karma Dainik Gomantakefx x
ब्लॉग

karma: कर्माच्या बंधनातून सुटावे तरी कसे?

karma: कर्माचा व कर्मफलाचा नाश व्हायचा तरी कधी आणि कसा? कर्माच्या बंधनातून सुटका व्हायची तरी कशी?

दैनिक गोमन्तक

प्रसन्न शिवराम बर्वे

karma: गेल्या लेखात आपण पाहिले की, कर्माची वजाबाकी होत नाही. ज्याला आपण चांगले म्हणतो, त्या कर्माची व ज्याला वाईट म्हणतो त्या कर्माची वजाबाकी होऊन जे उरेल ते कर्मफळ वाट्याला येते, असे होत नाही. दोन्ही मापात, स्वतंत्रपणे भोगावी लागतात. मग, एक प्रश्न साहजिक उपस्थित होतो कर्म आणि कर्माचे फल किंवा क्रिया आणि प्रतिक्रिया थांबतात तरी कधी? की, ही कर्माची न थांबणारी शृंखला आहे? कर्माचा व कर्मफलाचा नाश व्हायचा तरी कधी आणि कसा? कर्माच्या बंधनातून सुटका व्हायची तरी कशी?

आपल्या स्थूल देहाच्या मृत्यूनंतरही सूक्ष्म देहातील कोशांवर उमटलेले ठसे तसेच राहतात व तेच घेऊन सूक्ष्म देह पुढे जात असतो. फक्त नवीन स्थूल देह धारण केल्यावर पूर्वीच्या स्मृती राहत नाहीत. म्हणूनच आपल्याला मागल्या जन्मातले काहीही आठवत नाही. या जन्मी आठवत नाही, म्हणजे ते नष्ट होते असा त्याचा अर्थ नाही ते तसेच राहते. उदाहरणच द्यायचे झाले तर ज्ञान; जिथेपर्यंत व जेवढे ज्ञान आपल्याला एका जन्मात झालेले असते, तिथून पुढे ज्ञान प्राप्त होणे सुरू होते. आधीच्या ज्ञानाची पुन्हा उजळणी झाली की, आपणास ते लगेच समजते. ते कसे समजते हे सांगता मात्र येत नाही. कारण मागच्या जन्माच्या स्मृती नष्ट झालेल्या असतात.

संगणकातील एखादी फाइल डिलिट होते म्हणजे नेमके काय होते? त्याचा हेडर व फूटर वेगवेगळे होतात. माहिती तशीच राहते. एखादे सॉफ्टवेअर म्हणूनच हे हेडर व फूटर जोडून त्या डिलिट केलेल्या फाइलमधील डेटा परत मिळवू शकते. आपल्याबाबतीतही काही तसेच होते. आपल्या स्मृती नष्ट झाल्यामुळे एखादी व्यक्ती, प्रसंग, घटना आपल्या आयुष्यात का येतात याची संगती लागत नाही.

आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती, पूर्वजन्मीचे काही ऋणानुबंध असतात म्हणूनच आपल्याला या जन्मात भेटत असते. त्यासाठी ओळखपाळख असलीच पाहिजे असे नाही. अनेकदा वेळप्रसंगी ओळखीची माणसे तोंड लपवतात व जिची कधी गाठभेटही झाली नाही, अशी व्यक्ती आपली मदत करून जाते. गमतीचा भाग म्हणजे, अनोळखी असूनही, अन्य कुठलाही स्वार्थ नसताना वेळप्रसंगी हा माणूस आपल्यासाठी का धावून आला हे सांगता येत नाही, माहीतही असत नाही. एवढेच नव्हे तर जो मदत करतो, त्या माणसालाही आपण मदत नेमकी कशासाठी केली हे सांगता येत नाही. कारण अन्य जन्मीची स्मृती नष्ट झालेली असते. असे असले तरी ऋणानुबंध नष्ट होत नाहीत. त्याच्या कर्माची ती परतफेड असते.

आपण पुन्हा त्याच डिलिट झालेल्या संगणकाच्या फाइलच्या उदाहरणाकडे येऊ. एखादा डिलिट झालेला डेटा सॉफ्टवेअरला पण पुन्हा गवसत नाही. कारण त्या जागी दुसरा डेटा ओव्हरराइट झालेला असतो. म्हणजे त्याच जागी अन्य डेटाचे पुनर्लेखन झालेले असते. हे पुनर्लेखन झाल्यामुळे आधीचा डेटा पुसला जातो. कर्माचे ठसे पुसण्यासाठीही आपल्याला पुन्हा कर्मच करावे लागते. कर्मबंधनातून सुटणार तर पुन्हा कर्मच करावे लागते, अन्य मार्ग नाही. कर्माच्या बंधनातून सुटण्यासाठी पुन्हा कर्म केले तर, त्या कर्माच्या बंधनातून सुटण्यासाठी आणखी कर्म करायचे, मग पुन्हा तोच प्रश्न उभा राहतो; हे थांबायचे कधी व कसे?

त्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी अठराव्या अध्यायात फार उत्तम दृष्टांत दिला आहे-

तैसें कर्में कर्मबद्धता । मुमुक्षु सोडविले पंडुसुता ।

जैसा रसरीति मरतां । राखिला विषें ॥ १६३ ॥

एखाद्याला साप चावला, तर त्यापासून त्याचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टर सापाच्या विषापासून तयार केलेले औषधच देतात. इथे फरक लक्षात घेण्यासारखा आहे. साप चावलेल्या माणसाला पुन्हा थेट विष नाही टोचत. सापाच्या विषावर प्रक्रिया केलेले औषध अंगात टोचले जाते. ज्ञानेश्वर महाराज त्यासाठी ‘रसरिती’, असा शब्द योजतात. रासायनिक प्रक्रिया केलेले सापाचे विष, साप चावून अंगी भिनलेल्या विषावर औषध ठरते. कर्माच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी कर्म करायचे आहे, पण ते फक्त कर्म नव्हे तर प्रक्रिया केलेले कर्म करायचे आहे.

कर्मावर प्रक्रिया करताना, कर्म करण्याचे प्रयोजन लक्षात घेणे आवश्यक आहे. ज्ञानाप्रमाणेच केवळ कर्माने मोक्षप्राप्ती होत नाही. मग, प्रक्रिया केलेले कर्म करायचे कशाला? अंत:करणशुद्धी हे प्रक्रिया केलेल्या कर्माचे प्रयोजन आहे. आपल्या चित्तावर दाटलेले रजोगुण आणि तमोगुण नाहीसे करण्याची प्रक्रिया करणारे कर्म करावे लागते. रजोगुण म्हणजे चंचलता आणि तमोगुण म्हणजे नकारात्मकता. हे दोन्ही नाहीसे करण्यासाठी केलेली कर्मे पूर्वजन्मीच्या कर्मांचे ठसे पुसून टाकतात. नाशिकला एकदा नारायणकाका महाराज शक्तिपात दीक्षेबद्दल बोलताना म्हणाले होते की, ‘शक्तिपात दीक्षा देतो म्हणजे आम्ही काय करतो, तर भांडी घासूनपुसून स्वच्छ करतो’. तेव्हा कळाले नव्हते, पण या संदर्भात विचार करताना सद्गुरूंचे कार्य किती व्यापक आहे व असते, याची कल्पना आली.

जेव्हा सृष्टीची निर्मिती झाली तेव्हा जेवढे सूक्ष्मदेह निर्माण झाले, तेवढेच आजही आहेत व शुद्ध चैतन्यात पुन्हा विलीन होईपर्यंत तेवढेच राहणार आहेत. म्हणून आपण माणूस मेल्यावर ‘आत्म्याला सद्गती लाभो’, ‘आत्म्याला शांती लाभो’, असे म्हणतो ते एका अर्थाने चुकीचे आहे. आत्मा (शुद्ध चैतन्य किंवा जाणीव) शांतच असतो व त्याला कुठेही जायचे नसते. ज्याला प्रवास करायचा असतो, तो सूक्ष्मदेह असतो. म्हणूनच प्रत्येक जन्मी आपल्याला जाणीवपूर्वक कर्म करणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: '..राहुल गांधींकडे सर्व प्रकार मांडणार'! अमित पाटकर यांनी दिली माहिती; काँग्रेस, NSUI मधील वाद शिगेला

Bits Pilani: ‘बिट्स पिलानी’त विद्यार्थी मृत,कॅम्पसमधील धक्कादायक घटना; पोलिसांचा चहूबाजूंनी तपास

Rashi Bhavishya 17 August 2025: करिअरमध्ये प्रगती, प्रवासाचे योग ; मात्र आरोग्याकडे लक्ष द्या

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

Sanju Samson: आशिया कप 2025 पूर्वी संजू सॅमसनची दमदार बॅटिंग, फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक

SCROLL FOR NEXT