Goa|गोमंतकीय कवी माधव सटवाणी Dainik Gomantak
ब्लॉग

गोमंतकीय कवी 'माधव सटवाणी' ठरले कालिदास पुरस्काराचे मानकरी

यंदाच्या गोवा कोकण मराठी परिषदेच्या 14 व्या कविकुलगुरू कालिदास पुरस्कारासाठी ज्येष्ठ गोमंतकीय कवी माधव सटवाणी यांची निवड झाली आहे.

दैनिक गोमन्तक

- नारायण महाले

यंदाच्या गोवा कोकण मराठी परिषदेच्या 14 व्या कविकुलगुरू कालिदास पुरस्कारासाठी ज्येष्ठ गोमंतकीय कवी माधव सटवाणी यांची निवड झाली आहे. 30 जून रोजी कालिदास जयंतीदिनी मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण मिनेझिस ब्रागांझा इन्स्टिट्यूट, पणजी (Panji) येथे सायंकाळी 4 वाजता करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने त्यांच्या त्यांच्या कवितेचा हा संक्षिप्त परिचय.

कवितेतला स्वतःचा वेगळेपण जपणारा कवी गोवामुक्ती नंतरच्या कालखंडात गोमंतकीय (Goa) साहित्यामध्ये मूलभूत असे बदल झाल्याचे दिसून येतात. शिक्षणाच्या मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध झाल्यानंतर प्राथमिक शाळा ते विद्यापीठ स्तरावरील शिक्षण घेऊन शिक्षित झालेली पिढी साहित्य क्षेत्रातही स्वतःची नाममुद्रा उमटवू लागली.

नरेंद्र बोडके, सुदेश लोटलीकर, पुष्पाग्रज, द. वा. तळवणेकर, अवधूत कुडतरकर अशा कितीतरी समकालीन कवीनी कवितेत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. साहित्याच्या मध्यवर्ती धारेशी समांतर काव्यनिर्मिती केली आहे. गोमंतकीय मराठी कवितेला स्वप्नाळू ध्येयवादाच्या प्रभावातून मुक्त करून, आधुनिकतेच्या आणि वास्तवाच्या वळणावर आणले आहे. माधव सटवाणी हे याच पिढीतले एक समर्थ कवी. त्यांचे 'निमग्न' (1999) आणि 'एक शुभ्र टिंब' (2010) हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांची काव्यनिर्मिती संख्यात्मक नाही पण गुणात्मक आहे. अभ्यासू आणि चिंतनशील कवी अशी त्यांची ख्याती आहे.

'प्रतिमा आणि प्रतीकांची निर्मिती ज्यांची प्रतिभा करू शकते त्यांनीच कविता लिहावी' अशा शब्दात कवी विठ्ठल वाघ यांनी त्यांच्या कवितेचे सामर्थ्य अधोरेखित केले आहे तर काव्यसाधनेत निमग्न असलेला कवी अशा शब्दात गोमंतकीय जेष्ठ साक्षेपी समीक्षक डॉक्टर सोमनाथ कोमारपंतांनी त्यांच्या काव्य समर्थ याची नोंद घेतली आहे

माधव सटवाणी हे मूलतः सौंदर्यवादी कवी. त्यांची भाववृत्ती चिंतनशील आणि अंतर्मुख अशी आहे. काव्य हा त्यांच्या चिंतनाचा आणि निर्मितीचा विषय आहे याची प्रचिती देणारी त्यांची एक शुभ्र टिंब ही कविता पहा-

'शब्दच जेव्हा थेंब म्हणून उतरतात व्याकूळ झालेल्या ओठांवर,

तुझं अस्तित्व अंतर्बाह्य भरून येते शब्दा शब्दातून ...'.

काव्य निर्मितीची प्रक्रिया या शब्दांतून प्रतिबिंबित होते.

त्यांच्या काव्यानुभवाला जशी निसर्गसौंदर्याची ओढ आहे तसाच सामाजिक वास्तवाचा स्पर्शही आहे. त्यांच्या काही कवितांमधून उदास प्रेमभावनेची तरंगही उमटतात सृष्टी-सृजनतेचे विविध रंग पाहून त्यांच्यातला कवी हरपून जातो, हळवा होतो तसाच तो तटस्थपणे समाजवास्तवही टिपतो.

'इथे घर नाही, इथे माणूस नाही

आहेत फक्त नग्न झाडे- ज्यांचे हुंदकेही दबले आहेत

त्यांच्या निशब्द श्वासात....'

अशा शब्दात ते कवितेतून सामाजिक आशयही व्यक्त करतात.

त्यांच्या कवितेला निसर्गसौंदर्याची ओढ आहे. त्यांच्या वृत्तीमुळे निसर्गसौंदर्य केवळ वर्णनपर न राहता चिंतनशील बनते. उदाहरणार्थ-,

त्यांच्या कवितांमधून अत्यंत मनमुरादपणे जगण्याचा परंतु खेद व्यक्त न करण्याचा आनंदसोहळा अभिव्यक्त होत असतो. त्यांच्या कवितांची रचना पक्की असून, त्यातून अधोरेखित होणार्‍या नवीन वाटा, वळणे, प्रतिमा व प्रतीके नवीन जीवनदृष्टी आणि संवेदनाशील जाणीवा व्यक्त करतात. त्यांची कविता प्रेमरंगात गुरफटली नाही उलट ती सामाजिक अधिक झाली. वैचारिकता, चिंतनशीलता हेच त्यांचे त्यांच्या कवितेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले.

त्यांची कविता मध्यवर्ती काव्यधारेशी समांतर आहे. त्यातून बदलत्या जीवनातील, बदलत्या संवेदना प्रतिबिंबित होताना दिसतात. समाजाचं उध्वस्त उघड नागडं वास्तव रूप पाहून कवी बेचैन होतो पण आक्रमक होत नाही. उलट स्थितप्रज्ञ वृत्तीने सत्य स्वीकारून मानवी शाश्वत मूल्यांचाही आग्रह धरतो.

सटवाणींच्या कवितात संथ जगण्याचे तरंगही दिसून येतात तसेच प्रवाही जगण्याचे चिंतनही आढळते. आधुनिक जीवनशैलीच्या जाणिवा आणि वैचारिक निष्ठा त्यात दिसून येतात

शाश्वत मानवी मूल्यांचा वेध घेण्याबरोबर तरल भाववृत्तींचा प्रत्यय देणारा निसर्गही त्यांच्या कवितेतून प्रतिबिंबित होतो.

तू निष्पर्ण होऊन तरी बघ या सावरीसारखं

तारे लगडतील तुझ्या सर्वांगावर पानांसारखे....

अशा तरल निसर्गदत्त प्रतिमेतून त्यांची कविता अवतरते. गोमंतकीय मराठी कवितेत सटवाणीनी आपल्या वेगळेपणाची नाममुद्रा ठसठशीतपणे उमटवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi: ..जातां पंढरीसी सुख वाटे जीवा। गोव्यातील लाखो वारकऱ्यांनी गाठले पंढरपूर

Sanguem Rathotsav: विठ्ठल, विठ्ठल! सांगेत भाविकांचा पूर, रथोत्सवानिमित्त होणार विठूनामाचा गजर

Goa Live News Updates: ऑनलाईन फ्रॉडमधून ३ लाख ३५ हजार रुपयांचा गंडा

Goa Crime: अनैतिक संबंधातून पतीचा खुन! संशयितेला व्‍हिडिओ कॉन्‍फरन्‍सिंगमध्‍ये आणण्यात अपयश; कोलवाळ तुरुंग अधीक्षकाला नोटीस

Criminals In Goa: पोलिसांवर हल्ला, अनेकदा फरार! दिल्लीतील ‘गोगी टोळी’च्या गुंडास गोव्यात अटक; गुन्हेगारांसाठी बनतेय ‘आश्रयस्थान’?

SCROLL FOR NEXT