Goan students lag behind in mathematics
Goan students lag behind in mathematics Dainik Gomantak
ब्लॉग

गोव्याचे गणित चुकते कसे?

दैनिक गोमन्तक

मिलिंद म्हाडगुत

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या शिक्षणक्षेत्राच्या राष्ट्रीय कामगिरी अहवालात गोमंतकीय विद्यार्थी गणित विषयात पिछाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. गणित हा तसा म्हटला तर किचकट, म्हटला तर उत्कंठा वाढवणारा विषय. विद्यार्थी त्यात किती रस घेतो, हे महत्त्वाचे.

हा विषय अगदी शाळेच्या सुरवातीपासून असतो. जेव्हा विद्यार्थी शालेय जीवनात प्रवेश करतो तेव्हा त्याला पाढे शिकविले जातात. हे पाढे म्हणजेच गणिताची सुरवात असते. आणि त्यातूनच गणिताबद्दल रस निर्माण होतो.

नंतर वेगवेगळी उदाहरणे दिली जातात. आवड असली तर गणित अतिशय सोपा विषय. पण त्यात आवड निर्माण होणे महत्त्वाचे असते. आणि ही आवड शालेय जीवनाच्या सुरवातीपासून व्हायला पाहिजे. गोव्यात गणित हा महत्त्वाचा पण तेवढाच उपेक्षित विषय.

या विषयात साधना करणारे तसेच थोडेच. बारावीपर्यंत कशीबशी या विषयाची गाडी चालविली जाते. पण नंतर या विषयाकडे दुर्लक्ष केले जाते. आता तर एस.एस्सी.ला सोपे गणित हा पर्यायी विषय ठेवून विद्यार्थ्यांना अधिकच मोकळीक दिली आहे.

या विषयाकडे खरेतर तडजोड करता कामा नये. आम्ही एस.एस्सी.ला म्हणजे तेव्हाच्या अकरावी शिकत असताना आम्हाला एक खास अंकगणित (special arithemetic) हा विषय होता. आणि त्यावेळी हा विषय शाळांत शिकवला जात नसे.

पण या विषयात गुण भरपूर मिळत असल्यामुळे मी हा विषय त्यावेळी घेतला होता. आणि त्यावेळी आमच्या शाळा या पुणे बोर्डाशी संलग्न असल्यामुळे आम्हाला पुणे बोर्डाची एस.एस्सी. परीक्षा द्यावी लागत असे. त्याकरिता पुण्याहून येणारी काही संदर्भ पुस्तके तसेच खास अकरावी करता निघणारी मासिके यावर अवलंबून राहावे लागत असे.

यावेळी माझ्या बॅचमध्ये खास अंकगणित घेणारे फक्त सात विद्यार्थी होते. आणि त्यापैकी मला त्यावेळी या विषयात 88 गुण प्राप्त झाले होते. पण आता अंकगणित हा विषयच नष्ट झाला आहे. आता बीजगणित व भूमिती यावरच गणिताचा भर अवलंबून दिसतो.

गणितात सगळ्यात कठीण म्हणजे अंकगणित. आणि अंकगणिताचा पाया हा महत्त्वाचा असतो. पण आज गोमंतकीय विद्यार्थ्यांचा हा पाया खचल्यामुळे ते गणितात मागे पडायला लागले आहेत. बारावीनंतर आता चौगुले महाविद्यालयासारख्या काही महाविद्यालयांनी बी.एस्सी. (गणित) असा अभ्यासक्रम सुरु केला आहे.

यात तीन वर्षे फक्त गणित शिकविले जाते. इतर बी.एस्सी.मध्ये गणिताबरोबर आणखी दोन विषय घ्यावे लागतात. हवे असल्यास बी.एस्सी.च्या शेवटच्या वर्षाला गणित घेता येते. पण चौगुलेसारख्या महाविद्यालयात फक्त गणितमय अभ्यासक्रम असल्यामुळे जे कोण गणितात कारकीर्द आखू इच्छितात, त्यांना फायदा होत आहे. यामुळे गणिताच्या अभ्यासक्रमाबाबत थोडाफार सकारात्मक दृष्टीकोन तयार होत आहे. याच अनुषंगाने आता सरकारनेही गणितावर लक्ष द्यायला हवे.

जो गणितात चमकतो तो आयुष्यात कधीच मागे पडत नाही असा एक सिद्धांत आहे, कारण बुद्धिमत्तेचा आलेख हा बहुधा गणिताच्या यशापयशावर अवलंबून असतो. त्यामुळे गणित हा विषय सरकारने आता अनिवार्य केला पाहिजे.

आमचे विद्यार्थी सध्या आय.ए.एस., आय.पी.एस.सारख्या राष्ट्रीय पातळीवरच्या परीक्षातही चमकताना दिसत नाही. खरे सांगायचे तर गोव्यातील पालकांची नजर अजूनही डॉक्टर वा इंजिनियर पुरतीच मर्यादित असलेली दिसून येते. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरच्या अभ्यासक्रमाकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. ज्याचे गणित चांगले असते त्यांच्या बुद्धिमत्तेचे प्रमाण उच्च पातळीवरले असते.

असे विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवरच्या अभ्यासक्रमात चमकू शकतात. दुर्देवाने आमचे विद्यार्थी हे एका मर्यादित कुंपणात अडकलेले दिसताहेत. अजूनही त्यांना ‘आकाश हीच मर्यादा’ या उक्तीचा अर्थ समजला आहे, असे दिसत नाही. वर्षानुवर्षे तेच तेच घासून पुसून झालेले अभ्यासक्रम शिकण्यात काही अर्थ नसतो.

गणिताबाबत मुख्यमंत्र्यानी जी दखल घेतली आहे तिचे स्वागत करायला हवे. हे करताना मुख्यमंत्र्यांनी आय.ए.एस., आय.पी.एस.सारख्या परीक्षांत आपले विद्यार्थी कसे चमकतील हेही बघायला हवे. उच्च पातळीवरचे अधिकारी या अभ्यासक्रमातूनच निर्माण होत असतात. आणि आज गोव्यात पाहिल्यास बहुतेक आय.ए.एस. अधिकारी हे बिगर गोमंतकीय असल्याचे दिसून येते.

फक्त कारकून तयार करणे, एवढे आपले ध्येय असता कामा नये. उच्च दृष्टीकोन हवा. आणि विद्यार्थ्यांचा गणितातला कमकुवतपणा हटविण्याचा प्रयत्न करणे, ही याची सुरवात असू शकते. आणि याच नांदीतूनच शिक्षणक्षेत्राचा उज्‍ज्वल भविष्यकाळ साकार होण्याची आशा आपण बाळगू शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Session Court: वेश्याव्यवसाय प्रकरणी दोषी ठरलेल्या विजय सिंग याला गुरुवारी ठोठावली जाणार शिक्षा

Canacona: तपासणी टाळण्यासाठी समुद्रातून मद्य तस्करी; काणकोण येथे एकाला अटक

Goa SSC Result Declared: यंदाही मुलीच हुश्शार, गोव्यात दहावीचा 92.38 टक्के निकाल

Xeldem Assault Case: आंब्यावरुन मारहाण, सोनफातर - शेल्‍डे येथे बागमालकास जीवे मारण्याची धमकी

Goa Today's Top News: दहावीचा निकाल, अपघात, चिरे खाणीवर छापा; गोव्यातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT