Good work of literature Dainik Gomantak
ब्लॉग

चित्तवेधक कसदार साहित्यकृती

गोमन्तक डिजिटल टीम

मुकेश थळी

रवीन्द्र केळेकर यांचं जपान जसा दिसला, या मथळ्याचं मराठी प्रवासवर्णन आहे. तीन चार दशकांपूर्वी प्रकाशित झालेलं. कॉन्टीनेन्टल प्रकाशन असावं बहुधा. भाषाशैली अनुभवावी. सोपी, सुटसुटीत, स्पष्ट, प्रासादीक, सुबोध, सुगम अशी वाक्यरचना. एक होता कोल्हा..

अशी गोष्ट थोरांना सांगितल्यासारखी झुळूकदार शैली. वाचकांना कसं द्यावं हे माहित असायला पाहिजे. कठीण लिहिणं सोपं. सोपं लिहिणं कठीण. लिहितो ते कठीणच असतं. सोपं लिहायला श्रम लागतात. सोपं लिहिणं सोपं करायचं असेल तर वाक्यं राजधानी एक्सप्रेसच्या डब्यांसारखी लांबलचक नको. वाक्यं छोटी, लयदार पाहिजेत.

हा सहा मात्रांचा दादरा आहे असं वाटून डोक्यात कट्क कट्क असे आवाज तर निघत नाही ना असं वाटायला हवं. ही एक साधना होय. दोन दोन शब्दांची सुध्दा वाक्यं लेखक रचू शकतो. मला वाटतं, लेखक मेहनत घेत नाहीत. Exertion, exercise आपण न घेता वाचकाच्या टाळक्यावर संदिग्ध, अतार्किक मसाला मारून मोकळं होणं सोपं असतं. अर्थ काढायचा, समजण्याचा स्वाध्याय वाचकानं करायचा का? रियाझाविना लेखनाची स्वच्छता, सुलभता शक्य नाही.

रही बात प्रतिभा और मेहनत की. प्रतिभा पाहिजेच. पण श्रम घेतले नाही तर तीही गायब होते. प्रतिभा हा प्रसाद व आशीर्वाद होय. मेहनत आणि साधना केली तर ती फुलत जाते. प्रतिभेचं गिफ्ट आपणाला आहे याची विनम्र समज हवी.

साहित्य निर्मितीत, सृजनशीलतेची उत्कटता वा उत्स्फूर्तता व कारागिरी यांचं गणितीय प्रमाण नेमकं सांगणं कठीण. कश्मीरला (ते कश्मीर असा उच्चार करतात) गेलो होतो. कोंकणी – कश्मीरी कथांचा अनुवाद कार्यक्रम होता. आठ दिवस. मायनस 8 डिग्री तापमान असल्यानं मी गोव्याहून जायला टाळाटाळ करत होतो. पण श्रीनगर विद्यापीठात कोंकणी साहित्यावर इंग्रजी व्याख्यान माझ्या गळ्यात घातलं गेल्यानं सहा सदस्यीय कोंकणी शिष्टमंडळाने बळेच नेलं. आम्ही सहा व ते कश्मीरी अनुवादक सहा अशी बैठक आठवडाभर चालली. ते बुजुर्ग होते. अनेक जण प्राध्यापक स्कॉलर होते.

ते पुण्याला भांडारकर संस्थेत संशोधन संदर्भ धुंडाळायला आले होते हे ऐकून अभिमान वाटला. इंग्रजी, उर्दू, हिंदी फाडफाड बोलणारे. माझ्या व्याख्यानानंतर त्यांच्या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष स्मृतिशेष हाजिनी माझ्याकडे सविस्तर बोलले. ते कवी व समीक्षक होते. इंग्रजी फाड्फाड्. त्यांचं माझं सूत जुळलं. ते चिंतनशील होते. मला म्हणाले – "थलीजी, मी हल्लीच इथं एक परिसंवाद आयोजित केला. त्यावेळी ते साहित्य अकादेमीचे कश्मीरी निमंत्रक होते. विषय होता – spontaneity and craftsmanship in creative literature. हाजिनी बोलताना टक लावून धबधब्यासारख्या उर्जेनं कोसळत असायचे. पण एक शब्द अकारण वा अर्थहीन नसायचा. मोकळेपणी बोलायचे व टीकाही तशीच असायची.

सावरीच्या झाडाचं बोंड पक्व होऊन फुटतं व त्यातून वजन नसलेले पांढरे म्हातारीच्या केसासारखे झुबके वाऱ्यावर तरंगत तरंगत अलवारपणे खाली येतात. उत्स्फूर्तता ही अशी असते. नंतर ते झुबके लेखकाने क्रमवार कसे मांडावेत (स्फटिकीकरण) ही कारागिरी होय. आम्ही चर्चा केली. हाजिनी नंतर दोनदा गोव्यात येऊन गेले. बहुधा कोविड काळात निवर्तले.

प्रा हाजिनी तिथल्या वास्तव्यात म्हणाले होते, थलीजी, कश्मीरीमें जो पहले ज्ञानपीठकार है वह कवी यहां नजदीक ही रहते हैं. मुझे उनकी कविता उतनी गहरी नहीं लगती. और भी अच्छे लेखक कवी लोग हैं, जिनके काव्य में spontaneity और

ताजगी, सबकुछ है. नजाकत है. गहराई भी. एका संतकवीचं नांव त्यांनी सांगितलं. त्याच्या कविता कथन केल्या.

दुसऱ्या दिवशी मला म्हणायले," थलीजी, आम्ही त्या ज्ञानपीठकार कवीला भेटायला जाऊया का?" मी म्हटलं असो, नको. त्यांनी माझ्या उत्तरावर विचार सुध्दा केला नाही. कडाक्याच्या थंडीत धबधबा परत सुरू.

स्पष्टता हा फार मोठा विषय आहे. स्पष्टतेची स्पष्टता, या नावाचा मी एक लेख लिहिला होता. प्रत्येक वाक्य स्पष्ट हवं. स्पष्टतेचा गारवा व आनंद वाचकाला मिळायला हवा. चिंतनात, अर्थवहनात व कथनात स्पष्टता हवी. वाचकाला कंटाळा येईस्तोवर कथा, कादंबरी, नाटकात वा लेख, निबंधात पाल्हाळ, लंबण, भारूड हवं का? अनावश्यक माहिती अस्ताव्यस्तपणे ठासून कोंबावी का? याचा प्रश्न स्वत:ला विचारावा. माझी आजी एक म्हण वापरायची, कैलास कंटाळसर ती कथा कित्याक रे? खुद्द कैलासपती कंटाळेपर्यंत किर्तनकारानं निरूपण करत राहावं का?

आता नाटकाविषयी. दोन तासांच्या नाटकात अनेक प्रकारे स्पष्टता हरवत चालली आहे. दुर्बोध विदेशी नाटकं आपल्या भाषेत रूपांतरीत केल्यावर मुळात ती रसिकांच्या आकलनाच्या प्रांतात पोचतच नाही. पचतच नाही.

संस्कृती, संदर्भ वेगळेच असतात. शेवटी रसनिष्पत्ती आनंदाची असते हे विसरून कसे चालेल? कलानंद सेवन न करता डोकेदुखी घेऊन थेटरबाहेर यावं का? अभिनेते स्वभावत: कधीकधी काही क्रियापदं वा वाक्याचे शेवटचे भाग गिळतात. कथानकाचा प्रवाह समजण्यास अडसर येतो. काहींचे उच्चार तोंडातच गुळूक गुळूक होत विरत अदृश्य होतात.

आंगिक अभिनय, हालचाली या पसाऱ्यात वाचिक अभिनय दुर्लक्षित होतो कधीकधी. पार्श्वसंगीताचे आघात जर जोरात झाले की झाला विचका. वाक्यच लपून जातं. नाटक या साहित्यकृतीवजा सादरीकरण कलाकृतीत नाटककाराच्या शब्दांची व इतर घटकांची विलक्षण काळजी घ्यावी लागते. सांघिक, जिवंत विविध रंगी कवितेसारखी कलाकृती ती.

मी माझं नाटक, दिग्दर्शकाला दिल्यावर बजावतो, उच्चार बघायला मी येणार. तो माझा विषय. संवाद गरजेनुसार छांटा. पण मला सांगा. कारण कापलेला भाग मुख्य प्राणसुत्राचा लिंक असू शकतो.

एक मिनिटही नाटक रेंगाळलं तर खापर तुमच्या डोक्यावर. लोक आपल्या जीवनाचे दोन तीन तास देऊन इथं येतात, त्यांचा हा जीवन-भाग आनंदाने भरून टाकायला पाहिजे. कलेच्या खुमारीचे रंग आत कायमचे डकवायला हवेत.

साहित्यकृती ही अशी पाहिजे. रसवत्ता. शक्तीमय शब्दांनी, अर्थांनी भरलेली, भारलेली एक सत्ता!!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT