Flood Dainik Gomantak
ब्लॉग

Natural Disaster: ...अन्यथा आता विनाश अटळ आहे!

गोमन्तक डिजिटल टीम

कमलाकर द. साधले

Natural Disaster जगभरात गाजलेल्या हिमालयातील ‘चिपको आंदोलना’ला चार दशके लोटली. या आंदोलनाचे नेते कै. सुंदरलाल बहुगुणा व चंडीप्रसाद भट्ट दोघेही माझ्याकडे येऊन गेले. सुंदरलालजी तीन वेळा आले.

दोन वेळा मुक्काम माझ्या घरीच होता. त्यांच्याकडून प्रत्यक्ष माहिती मिळाली. हिमालयातील झाडे त्या गावांतील लोकांनी, विशेषत: स्त्रियांनी, कापणीसाठी कंत्राटदार आले असता पर्यावरणीय झाडांना मिठ्या मारून वाचविली.

हिमालयात झाडांचे प्रमुख पर्यावरणीय कार्य असते ते तेथील पर्वतांच्या तीक्ष्ण उताराची भुसभुशीत माती दगड झाडांच्या मुळांनी घट्ट पकडून ठेवणे. झाडे कापली की ते निघून जाते आणि दरडी कोसळतात. मी उत्तरांचलात प्रवास केलेला आहे.

तेथे उघडे बोडके डोंगर. एका दिवसाच्या प्रवासात चार-पाच ठिकाणी दरडी कोसळलेल्या आढळल्या. त्याच हिमालयाच्या पूर्वेकडील भूतानमध्ये चार दिवस प्रवास केला. तेथे वृक्षकापणी न झाल्याने भरगच्च झाडीचे डोंगरउतार, एकही ठिकाणी दरड कोसळलेली आढळली नाही.

प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनाही आज शिकविले जाते की, ‘झाडे-गवत यांचे एक कार्य माती वाढून, उडून जाण्यापासून रोखणे’. हे सरकारला माहीत नाही?

या पावसाळ्याच्या पुराचा एक व्हिडिओ व्हॉटस्ऍपवरून आला. कोरड्या नदीच्या पात्रातून पुराचा एकदम एक लोट यावा तसा हिमालयातील एका पर्वतीय गावाच्या रस्त्यातून चिखलपाण्याचा एक लोंढा लांबून येताना दिसतो. तो एका गल्लीत घुसतो. त्या चिखलाच्या लोंढ्यात लाकडाचे कापलेले ओंडकेच ओंडके दिसतात.

लाकडाची एक अख्खी वखारच वाहून आलेली दिसत होती. पाणी कमी आणि माती जास्त असा चिखलाचा मलबा आणि त्यांत निरनिराळ्या आकाराचे कापलेल्या लाकडाचे ओंडके. निसर्ग सुस्पष्टपणे ओरडून सांगत आहे, दाखवीत हे पहा, वरच्या पर्वतांतील वृक्षतोडीचे परिणाम. पण डोळ्यावर पट्टी आणि कानात बोळे, अशा व्यवस्थेला काय करायचे?

विकासाच्या नावाखाली छोट्या छोट्या हितसंबंधांची जपणूक, सर्वांच्या सुरक्षिततेला डावलूूनही कॉन्ट्रॅक्टरस्नेही सरकार आणि स्वार्थी उद्योजकच नव्हे तर सामान्य, सुशिक्षित, स्वत:ला पर्यावरणप्रेमी म्हणविणारा नागरिकही ‘तुम्ही म्हणता ते सर्व खरे, पण असे केल्याशिवाय कसे होणार?’ हे उद्गार पदोपदी ऐकवत असतो. फक्त तात्कालिक सोय व सोपेपणासाठी मूळ उद्दिष्टाचाच बळी दिला जातो.

एक नवीन सामाजिक संस्था. तिच्या घटनेत पर्यावरण जतन- संवर्धन याला बरेच महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. तिने संपादित केलेल्या नवीन जागेत या वर्षाच्या वृक्षारोपणाचा विषय आला. पहिला प्रस्ताव- ‘तिथे झाडेझुडपे वेडीवाकडी कशीही वाढलेली आहेत.

कुठे काय पेरायचे याचा अंदाजच येत नाही. आधी जेसीबी घालून सर्व साफ करूया, शक्य तेथे डोंगर उतार समतळ करूया. मग झाडांचे नीट प्लॅनिंग करता येईल’. यातून या मंडळींना बाहेर काढण्यास मला बरेच कष्ट पडले.

मात्र, संत ज्ञानेश्‍वरांची एक उक्ती आठवली- ’अवघे देऊळ मोडोनि पौळी केली! ’देवळाची देखभाल नसल्याने मोडकळीला आलेले असते. एक भाग मोडलेला असतो. गुरे- वटवाघळे, साप यांनी आपले बस्तान बसविलेले असते.

त्यामुळे लोकही जायला घाबरतात. गावकरी ठरवितात आधी झुडपे काढून साफ करूया. देवळाच्या भोवती तटबंदी व फाटक करूया. मग लोक ये-जा करू लागतील. देऊळ नीट बघण्यास वर्गणी मिळू लागेल. तटबंदीसाठी कोण दगड देतो, कोण चुना, कोण श्रमदान देण्याचे कबूल करतो. काम सुरू होते.

पण दगड कमी पडतात. मग देवळाची एक भिंत कोसळलेली असते. तेच दगड वापरूया असे ठरते व काम चालू ठेवले जाते. तरीही तटबंदी पुरी होत नाही. मग देवळाचा एक भाग मोडायला आलेला आहे. तो केव्हा ना केव्हा कोसळणारच. ते दगड काढूया.

देऊळ नवीन बांधावे लागणार. ते देऊळ असे अर्धवट असे होण्याऐवजी तटबंदी तरी पूर्ण करूया. असा व्यावहारिक शहाणपणाचा प्रस्ताव येतो आणि ’अवघे देऊळ मोडोनि पौळी कैली’ हे घडते. तात्कालिक सोय, सोपेपणा यासाठी मूळ उद्दिष्टाचाच विसर पडतो.

याशिवाय स्वार्थाची भूमिका (स्वतःची वा आपल्या हितसंबंधियांची) बहुतेकवेळा निर्णायक ठरते. गोव्यात वाघ नाही हा धोशा सरकारने बराच काळ चालविला. शेवटी वाघोबांनी वनखात्यांच्या कॅमेऱ्यासमोर साक्ष दिली.

एकदा नव्हे, तीनचार वेळा. तरी तो कर्नाटकमधून आलेला पर्यटक ठरतो. आता त्याने आपला जन्मदाखला व आईवडिलांचा निवासी दाखला आणून देणे बाकी राहिलेय.!. बळेच कानात बोळे व डोळ्यांवर कातडे ओढणाऱ्यांना काय करणार?

हे झाले हितसंबंधियांचे. निष्ठावंतांचे काय? पर्यावरणाच्या सभा, परिषदा कार्यशाळा घडतात. प्लास्टिक व नॉन-बायोडीग्रेडेबल कचऱ्यावर प्लास्टिकच्या एकवेळ वापरावर आवर्जून बोलले जाते. पण त्या कार्यक्रमात दिलेला चहा हा एकेरी वापराच्या कपातूनच दिला जातो.

तेथे ती कॅटररच्या अखत्यारीतील गोष्ट म्हणून त्या पापातून स्वतःची सोडवणूक करून घेतात. सार्वजनिक संस्कृतीचा भाग म्हणून या प्रथेकडे ’काना-डोळा’ केला जातो. कॅटररकडे आग्रह धरला तर तो स्टील किंवा काचेच्या कपांची सोय करतो हे मी पाहिलेले आहे.

उच्च शिक्षितांतसुद्धा काय चालते हे एक वैद्यकीय व्यावसायिक एका लेखामध्ये लिहितात. मोठ्या कंपनीत वरच्या हुद्द्यावर काम करणाऱ्या एका उच्चशिक्षित स्त्रीचे उद्गार, ‘म्हणे घरी करून खा! रिकामटेकड्यांना सांगायला काय जाते? सकाळपासून नुसती धुमश्चक्री असते. सीरियल-दूध नाहीतर कॉफी बिस्कीट जेमतेम खाऊन ट्रेन गाठायची.

दुपारी काम करता करताच कॉफी हम्बर्गर पोटात ढकलायचा. रात्री घरी पोहोचतो तेव्हा इतके थकायला होते! एखादा कॉम्बो-मील घरी मागवतो. नाहीतर नूडल्स किंवा रेडीमेड सूप-ब्रेड गिळलं की झोपायला मोकळे!’

हे शीघ्रान्न (फास्ट फुड) शरीराला किती घातक त्यातून कोणकोणते आजार जडतात याविषयी एवढी माहिती वृत्तपत्रांतून, नियतकालिकांतून, सोशल मीडियातून येत असते की, सुशिक्षित मंडळी याविषयी अनभिज्ञ असूच शकत नाहीत.

एसी रूममध्ये बसून काम करण्याने या ऑफिसर बाई संध्याकाळपर्यंत थकून जातात याला कारण दिसते ते म्हणजे कामाचा व धावपळीचा ताण. संध्याकाळी घरी येताना वाटणारा थकवा, चिडचिड या भाषेत बाईची प्रकृतीच त्यांना ओरडून सांगते, ‘बाई गं, फार होतेय हे, दिनचर्या, आहार-विश्रांती मनःशांती यांचा विचार कर.

शरीर विज्ञान सांगते, जंक फूडबरोबर, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह हे दुष्ट त्रिकूट शरीरात घुसतात. ठाण मांडून बसतात. चिंता, नैराश्य मनात घर करतात. मेंदूच्या गाभ्यातल्या स्मृतिकेंद्राची कार्यक्षमता घटते. बुद्धीचा मनाला तल्लखपणा कमी होतो. त्या घसरगुंडीमुळे चिंता - नैराश्य घेरते.’

प्रकृती हे निरनिराळ्या माध्यमातून बोलत असते, सांगत असते. पण बाजार व्यवस्थेने केलेल्या तात्पुरत्या सोईकरिता आपण दोन्ही कानात बोळे घातले आहेत आणि डोळ्यांवर पट्टी बांधली आहे, हे धोके आपणाला दिसू नयेत म्हणून! धोक्यांपासून तेच सध्याचे संरक्षण, ही मानसिकता बनली आहे.

घनदाट अरण्यातून वाहणारे पाणी पावसाळ्यातसुद्धा स्वच्छ, पारदर्शक असते. गावातून वाहणारे लाल का? मानवी कृतीने जखमी झालेल्या रक्ताळलेल्या भूमीला तो आक्रोश असतो. जलतज्ज्ञ शूबर्गर म्हणतात, ‘पाणी क्रुद्ध बनते. रस्त्यावर निदर्शन करून थांबत नाही. ते संहाररूप धारण करते तेव्हा बांधबंधारे तोडते, पूल पाडते, घरे मोडते, मोटारगाड्या उलट्या पालट्या करून दूर भिरकावून देते’.

निसर्गाची ही भाषा समजायला कठीण नसते. ती वाचायचा आपण कधी प्रयत्न करतो का? आपण बेपर्वाईने फेकलेला कचरा, सांडलेले तेल समुद्र किनाऱ्यावरील स्वच्छ रेतीवर पसरून साभार परत करतो. पुरात पाण्याची पातळी वाढते तेव्हा प्लास्टिक कचरा काठांवरील झाडाझुडपांच्या फांद्यात अडकून राहतो, हे निषेध फलक आपण कधी वाचतो का?

आपण हवेत अनेक प्रकारची प्रदूषके सोडतो. त्यामुळे हवा संतापते. रागाचा पारा चढतो. त्यामुळे चक्रीवादळे वाढत चालली आहेत. वादळे जेव्हा गावात घुसतात आणि जे वायुतांडव घडते त्यात पालापाचोळ्याबरोबर घरांची छपरेही उडून जातात.

झाडे उन्मळून पडतात, विजेचे खांब वाकतात, खांबांवरील विजेच्या तारा तुटून पडतात. काही मिनिटांत होत्याचे नव्हते होते. यांतून सृष्टी काही सांगत असते, बोलत असते. ते वाचले पाहिजे, ऐकले पाहिजे. योग्य प्रतिसाद दिला पाहिजे. गोष्टी अशा थराला गेल्या आहेत की,

हे वाचाल (आणि योग्य प्रतिसाद द्याल) तर वाचाल : अन्यथा आता विनाश अटळ आहे!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT