Food  Dainik Gomantak
ब्लॉग

Shravan: श्रावणातले शाकाहारी पदार्थ आणि त्यातील पोषणमूल्ये

श्रावण महिन्यातल्या व्रतवैकल्ये आणि सण उत्सवातील शाकाहारी अन्न पदार्थांतले वैविध्य इथल्या कष्टकरी लोकमानसाची अपूर्व देणगी आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

राजेंद्र केरकर

गोवा- कोकणातल्या सृष्टीला श्रावण महिन्यात हिरव्यागार रंगाचे इतके वैभव लाभलेले असते की, चांद्र कालगणनेतील हा पाचवा महिना इथल्या कष्टकऱ्यांनी त्यामुळेच बहुधा नानाविध अशा शाकाहारी अन्न संस्कृतीच्या घटकांनी समृद्ध केलेला असावा.

मान्सूनच्या पर्जन्यवृष्टीत आकंठ न्हाणारी इथली सृष्टी कुठे विविधरंगी रानफुलांनी, तृणपात्यांनी इतकी बहरलेली असते की त्यावरती स्वच्छंदपणे फुलपाखरे बागडत असतात.

डोंगरकपारीतून कोसळणारे जलप्रपात असोत अथवा पावसाचे पाणी कवेत घेऊन अखंडपणे वाहणारे ओहळ, नदीनाले असोत आपल्या सभोवतालच्या जंगलातच नव्हे तर पठरावरती ही सृष्टीचा रंग लावण्याचा आणि विविध फुलांचा हवाहवासा वाटणारा गंध तेथे वावरणाऱ्यांना व्यापून टाकतो.

ग्रीष्मात मलूल, शुष्क वाटणारी तृणपातीसुद्धा छोटेखानी पुष्पाच्या रंगोत्सवात श्रावणात एकरूप होऊन जातात. निसर्गात या महिन्यात जेथे तेथे दिव्यत्वाची प्रचिती येत असल्याकारणाने आपल्या पूर्वजांनी नागपंचमीपासून गोकुळाष्टमीसारख्या सण उत्सवांचे आयोजन केले होते.

इथल्या लोकमानसातही परंपरा इतकी रुळली की जेव्हा ख्रिस्तीकरणाची प्रक्रिया इथे सक्तीने राबवली गेली तेव्हा नव्या ख्रिश्‍चन पंथात प्रवेश केलेल्या जातीजमातींनी जुन्या परंपरा, श्रद्धा, रीतीरिवाजांना सहजासहजी सोडले नाही आणि त्यासाठी कणसाच्या, तवश्याच्या फेस्तांत त्यांनी पारंपरिक अन्नपदार्थांना प्राधान्य दिले.

खरे तर एकाच पेशीच्या जिवापासून ते गुंतागुंतीने युक्त सस्तनी प्राणी, त्याचप्रमाणे वृक्षवेलींना त्यांच्या क्रियाशील जीवनासाठी, प्रजोत्पादनास आणि पुनरुत्पादनाखातर किमान स्वरूपात काही खाद्यान्नाची गरज भासते, अन्नात असणारी पोषक तत्त्वे आरोग्याशी निगडीत असल्याने मनुष्यांबरोबर पशुप्राण्यांना, वनस्पतींना जगण्यासाठी त्यांची गरज असते.

अन्नाच्या नानाविध घटकांतून विविध पोषक घटकांची प्राप्ती होऊन, जगण्यासाठी आवश्यक ऊर्जा लाभत असते. आदिम काळात मनुष्यप्राणी जमिनीत आढळणारी विविध कंदमुळे, रानटी फळे, फुले यांचे प्रामुख्याने सेवन करीत असे.

कालांतराने जेव्हा संस्कृती आणि धर्माच्या आधारे माणसाने सण, उत्सव साजरे करण्याला प्रारंभ केला तेव्हा त्यांनी विविध सण, उत्सव ज्या मौसमात, ऋतूत येतो, त्यानुसार खाद्यान्नाचे नियोजन केले आणि त्यातूनच वैविध्यपूर्ण अशा अन्नसंस्कृतीचा उगम झाला आणि त्यातून जगण्यासाठी ऊर्जा, पोषक तत्त्वांच्या प्राप्तीबरोबर त्याचे जीवन उत्साही होण्यास मदत झाली.

‘श्रावणमासी हर्षमानसी, हिरवळ दाटे चहूकडे’ असा लौकिक असणारा व बा. भ. बोरकरांच्या शब्दांत सांगायचे तर ‘सृष्टीला पाचवा महिना’ लागलेला असतो आणि ज्याप्रमाणे पाच महिन्यांची गर्भवती स्त्री आपल्या अपत्याला उदरात वाढवताना उत्साहित असते, अगदी त्याप्रमाणेच श्रावणात वृक्षवेलींची तर्‍हा झालेली असते.

या महिन्यातच माळरानावर वाढलेली टाकळा, कुरडू, भारंगी, चिवार, आकूर, सुयची, कणकीचे कोंब, गुळवेलीची कोवळी पाने आदी जंगली भाजी लोकमानसाला पौष्टिक त्याचप्रमाणे औषधी गुणधर्माने युक्त घटकांचा आस्वाद देते.

श्रावणात जवळच्या रानात, माळरानावरती तर्‍हेतर्‍हेची रानटी भाजी विनासायस उपलब्ध असायची. त्यातल्या औषधी तत्त्वाचे ज्ञान समाजातल्या वयोवृद्धांना असल्याकारणाने ती भाजी कशी चिरायची आणि त्यात मीठ, मिरची, खोबऱ्यासह काय काय घालायचे? किती प्रमाणात घालायचे? ही भाजी चुलीवरती किती वेळ ठेवायची, या विषयीचे पारंपरिक ज्ञान होते.

नागपंचमी हा श्रावणातला पहिला महत्त्वाचा सण. उंदीर, घुशी यांचा फडशा पाडणाऱ्या नागाबरोबर अन्य सापांविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण आबालवृद्धांच्या आवडीचा असतो.

हळदीच्या पानात तांदळाचे मळलेले पीठ व्यवस्थित थापून, त्यात गूळ, खोबरे, वेलची आदीचे मिश्रण लपेटून तयार केलेल्या पातोळ्या विशिष्ट पद्धतीने शिजवल्या जातात. त्यांचा आस्वाद घेताना, मुगागाठी, खतखते याबरोबर खास आंबाडे घालून केलेली अळूची भाजी, लज्जत अधिकच वृद्धिंगत करते.

हळदीच्या पानाचा सुगंध आणि गोडवा, त्यात लपेटलेल्या पातोळ्याच्या चवीची खुबी आगळीवेगळीच करत असतो. त्यामुळे ख्रिस्ती पंथात गेल्यावरती ज्यांच्या पूर्वजांच्या जिभेवरती पातोळ्याची जी चव रुंजी घालत होती, ती त्यांनी 15 ऑगस्टला साजऱ्या केल्या जाणाऱ्या अवर लेडी ऑफ ऍजम्शनच्या फेस्तात कायम ठेवली.

श्रावणातला प्रत्येक रविवार हा सूर्यपूजनाच्या व्रताशी संबंधित असतो आणि प्रत्येक रविवारी व्रतस्थ सुवासिनी तांदळापासून वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ तयार करत असते. रात्रभर फुगत घातलेले तांदूळ, दुसऱ्या दिवशी वाटून त्यात तूप, गूळ, वेलची, सुंठ, मीठ, किसलेले खोबरे घालून चवदार अशी ‘खांटोळी’ पूर्वीच्या काळी हमखास असायची.

दुसऱ्या रविवारी गूळ खोबरे यांच्या मिश्रणाला पिठाच्या लंबगोलाकार कलाकृतीत घालून उकडून ‘मुठले’ तयार केले जाते. तिसऱ्या रविवारी फणसाच्या पानात फुगत घातलेले तांदूळ वाटून, त्यात गूळ-खोबऱ्याचे मिश्रण घालून उकडल्यावरती कोन तयार केले जातात.

चार रविवारी मौसमी पत्री, फुले यांनी चुन्याच्या रंगात भिंतीवर काढलेल्या सूर्याच्या कलाकृतीचे पूजन करून आपल्या पतीला सूर्यासारखे तेजस्वी आणि दीर्घायू व्हावे अशी प्रार्थना केली जाते.

रविवार पूजनाच्या दुपारच्या एका वेळच्या जेवणातले सगळेच अन्नपदार्थ अधिकाधिक चवदार होतील याची पूर्वतयारी केलेली असते. त्यामुळे या समस्त अन्नपदार्थांचा आस्वाद घेण्यात घरातले समस्त लोक उत्सुक असतात.

श्रावणात उपवासात, साजूक तुपातली साबुदाण्याची गरमागरम शेंगदाणे घालून तयार केलेली खिचडी, खमंग थालीपीठ, अशा एकापेक्षा एक चवदार पदार्थांच्या नुसत्या आठवणीने जीव सुखावतो. हिरव्यागार केळीच्या पानावर गरम पिवळ्या धम्मक वरण भाताची चव काही औरच असते.

कधी मुगापासून तयार केलेली खिचडी, डाळीपासून तयार केलेले माधुर्यपूर्ण मनगणे श्रावणातल्या गोडव्यात विशेष भर घालत असते. गोकुळाष्टमीच्या सणाला दही, पोहे एकत्र करून तयार केलेला नैवेद्य हमखास खायला मिळतो.

पूर्वी श्रावणातल्या उपवासाच्या जेवणात रानात ऋतूनुसार ज्या भाज्या उपलब्ध असतात, त्यांचा हमखास वापर केला जात असे. आज या भाज्या शहरात सहज उपलब्ध होत नसल्याने, अशा शाकाहारी जेवणात कोबीची त्याचप्रमाणे बटाट्याची हळद पूड घालून केलेली सुकीभाजी आवडीने खाल्ली जाते.

श्रावणात निरफणस, सावरबोंडी केळीची कापे, रवा आणि मिरचीपूड लावून भाजली जातात, त्याची चव काही औरच असते. पूर्वी श्रावणातल्या प्रत्येक सण-उत्सवात विभिन्न गोड पदार्थांची खास मेजवानी असायची.

मनगणे, मुगाची खिचडी, मुगाचे पातळ कढण, सांजी, भोपळ्याची खीर अशा पदार्थांसह भजी, वडे असे तेलात तळलेले पदार्थातही हमखास असायचे.

भिजवलेल्या कणकेच्या पुऱ्या लाटून त्यात गुळखोबरे यांचे मिश्रण भरून सगळ्या बाजूंनी दुमडून चौकोनी आकारातल्या करंज्यासारख्या पदार्थाची चव तेलात उकडल्यावरती खूपच वेगळी लागते. श्रावणातल्या शाकाहारी अन्नपदार्थांची लज्जत पूर्वी चाखण्याची उत्सुकता घरोघरी असायची.

आज माणसाचे जीवन वाढत्या व्यापात त्रस्त बनलेले असल्याने असे वेगवेगळ्या अन्नघटकांनी युक्त पदार्थांना बनवण्यासाठी वेळ आणि सहनशीलता समाजातून लुप्त पावत असल्याने ही अन्नसंस्कृती विस्मृतीत जाण्याच्या मार्गावरती आहे.

श्रावण महिन्यातल्या व्रतवैकल्ये आणि सण उत्सवातील शाकाहारी अन्न पदार्थांतले वैविध्य इथल्या कष्टकरी लोकमानसाची अपूर्व देणगी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT