Nature  Dainik Gomantak
ब्लॉग

तू तर ‘निसर्गसखी’

गोमन्तक डिजिटल टीम

डॉ. संगीता सोनक

बहुदा स्त्रीनेच शेतीची सुरुवात केली असावी. झाडावरून खाली पडलेल्या बियांना अंकुर फुटलेला तिने पाहिला असावा. घरातील पुरुष शिकारीला गेले असताना संयमपूर्वक तिने हे बियाणे जमिनीत लावले असावेत.

तिचे हे प्रयोग सफल झालेले पाहून तिच्या साथीदाराची तिला शेतीच्या कामात साथ लाभली असावी. स्त्रियांनी मेंढ्या, कुत्रा, गाढव आणि डुक्कर पाळले होते; आता तिने पुरुषाला पाळीव बनवले. स्त्रीने पाळलेला हा शेवटचा प्राणी; ज्याने केवळ अंशतः आणि थोड्याशा अनिच्छेनेच संस्कृती स्वीकारली.”हे शब्द आहेत विल ड्युरँट या सुप्रसिद्ध अमेरिकन इतिहासकार, तत्वज्ज्ञ आणि विचारवंतांचे.

शेतकामातील स्त्रियांचा सहभाग, त्यांचे परंपरागत चालत आलेले बहुमोल योगदान, पारंपरिक पर्यावरणीय ज्ञान, सृष्टीशी, भवतालाशी असलेला तिचा घनिष्ठ संबंध मी खाजन, मच्छीमारी आणि खाणकाम या तिन्हीं बाबतीत गेली तीस-पस्तीस वर्षे स्थानिक स्त्रियांबरोबर क्षेत्रकाम करताना पाहिला आहे, प्रत्यक्ष अनुभवला आहे.

पुढच्या हंगामासाठी उत्कृष्ट प्रतीचे बियाणे निवडणे, पिकांच्या लागवडीशी संबंधित निर्णय घेणे, नडणी, पेरणी, कापणी, पाण्याची व्यवस्था करणे इत्यादी कामे स्त्रिया करतात. उकडा भात किती तापमानावर किती वेळ उकडायचा हे तिचे कौशल्य असते. घरातील नैसर्गिक संसाधनांशी, विशेषतः अन्न, पाणी, जळण इत्यादींशी संबंधित असलेली अनेक कामे ती करते. खाणक्षेत्रात कोरड्या झालेल्या विहिरी तिला सतावतात.

पाण्याची पारंपरिक स्त्रोते खाणींमुळे नष्ट झाल्याने ती परावलंबित झाली. टँकरने आणलेले पाणी घेण्यासाठी रांगेत उभे राहण्यात तिचा बराच वेळ जाऊ लागला. वृक्षतोड, जंगलतोडीमुळे जळण आणि परंपरागत औषधे यांची कमतरता तिला भासू लागली. मच्छीमार क्षेत्रात मात्र परिस्थिती जरा वेगळी दिसते. तेथे स्त्रीकडे अर्थार्जनाचे काम म्हणजे मासेविक्रीचे काम असते. त्यामुळे ती स्वावलंबी आहे. तिचा तोरा आगळा आहे.

स्त्री आणि सृष्टी यांच्यातील साधर्म्य आदिम काळापासून मानवाने ओळखले आहे असे अनेक अभ्यासक मानतात. भूमीच्या उत्पादनशक्तीची तुलना त्याने स्त्रीच्या गर्भधारणेशी केली. भूमीतून फुटणारे कोंब आणि स्त्रीच्या गर्भातून येणारे अपत्य यातील साम्याची जाणीव त्याला झाली. भूमी आणि स्त्री यांच्या सहचर्याची आवश्यकता त्याला उमगली.

पृथ्वीच्या सर्जनशक्तीमुळे आपल्या अन्नाची सोय होते तर स्त्रीच्या सुफलनामुळे वंशविस्तार होतो हे त्याला समजले. स्त्रीच्या या सृजनशक्तीमुळे त्याने स्त्रीला गौरवाचे स्थान दिले. म्हणूनच आदिम संस्कृतीत जगाच्या पाठीवर ठिकठिकाणी भूमीची आणि कृषिदेवतांची स्त्रीस्वरूपात, मातृस्वरूपात पूजा केली जायची.

भारतात भूमिका, रेणुका, सीता, यल्लमा, भुलाबाई, म्हाळसा, बाणाई इत्यादी स्वरूपात स्त्रीची पूजा केली गेली. सप्तमातृकांची शिल्पे भारतात ठिकठिकाणी सापडली आहेत. आपल्या गोव्यात सुफलन आणि प्रजनन यांची देवी मानली जाणाऱ्या, पाषाणशिल्पात कोरलेल्या लज्जागौरी, सापडल्या आहेत.

धुमे यांनी प्राचीनकालीन योनीस्वरूपातील एक पाषाण, ‘म्हातारी’, गोव्यात सापडल्याचे लिहिले आहे. आदिमसंस्कृतीने सुफलन आणि प्रजनन यांना वंद्य मानले. योनी आणि लिंग या जननेंद्रियांची पूजा केली.

योनिस्वरूपात कोरलेले, अनेक वर्षे पूजलेले दगड गोव्यात नानोडा येथे आम्ही बघितले आहेत. गोव्यात भूमका, सांतेर, केळबाय, म्हाळसा यांची पूजा केली गेली. भूमकेच्या स्वरूपात भूदेवी, सुफल असलेल्या वारुळाची सांतेर म्हणून, तर वृक्षवेलींशी निगडित असलेली देवता केळबाय. थोड्या नंतरच्या काळात आलेली, पावसाशी नाते असलेली गजलक्ष्मी. शतकानुशतके पूजली गेलेली स्त्रीची ही विविध रूपे.

निसर्गाशी स्त्रीचे हे सख्य शतकानुशतके चालू राहिले. नैसर्गिक संसाधनांशी संबधित अशा तिने घेतलेल्या कौटुंबिक जबाबदार्‍यांमुळे तिचे निसर्गाशी मैत्र जुळले. या संसाधनांवर अवलंबित असल्यामुळे तिचे निसर्गनिरीक्षण वाढले. निसर्गाचे सान्निध्य तिला लाभले. कुटुंबाची जबाबदारी तिने पत्करली.

स्वतःपुढे कुटुंब. स्वतःच्या हिताआधी कुटुंबाचे कल्याण. पाहता पाहता कुटुंबात असलेले तिचे उच्च स्थान कधी ढळले, तिला दुय्यम स्थान कधी प्राप्त झाले हे तिला कळलेच नाही. आदिम संस्कृतीत असलेली मातृसत्ताक पद्धतीची जागा पितृसत्ताक पद्धतीने घेतली. स्त्रीवर अनेक अत्याचार सुरू झाले.

स्त्रीला वारसा हक्कापासूनही वंचित केले गेले. मातृतुल्य पृथ्वीला आणि देवतासमान स्त्रीला पुरुषी अधमपणाचा ताप जाणवायला लागला. पर्यावरणाचा ऱ्हास आणि स्त्रियांवरील अत्याचार यातील हे समांतर. ह्यातूनच हल्ली पर्यावरणीय स्त्रीवाद ही संकल्पना उदयास आली. फ्रेंच लेखिका फ्राँस्वा डि’एबोन यांनी आपल्या पुस्तकात १९७४मध्ये ‘इकोफेमिनिझम’ ही संकल्पना पहिल्यांदा वापरली. या संकल्पनेत पर्यावरण आणि स्त्रियांच्या सहसंबंधांचा खोलवर विचार केला गेला.

पर्यावरणाशी स्त्रियांचे नाते आजच्या काळातही अतूट आहे. अनेक पर्यावरणविषयक चळवळीत स्त्रियांचा सहभाग आहे. मोलाचा वाटा आहे. जगात सर्वत्र निसर्गसंवर्धनात स्त्रियांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.

रॅचल कार्सन यांनी ‘द सायलंट स्प्रिंग’ हे पुस्तक लिहून लोकांना पर्यावरणविषयक समस्यांबद्दल संवेदनशील बनवले. नॉर्वेच्या भूतपूर्व पंतप्रधान ग्रो हर्लेम ब्रंटलँड यांनी शाश्वत विकासाची संकल्पना रुजवली. नोबेल पारितोषिक विजेत्या, केनियन पर्यावरणवादी वंगारी माथाई यांनी पर्यावरण रक्षणासाठी हरितपट्ट आंदोलनाची मुळे रोवली. पृथ्वीवर होणारा हवामानबदल आणि तापमानवाढ थांबवण्यासाठी स्वीडीश कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग सतत कार्यरत आहे.

भारतात वृक्षतोडीच्या विरोधात १९७३मध्ये सुंदरलाल बहुगुणा यांच्या पुढाकाराने उत्तराखंडातील (आताच्या) मंडल गावात झालेले चिपको आंदोलन आणि त्यापूर्वी १७३०मध्ये राजस्थानमध्ये अमृतादेवी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेले बिश्नोई लोकांचे आंदोलन ही स्त्रियांचा सहभाग लाभलेल्या आंदोलनांची उदाहरणे.

पर्यावरण क्षेत्रातील वंदना शिवा यांचे योगदान सर्वज्ञात आहे. मेधा पाटकर यांनी धरणविरोधी लढा दिला. सुनीता नारायण या लोकजागृतीचे काम करत आहेत. आपल्या गोव्यातही अनेक स्त्रियांनी पर्यावरणक्षेत्रात आपले योगदान दिलेले आहे.

यांत गोव्याच्या पर्यावरण संवर्धनासाठी बलाढ्य शक्तींशी लढा देणारी नॉर्मा अल्वारीस आहे, किनार्‍यावरील वाळूच्या डुंगांचे रक्षण करण्यासाठी झटणारी माझी स्वर्गवासी मैत्रीण कस्तुरी देसाई आहे,

म्हादई धरणाच्या विरोधात आवाज उठवणार्‍या निर्मला सावंत आहेत, खाजन परिसंस्थांच्या जपणुकीसाठी वावरणारी एल्सा फेर्नांदिस आहे, आईवडिलांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच उमलणारी समृद्धी केरकर आहे. नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने या सर्व ‘निसर्गसखीं’ना माझा मनःपूर्वक नमस्कार.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT