Navratri 2022 | Dandiya Dainik Gomantak
ब्लॉग

Navratri 2022: नवरात्री ऊर्जेचा ठेका अन् संस्कारांची रुजवण

Navratri 2022: आता केवळ चूल आणि मूल नव्हे; तर अनेक क्षेत्रांत महिला भरारी घेत आहेत.

दैनिक गोमन्तक

Navratri 2022: आज मनातील रावण मारून मनामनात मांगल्याचे सीमोल्लंघन करण्याचा दिवस. नवरात्र हा खास देवीचा उत्सव. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री अशा विविध रूपांतील देवीचे दर्शन या काळात होते. हा खऱ्या अर्थाने स्त्रियांचा, स्त्रीत्वाचा उत्सव. गोव्यात चतुर्थीच्या घुमट आरती संपत नाहीत तोच नवरात्रीची चाहूल लागते आणि मनात गरबा दांडियाच्या टिपऱ्या वाजू लागतात.

आज आपल्या सर्वच सणांचे व्यापारीकरण झालेय हे खरे आहे. नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे ही टूम तर व्यापारीकरणच. पण काय हरकत आहे? आपल्याला ऊर्जा पुरवणारा, आपल्या रोजच्या रटाळ जीवनात प्राण फुंकणारा, उत्साह भरणारा असा सण हवाच. तरुण मुलं-मुली तर गरबा दांडिया खेळण्याच्या ओढीने संध्याकाळी मंदिरात जमतात. त्यापूर्वी महिनाभर जमतील तसे क्लास लावून पूर्वतयारीही करतात.

आज गरबा दांडिया अगदी गावगावात पोचलाय. एवढेच नव्हे तर त्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेतली आहे. नृत्य हा महिलांचा आवडता कलाप्रकार आहे. मग तो गणपतीसमोर घातल्या जाणाऱ्या फुगडी रूपात असो, गरबा दांडियातील नृत्य असो किंवा नंतर येणाऱ्या धालोत्सवातील नाच असो. असे सण आपल्या आयुष्याला एक लय मिळवून देतात.

नवरात्रोत्सवातील मखरोत्सव तर गोव्याचे वैशिष्ट्य. केवळ कवळे मंगेशी फोंडाच नव्हे तर गावागावातील मंदिरांत आता मखरे सजलेली दिसतात. गावातील तरुण वर्ग अगदी उत्साहाने त्यात सहभागी होत असतो. एका अर्थाने हा सृजनोत्सवच आहे. नवरात्रातील रुजवण हे सृजनच नाही का?

अनेक मंदिरांत तर ज्या दिवशी जो रंग असेल त्या रंगाची फुलं वापरून छान सजावट केलेली आढळून येते. गावात एक मंगलमय वातावरण यामुळे निर्माण होते. गावाला बांधून ठेवण्यासाठी अशा प्रकारचे सण उत्सव मोठेच काम करत असतात. गोमंतकीय तसेही फार उत्सवप्रिय. काले, जत्रा यात उत्साहाने सहभागी होणारे.

या निमित्ताने चालणारी नाटके, दशावतारी प्रयोगही हौसेने पाहाणारे. त्यांनी गरबा दांडियाचा स्वीकार केला तर आश्चर्य नाही. येथील भूमी ही कलाकारांची. लय, ठेका याचे त्यांना अप्रूप. नवरात्रोत्सवात भजन पूजनाबरोबर कीर्तनांचा आस्वादही घेता येतो. सृजन हे स्त्रियांना मिळालेलं वरदान. त्यामुळे हा उत्सव तसा त्यांचाच.

आता केवळ चूल आणि मूल नव्हे तर अनेक क्षेत्रांत महिला भरारी घेत आहेत. त्यांचा यथोचित सन्मान ‘दुर्गा’ म्हणून होत असतो. अनेक संस्था, संघटना समाजातील कर्तृत्ववान स्त्रियांची दखल घेत आहेत, त्यांचा गौरव करत आहेत. आपल्या कार्याची घेतली जाणारी दखल आपल्याला आणखी चांगले काम करण्यास प्रोत्साहन देत असते.

घरातील स्त्री शिक्षित असेल तर पूर्ण घरालाच ती शिक्षणाची ओढ लावू शकते. नवरात्रीचे चैतन्य म्हणजे तरी वेगळे काय आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरातील आई दुर्गा आपल्यातील असुराला संपवून ज्ञानाचे दीप लावण्याची, वाईटावर चांगल्याच्या विजयाची रुजवण करण्याची शिकवणच तर देत असते. नवरात्रीचा ठेका मनात साठवताना त्यातील संस्काराची रुजवण आपण विसरू नये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Navy Goa: गोव्यात नौदलाच्या जहाजाचा अपघात; मच्छिमारांच्या बोटीला धडक, दोन बेपत्ता, 11 जाणांना वाचविण्यात यश

Saint Francis Xavier Exposition: जुन्या गोवेत देशी-विदेशी भाविकांची गर्दी! कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांनी प्रार्थना घेऊन केला शुभारंभ

Electricity Tariff Hike: वीज दरवाढीच्या शिफारशींना ‘जीसीसीआय’चा आक्षेप; पर्यटन व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होण्याची शंका

Panaji: मांडवी पुलावर पेटत्या कारचा थरार! आगीच्या भडक्यात दर्शनी भाग जळून खाक; शॉर्टसर्किट झाल्याचा संशय

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

SCROLL FOR NEXT