Mopa-Dhargal Accident
Mopa-Dhargal Accident Dainik Gomantak
ब्लॉग

Mopa-Dhargal Accident: गंभीर अपघातानंतर तरी बोध घेणार का?

गोमन्तक डिजिटल टीम

प्रमोद प्रभुगावकर

Mopa-Dhargal Accident  संपलेल्या आठवड्याच्या उत्तरार्धात धारगळ येथे झालेल्या भीषण अपघाताचे पडसाद गोव्यात सर्वत्र उमटणे स्वाभाविकच होते व तसे ते उमटलेही. एका निरपराधाचा त्यात बळी गेला असला, तरी या अपघातास कारणीभूत असलेल्या ट्रकचालकाची बेपर्वाई त्यातून दिसून आली.

खरे तर अपघातानंतर संबंधित वाहन आहे त्याच ठिकाणी थांबायला हवे पण येथे तसे घडले नाही तर मयतासह त्याची स्कूटर अपघातस्थळापासून दोनशे मीटरपर्यंत फरफटत गेली व त्यामुळे स्थानिक रहिवासी संतप्त झाले व त्यांनी या बेदरकार प्रकाराबद्दल व त्याकडे संबंधित यंत्रणा करत असलेल्या दुर्लक्षाबद्दल आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आंदोलन केले.

त्याला नंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनीही पाठिंबा तर दिलाच पण मृताच्या नातेवाइकांना योग्य ती भरपाई मिळेपर्यंत संबंधित रस्त्याचे काम सुरू होऊ न देण्याचा पवित्रा घेतला, हे योग्यच झाले.

खरे तर कोणताही वाहनचालक हा मुद्दाम कोणताच अपघात करत नसतो हे खरे असले तरी अनेकदा त्याची बेबर्वाई वा बेदरकारी ही अनेकांच्या जिवावर बेतते, याचे हा अपघात हे एक चांगले उदाहरण आहे.

मोपा विमानतळासाठी युद्धपातळीवर बांधला जात असलेला बगलरस्ता व उड्डाणपुलाच्या कामावरील सदर ट्रक होता व तो महाराष्ट्रात नोंदणी केलेला होता आणि तो हाकणारा चालक परप्रांतीय, उत्तर भारतीय होता.

हे चालक मानवी जिवाची पर्वा न करता कशी वाहने हाकतात व माणसांना चिरडून टाकतात याचा अनुभव आपण यापूर्वीही खाणव्यवसायाच्या काळात पुरता घेतला आहे. पण त्यावेळची गोष्ट वेगळी होती व आताची वेगळी आहे.

दुसरी बाब म्हणजे हे ट्रकचालक ज्या प्रदेशांतील आहेत तेथील रस्ते व अन्य व्यवस्था व गोव्यातील व्यवस्था यात मोठा फरक आहे व म्हणून अशी वाहतूक जेथे सुरू आहे तेथे मानवी जिवांची काळजी घेण्याची जबाबदारी संबंधित कामाचे ठेकेदार तसेच सरकारी यंत्रणेची आहे.

पण प्रत्यक्षात ती घेतली जात नाही हे या अपघातांतून तसेच यापूर्वी त्याच भागांत झालेले अपघात व त्यात गेलेले मानवी बळी यांनी दाखवून दिले आहे.

खरे तर हे काम चालू असलेल्या भागात वाहतुकीवर नियंत्रण व असे प्रकार घडू नयेत म्हणून योग्य ती खबरदारी घेण्याची गरज होती पण ती घेतली गेली तर नाहीच पण वरचेवर अपघात होऊनही संबंधितांनी पावले उचलली नाहीत, ही चीड होती व त्यांतून लोक रस्त्यावर आले.

पेडणे तालुका आज सत्ताधारी पक्षाकडे आहे, असे असूनही हे का घडावे, की लोकांना गृहीत धरण्याची ही मानसिकता मानायची, असा प्रश्‍न तेथील स्थानिकांना सतावतो आहे.

मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत तेथील लोकांमध्ये अनेक आकस आहेत. सरकार जरी, ‘या महाकाय प्रकल्पामुळे पेडणे तालुक्याचा कायापालट होणार’, असा दावा करत असले तरी स्थानिक मात्र वेगळाच अनुभव घेत आहेत.

मग त्यामागील कारण त्या परिसरांत परप्रांतीयांनी मोठ्या प्रमाणात केलेली जमीन खरेदी असो, तेथे होऊ घातलेले कॅसिनो असोत वा स्थानिकांना तेथे रोजगाराबाबत दिलेली फसवी आश्वासने असोत. विमानतळ सुरू झालेला असला तरी या मागण्यांवर तोडगा निघाला नसल्याच्या स्थानिकांच्या तक्रारी आहेत.

ज्या लिंक रस्त्याच्या कामावरील ट्रकला वरील अपघात झाला त्यानंतर जो जनक्षोभ उसळला त्याचे हेही एक कारण आहे. अर्थात अशा प्रत्येक घटनेचा राजकीय पक्ष व नेते लाभ घेण्यास टपलेले असतात.

त्यामुळे असे प्रकार मुळात होणारच नाहीत, किंबहुना ते टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे. पण प्रत्यक्षात अनुभव मात्र वेगळाच येतो. अशा घटना घडल्यानंतर यंत्रणेची धावपळ सुरू होते..

सध्या गोव्यात पत्रादेवी ते पोळे या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६चे चौपदरीकरणाचे काम जागोजागी चाललेले पाहायला मिळते. नव्या मांडवी पुलाचे काम जरी आटोपलेले असले तरी अन्य कामे सुरूच आहेत. तीच गोष्ट आठपदरी जुवारी पुलाची आहे. तेथील उरलेल्या अर्ध्या भागाचे काम चाललेले आढळून येते.

तसेच मडगावच्या पश्‍चिम बगलरस्त्याचे आहे. पण कुठेच अशा पेडणे प्रकारच्या बेदरकारपणामुळे मानवी हानी झालेली नाही. एक दोन प्रकार झाल्यानंतर संबंधित ठेकेदार त्याचप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला त्या संदर्भात खबरदारीचे उपाय योजता का आलेले नाहीत?

की सरकारने संबंधित ठेकेदारांवरच सगळे काही सोपवले आहे. यापूर्वी अनेक भागांत मोठाले पूल उभारले गेले त्यासाठी गर्डरसारखे अजस्र भाग रस्ता मार्गे आणून चढविले गेले पण असे प्रकार घडून स्थानिकांचा रोष ओढवलेला नाही याचीही दखल घेण्याची गरज आहे.

एकंदर प्रकार पाहिला तर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण असो वा त्यात मोडत असलेला हा मोपा लिंक रोड असो , त्या कामाच्या निविदा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून जारी होत असलेल्या या कामावर तसेच ठेकेदारांवर राज्य सरकारचे कोणतेच नियंत्रण नसावे, अशी शंका येते.

कारण बहुतेक नव्हे तर सगळीच कामे गोव्याबाहेरील व राष्ट्रीय स्तरावरील ठेकेदारांना (कंपन्या) दिली गेलेली आहेत. या लोकांचे लागेबांधे थेट दिल्लीशी असतात व त्यामुळे राज्य सरकारची मात्रा त्यांच्यासमोर चालत नसावी. त्यातूनच तर या घटना घडत नसाव्यात ना?

वर जो खनिज व्यवसाय म्हणजे वाहतूक सुरू असताना त्यात जी बेदरकारी, कुणाला न जुमानण्याची प्रवृत्ती बळावली होती, त्याचा उल्लेख करण्याचे हेच कारण होते.

म्हणून संबंधित यंत्रणेने म्हणजेच सरकारने या प्रकारांची वेळीच गंभीर दखल घेण्याची गरज आहे. गोव्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण अगोदरच गंभीर आहे. तशातच अशा बेदरकारपणामुळे अपघात गोवून कुटुंबे उद्ध्वस्त होऊ लागली तर मग हा विकास, हा कायापालट कोणासाठी, असा प्रश्‍न गोमंतकीय करू लागेल व त्याचे कोणतेच उत्तर सत्ताधाऱ्यांकडे नसेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Live Update: लाटंबार्से पंचायतीत सत्ताबदल अटळ; आमदार चंद्रकात शेट्ये यांना मोठा धक्का

Margao: दिगंबर कामतांची चिंता वाढली; मडगावमध्ये सरदेसाईंचा 'जनता दरबार', शेकडो लोकांना मांडल्या समस्या

Goa Assembly Session: ST आरक्षणासाठी युरी आलेमाव अधिवेशनात आवाज उठवणार; 'अस्मिताय दिसा'सह 4 खाजगी ठराव

Goa News: कोलवा PSI ने मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेवर खंडणीचा गुन्हा, पतीसह झाली होती अटक

Futsal Goa: गोव्याच्या आंबेली स्पोर्टस क्लबचा गतविजेत्यांना मिनर्व्हा अकादमीला धक्का, उपांत्य फेरीत प्रवेश

SCROLL FOR NEXT