Independence Day Dainik Gomantak
ब्लॉग

Independence Day: 15 ऑगस्ट आणि गोमंतकीयांच्या सुखदु:खाचा कल्लोळ

गोमन्तक डिजिटल टीम

सुशीला सावंत मेंडीस

दोन महायुद्धांमुळे जग लोकशाहीसाठी सुरक्षित झाले, असे मानले जात होते. द्वितीय विश्वयुद्धानंतर, पंडित नेहरूंना वैज्ञानिक स्वभाव असलेले आणि शांततापूर्ण सहअस्तित्वाचे पुरस्कर्ते असलेले महान लोकशाहीवादी म्हणून पाहिले गेले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर आंतरराष्ट्रीय नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

त्यांच्यामध्ये पोर्तुगालचे फॅसिस्ट हुकूमशहा आंतोनियो ऑलिव्हेरा सालाझार होते. सालाझार यांनी त्यांच्या सरकारच्या नावाने भारताला स्वातंत्र्य मिळाल्याबद्दल पंडित नेहरूंचे अभिनंदन केले.

मिळालेल्या शुभेच्छांना पंडित नेहरूंनी दिलेल्या प्रतिउत्तराचेही त्या काळातील वृत्तपत्रांनी खूप कौतुक केले होते. पोर्तुगालचे लोकही हुकूमशाही राजवटीपासून स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या अपेक्षेने वाट पाहत होते.

फ्रेंच आणि पोर्तुगीज साम्राज्यवाद्यांच्या डावपेचांविरुद्ध आणि त्यांच्या दाव्यांविरुद्ध ठोस भूमिका घेण्याची गरज असल्याचे यावेळी स्पष्ट झाले. फ्रेंच गव्हर्नरने अहिंसेच्या गुणांची प्रशंसा केली होती. त्यांचा अहिंसेवर अजिबात विश्‍वास नव्हता.

तरीही ते अहिंसेची भलामण केवळ आपले वसाहतवादी साम्राज्य टिकवण्यासाठी ढाल म्हणून करत होते. याची जाणीव असल्याने, ‘या दोन्ही युरोपियन शक्तींना सूचित केले पाहिजे की एक स्वतंत्र देश म्हणून भारत अहिंसेवर आधारित नाही.

आपले साम्राज्य राखण्यासाठी आमच्या अहिंसेच्या गुणाचा वापर आमच्याच विरुद्ध कवचासारखा करून गोव्याच्या स्वातंत्र्याची गळचेपी करू नये’ ही तमाम गोमंतकीयांची भावना पत्रकारांनी व्यक्त केली.

१५ ऑगस्ट रोजी गोव्यातील आणि मुंबईतील गोमंतकीयांमध्ये खळबळ माजली होती. नुकतेच स्वातंत्र्य मिळवलेल्या इतर देशांच्या तुलनेत पोर्तुगीजांच्या पारतंत्र्यात असलेल्या आपल्या गोमंतकीयांची स्थिती कशी आहे, हे शोधण्यासाठी त्या काळातील वर्तमानपत्रे हा महत्त्वपूर्ण स्रोत होता.

गोमंतकीयांनी भारताचा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात, आनंदाने साजरा केला. पणजीमध्ये मोठ्या संख्येने लोकांनी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी भारतीय वाणिज्य दूत एम. ए. आर. बेग यांना बोलावले. या गटात सरकारी नोकरांचा समावेश नव्हता.

नंतर पणजीमध्ये मिरवणूक काढण्यात आली आणि सुमारे ८०० गोमंतकीय ध्वजारोहण सोहळ्यात सहभागी झाले होते. कॉन्सुल बेग हे त्यापैकीच एक. मात्र ही मिरवणूक लाठीचार्ज करून पांगवण्यात आली.

भारतीय स्वातंत्र्य युगाच्या आगमनाची घोषणा करत ३०० लोकांची मिरवणूक आगशी गावातून निघाली. काणकोण येथे एक उत्स्फूर्ततेने लोक एकत्र जमले, ज्यांना नंतर पोलिसांनी जबरदस्तीने पांगवले. पोलिसांचा हस्तक्षेप आणि बळाचा वापर करण्याची धमकी देऊनही गोव्यातील इतर गावांमध्ये भारताचे स्वातंत्र्य साजरे करणाऱ्या अशाच मिरवणुका निघाल्या.

हा उत्साह इतका प्रभावी होता की, कॅथलिकांनी भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी चर्चमध्ये मोठ्या संख्येने याजकांना बोलायला लावले. पोर्तुगीजांनी गोव्यातील लोकांमध्ये उत्सवाची भावना वाढत चालल्याचे पाहून एक पोलीस आदेश जारी केला आणि इमारतींवर पोर्तुगीजांसह दोन अधिराज्यांचे ध्वज फडकवणे अधिकृत केले.

‘गोव्याला पूर्ण स्वातंत्र्य मिळेपर्यंत सर्व गोमंतकीयांनी एकजुटीने एका पक्षाच्या अंतर्गत संघटित होण्याची गरज आहे’, अशी पत्रे लोकांनी संपादकांना लिहिली. यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन कॉंग्रेसचे हात बळकट करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

गोमंतक प्रजा मंडळाचे मुखपत्र असलेल्या ‘गोमंतक’मध्ये लिहिलेल्या एका पत्रात डॉ. एफ. डी. क्रूझ लिहितात की, ‘नॅशनल कॉंग्रेस (गोवा) - एनसीजी, अहिंसेचा शस्त्र म्हणून वापर करून गोव्यातील गोऱ्या राजवटीविरुद्ध लढेल असा त्यांना विश्वास आहे’.

स्वतंत्र आणि शक्तिशाली भारतीय संघराज्याच्या जन्मामुळे, लवकरच गोवाही पोर्तुगिजांच्या जोखडातून मुक्त होऊन मोकळा श्‍वास घेईल, असा विश्वास तमाम गोमंतकीयांच्या मनात होता.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी मुंबईत नॅशनल कॉंग्रेस (गोवा) - एनसीजीने रॅली काढण्यासाठी, मिरवणूक काढण्यासाठी आणि ध्वजारोहण समारंभ करण्यासाठी दहा दिवस तयारी केली होती. गोमंतक प्रजा मंडळाच्या स्वयंसेवकांनी हजारो पत्रके वाटून मोहिमेचे उत्साहात नेतृत्व केले होते.

आणि या ऐतिहासिक दिवसाचा सोहळा यशस्वी करण्यासाठी वैयक्तिक संपर्कही केले होते. हिंदू महासभेसारख्या प्रतिगामींच्या प्रतिगामी प्रचाराला न जुमानता गोमंतकीय मोठ्या संख्येने क्रॉस मैदानावर ९.३० वाजता ‘नवें जीवित’ या बँडच्या सुरात बाहेर पडले. यात गोव्याविषयी आत्मीयता असलेल्यांसोबत असोळणा, वेळ्ळी आणि कुंकळ्ळी येथील रहिवासी सहभागी झाले होते.

मिरवणुकीत एनसीजीची ओळख सांगणारे रोमन आणि देवनागरी भाषेतील दोन फलक होते. एकावर ‘भारतीय नागरिकत्व हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे’, अशी घोषणा लिहिलेली होती. तर दुसऱ्या फलकावर ’देशद्रोह्यांसाठी लोक न्यायालय’, असे लिहिले होते. आणखी एका फलकावर एनसीजीमध्ये सामील होण्याचे आणि भाटकारशाही व जातिव्यवस्था नष्ट करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

भारताच्या स्वातंत्र्यगर्भात गोव्याच्या स्वातंत्र्याचे बीजही अंकुरत असल्याचे दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रांनी अधोरेखित केले. ‘आधीपासून असलेल्या स्वातंत्र्याला आणि आजूबाजूला असलेल्या स्वातंत्र्याला गोव्याचा सलाम. जय हिंद!’, असे तत्कालीन वृत्तपत्रात छापून आले होते.

‘महात्मा गांधीजी की जय’, ‘लोहिया की जय’, अशा घोषणा देत गोमंतकीयांनी हातात झेंडे व फलक घेऊन मिरवणूक काढली. जेव्हा ही मिरवणूक मेट्रो सिनेमापर्यंत पोहोचली तेव्हा त्यात हजारो गोमंतकीय लोक सहभागी झाली होते. या भागांत अनेक गोमंतकीयांची घरे होती. ही मिरवणूक क्वीन्स रोड आणि सोनापूर लेनपर्यंत गेली.

वीस हजारांहून अधिक लोक यात सहभागी झाल्याचा अंदाज आहे. मुंबईत अन्य ठिकाणी जिथे गोमंतकीय मोठ्या संख्येने राहत होते. त्यामुळे गिरगाव, कावेल आणि काळबादेवी रोडपासून ते पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी किंवा क्रॉस मैदानापर्यंत जाईपर्यंत मिरवणुकीत सहभागी लोकांची संख्या वाढतच गेली.

या मिरवणुकीचे नेतृत्व करणारे नेते आणि कार्यकर्ते डॉ. ज्युलियाओ मिनेझिस, डॉ. एरिक डी मेलो यांच्यासह मिस ओरिन डी सूझासारख्या अनेक महिला होत्या. क्रॉस मैदानावर पोहोचल्यानंतर, मिस डी सूझा यांनी स्वतंत्र भारताचा राष्ट्रध्वज फडकावला. सँचेस डी सूझा, सिरिल फर्नांडिस आणि वर उल्लेख केलेल्या इतरांनी ध्वजाला मानवंदना दिली. त्यानंतर ज्युलियाओ मिनेझिस यांनी उपस्थितांना संबोधित केले.

त्यांच्या भाषणाचा सारांश : भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश राजवटीविरुद्ध स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या हजारो स्वातंत्र्यसैनिकांचे प्रतिनिधित्व करणारा ध्वज फडकावणे प्रतीकात्मक होते. त्यानंतर त्यांनी गोवावासियांना आठवण करून दिली की, गोव्यात मागील वर्षी सुरू झालेली १८ जूनची अहिंसक चळवळदेखील महात्मा गांधींच्या मार्गदर्शनाखाली होती. ते म्हणाले की, ‘हा दिवस गोमंतकीयांचाही आहे.

कारण ऑगस्टच्या क्रांतिकारकांसोबत मोठ्या संख्येने गोमंतकीय लढले होते आणि सुभाषचंद्र बोस यांच्या भारतीय राष्ट्रीय सैन्यातही सामील झाले होते’. टी. बी. कुन्हा, पुरुषोत्तम काकोडकर, लक्ष्मीकांत भेंब्रे, पांडुरंग शिरोडकर, डॉ. राम हेडगे, मारिओ रॉड्रिग्स आणि इव्हाग्रिओ जॉर्ज यांसारखे गोमंतकीय देशभक्त पोर्तुगीज तुरुंगात सडत होते आणि गोवा स्वतंत्र झाल्याचे पाहणे त्यांच्या नशिबी नव्हते.

त्यानंतर जॉर्ज वाझ यांनी लोकांना संबोधित केले आणि मोठ्या मेळाव्याला उभे राहून आपल्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ दोन मिनिटे मौन बाळगण्याची विनंती केली. त्या काळातील वृत्तपत्रांनी या मोर्चात सामील न झालेल्या आणि अराजकीय राहिलेल्या गोमंतकीयांचा तसेच हिंदू महासभेच्या दत्ता पैचा निषेध केला.

गोमंतकीय आता स्वत:च्या प्रयत्नाने, सेवेने आणि बलिदानाने स्वत:च्या स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल करतील, याचे प्रतीक म्हणून हा मोर्चा होता. १५ ऑगस्ट १९४७, पोर्तुगीज वसाहतवादी राजवटीच्या ४०० वर्षांहून अधिक काळ लांब असलेल्या पारतंत्र्याचा अंधार संपून गोव्याच्या स्वातंत्र्याचा मार्ग दाखवणारा प्रकाश पडला होता. त्या प्रकाशाच्या आशेचे किरण गोव्याच्या प्रत्येक गावात पसरले.

या दिवशी गोमंतकीयांच्या सुखदु:खाचा कल्लोळ व त्या संमिश्र भावनांचा सारांश एस. एफ. डिमेलो अन्सलेकर यांनी मांडला आहे; ते म्हणतात, ‘ज्या देशाचे आपण अविभाज्य भाग आहोत, त्या देशाला, देशवासीयांना अहिंसक लढ्याने विजय मिळवून दिला याचा आनंद आहे. आपण गोमंतकीय, युरोपियन वसाहतवादाचे पहिले बळी आहोत आणि गंमत म्हणजे त्यातून मुक्त होणारे शेवटचे आहोत, याचे दु:ख वाटते!’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Table Tennis Championship: अंकुर, सुतिर्थाची कमाल! यूटीटी राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत मारली बाजी; विजेतेपदावर कोरले नाव

Goa University: ''गोवा विद्यापीठातील ती पदे भरु देणार नाही, कुलगुरुंनी अद्याप...''; सरदेसाईंच्या पक्षाचा आक्रमक पवित्रा

Goa Accident: अपघात नव्हे तो खूनच! देऊमळ ग्रामस्थांची केपे पोलिस स्थानकावर धडक

Goa Fire: मालक बाहेर पडला अन् फ्लॅटमधून धूर येऊ लागला; सिलिंडर बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली

Global Konkani Forum Protest: साहित्य अकादमींच्या कार्यक्रमांवर बहिष्कार; गोव्यातल्या कोकणी फोरमने टोकाचा निर्णय का घेतला?

SCROLL FOR NEXT