Jon Fosse 2023 Nobel Prize in Literature  Google
ब्लॉग

Gomantak Editorial: उपेक्षितांचे शब्दरंग

नवीन मूल्यांचे स्वागत करण्यात आपली तीन-चार दशके खर्ची पडली आहेत. त्याकाळातच ॲनी अर्नो किंवा युन फॉस यांच्यासारखे प्रतिभावंत जन्माला आले.

दैनिक गोमन्तक

Jon Fosse Awarded 2023 Nobel Prize In Literature: ‘वडिलां’च्या पिढीने केलेले पूर्वदिव्य आणि नव्या सहस्त्रकाच्या उंबरठ्यावर, अंगावर येणारा अज्ञात भविष्यकाळाचा लोंढा यात ऐंशी-नव्वदीच्या दशकातील पिढी चेंगरली गेली.

दोन कालखंडांच्या पाषाणांच्यामध्ये अडकलेल्या या पिढीचे भागधेय विख्यात वैचारिक आल्विन टॉफलर यांनी ‘फ्युचर शॉक’ या त्यांच्या लक्षवेधी ग्रंथात मांडले होते. सध्या जे, पन्नाशी-साठीच्या घरात आहेत, ते याच पिढीचे आहेत.

‘जुने ते सोने’ मानून उरी कवटाळून जतन करायचे की ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’ असे म्हणून पुढे जगू लागायचे, या दुग्ध्यातली ही पिढी एका हाताने भूतकाळाचा घरंगळता खडक रोखणारी, आणि दुसऱ्या हाताने भविष्यातील आव्हानांना सामोरी जाणारी निघाली.

यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार ज्यांना जाहीर झाला, ते नॉर्वेचे युन फॉस यांच्या बहुप्रसवा लेखणीने या पिढीचे आक्रंदन टिपले, कारण तेदेखील याच पिढीचे प्रतिनिधी आहेत.

लहान वयातच हातातली गिटार खाली ठेवून फॉस यांनी लेखणी उचलली, तेव्हा त्यांच्या तरुण मनाला साम्यवादातली सौंदर्यस्थळे खुणावू लागली होती; पण नववाङमयीन प्रवाहाला अनुसरुन अतिवास्तववादाचीही (surrealism) भुरळ पडली होती.

त्यांची पहिलीच साहित्यकृती ‘रेड, ब्लॅक’ हिने वाचकांचे लक्ष वेधून घेतले. संगीताचाही विशेष कान असलेल्या फॉस यांना स्वत:च गाणी लिहून त्यांना चाली लावण्याचा छंद होता. याच ओढीने त्या गाण्यांच्या कविता होत गेल्या.

नॉर्वेमध्ये रंगमंचावरील नवनव्या प्रयोगांचे फार औत्सुक्याने आणि उत्साहाने स्वागत केले जाते. साहजिकच फॉस यांनी नाटकेही लिहिली. आजमितीस त्यांची चाळीस नाटके नुसती लिहून झालेली नाहीत, तर ती रंगमंचावरही आली आहेत, आणि रसिकांची उदंड दाद त्यांना मिळाली आहे.

याखेरीज अनेक कादंबऱ्या, ललितबंध आणि कवितांचे लेखन त्यांनी केले आहे. अनुवादाच्या क्षेत्रातही त्यांचे विशेष योगदान आहे. फॉस यांची लेखनशैली हादेखील युरोपीय साहित्यवर्तुळात अभ्यासाचा विषय झाला आहे.

‘द डॉल्स हाऊस’ सारखी अजरामर नाटके देणारे ‘वडील’ पिढीचे जगविख्यात नाटककार हेन्रिक इब्सेन हेदेखील नॉर्वेचेच, हा काही योगायोगाचा भाग नव्हे. त्या दृष्टीने एकाअर्थी युन फॉस हे इब्सेनचेच थेट वारसदार ठरतात.

इब्सेनच्या ‘डॉल्स हाऊस’चे मराठी रुपांतर मामा वरेरकरांनी केले होते, हे वाचकांच्या जुन्या पिढीला आठवत असेल. इब्सेनच्या कलाकृतींची जशी भाषांतरे झाली, तशीच फॉस यांच्याही नाटक-कादंबऱ्यांचे अनुवाद गाजले.

गेल्या शतकात इब्सेनच्या नाटकांचे शेक्सपीअरनंतर सर्वाधिक खेळ झाले. त्यानंतर वर्तमानात सर्वाधिक प्रयोग झालेले नाटककार म्हणून युन फॉस यांचेच नाव घेतले जाते.

तथापि, स्वभावधर्म पाहिला, तर फॉस यांचे प्रातिभिक नाते गेल्या शतकातील आयरिश नाटककार सॅम्युएल बेकेट यांच्याशी अधिक जवळचे. ‘वेटिंग फॉर गोदो’ ही त्यांची अजरामर नाट्यकृती आजही नाट्यविद्येच्या अभ्यासकांसाठी महत्त्वाची मानली जाते. बेकेटप्रमाणेच फॉस यांनी स्वत:चा स्वतंत्र घाट तयार केला.

‘फॉस मिनिमलीझम’ किंवा फॉसचा किमानतावाद म्हणून तो ओळखला जातो. इब्सेन किंवा बेकेट हे या ना त्या कारणाने मराठी रसिकांना ठाऊक झाले. पण दुर्दैवाने, फॉस यांच्या नाट्यकृतींचा पुरेसा अभ्यास आपल्याकडे झालेला दिसत नाही. साहित्याच्या आदानप्रदानाच्या व्यवहारात हे एक राहून गेलेले काम आहे, असे आता वाटते.

फॉस यांचे वाङ्‌मयीन कर्तृत्व अफाट आहे, यात शंकाच नाही. त्यांच्या विशिष्ट शैलीच्या साहित्यकृतींमधून उपेक्षितांना आवाज मिळाला, असे नोबेल पुरस्कार समितीने आवर्जून नमूद केले आहे.

गेल्या काही वर्षांत नोबेल पुरस्कारांचे निवडीचे निकषही अधिक खुले आणि कालसुसंगत होऊ लागले आहेत, असे दिसते. साहित्याचा नोबेल पुरस्कार प्राय: कादंबरीकारांकडेच जात असे. साहित्याच्या या आकृतिबंधाला सर्वश्रेष्ठ मानण्याचा कल गेल्या दोनेक दशकात हळूहळू कमी होऊ लागला.

कविता, नाटके, वैचारिक लिखाणाचा प्रांत हेदेखील साहित्याचा भाग आहेत, हे लक्षात घेत घेत हे बदल झालेले आहेत. कोंडीफोडू साहित्यिकांच्या राजकीय विचारसरणीकडे किंचित डोळेझाक करुन निव्वळ साहित्यिक निकषांवर या निवडी होऊ लागल्या, ज्यात वर्तमानातील बदलांचे प्रतिबिंब पडू लागले आहे.

ही बाब निश्चितच स्वागतार्ह मानायला हवी. गेल्या वर्षी फ्रेंच साहित्यिका ॲनी अर्नो यांना नोबेल पुरस्कार जाहीर झाला होता. स्त्रीवादी साहित्याचा बुलंद आवाज अशी त्यांची आधीच प्रतिमा होती. तिच्यावर शिक्कामोर्तब झाले.

२०१६ मध्ये विख्यात गीत-संगीतकार बॉब डिलन यांना नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. नोबेल समितीच्या कक्षा रुंदावत असल्याचीच ही शुभलक्षणे. जागतिक साहित्यात गेल्या काही वर्षात जे काही भलेबुरे बदल झाले, त्यात अभिजात साहित्याची व्याख्याही बदलल्यासारखी वाटते.

‘अनिवार्य’ साहित्याचे पारडे जड होऊ लागले, असा याचा अर्थ. हा बदल फक्त साहित्याच्या प्रांतातच होतो आहे, असा मात्र नव्हे. जवळपास सर्वच कलाक्षेत्रात ही उलथापालथ होताना दिसते.

या नवीन मूल्यांचे स्वागत करण्यात आपली तीन-चार दशके खर्ची पडली आहेत. त्याकाळातच ॲनी अर्नो किंवा युन फॉस यांच्यासारखे प्रतिभावंत जन्माला आले. इब्सेन अथवा बेकेट यांचा वारसा पुढे चालू राहिला आहे, ही अभिजाताची खूण आजही सापडते, आणखी काय हवे?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope today: अनंत चतुर्दशी 2025, बाप्पाचा 'या' 4 राशींवर राहील आशिर्वाद; आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात समृद्धी मिळेल

BITS Pilani: उलटीमुळे श्‍‍वास गुदमरून झाला मृत्‍यू, तणावाखालील ऋषीला नव्हता 'बिट्स'चा आधार; पेशंट स्वतःहून उपचारासाठी आला नाही, ही सबब पुढे

Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

ED Raid: सोनाराने बनावट दागिने ठरवले खरे, तारणाद्वारे 2.63 कोटींची फसवणूक; कोलवा, मुगाळी येथे संशयितांच्‍या घरांवर EDचे छापे

SCROLL FOR NEXT