांनी प्रचंड अत्याचार आणि धर्मांतरण करून गोव्याची सत्ता हस्तगत केली. छत्रपती शिवाजीराजे आणि संभाजी महाराजांनी देखील मोठ्या प्रमाणात पोर्तुगिजांना प्रतिकार केला, असे देसाई म्हणाले. स्वागत, मान्यवरांची ओळख, सूत्रनिवेदन आणि आभार प्रदर्शन क्रिष्णा गावस यांनी केले. शिवाजी देसाई यांनी प्रारंभी क्रांतिवीर दीपाजी राणे आणि दादा राणे यांच्यावरील पोवाडा सादर केला. कार्यक्रमास भरभरून प्रतिसाद लाभला.
दादा राणेंना दिला दगा
दादा राणे यांनी 6 ऑक्टोबर 1895 रोजी सत्तरीतील जनता आणि सैनिकांना सोबत घेऊन हळर्ण किल्ला ताब्यात घेतला. दादा राणेंनी या भागात दरारा निर्माण केला. दादा राणे यांनी संपूर्ण गोव्यातून पोर्तुगिजांना हाकलून लावण्याची योजना आखली. पणजी, आग्वाद किल्ला घेण्याची त्यांची योजना होती; परंतु पोर्तुगिजांनी पुन्हा तह केला आणि दादा राणे यांना खोट्या खुनाच्या आरोपाखाली अडकवून आफ्रिकेच्या तुरुंगात त्यांना 28 वर्षांची शिक्षा झाली, असे देसाई म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.