Marathi Theatre in Goa Dainik Gomantak
ब्लॉग

Marathi Theatre in Goa : गोमंतकीय मराठी रंगभूमी दीन का?

गोमन्तक डिजिटल टीम

Marathi Theatre in Goa : मराठी रंगभूमीच्या उगमाविषयी मतभेद असले तरी संस्थानिक चिंतामणराव अप्पासाहेब पटवर्धन यांच्या आश्रयामुळे कै. विष्णुदास भावे यांनी 5 नोव्हेंबर 1843 रोजी सांगली येथे ‘सीता स्वयंवर’ या नाटकाचा प्रयोग केला आणि मराठी रंगभूमीचा पाया रचला, असे मानले जाते आणि तोच दिवस मराठी रंगभूमीदिन म्हणून साजरा केला जातो. मराठी नाट्य परंपरा जोपासली जात असताना नवनवीन नाटके रंगभूमीवर येत आहेत. पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, वैचारिक, मानसशास्त्रीय, करमणूकप्रधान, रहस्यमय असे वेगवेगळे विषय आणि प्रकार मराठी रंगभूमीने आजपर्यंत हाताळले.

नाटक ही अभिव्यक्तीतील आविष्कारातून रसिकांपुढे मांडण्याची सर्वोत्तम कला आहे. भारतात नाट्यकलेची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. ‘भरत नाट्यशास्त्र’च्या पूर्वीपासून भारतात नाटक अस्तित्वात होते, याचे पुरावे अश्वघोष यांच्या नाटकावरून सापडतात. भारतात यानंतर कालिदास, भवभूती, भास, शूद्रक इत्यादी लेखकांची नावे संस्कृत आणि प्राकृत भाषेतील नाटकांमधून दिसून येतात. हीच परंपरा पुढे खंडित-अखंडित स्वरूपात आजपर्यंत चालत आलेली आहे, पाश्‍चात्य रंगभूमीचा ठळक प्रभाव आधुनिक मराठी रंगभूमीवर दिसून येतो.

गोव्यातील राज्य नाट्य स्पर्धा सोडली तर गोव्यातील नाटक रंजनात्मक, कौटुंबिक आणि विनोदी नाटक यापुढे जात नाही. नाही म्हटल्यास राजकारण, जातिव्यवस्था, महिलांचे प्रश्‍न, जमीनदार, आरोग्य, पर्यावरण आणि इतर विषय काही प्रमाणात नाटकांत मांडल्याचे दिसून येते, पण यात नाविन्याचा अभाव असतो. खरे म्हणजे जागतिक रंगभूमीवर झालेल्या घडामोडींचा येथील रंगकर्मी विचार करताना दिसत नाहीत. काही गोमंतकीय नाट्यसंस्थांनी आपल्या नाटकांचे प्रयोग देशात आणि परदेशात सादर केलेले असतीलही, परंतु जागतिक रंगभूमीने दखल घ्यावी असे प्रयोग गोव्यातील मराठी रंगभूमीवर होताना दिसत नाहीत. एवढेच नाही तर भारतातील इतर प्रांतांमध्ये होणाऱ्या प्रयोगांची-प्रायोगिकतेची दखलसुद्धा तेवढ्या प्रमाणात घेतलेली दिसत नाही. जागतिक स्तरावर इतर कला आणि व्यवसाय क्षेत्रांत ठसा उमटविणाऱ्या गोमंतकीयांचे नाट्यकलेत प्रयत्न झालेले दिसत नाहीत.

उत्सवी रंगभूमी, स्पर्धात्मक हौशी रंगभूमी आणि व्यावसायिक रंगभूमी असे तीन प्रकार गोव्यात पाहायला मिळतात. राज्यस्तरावरील स्पर्धात्मक रंगभूमीवर नवनवीन नाट्य आविष्कार काही प्रमाणात सादर झालेले दिसून येतात, पण अनेकदा सादरकर्त्यांच्या किंवा परीक्षकांच्या अज्ञानामुळे केलेले प्रयास फुकट जातात.

बालरंगभूमीने नाट्य, दूरदर्शन व सिनेमासृष्टीला अनेक कलावंत दिले आहेत. रंगभूमीला सशक्त करण्यासाठी लहान वयापासूनच रंगभूमीची माहिती व आकर्षण निर्माण होणे गरजेचे आहे. यासाठी बालनाट्य शिक्षणाची आवश्यकता असते. यातून कलावंत, तंत्रज्ञ आणि रसिक निर्माण होण्याचे कार्य घडत असते. नाही म्हटल्यास शालेय स्तरापासून उच्चस्तरापर्यंत नाट्य शिक्षणाची सोय सरकारतर्फे केली गेली आहे, पण या नाट्यशिक्षणाचा दर्जा आणि त्यातून घडलेल्या कलाकारांचा लेखाजोगा होणे अत्यंत आवश्यक आहे. शालेय स्तरावर किंवा नाट्य महाविद्यालय स्तरावर गोव्यात शिकवणाऱ्या शिक्षकांची गोव्यातील ‘अ’ किंवा ‘ब’ गट स्पर्धेत सादर होणाऱ्या नाटकांना असलेली नगण्य उपस्थिती हे कशाचे द्योतक असावे? गोवा कला आणि संस्कृतीच्या माध्यमातून उदरनिर्वाहाचे साधन पक्के झाल्यामुळे काही नाट्यशिक्षकांनी आपल्या कलेत प्रवाही राहण्याचे सोडून दिल्याचे जाणवत आहे. सिनेमा, टीव्ही चॅनल्सची वाढती संख्या, मोबाइल, इंटरनेट यांनी मनोरंजनाचे अनेक पर्याय खुले झाले. त्यामुळे, नाटकाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळणे कठीण आहे.

नवीन रंगकर्मींच्या प्रयत्नांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याने प्रयोगाला मर्यादा येत आहेत. रंगकर्मी-रसिकांची अनास्था नवोदितांची निराशा करणारी ठरली आहे. नाट्य निर्मितीचे प्रयत्न रसिकांचा प्रतिसाद घटल्याने बंद पडले आहेत. मराठी रंगभूमीला वाचविण्यासाठी या दृष्टीने विचार होणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या आवडत्या कलाकाराला प्रत्यक्ष अभिनय करताना बघणे आणि त्याला त्याच्या कामाची दाद देणे हे मराठी प्रेक्षकांना मनापासून आवडते. म्हणूनच नाटक मराठी माणसाच्या मनावर सर्वकाळ अधिराज्य गाजवत आले आहे. आज आपण सिनेमा, टीव्ही, इंटरनेट या सर्व सुविधांनी आयुष्य जगत असलो तरी नाटक बघणारा, त्याला पसंती देणारा एक मोठा वर्ग आहे.

सर्जनशील आणि सक्रिय बाजू असलेल्या इतर कलांप्रमाणेच नाटकालाही दोन बाजू आहेत. एकाचा दुसऱ्यावर प्रभाव पडायचा आणि त्याला मुक्ती किंवा आवर घालत राहायचे. जीवनाच्या बाह्य आणि अंतर्गत स्वरूप दर्शनात सर्जनशील नाटकाचा वेग अखंड असतो. म्हणूनच जीवनाच्या मुक्तीसाठी, कायदे करण्यासाठी नाटक मुक्त आणि मोकळे असले पाहिजे. नाटकात जीवनाच्या व्यक्त केलेल्या भौतिक अवस्थेपासून त्याच्या सुप्त मनोगतापर्यंत सर्व काही, संवाद आणि अभिनयातून व्यक्त केले जाते. विविध सामाजिक परिस्थितीमुळे नाटकाच्या सर्जनशील आणि सक्रिय पैलूंचे पृथक्करण अपरिहार्य होऊन त्याची निरपेक्ष परंतु अपूर्ण स्थिती अधिकाधिक होत गेली आहे. ‘एका बिंदूवर त्यांचे मिश्रण करून, त्यांना सापेक्ष बनवता येते, परिपूर्ण नाही’, हा विचार मनात घट्ट पकडून आजचा मराठी रंगभूमी दिन साजरा करुया.

-विकास कांदोळकर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT