Sambar History: आमसुलं न्हवती म्हणून चिंच वापरली, छत्रपती संभाजी महाराजांच्या सन्मानार्थ दिले नाव; 'सांबारचा' रंजक इतिहास

Sambar Origin: दिवाळी निमित्ताने एका घरगुती ’दिवाळी पार्टी’ला गेले होते. आयोजकांनी सुंदर आदरातिथ्य केलं. बौद्धिक खाद्य पुरविणाऱ्या गप्पा सुरू झाल्या.
Sambar Origin
Sambar OriginDainik Gomantak
Published on
Updated on

दिवाळी निमित्ताने एका घरगुती ’दिवाळी पार्टी’ला गेले होते. आयोजकांनी सुंदर आदरातिथ्य केलं. बौद्धिक खाद्य पुरविणाऱ्या गप्पा सुरू झाल्या. गप्पांचा ओघ खाद्यपदार्थांचा इतिहास यावर होता. मग काय माहितीचं भांडारच समोर होतं. यात ‘सांबार’ पदार्थ कोणाचा याबद्दल चर्चा सुरू झाली. यातील अनेकांना सांबारच्या निर्मितीचा इतिहास माहीत नव्हता.

दाक्षिणात्य खाद्य अस्मिता ‘इडली-वडा-सांबार’ मध्ये एकवटली आहे. परंतु मूळ ’सांबार’ या पदार्थाची निर्मिती केली ती मराठा साम्राज्याने आणि आज हा पदार्थ दक्षिण भारतीय पदार्थांमध्ये एक अविभाज्य भाग बनलेला पदार्थ आहे. इडली, डोसा, वडा असो वा साधा भात, सांबारशिवाय ते अपूर्ण वाटतात. पण तुम्हाला माहीत आहे का, या चटपटीत आणि मसालेदार पदार्थाचा जन्म तंजावरच्या मराठा साम्राज्यातील राजघराण्यात झाला आणि नंतर तो दक्षिण भारताचा प्राण बनला.

मराठा साम्राज्यात उगम

सांबारची निर्मिती झाली ती तंजावरमध्ये आणि तंजावरमध्ये मराठ्यांची सत्ता होती. तंजावरचे मराठा साम्राज्य एकूण १८० वर्ष टिकले. या १८० वर्षात १० राजे होऊन गेले. तंजावरचा पहिला मराठा शासक शिवाजी महाराजांचा सावत्र भाऊ व्यंकोजी भोसले हे होते. या व्यंकोजींचा मुलगा शाहूजी भोसले १७ व्या शतकात, तंजावर येथे मराठा शासक कार्यरत होता.

एकदा त्यांच्या राजवाड्यात महाराष्ट्रीअन पद्धतीची आमसुलं घातलेली पारंपरिक आमटी बनवण्याची तयारी सुरू होती. पण ऐनवेळी समजलं की आमसुलं संपली आहेत. अशा परिस्थितीत, स्वयंपाक्यांनी आमसुलांना पर्याय म्हणून चिंचेचा वापर केला. त्यांनी चिंचेच्या रसात मसूरडाळ ऐवजी तूर डाळ, विविध भाज्या आणि मसाल्यांचे मिश्रण शिजवले. या प्रयोगातून जो नवीन पदार्थ तयार झाला, तो सगळ्यांनाच खूप आवडला.

संभाजी महाराजांच्या नावावरून ‘सांबार’ नाव

याच काळात छत्रपती संभाजी महाराज तंजावरला भेट देण्यासाठी गेले होते. त्यांच्या सन्मानार्थ हा नवीन पदार्थ त्यांना वाढण्यात आला. त्यांना तो इतका आवडला की त्यांच्या नावावरूनच या पदार्थाला ‘सांबाजी’ असं नाव देण्यात आलं होतं. त्याचाच अपभ्रंश होत होत ‘सांबार’ अस नाव प्रचलित झालं.

या मराठी फोडणीतून तयार झालेल्या पदार्थाने नंतर संपूर्ण दक्षिण भारताला वेड लावले. यापूर्वी असा पदार्थ त्या भागात नव्हता का? तर ‘हुलू’ किंवा ‘हुळू’नावाचा पदार्थ होता पण ज्यापद्धतीने सांबार तयार केला जातो तसा हा पदार्थ नव्हता. राजघराण्यांमध्ये - संस्थानिकांच्या स्वयंपाकघरात असे नावीन्यपूर्ण पदार्थांची निर्मिती करण्याची चढाओढ असायची. यातूनच नवनवीन पदार्थांची निर्मितीदेखील व्हायची.

दाक्षिणात्य पंगतीतील प्रवास

मराठा साम्राज्याच्या काळात आणि त्यांच्या प्रभावामुळे या पदार्थाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला. कालांतराने, सांबार दक्षिण भारतातील तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या सर्व राज्यांमध्ये इतका लोकप्रिय झाला की तो तिथल्या स्थानिक खाद्यसंस्कृतीचा एक भाग बनला.

आजच्या घडीला ‘सांबार’ हा प्रादेशिक अस्मितेचा भाग बनला आहे. यांचा कोणताही पदार्थ सांबारशिवाय अपूर्ण आहे. दक्षिणेतील प्रत्येक राज्याने सांबारला स्वीकारलं पण त्यांनी आपापल्या सांबारच वेगळेपण जपलं. प्रत्येक राज्याने आपापल्या स्थानिक चवीनुसार आणि उपलब्ध घटकांनुसार सांबारात बदल केले.

Sambar Origin
Goan Food: गोव्यातील हॉटेलांतून ‘गोंयचे’ खाद्यपदार्थ मिळणे का अवघड होत चालले आहे?

तामिळनाडूमध्ये सांबार मसाला वापरला जातो, ज्यात धणे, जिरे आणि लाल मिरच्या असतात. कर्नाटकमध्ये: सांबार मसाल्यात थोडा गोडसरपणा असतो आणि ओल्या मसाल्याचा वापर केला जातो. केरळमध्ये: भाजलेल्या नारळाचा वापर करून सांबारची एक वेगळी आवृत्ती तयार केली जाते.

आज सांबार केवळ दक्षिण भारतातच नव्हे, तर जगभरात लोकप्रिय झाला आहे. अनेक आंतरराष्ट्रीय डिक्शनरीमध्ये ‘सांबार’ या शब्दाचा समावेश करण्यात आला आहे. इडली, डोसा, वडा, उपमा आणि भातासोबत सांबार आवडीने खाल्ला जातो.

Sambar Origin
Best Time To Visit Goa: कोणत्या महिन्यात गोव्याला जावं? दोन दिवसांचा प्लॅन कसा असावा? Food, Stay ची संपूर्ण माहिती

या पदार्थाचा इतिहास कोणताही असो, त्याच्या चवीमुळे त्याने जगभरात आपले स्थान निर्माण केले आहे. सांबार फक्त एक पदार्थ नाही - तो दक्षिण भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. लग्नसमारंभ, सण, किंवा रोजचे जेवण - सांबार नेहमी जेवणात असतोच.

इडली-सांबार, डोसा-सांबार, भात-सांबार या जोड्या आज देशभरच नव्हे तर जगभर लोकप्रिय झाल्या आहेत. भारतातील पदार्थांच्या निर्मितीचा इतिहास असाच रंजक आहे आणि विशेष म्हणजे ‘करायला गेले एक आणि घडले वेगळेच’ म्हणजेच वेगळाच पदार्थ करण्याच्या बनवण्याच्या उत्साहात काहीतरी वेगळ्याच पदार्थाची निर्मिती झाली असे प्रकार यात घडल्याचे दिसते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com