Chorla Ghat: चोर्लाची ओळख म्हणजे 'अपघात' घाट!

Chorla Ghat: चोर्लाघाट रस्त्यांची ओळख बदलण्यासाठी दोन्ही राज्यांतील यंत्रणांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे.
Chorla Ghat
Chorla GhatDainik Gomantak
Published on
Updated on

Chorla Ghat: चोर्लाघाट रस्ता नेहमीच चर्चेत असतो, कारण गेल्या पाच वर्षांत प्रचंड मोठ्या खड्ड्यांमुळे हा घाटरस्ता प्रवाशांच्या चर्चेत कायम आहे. आत्ता घाट रस्त्याचे डांबरीकरण झाले, पण दोन्ही बाजूची गटार व्यवस्था, दिशादर्शक फलक, अरुंद वळणे आणि वाढलेली वर्दळ यामुळे हा रस्ता जीवघेणा ठरला आहे. दररोज एक तरी छोटामोठा अपघात होत असून वाहतूक कोंडी तर नित्यनियमाने होते.

निश्चित वेळेत कोणालाही या रस्त्यांवरून पोहोचता येत नाही. हे सर्व कर्नाटक-गोवा सरकारच्या दुर्लक्ष करण्यामुळे घडत आहे. त्यामुळे होणारे अपघात असतील किंवा वाहतूक कोंडी याला दोन्ही राज्यातील शासन यंत्रणा जबाबदार आहेत.

गेल्या आठवड्यात आंतरराज्य (हैद्राबादकडे ये-जा करणाऱ्या) बससेवेमुळे प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी झाली, काही वेळेला या बसेसना रस्ता देताना दुचाकी, चारचाकी वाहने गटारात अडकली. 24 नोव्हेंबर रोजी सकाळीच कचरावाहू अवजड वाहन एका मोठ्या खड्ड्यात पडल्यामुळे वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या दोन्ही बाजूंनी दोन-तीन किलोमीटर लांब रांगा लागल्या. पण पोलिसांचा पत्ता नाही. पोलिसांची काहीच भूमिका नाही.

केरीतूनही अवजड वाहने पुढे सोडली जात होती आणि कर्नाटकडूनही (कणकुंबी) वाहने येत होती. कुठेही वाहनांवर निर्बंध नव्हते. इतकी वाईट स्थिती 24 नोव्हेंबर रोजी असूनसुद्धा २५ रोजी पुन्हा अवजड वाहने दिवसा धावत होती. त्यापैकी अवजड वाहने घाटात रस्ता अडवून उभी होती, हे प्रकार दररोजच पाहायला मिळतात. या प्रकारामुळे वाहतूक कोंडी होते. पण या प्रकाराकडे पोलिसांचे दुर्लक्ष होते, केरीत तपासणी नाक्यावर बसून काहीही उपयोग होत नाही. त्यांनी घाट रस्त्यांवर फेरी मारली पाहिजे.

Chorla Ghat
Blog: 'चतुरंग'चे तिसावे रंगसंमेलन गोव्यात

गोव्याची हद्द सुरू होण्यापूर्वीच त्यांना रोखायला हवे. तरच वाहतूक कोंडी कमी होईल आणि होणारे त्रासही कमी होतील, अन्यथा हे प्रकार असेच सुरू राहणार आणि अपघातांचे प्रमाणही कमी होणार नाही, ते वाढत राहील.

बेळगाव-गोवा हा कमी अंतराचा आणि सुरक्षित मार्ग म्हणून अनेकांची या मार्गाला पसंती होती. लवकर बेळगावला जाता यावे आणि संध्याकाळी निश्चित वेळेत गोव्यात परत येता येत होते. पण अलीकडच्या काळात या रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. अनमोड घाट रस्ता बंद असल्यामुळे अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात या रस्त्याने सुरू आहे.

उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी फक्त दिवसा या मार्गावर अवजड वाहनांवर वाहतुकीसाठी निर्बंध घातले आहेत. ते फक्त कागदावरच आहेत. त्याबाबत कुठेही सूचना फलक लावलेला नाही. ते लावण्याची त्यांना गरज वाटत नाही. होणारे अपघात, वाहतूक कोंडी त्यांना दिसत नसावी, याबाबतचे वृत्तही त्यांच्यापर्यंत पोहोचत नसावे.

कारण त्यांना जाणीवपूर्वक डोळेझाक केलेली आहे. त्यांच्या आदेशाला केराची टोपलीच दाखवलेली असेल तर ते काय करणार, हा प्रश्नच आहे. पण जातीने या भागाची पाहणी करायला हवी, त्यांना त्यांच्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी समज द्यायला हवी. खुद्द बांधकाम खाते, गृहखात्यानेही या रस्त्यांवर होणारी मनुष्यहानी, बळी, अपघाताची दखल घ्यायलाच हवी.

मुख्यमंत्रीही याच मार्गाने कर्नाटक दौऱ्यावर गेले होते, त्यावेळी त्यांनी कचऱ्याबाबत मत व्यक्त केले होते. कर्नाटकला रस्त्याबद्दल सांगितले होते. त्यांनी आत्ता अवजड वाहतुकीबाबत ठोस आदेश द्यायला हवा, तरच संबंधितांना आपली ‘ड्युटी’ समजेल व या रस्त्यावरील ताण कमी होईल आणि प्रवाशांना दिलासा मिळेल.

उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी अवजड वाहनांना दिवसा वाहतूक परवानगी दिलेली नाही, पण त्यासंदर्भात घाट रस्त्यावर सूचना दिलेली नाही. तेथे जुनी तीन वर्षांपूर्वीच सूचना आहे. हा प्रकार चुकीचा आहे. सूचना, आदेश फक्त लेखी देऊन फाईल बंद होते. हा संदेश प्रवासी, वाहन चालकांपर्यंत कसा पोचणार, हा मोठा प्रश्न आहे.

Chorla Ghat
Blog: मुकाबला द्वेषमूलक वक्तव्यांचा

फक्त आदेश काढला म्हणजे सर्व काही होत नाही, त्याची अंमलबजावणी कोण करणार, याचा विचार जिल्हाधिकाऱ्यांनी करायला हवा. दररोज होणारी वाहतूक कोंडी आणि अपघातात जाणारे बळी याची जबाबदारी कोण घेणार? आपल्या प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हे प्रकार घडत आहेत. तेव्हा नवी सूचना घाटरस्ता सुरू होण्यापूर्वी गोवा सीमेवर ठळकपणे लावली पाहिजे. तेथेच पोलीस चौकीही उभारायला हवी.

तरच गोव्यात येण्यापूर्वीच अवजड वाहनचालक व इतरांनाही चाप बसेल आणि सुरळीत, सुरक्षित वाहतूक होईल. घाट मार्गावर वाहतूक पोलीस किंवा कोणीही नसल्यामुळे संध्याकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात अवजड वाहने येत असतात.

एकावेळी अवजड वाहन व मोठी बस आली तर रस्ता पार करणे दोघांनाही कठीण होते. कारण रस्त्याच्या बाजूला थोडे जरी वाहन घेतले तरी ते खाली कोसळण्याची शक्यता आहे. कारण किमान मीटर-दीड मीटर खाली नादुरुस्त गटार आहे. त्यात वाहन पडले, की ते निश्चितपणे कलंडतेच. इतका हा धोकादायक रस्ता आहे.

घाटाच्या वरचा कर्नाटक राज्यातील रस्ताही बऱ्याच ठिकाणी खड्ड्यात गेलेला असल्याने छोट्या गाड्या चालविणे कठीण आहे. त्यासंदर्भात कर्नाटक शासनाशीही चर्चा करायला हवी. एकूणच डोळसपणे या रस्त्यासंदर्भात गोवा शासन, संबंधित खात्याने लक्ष दिल्यास हा रस्ता टिकेल, अन्यथा रस्ता पुन्हा खड्ड्यात गायब होण्याची शक्यता आहे. सुज्ञांस अधिक सांगणे न लगे!

मुख्यमंत्र्यांच्या कर्नाटक दौऱ्यानंतर काही ठिकाणी खड्डे बुजवले गेले, पण कायमस्वरूपी उपाय काढला नाही. शिवाय चोर्ला घाट ते बेळगावपर्यंत अनेक ठिकाणी छोटी वाहने अडकून पडण्यास पुरेसे मोठे खड्डे आहेत. या खड्ड्यातून वाहनांची झीज मोठ्या प्रमाणात होत आहे. जीव मुठीत घेऊनच या रस्त्याने प्रवास करावा लागत आहे, इतकी या रस्त्यावर अपघाताची, वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे.

गोवा आणि कर्नाटक शासनाने एकत्रितपणे या रस्त्यांच्या विकासासाठी, सुरळीत वाहतुकीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. दोन्हीकडे मद्यसाठा तपासण्यासाठी तपासणी नाके आहेत, पण प्रचंड प्रमाणात मद्यप्राशन करून दिवसा-रात्री वाहने हाकणाऱ्यांवर निर्बंध नाहीत. त्यामुळे भरधाव वेगाने वाहने हाकणारेही अनेक आहेत.

गोव्यापेक्षा कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणातील प्रवासी बेदरकारपणे वाहने चालवितात आणि स्वतःबरोबर इतरांनाही संकटाच्या दरीत ढकलतात. यावर निर्बंधांसाठी घाट रस्त्यांवर पोलिसांची देखरेख हवी, मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करावी.

अन्यथा भविष्यात या रस्त्यांवर अनेकांचे बळी निश्चित जाणार आहेत. ‘अपघात’घाट चोर्लाघाट मार्ग!, ही या रस्त्यांची ओळख बदलण्यासाठी पोलीस, प्रशासनाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिले तर निश्चितपणे हे प्रकार थांबतील असा सर्वसामान्यांना विश्वास आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com