Goa Inquisition Dainik Gomantak
ब्लॉग

Goa Inquisition : गोव्याचे इन्क्विझिशन म्हणजे 'एक नवी रंगसफेती'

इन्क्विझिशन हे संपूर्ण ख्रिस्तीकरण प्रकरणाचा एक छोटा भाग आहे.

दैनिक गोमन्तक

Portuguese: गोव्याच्या इतिहासात घडलेल्या कुप्रसिद्ध इन्क्विझिशनच्या घटनेवर श्री एलन माशादो प्रभू यांनी लिहिलेले एक नवे अभ्यासपूर्ण पुस्तक परवाच वाचनात आले. एलन माशादो प्रभू हे एक मंगळुरी अभियंते असून, त्यांचे पूर्वज बार्देशमधील हळदोणे गावचे प्रभू ज्ञातीतील सारस्वत होते.

कुतूहलाची गोष्ट म्हणजे ते अजूनही अभिमानाने प्रभू नाव लावून घेतात. यापूर्वी 1961 साली प्रकाशित झालेले अनंत काकबा प्रियोळकर यांनी लिहिलेले ‘द गोवा इन्क्विझिशन’ हे एकमेव पुस्तक या विषयावर जाहीररीत्या उपलब्ध होते.

इन्क्विझिशनला 252 वर्षांचा इतिहास आहे. ते 1560 साली चालू होऊन 1812 साली संपवण्यात आले. मध्ये मार्कुस दे पोंबाल या उदारमतवादी पोर्तुगाली राजाच्या राजवटीखाली 1774 साली काही वेळ तात्पुरते स्थगित करण्यात आले होते. झालेल्या इन्क्विझिशनची कागदोपत्री संपूर्ण तपशीलवार नोंद होती, पण प्रसंगानुरूप पुष्कळसे दस्तऐवज जाळून टाकण्यात आले व उरलेले गुप्त ठेवले गेले.

पण इन्क्विझिशनवेळी गोव्यात असलेला एक फ्रान्सिसी वैद्य चार्ल्स गाब्रिएल डेलॉन त्याने पुस्तक लिहिले, त्यावरूनच इन्क्विझिशनची सगळी माहिती जगभरच्या लोकांपर्यंत पोहोचली. त्याशिवाय इंग्रज पंथप्रसारक क्लॉडिअस बुकानन यांनी पण पुष्कळ वृत्तान्त लिहून ठेवला.

आता लेखक दावा करतात की, त्यांनी पोर्तुगालमध्ये असलेले सगळे मूळ दस्तऐवज शोधून काढून, तेथील अभिलेख विभागातील हजारो कागदपत्रांचा अभ्यास केला व या निर्णयाप्रत आले आहे की, ज्या तर्‍हेने इन्क्विझिशन एक अतिशय क्रूर, अत्याचारी, भयानक, असहिष्णू, छळवादाचा उच्छाद मांडलेली घटना म्हणून रंगवली जाते तसे नसून ते एक अतिशय सौम्य व मवाळ प्रकारचे प्रकरण होते.

लेखक म्हणतात की, इन्क्विझिशनमध्ये जवळपास फक्त एकोणीस हजार वैयक्तिक प्रकरणे नोंद झालेली आढळून येतात, त्यातील फक्त पंचवीस टक्के हिंदू होते. बाकीचे सगळे नवख्रिस्ती होते, जे नवख्रिस्ती पांथिक चालीरीती व रीतिरिवाजांचे पालन करीत नव्हते (ज्यांना हेरेटीक असे संबोधले जाते) व त्याशिवाय समलिंगी (सोडोमी), मुसलमान व यहुदी लोक.

त्याच्यानंतर ते सांगतात की, जे छळ व अत्याचार केले गेले तेसुद्धा सौम्य प्रकारचे होते व फक्त नवख्रिस्तींना पांथिक शिस्त लावण्यासाठी किंवा वठणीवर आणण्यासाठी केले गेले होते. ते म्हणतात फक्त एकशे नव्याण्णव व्यक्तींना जाळले गेले, त्यामधल्या केवळ पंधरा व्यक्ती हिंदू होत्या.

त्याच्यानंतर ते सांगतात की, जे छळ व अत्याचार केले गेले तेसुद्धा सौम्य प्रकारचे होते व फक्त नवख्रिस्तींना पांथिक शिस्त लावण्यासाठी किंवा वठणीवर आणण्यासाठी केले गेले होते. ते म्हणतात फक्त एकशे नव्याण्णव व्यक्तींना जाळले गेले, त्यामधल्या केवळ पंधरा व्यक्ती हिंदू होत्या.

अधिकृतपणे इन्क्विझिशन म्हणजे एकूण एक ख्रिस्तीकरण किंवा बाटाबाटी नव्हे. इन्क्विझिशन म्हणजे फक्त पांथिक गुन्हे चालवण्यासाठी स्थापन केलेले एक पांथिक न्यायपीठ. इन्क्विझिशन हे संपूर्ण ख्रिस्तीकरण प्रकरणाचा एक छोटा भाग आहे.

लेखकांच्या म्हणण्याप्रमाणे ते फक्त हेरेटीकांना शासन करण्यासाठी स्थापित केलेले होते, पण हिंदुत्ववादी त्याचे एक भयानक चित्रण उभे करतात, काळी आख्यायिका (ब्लॅक लेजंड) असे रंगवून व पांथिक तेढ आणि द्वेष पसरविण्याचे काम करतात, असा त्यांचा दावा आहे.

जेव्हा ख्रिस्तीकरण चालू झाले. तेव्हा पोर्तगीज सत्ता फक्त तिसवाडी, बार्देश व सासष्टी या तालुक्यांपर्यंत सीमित होते (मुरगाव तालुका सासष्टीचा भाग होता), ज्यांना जुन्या काबिजादी म्हणत असत. तिकडची हजारो हिंदू देवळे मोडून जमीनदोस्त करण्यात आली. पुष्कळ ठिकाणी त्यांच्यावर किंवा जवळपास चर्च उभारण्यात आल्या.

ख्रिस्तीकरणाचे आदेश काढण्यात आले, जे तयार नव्हते त्यांना हद्दपार करण्याचा हुकूम काढला गेला व त्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली. जे राहिले त्यांचे सक्तीने ख्रिस्तीकरण करण्यात आले. सारस्वत लोकांनी तर आपापल्या कुलदैवताच्या मूर्ती घेऊन रातोरात पळ काढला व नदीपार दुसऱ्या राजवटीच्या आधिपत्याखाली असलेल्या प्रदेशांत स्थापित केल्या व देवळे उभारली. संपूर्ण गावच थलांतरित झाले जसे उदाहरणार्थ फोंडा वाडी-तळावली येथील पुष्कळ लोक कोलवा येथून स्थायिक झालेले आहेत.

सारस्वत ब्राह्मणांना पूर्वी लक्ष्य केले गेले. साम, दाम, दंड, भेद या तत्त्वांचा उपयोग केला गेला. जे लोभाने आपणहून सगळ्यांत पूर्वी ख्रिस्ती झाले त्यांना दुसऱ्यांची जप्त केलेली मालमत्ता बक्षीस म्हणून बहाल करण्यात आली. यामुळे ख्रिस्ती झालेले सारस्वत ब्राह्मण एकदम श्रीमंत बनले व त्यांनी महालवजा प्रासाद उभारले.

सगळ्या सुपीक जागा, नारळाच्या बागा, शेते त्यांच्या नावावर झाली. यानंतर बाकीच्या जातींवर लक्ष वळवण्यात आले व त्यांचे बळजबरीने ख्रिस्तीकरण केले गेले. भाटकारच ख्रिस्ती झाल्याने त्यांची कुळे सहज ख्रिस्ती बनली. एक तर त्यांच्या भाटकाराचे आडनाव किंवा ज्या पंथप्रसारकाने त्यांना दीक्षा दिली त्यांचे आडनाव त्यांना देण्यात आले.

यात सगळ्यांत मोठ्या आश्चर्याची गोष्ट म्हणजे हिंदू धर्म सोडून अन्यत्र ख्रिश्चन, मुसलमान यांच्यात जाती असत नाहीत. पण उच्च जातीयांनी स्वेच्छेने ख्रिस्ती व्हावे म्हणून सगळ्या प्रकाराची आमिषे दाखवली गेली, त्यात जाती कायम ठेवण्याची हमी दिली गेली होती. त्यामुळे ख्रिस्ती ब्राह्मण, क्षत्रिय व शूद्र अशा नवजाती तयार झाल्या व अजून आहेत. त्यांच्यामध्ये रोटीबेटी व्यवहार होत नसे आणि अजून होत नाही.

नवख्रिस्ती ब्राह्मण व खानदानी क्षत्रिय यांची शान व चालीरीती बघण्यासारखा होत्या व आहेत. महालवजा मोठी आलिशान घरे, घरी पूर्ण पोर्तुगीज बोलणे, त्याच पद्धतीचे पेहराव, चालीरीती, रीतिरिवाज, हिंदू धर्मात वर्ज्य असलेला मांसाहार, पाश्चात्त्य संस्कृतीच्या पूर्ण नकला, दुसऱ्यांना कस्पटासमान मानण्याची वृत्ती या वरून ते फक्त प्रतीपोर्तुगीज नव्हे तर त्यांच्यापेक्षाही काकणभर सरस व दोन पावले पुढेच वाटायचे व वाटतात.

मोठ्या जमिनींवर फुकट अनायासे मालकी झाल्याने ते मोठे जमीनदार ठरले व उरलेले सगळे त्यांची कुळे किंवा आश्रित ठरले. त्यांची आडनावे अतिशय लांबलचक व किचकट असतात व जेवढी आडनावे लांब, तेवढ्या वेगवेगळ्या कुटुंबाच्या जमिनी त्यांनी वारसाहक्काने गिळंकृत केलेल्या असतात.

तडीपार केलेली हिंदू ब्राह्मण कुटुंबे जेव्हा जुन्या काबिजादीत परत आली तेव्हा त्यांना टीचभरसुद्धा जमीन राहिलेली नव्हती, ना राहायला घरे होती. त्यामुळे आज जुन्या काबिजादीत कोणाकडेही एक छोटेखानीसुद्धा जागा नाही, सोडून नायक शंखवाळकर घराणे. ज्यांच्या जमिनी सांकवाळ पठारावर होत्या व अतिशय खडकाळ व नापीक असल्यामुळे जप्तीतून त्या सुटल्या असाव्यात.

लेखकांनी कल्पकतेने फक्त इन्क्विझिशनचाच इतिहास घोटून ते एकदम सौम्य कसे होते आणि कसे कमीत कमी हिंदूंना बाधले, उलट ते जास्तीत जास्त नवख्रिस्तीनाच शिक्षा करण्यास स्थापित केले गेले होते, हे सिद्ध करण्याचा हा एक अचंबित प्रयत्न केला आहे. इन्क्विझिशन हे एक इतिहासातील वेगळी घटना असे घेऊन चालत नाही तर त्याची गोव्याच्या पूर्ण ख्रिस्तीकरणाच्या घटनेच्या संदर्भातच चर्चा करावी लागते.

जबरदस्तीच्या या ख्रिस्तीकरणामुळे गोव्याची ख्रिस्ती लोकसंख्या एकवेळेस पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त होती. आज पुष्कळ लोकांनी परदेशांत स्थलांतर केल्यामुळे ती पस्तीस टक्क्याच्या खाली आलेली आहे ही वस्तुस्थिती आहे. जुन्या काबिजादीमध्ये तर ते एकदम बहुमतात आहेत.

सातासमुद्रापारचा आपला पंथ आणून जबरदस्तीने लोकांचे ख्रिस्तीकरण करणे यासारखा गुन्हा नाही. साडेचारशे वर्षांपूर्वी सुरू झालेल्या घटना एकविसाव्या शतकांत उगाळून काढून कुठल्याच बाजूला काहीच ईप्सित साध्य होत नसते. हे जरी खरे असले आणि त्यासाठी आताचा ख्रिस्ती समाज जबाबदार नाही हेसुद्धा खरे असले तरीही, त्या इतिहासाचा आता केलेला उल्लेख ख्रिस्ती समाजाविषयी द्वेषाची भावना निर्माण करेल हा कुतर्क आहे.

हिंदूंचे वंशविच्छेदन, झालेले अत्याचार यांचा इतिहास वाचून हिंदूनी मुसलमानांचे किंवा ख्रिस्तींचे शिरकाण केले, असा एकही दाखला नाही. अत्याचार झालेच नाहीत, झाले तर ते फार सौम्य होते वगैरे चित्र उभे करण्यासाठी सामाजिक द्वेष पसरण्याची भीती मुद्दाम निर्माण केली जात आहे.

जे झाले ते एकदम मवाळ व सौम्य होते, असे दाखवून जास्तीत जास्त लोक जातिभेदाला कंटाळून स्वेच्छेने ख्रिस्ती झाले असा नवा युक्तिवाद करणे हा एक पूर्ण दुष्प्रचार आहे व सत्याला किंवा तर्काला धरून नाही. नवनवीन पुस्तके लिहून ख्रिश्चन पंथाने केलेल्या अत्याचार सौम्य करण्याचा, रंगसफेती (व्हाइटवॉश) करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू असतो. त्याच मालिकेतील हे आणखी एक पुस्तक.

जसा इराणसारखा देश दुसऱ्या महायुद्धात यहुदी शिरकाण झालेच नाही असे म्हणतो, तशापैकी हा पण एक प्रकार आहे. हे पुस्तक म्हणजे इन्क्विझिशनद्वारे अमानुष, क्रूर पद्धतीने केलेल्या गोव्यातील ख्रिस्तीकरणाच्या काळ्या इतिहासाची नव्याने केलेली रंगसफेती आहे.

-प्रयेश नाईक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT