Laddu  Dainik Gomantak
ब्लॉग

अभिनव असे ’गोवन लड्डू’

कोरोनाच्या काळात अनेक नोकऱ्या गेल्या, अनेक तरुण बेरोजगार झाले. पण याच काळात अनेकांना नवी वाट गवसली.

गोमन्तक डिजिटल टीम

मनस्विनी प्रभुणे-नायक

कोरोनाच्या काळात अनेक नोकऱ्या गेल्या, अनेक तरुण बेरोजगार झाले. पण याच काळात अनेकांना नवी वाट गवसली. आपल्यातील कल्पकतेने त्यांनी कमी भांडवलात नवनवीन व्यवसाय सुरू केले. यात खाद्यपदार्थांशी निगडित व्यवसायाला लोकांचा चांगला प्रतिसाद लाभला.

कोरोनाच्या काळात लोकांच्या मनात रेस्टोरंटमध्ये जाऊन खाण्याबाबत भीती बसली होती. घरात सर्वजण करोना पॉझिटिव्ह असतील तर स्वयंपाक कोणी बनवायचा? असा प्रश्‍नदेखील असायचा. सर्वांसाठी मोठा कठीण काळ होता.

एक - दीड वर्षांपूर्वी सांतिनेजमधून भाटले, मळा रस्त्यावर एका दुकानाच्या पाटीने लक्ष वेधून घेतले. त्या दुकानाची पाटी होती ‘गोवन लड्डू’. हे वाचून चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होतेच, शिवाय तोंडातून ‘वाह.. छान कल्पना आहे’ असेदेखील सहजोद्गार आले.

मग इथल्या घराघरांत बनणाऱ्या साऱ्या लाडवांचे प्रकार डोळ्यांसमोर आले. गव्हाच्या पिठाचे, हिरव्या मुगाचे, मुगाच्या डाळीचे, रवा, बेसन, तांदळाच्या पिठाचे, उकड्या तांदळाच्या पिठाचे, नाचणीचे असे तर्‍हेतर्‍हेच्या लाडवांनी भरलेले ताट दिसू लागले.

मी एवढी आवडीने गोड पदार्थ खाणारी नाहीये, पण मनातल्या उत्सुकतेने पुढे जाऊ दिले नाही. मुद्दाम गाडी थांबवून आम्ही हे ‘गोवन लड्डू’ बघायला गेलो. गेल्यागेल्या वर उल्लेख केलेले सर्व लाडूंचे दर्शन झाले. नुसतेच दर्शन नाही, तर तिथे आत शिरण्याआधीच शुद्ध तूप आणि गोड अशा संमिश्र सुगंधाने आमचे चित्त पूर्णपणे वेधून घेतले.

हा सुगंध समोर दिसणाऱ्या विविध प्रकारच्या लाडवांच्या शुद्धतेच्या दर्जाची ग्वाही देत होता. खरोखर नावाप्रमाणेच गोव्यातील प्रत्येक घरात बनवले जाणारे विविध प्रकारचे लाडू दिसत होते. कोणी गोवन लाडूंचे असे ब्रँडिंग करतोय यावर विश्वास बसत नव्हता. असल्या कामात महिला अग्रेसर असतात.

महिला बचतगटांचे वेगवेगळे कार्यक्रम करत असताना, त्यात खाद्यपदार्थ विक्रीला ठेवताना या साऱ्या महिला मुगाचे-बेसनाचे आणि गव्हाच्या पिठाचे लाडू बनवून आणत. यात त्यांचा हातखंडा. त्यामुळे ‘गोवन लाडू’मध्ये शिरताना, ‘अशाच महिलांनी एकत्र येऊन तर हे सुरू केले नाही ना?’, असे वाटून गेले.

पण काउंटरच्या पलीकडे तरुणाला बघून आणखी एक आश्चर्याचा धक्का बसला. असले पदार्थ विक्री करायला तरुणांना थोडीशी लाज वाटते. प्रदर्शन भरवते तेव्हा हमखास एक दृश्य बघायला मिळते. तरुण मुले आईला सोडायला येतात पण आईने बनवलेल्या पदार्थांच्या स्टॉलवर थांबायला त्यांना लाज वाटते.

इथे तर तरुण मुलगा लाडूंचे दुकान थाटून बसलेला बघून आश्चर्य वाटणे साहजिक होते. अमेय वायंगणकर याने हे खाद्यपदार्थांचे अनोखे दुकान सुरू केले आहे. त्याच्या या धाडसाचे सर्वांना कौतुक वाटावे असेच आहे. अमेय आणि त्याची पत्नी पिया यांनी खाद्यपदार्थांशी निगडित व्यवसाय करण्याचे पक्के केले.

Laddu

आईच्या हातचे रोज वेगवेगळे चविष्ट पदार्थ खाताना आणि विशेष करून लाडू खाताना अमेयला कायम वाटायचे की हे जर मार्केटमध्ये विकले तर लोकांना हे आवडतील. मनातल्या या कल्पनेला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पियानेदेखील प्रोत्साहन दिले. शिवाय नोकरी सोडून तीदेखील पूर्णवेळ या व्यवसायात आली आणि यातून ‘गोवन लड्डू’ साकार झाले.

केवळ विविध प्रकारच्या लाडूंपासून सुरुवात करणे तसे सोप्पे काम नव्हते. आपण कुठेतरी जोखीम घ्यावीच लागते, धाडस दाखवावे लागते. तसे अमेयने हे धाडस दाखवले. लाडू बघता बघता संपले. रोज नवनवीन ऑर्डर येऊ लागल्या.

लोकांनी जोरदार ‘माऊथ पब्लिसिटी’ केली. घरी बनवलेले, शुद्ध तुपातले लाडू म्हटल्यावर खवय्ये मंडळींना गोड खाण्याची संधीच मिळाली. साखरेची चिंता वाटणाऱ्यांचा अमेय आणि पियाने तोही प्रश्‍न सोडवला. त्यांनी साखरेचे नव्हे तर गूळ वापरून लाडू बनवले. गूळ घातलाय म्हटल्यावर साखरेची चिंता करणारे आणखी एक लाडू जास्त खाऊ लागले.

’गोवन लड्डू’ सुरू होताच खवय्यांनी तिथे गर्दी केली. बघता बघता पणजीत सगळीकडे ‘गोवन लड्डू’बद्दल ऐकू येऊ लागले. आमच्या ऑफिसमधल्या अनेकांची इकडे ‘वारी’ सुरू झाली. तिथे पाय ठेवेपर्यंत ‘इथे फक्त लाडू मिळतात की काय!’ असा माझाही समज झाला होता. लाडूचे सर्व प्रकार तर आहेतच पण त्याशिवाय गोवेकरांच्या घरात रोज शिजणारा प्रत्येक पदार्थ इथे मिळतो.

सकाळच्या नाश्त्याला पोळे आणि वेगवेगळ्या प्रकारचे तोंडीलावणे, उसळी, चटणी, सांदण, चपाती एवढे पदार्थ असतात. कधी ‘बियांभाजी’ तर कधी मुगाची उसळ, कधी कालवांचे तोंडीलावणे, कधी अळसांद्यांचे तोंडीलावणे आणि त्यासोबत मऊसूद पोळे मिळतात. गोवेकरांची चव ओळखून अमेय आणि पियाने इथला मेन्यू पक्का केला आहे.

लोकांकडून मिळणारा प्रतिसाद आणि मिळणाऱ्या वेगवेगळ्या सूचना यावरून काही महिन्यांपूर्वी अमेय - पियाने दुपारचे जेवण (पार्सल) द्यायला सुरुवात केली. यात शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारच्या थाळी ते देतात.

Laddu

शाकाहारी थाळीमध्ये वरणभात, एखादी भाजी, चपाती, लोणचे आणि कुरकुरीत कापे असतात तर मासळीच्या थाळीमध्ये भात - ‘हुमण’, ‘तिसऱ्याचे सुके’, भाजी, खीर, तळलेले मासे, लोणचे इतके प्रकार असतात.

एखाद्याला एवढे सगळे खायचे नाही तर त्याला चपाती आणि चिकन शागुती, चपाती आणि भाजी, चपाती आणि उसळ असे वेगवेगळे पर्याय इथे उपलब्ध आहेत. याशिवाय पुरणपोळी, शेवया आणि आमटी, ‘पोस’, पायस, साखरभात, शकुन उंडे असे तोंडाला पाणी आणणारे पदार्थ इथे मिळतात. उड्डमेथी, ‘सांसव’देखील अधूनमधून बनवतात.

खूपदा लोकांच्या मागणीप्रमाणेदेखील पदार्थ बदलत असतात. इथे शेवया आणि शकुन उंडे मुद्दाम खाऊन बघावेत असे आहेत. अमेयच्या आईने श्रावणात तर विचारू नका इतकी पदार्थांची विविधता दिली. अमयेची आई म्हणजे दीपश्री वायंगणकर. दीपश्री यांनी बनवलेले पदार्थ, पियाचे व्यवस्थापन आणि अमेयच्या कष्टांची जोड ‘गोवन लड्डू’ला लाभली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shehbaz Sharif Video: 'पाकिस्तान दहशतवाद कधी थांबवणार?' रिपोर्टरच्या थेट प्रश्नावर काय म्हणाले शाहबाज शरीफ? शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ व्हायरल

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

Makharotsav: ..उत्सवमूर्ती जिवंत झाल्याचा आभास देणारा 'मखरोत्सव', गोव्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

Viral Video: 'खतरों के खिलाडी' वाली स्टंटबाजी, पठ्ठ्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT