Bawal Book  Dainik Gomantak
ब्लॉग

Kokan: ग्रामीण मातीच्या रंगात रंगलेला 'बवाळ'

दैनिक गोमन्तक

Kokan: गोमंतकातील ग्रामीण साहित्याचे श्रेय ज्या साहित्यिकांना जाते, त्यात श्री. दयाराम पाडलोस्कर एक आहेत. त्यांच्या कथा अस्सल तांबड्या मातीत रंगलेल्या व कोकणी भाषेचा गोडवा पांघरून, वाचकांच्या भेटीला येतात. ’बवाळ’ हा पारितोषिक विजेता कथासंग्रहही, असेच साधेसुधे, पण संघर्षमय असे जीवनदर्शन घडवतो.

प्रांत कोणताही असू दे, पण त्यातील ग्रामीण जीवन बहुतेक करून, सर्वत्र सारखेच आहे. रोजचे दोन घास खाण्याकरता, डोक्यावर फाटकेतुटके का होईना पण छप्पर असण्याकरता प्रचंड संघर्ष करणारे हे जीवन. त्यातील प्रत्येक कथेतून सामोरी येणारी हाडामांसाची माणसे मेटाकुटीने कशीबशी जगणारी असली तरी परिस्थितीला शरण न जाणारी आहेत.

त्यांना स्वतः च्या खडतर नशिबाची तसेच मिळकतीच्या तुटपुंज्या साधनांची जाणीव आहे; अतोनात कष्ट करण्याची त्यांची तयारी आहे, नीतीची त्यांना चाड आहे व जगत्नियंत्यावर त्यांचा प्रचंड विश्वास आहे. हा विश्वासच त्यांची जगण्याची व कष्ट करण्याची जिद्द अबाधित ठेवतो.

बवाळ कथासंग्रहातल्या कथांमध्ये वाचकांना घटनांची उतरंड वा तांडव सापडणार नाही. पण काळाचे, परिस्थितीजन्य फटकारे, खिळवून ठेवतील. दैनंदिन जीवनाचे साधे-सोपे चित्रण मनाला आपलेसे वाटेल कारण बहुतांश गोमंतकीयांचे जिव्हाळ्याचे सौहार्द त्यात ठासून भरलेले दिसेल.

दहा कथांच्या या संग्रहात, ज्या रेड्यांवर आयुष्याची पुरी भिस्त आहे, त्यांचे हरवणे, एकाचे सर्पदंशाने मरणे आहे, पण दोन ओळीत सांगून संपणाऱ्या या बावीस पानी पहिल्या कथेत जे गावजीवन चित्रित झाले आहे, त्यास तोडच नाही. कुठेही कंटाळवाणी न होणारी ही कथा, शेवटपर्यंत वाचकाला आपल्याबरोबर फरफटत नेण्याची क्षमता ठेवते.

पात्रांच्या दुःखाश्रूंबरोबर वाचकही हळहळतो पण, पाडलोस्करांची पात्रे जिद्द हरवणारी नाहीत. इतक्या संकटात व दु:खातही, त्यातल्या त्यात बरे शोधून, समाधानी राहण्याची जिद्द बाळगतात. म्हादी, सावळ्याला धीर देत अश्रू पुसत म्हणतो, ‘सावळ्या, पिशासारको रडाक नको. मेल्या, एकतरी रेडो जितो रवलो. आमचा नशीब... (वडीचे रेडे )

‘म्हादेवा पाव रे’ या कथेतील पात्रे अतिशय भाविक आहेत. घरात बाळंतपणाला टेकलेली नायिका आहे व एकदा आपल्यापायी, गावकऱ्यांनी सापाला मारल्याची खंत उरी घेतलेला नायक आहे. या वेळेला मात्र तो गावकऱ्यांना साप (देवचाराचे रूप) मारू देत नाही व सुखरूप इकडे घरात बायको, बाळंत होऊन मुलगा होतो. गावकऱ्यांची ही भावपूर्ण मानसिकता, वाचकांच्या मनाला नक्कीच हलवून जाते.

कथासंग्रहाच्या शीर्षकाची कथा ‘बवाळ’ (गोंधळ), आंतरजातीय विवाहाच्या समस्येवर बेतलेली आहे. जरी काही गावकरी शहाणे-सुरते असले व ‘माणूस हो माणसांवांगडाच लगीन जाता. जनावरांवांगडा जायना. हैय जात-पात कोणी केली? देवान काय आमी?’ असे म्हणत असले तरी, गावकरी शेवटी, अंगात आलेल्या देवाचा शब्दच मानतात.

आंतरजातीय विवाह करून देव बाटवणाऱ्या दोन मुलांच्या दोन्ही घरांना वाळीत टाकतात, बाहेरच्या जगात, अस्तित्वात आलेल्या शैक्षणिक सैलपणाला, आधुनिकपणाला गावकरी मुळीच भीक घालत नाहीत, हे विदारक सत्यही कथा मांडते.

‘अवगत’ कथेत, आत्महत्या केलेल्या स्त्रीचे जसे मृत्यूनंतरही होणारे धिंडवडे चितारलेत, तसेच पोलीस जीवनात, पोलिसांच्या होणाऱ्या हालांचाही पंचनामा केलाय. काहीशा दीर्घ कालावधीत घडणारी, थोडीशी दैववादी तर थोडी आधुनिक आचार-विचारांकडे झुकणारी, शोकांतिकाच पण तरी आशेची किनार लाभलेली अशी सरमिसळ कथा म्हणजे ‘धालोच्या मांडावरचा खेळ’ ही कथा म्हणता येईल.

खरोखरीचे आयुष्य म्हणजे हा ‘खेळच’ म्हणता येईल अशीच सर्व पात्रांची आयुष्य घडत - बिघडत जातात. त्यातल्या त्यात, ‘मुलांचं भलं व्हावं’ असा विचार करून व आंतरजातीय विवाहाला ‘इगो’ न बनवता, मुलांना ‘पळून जावून लग्न करा’चा सल्ला देणारे दोन्ही मुलांचे बाप आहेत, याच प्रश्नाला ‘इगो’ करून, भांडणे - शिव्या - शाप- नाकारणे अशा पायऱ्यांवर अनुक्रमे वागून, घरात सर्वांना जंजाळ करणाऱ्या स्त्रिया आहेत, सासूने दिलेल्या शापाने ‘मूल मेले’- असे मानणारी सून आहे. तरी अपघातात नवरा जखमी झाल्यावर त्याच्यावर पान्हयाची धार सोडून त्याला पुनःजीवन देऊ बघणारी तीच सून आहे. खरोखर, मनुष्याचे आयुष्य म्हणजे ‘धालोच्या मांडावरचे खेळ’ च आहेत हे पटते.

गोमंतकातील प्रत्येक गावांत या ना त्या सणांना नाटके होतात, लिखाणापासून ते प्रयोगापर्यंत सर्व बाजू गावकरीच सांभाळतात. अशाच एका गावात ’पेडण्याच्या भाषेत’ नाटक लिहिल्याच्या कारणाने गावकरी लेखकाला (केशव) वाळीत टाकतात. बिचारा लेखक, खोट्या वृत्तीच्या चांडाळ गांवकऱ्यांना खूप समजावतो पण कोणीही बधत नाही.

एकटा बिचारी सोनू, अभ्यासपूर्ण पाठिंबा देतो पण त्याची कोणी पत्रास ठेवत नाही, शेवटी लेखक गाव सोडून जातो. शेवटी मुंबईल्या ज्येष्ठ दिग्दर्शकाकडे नाटक पोहोचते व त्याचे त्यापुढे सोने होते. नाटक दणकून चालते, नाव होते, पैसे व प्रसिद्धी मिळते. गोमंतकीय सामाजिक जीवनात, सणासुदींना होणाऱ्या नाटकांचे महत्त्व फार आहे. त्या पार्श्वभूमीवर, ही कथा वाचकांचे मन मोहून टाकते.

हरवलेल्या काळ्या कोंबडीच्या पांढऱ्याशुभ्र अंड्याची आस ठेवणारा बंडू (कवाट), परदेशी जाऊन राहिलेल्या भाटकाराचे भार राखत, कधीकाळी प्रेमाकरता हिंदू झालेली व तो मरताच परत ख्रिश्चन होऊन जगणारी अना (शिवडो)- या कथा अस्सल गोमंतकीय जीवनाचे आरसे म्हणता येतील. कथांमध्ये येणारी प्रत्येक चालरीत, घरादारांची, गावांची वर्णने, केवळ आणि केवळ ‘गोमंतकीय’ जीवनाचे प्रतिनिधित्व करतात. कथा संग्रहातील ही आणखी एक प्रदीर्घ कथा.

शेवटची कथा ‘घुसमट’ ही सध्याच्या गोव्याच्या रूपावर, बदलांवर व त्यापायी ‘पूर्वीच्या’ रंगात रंगलेल्या ‘निज गोयंकाराच्या’ तगमगीवर, सुरेखपणे चितारली आहे. ‘बदल’ कितीही विकासाकडे नेणारे असले तरी त्यांना स्वीकारणे मागच्या पिढीला अवघड जाते. कळते पण वळत नाही- असा प्रकार असतो तो. बदलत्या गोव्याचे रूप व त्यात होणारी लेखकाची घुसमट दर्शवते.

‘बवाळ’ कथासंग्रह, यापायीही मनाला भिडतो की त्यातल्या भावना, वर्णने, जीवनपद्धती, जीवनदर्शन सर्व काही अस्सल आहे. कथा ‘पाडण्या’करता त्यात अनावश्यक खोटे प्रसंग, खोटे स्वभाव, दर्शन वा खोटी परिस्थिती निर्माण केलेली नाही.

संपूर्ण ग्रामीण-जीवन, लेखकाने भोगलेले असल्यामुळे असेल पण त्यात कुठेही ‘शो ऑफ’ सापडत नाही. संपूर्ण कथा मराठीतून व संवाद कोकणीतून असे या कथांचे स्वरूप आहे. मात्र, गोव्याबाहेरील वाचकांना अनेक शब्द अडू शकल्याने, गोडी थोडी कमी वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पुरस्कारांचे दीड डझन, गोड ओझे बाळगणाऱ्या श्री. दयाराम पाडलोस्करांचा हा कथासंग्रह ‘बवाळ’, सौ. देवल पाडलोस्कर यांनी अतिशय उत्तमरीतीने प्रकाशित केला आहे. महेश तानावडे यांच्या अत्यंत आकर्षक मुखपृष्ठासह.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT