Kesarbai Kerkar Indian vocalist  Dainik Gomantak
ब्लॉग

Kesarbai Kerkar : अंतराळात गुंजणारा आवाज

गोमन्तक डिजिटल टीम

आसावरी कुलकर्णी

सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात गोव्याच्या निसर्गरम्य केरी गावात एका सुरेल मुलीचा जन्म झाला. कलाकारांच्या या गावातल्या निसर्गातच सूर सामावलेला आहे. कदाचित इथे जन्मलेले प्रत्येक मूल कलाकार होण्याचे एक वेगळेच गुणसूत्र घेऊन जन्माला येते.

पोर्तुगिजांच्या राजवटीची धार बोथट झाली होती. शिक्षण, कला, साहित्य या क्षेत्रांत गोव्यातील लोक पुढे येत होते. गोव्यातील कलाकार घराण्यातून दिग्गज कलाकारांची उपज होत होती.

त्यातलीच ही केरी गावाची सुरेल कन्या केसर, किंवा केसरबाई! वयाच्या ८व्या वर्षापासून संगीताच्या क्षेत्रात झोकून घेतलेली तपस्विनी. आजच्याप्रमाणेच त्यावेळी देऊळ हे एक सांस्कृतिक केंद्र असायचे. देवळात रंगणाऱ्या भजन, कीर्तनातून प्रेरणा घेऊन संगीताकडे वळलेल्यांपैकी केसरबाईही होत्या.

देवळात ऐकलेले अभंग घरी येऊन गुणगुणायचा बाईंना छंदच लागला होता. त्यांची ही आवड पाहून त्यांच्या आईने त्यांना मंगेशीच्या देवळातील भटजींकडे गाणे शिकण्यास पाठवले. पण त्यांच्याकडून केसरबाईना फक्त अभंग किंवा भजन शिकायला मिळाले.

पुढे ८व्या वर्षी त्यांच्या आई आणि मामांनी त्यांना कोल्हापूरला नेले. वर्षभर शिक्षण घेऊन त्यांना गोव्यात परतावे लागले. त्याकाळी कोणतेही शिक्षण तसे सोपे नव्हते. संगीताच्या शिक्षणासाठी आपली योग्यता सिद्ध करावी लागायची.

गुरूला पूर्णतः शरण जाऊन विद्या आत्मसात करावी लागायची. तेव्हा कुठे एखाद्याला मैफली करण्याची परवानगी मिळायची. आजच्या काळात शीघ्र प्रसिद्धीसाठी लहान लहान मुलांना स्पर्धेत धावताना पाहिले की वाटते यांना विद्या घेण्याचा अर्थच कळला नाही.

दिगंतात आपले नाव अजरामर करणाऱ्या केसरबाईंना संगीताचे शिक्षण घेण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले. जेव्हा त्या एखाद्या गुरूला शरण जाऊन काही काळ संगीत शिकण्याचा प्रयत्न करायच्या तेव्हाच दुर्दैवाने त्या शिक्षकांना काहीतरी अडचण यायची आणि यांचे शिक्षण थांबायचे.

पण हार न मानता केसरबाई यांनी तब्बल २५ वर्षे खडतर तपस्या केली. पंडित रामकृष्णबुवा वझे, पंडित भास्करबुवा बखले आणि शेवटी अल्लादिया खाँ यांच्याकडे त्यांनी शिक्षण घेतले. १६व्या वर्षी त्या मुंबईला स्थलांतरित झाल्या.

त्या जेव्हा मैफलीत उतरल्या तेव्हा त्यांचा आवाज, सूर इतका परिपक्व झाला होता की अगदी छोट्या कालावधीत त्यांचे नाव देशभर गाजले. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांचे कौतुक केले होते. एवढेच काय नोबेल पारितोषिक विजेते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना ‘सूरश्री’ ही पदवी बहाल केली होती.

कुठे थांबायचे हे जेव्हा कलाकाराला कळते त्या कलाकाराने संगीतातील अत्युच्च पातळी गाठलेली असते. जेव्हा केसरबाई केरकर यांना असे वाटले की त्यांच्या संगीतातून त्या फार काही देऊ शकत नाहीत तेव्हा त्यांनी स्वतःच सार्वजनिक मैफलीतून निवृत्ती घेतली.

त्यांनी एकदा एका मुलाखतीत सांगितले होते, ‘आयुष्यभर मी देवाला संगीत ऐकवले. ते होताना जर काही रसिकांनी माझ्या गायनाचा आस्वाद घेतला असेल तर मी भाग्यवान आहे!’ किती हा साधेपणा! वोएजर नावाच्या यानात त्या काळी त्यांच्या आवाजातली तबकडी अंतराळात नेण्यात आली होती जी आजही तिथेच आहे. रूढार्थाने अंतराळात जाणाऱ्या पहिल्या भारतीय या केसरबाई होत्या असे म्हटले तर वावगे ठरू नये!

संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, पद्मश्री आणि पहिला राष्ट्रपती पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. अंतराळात गोव्याचे नाव झळकवणाऱ्या सूरश्री केसरबाई केरकर या केवळ गोव्याच्या आकाशातील नव्हे, तर अंतराळातील सुरेल ताराच आहेत!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sindhudurg: गोव्यात मौजमजेसाठी येणाऱ्या पोलिसांना कर्तव्याचा विसर, कॉलेज तरुणीची काढली छेड, स्थानिकांनी दिला चोप

Sadanand Shet Tanavade: संसदेच्या वाणिज्य स्थायी समिती सदस्यपदी सदानंद शेट तानावडे यांची निवड

Bashudev Bhandari Missing Case: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी; केंद्रीय गृहमंत्रालयाने दखल घेताच तपासाला वेग

Badlapur Encounter: अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी राजकीय दावे विरुद्ध जनतेचा पाठिंबा; ''देवानेच न्याय केला...''

MP Viriato Fernandes: गोवा आणि गोमंतकीयांसाठी अभिमानाचा क्षण! देशाच्या संरक्षण समितीवर कॅ.विरियातो फर्नांडिसांची नियुक्ती

SCROLL FOR NEXT