Greece composer orpheus Dainik Gomantak
ब्लॉग

Blog: ऑर्फियस : ग्रीसमधला आणि जीएंचा

सगळ्यांना मृत्यू अटळ आहे पण माहीत असणे निराळे आणि हाडामासात मृत्यू भोगणे निराळे.

गोमन्तक डिजिटल टीम

दत्ता दामोदर नायक

संगीतकार ऑर्फियस आणि त्याची पत्नी युरिडिसी यांचे एकमेकांवर निरतिशय प्रेम असते. अचानक एके दिवशी सर्पदंशाने युरिडीसी मरण पावते. ऑर्फियस शोकाकुल होतो. युरिडिसीच्या शोधात ऑर्फियस आपले तंतुवाद्य वाजवीत पाताळलोकापर्यंत जातो. पाताळलोकाच्या दारात असलेला त्रिमुखी हिंस्र कुत्रा ऑर्फियसच्या संंगीतावर लुब्ध होऊन त्याच्यावर हल्ला करत नाही.

ऑ़र्फियस अधोलोकाच्या देवतांची प्रार्थना करतो. देवता युरिडिसीला ऑर्फियसच्या मागे चालत पृथ्वीलोकापर्यंत जायची अनुमती देतात पण पृथ्वीवर पाय ठेेवेपर्यंत ऑर्फियसने मागे वळून युरिडिसीकडे पाहू नये अशी अट असते. पृथ्वीलोकापर्यंत पोहोचता पोहोचता ऑर्फियस मागे पाहतो. तत्काळ युरिडिसी परत पाताळात जाते.

पेनेलोपकडून ऑर्फियसच्या मिथककथा ऐकल्यानंतर या कथेवर आधारलेल्या जी. ए. कुलकर्णीची ‘ऑर्फियस’ याच नावाच्या कथेचा कथाभाग मी तिला सांगितला. मागे वळून पाहण्याचा ऑर्फियसचा निर्णय त्याने विचारपूर्वक घेतलेला होता असे जीएंचे भाष्य आहे.

‘मी एवढा धोका पत्करून या ठिकाणी आलो तो युरिडिसला परत नेण्यासाठी हे पूर्णपणेे सत्य आहे. पण येथून जाताना माझ्याबरोबर जी स्त्री आली ती, तिचे नाव युरिडिसी असूनही, माझी, मला माहीत असलेली युरिडिसी नव्हती.

मला आता पूर्ण अज्ञात आहे, असा तिच्यात समूळ बदल झाला होता. सगळ्यांना मृत्यू अटळ आहे पण माहीत असणे निराळे आणि हाडामासात मृत्यू भोगणे निराळे. मी हा मृत्यू भोगला नाही. युरिडिसीने तो भोगला आहे. तिच्यात मृत्यू विषाप्रमाणे भिनून राहिला आहे. तिला सदेह करताना मृत्यूचा एकवार घेतलेला अनुभव तिच्यातून काढून टाकणे हे तुमच्यादेखील अमर्याद शक्तीपलीकडचे होते.

प्रत्येक सुख आसक्तीने तळव्यावर घेऊन त्यातच रमून जाणारी युरिडिसीची मला सोबत हवी होती आणि ती तर आता संपूर्णपणे नष्ट झाली आहे. मी मागे वळून पाहिले तर युरिडिसी मागे जाईल ही तुमची अट मला फार कठोर वाटली होती, पण माझे ते अज्ञान होते. ती अट नव्हती तर सवलत होती. सुटण्याचा अखेरचा एक मार्ग सहृदयतेने माझ्यासाठी आपण उघडा ठेवला होता, हे नंतर मला उमगले.’

पेनेलोप थोडा वेळ काहीच बोलली नाही. मग म्हणाली, ‘मिथककथा खेचराप्रमाणे वांझ नसतात. एका मिथककथेतून दुसरी मिथककथा जन्माला येते.‘

डेल्फी हे ग्रीसमधले महत्त्वाचे स्थळ अथेन्सपासून अडीच तीन तासांच्या अंतरावर आहे. डेल्फी ही पृथ्वीची नाभी (बेंबी) आहे असा ग्रीक भाविकांचा भावार्थ होता. पृथ्वी सपाट आहे असे ग्रीक समजत होते. ग्रीक देवांचा राजा झ्युस याने पृथ्वीच्या चारही कोपऱ्यांवरून चार गरुड हवेत सोडले. हे चारही गरुड उडत उडत डेल्फीला एकमेकांना भेटले. त्यामुळे डेल्फी हे पृथ्वीचे केंद्रस्थान असल्याचा समज पक्का झाला.

डेल्फीवर आधिपत्य असलेल्या पायथॉन नावाच्या भयंकर विषारी सर्पाला मारणाऱ्या अपोलो देवाचे इथे मंदिर होते. अपोलो देव क्रेटा बेटावरून डोल्फीनवर बसून इथे आला म्हणून या स्थळाला ‘डेल्फी’ म्हणू लागले. आज डेल्फीत केवळ भग्न स्तंभ आणि भग्न भिंती आहेत.

डेल्फीतल्या एकेकाळच्या वैभवाच्या त्या पाऊलखुणा आहेत. डेल्फीत जोगिणी कौल (ऑरेकल) देत. प्रमुख जोगिणीला ‘पाथिया’ असे म्हणत व ती देवाकडे थेट संवाद साधू शकते अशी श्रद्धा होती. पुढे तरुण जोगिणी भक्तांबरोबर पळून जायला लागल्या.

त्यामुळे वृद्ध जोगिणींची नेमणूक करावी लागली. भारतावरच्या स्वारीपूर्वी अलेक्झांडर डेल्फीत आला होता व आपण विजयी होऊ, असा कौल त्याने जोगिणीकडून बळजबरीने वदवून घेतला होता असे म्हणतात.

डेल्फीत छोटे म्युझियम आहे. रथ चालवणारा सारथी, सिंहिणीचा देह आणि सर्पाचा चेहरा असलेला स्पिंक्स, आर्गोस शहरातले दोन जुळे युवक, नाइल नदीत बुडून मेलेला ऍजिनोस याची शिल्पे इथे आहेत. जुळ्या तरुणांचे चेहरे तंतोतंत सारखे असले तरी बारकाईने पाहिल्यास त्या दोघांच्या रूपांतील सूक्ष्म भेद लक्षांत येतो.

आईने जुळ्या मुलांतील एकेकाला अचूक ओळखावे यासाठी निसर्ग जुळ्या मुलांच्या रूपांत किंचित भेद ठेवतो. हे भान शिल्पकाराने ठेवले आहे हे पाहून आपण थक्क होतो. ही सर्व शिल्पे आपण जिवंतच आहोत असे समजत असावीत असे पाहणाऱ्याला वाटावे हेच ही शिल्पे घडवणाऱ्या शिल्पकाराचे यश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT