दत्ता दामोदर नाईक
Midas King हाैशी फोटोग्राफी करणाऱ्यांना फोटोग्राफीच्या व्याकरणातील दोन तरी प्राथमिक नियम माहीत असायला हवेत. नवखे फोटोग्राफर्स व्यक्तीला किंवा वास्तुला मधोमध घेऊन त्यांचे फोटो काढतात. ही फोटोग्राफीच्या ऍस्थेटीक्समध्ये न बसणारी गोष्ट आहे.
फोटोे काढताना फोटो फ्रेममध्ये दोन आडव्या व दोन उभ्या रेषा आहेत अशी कल्पना करावी. या उभ्या, आडव्या रेषांमुळे फोटोफ्रेमचे नऊ काल्पनिक कप्पे (चौकोन) होतील.
अपेक्षित व्यक्ती किंवा वास्तू मधल्या तीन चौकोनांपैकी डावीकडचा चौकोन व मधोमध असलेला चौकोन यांच्या सीमीरेषेवर असावी. त्यामुळे फोटोच्या उजव्या बाजूला मोकळी जागा राहते आणि या ओपन स्पेसमुळे फोटोचे सौंदर्य द्विगुणित होते.
फोटोग्राफीतला दुसरा नियम म्हणजे फोटोफ्रेम अ ब क ड या चार कोनाची मानली, तर ब व ड हे विरुद्ध बाजूचे कोन एका काल्पनिक रेषेने जोडावेत. मग अ व क मधून ब ड रेषेला काटकोनात छेदेल अशा काल्पनिक रेषा काढाव्यात. या रेषा ब ड रेषेला य व र बिंदूत मिळतात असे मानले तर वांछित व्यक्ती किंवा वास्तू य किंवा र बिंदूवर घेऊन फोटो काढावा.
फोटोग्राफीच्या लोकशाहीकरणाचा अतिरेक झाला की आपण पर्यटनस्थळाचा पूर्णतः आस्वाद घेत नाही. आपण कधी फोटो किंवा सेल्फी काढतोे आणि आपल्या स्टेटसवर तो कधी अपलोड करतोे याची आपल्याला घाई असते.
जणू सेल्फी काढल्याशिवाय आपला अनुभव पूर्णच होणार नाही. प्रवासाची आवड असणाऱ्यांनी आपली दृकस्मरणशक्ती (व्हिज्युअल मेमरी) वाढवणे जरुरीचे असते. मगच हे प्रवासानुभव आपल्या अंतर्चक्षुसमोर प्रगटू शकतात.
‘फॉर ऑफन व्हेन ऑन माय काउच आय लाय इन व्हेकंट ऑर इन पेन्सिव्ह मूड, दे फ्लॅश अपॉन दॅट इनवर्ड आय विच इस ब्लिस ऑफ सॉलिट्यूड’. एकांतातले हे सुख, वर्डस्वर्थ म्हणतो त्याप्रमाणे आपणाला चाखता येते.
डोळा हे पंचेद्रियांतले प्रमुख इंद्रिय आहे असे मानण्याची चूक आपण करतो. प्रत्येक पर्यटनस्थळाला स्वत:चा एक गंध असतो. सुगंध असतो. एक ध्वनी असतो. नाद असतो. तिथे आलेले स्पर्शानुभव असतात. तिथल्या खाद्यपदार्थाची जिभेवर रेंगाळणारी चव असते. आपल्या पंचेद्रियांनी घेतलेल्या समग्र अनुभवाला कॅमेऱ्यासारखे एकांगी, कृत्रिम यंत्र पर्याय होऊ शकत नाही.
अथेन्सला पाच हजार वर्षांचा इतिहास आहे. मार्क ट्वेनने बनारसबद्दल जे उद्गार काढले ते अथेन्स शहराशीही तंतोतंत जुळतात. ‘बनारस इज ओल्डर दॅन हिस्ट्री, ओल्डर देन ट्रेडिशन, ओल्डर देन इव्हन लेजन्ड अँड लुक्स ट्वाइस ओल्ड ऍज ऑल ऑफ देम पुट टूगेदर’.
बनारसच्या जागी अथेन्स टाकून म्हणता येईल - ’अथेन्स इतिहासापेक्षा पुरातन आहे. ते परंपरेपक्षा जुने आहे. दंतकथेपेक्षा प्राचीन आहे आणि इतिहास, परंपरा व दंतकथा यांच्या कालमानाच्या बेरजेहून दुप्पटीने त्याचे वयोमान आहे.’
अशी पुरातन संस्कृती आपल्या सामूहिक स्मृती मिथककथांच्या रुपाने सांभाळून ठेवली जाते. संस्कृतीच्या कालप्रवाहात मिथककथांची बेटे कधी, का, कुणी निर्माण केली हे गुपीत आहे. ग्रीक मिथककथांचे वैविध्य आणि वैचित्र्य पाहून आपण अचंबित होतो.
ग्रीक मिथककथांतील मिडास राजाची मिथककथा सर्वश्रुत आहे. मिडास राजाला सोन्याचा सोस असतो. त्यामुळे मिडास राजा देवतांकडून ’आपण ज्याला हात लावू त्याचे सोने होईल’ असा वर प्राप्त करून घेतो. मिडास राजा आपल्या स्पर्शाने राजवाड्याच्या भिंती, खांंब, शिल्पे, आसने, सिंहासन सर्व सोनेरी करतो.
पण राजाला आपल्या हाताने अन्नाचा आस्वाद घेता येत नाही. सोन्याने भूक भागत नाही हे राजाला उमगते. राजा आपल्या छोट्या राजकन्येला प्रेमाने कुरवाळतो तेव्हा तिचा सोन्याचा पुतळा होतो.
राजा आपल्या प्रिय राणीला स्पर्श करू शकत नाही. मिडास राजाला पश्चात्ताप होतो. देवताकडे याचना करून मिडास राजा त्यांचा वर परत घ्यायला लावतो. मिडास राजाच्या या कहाणीवरून भाषेत ‘मिडास टच’ हे शब्द आले. ’कोणत्याही गोष्टीचे चीज करणे, सोने करणे’ असा सकारात्मक गर्भितार्थ या शब्दांत आहे.
महाभारतातल्या मुंगुसाची गोष्ट मला नेहमीच बुचकळ्यात टाकते. धर्मराजाचा राजसूय यज्ञ चाललेला असताना अर्धे अंग सोन्याचे असलेले मुंगूस यज्ञमंडपात लोळते. एका ब्राह्मणाने स्वतः उपाशी राहून याचकाला भिक्षा दिल्यावर त्याच्या अंगणात लोळल्यावर मुंगुसाचे अर्धे अंग सोन्याचे होते.
धर्मराजाच्या यज्ञमंडपात लोळून आपले उरलेले अंग सोन्याचे होईल या आशेने मुंगूस येते पण त्याची इच्छा फलद्रूप होत नाही. मुळात आपले पूर्ण अंग सोन्याचे व्हावे असा मूर्ख विचार मुंगुसाच्या मनात का यावा?
उलट आपले सोनेरी झालेेले अंग पूर्वरत व्हावे असे मुंगुसाला वाटायला हवे. मिडास राजाला उशीराने आलेले शहाणपण महाभारतातल्या मूर्ख मुंगुसाला का येऊ नये?
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.