पर्वरी: बार्देश तालुक्यातील साळगाव मतदारसंघात भंडारी समाजाचे प्राबल्य आहे. मागील तीन निवडणुकीत या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व याच समाजातील लोकप्रतिनिधींनी केले आहे. दोन वेळा भाजपचे माजी मंत्री दिलीप परुळेकर यांना संधी मिळाली, तर त्यानंतर 2017 सालच्या निवडणुकीत गोवा फॉरवर्डचे जयेश साळगावकर आमदारपदी निवडून आले. येत्या निवडणुकीत या मतदारसंघात ‘भंडारी विरुद्ध भंडारी’ अशीच प्रमुख लढत होईल असे दिसते.
2022 मधील विधानसभा निवडणुकीत नव्या नेतृत्वाची निवड करताना या मतदारसंघात ख्रिश्चन आणि भंडारी समाजाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे एखाद्या पक्षाला उमेदवारी जाहीर करताना जो कार्यकर्ता ख्रिस्ती समाज आणि भंडारी समाजात लोकप्रिय आहे, त्यालाच उमेदवारी जाहीर करावी लागणार आहे. तेव्हाच अपेक्षित यश पदरात पडू शकते.
वर्ष 2012 मध्ये कळंगुट मतदारसंघातील गिरी, नेरूल, पिळर्ण, सांगोल्डा आणि रेईश मागूश, साळगाव या पंचायती वगळून साळगाव हा नवीन मतदारसंघ करण्यात आला. त्यामुळे या सहा पंचायती मिळून हा मतदारसंघ झाला आहे. या मतदारसंघात 2021 नुसार एकूण 27, 234 मतदार असून त्यात 13, 380 पुरुष, तर 13, 854 महिला यांचा समावेश आहे. या मतदारसंघात भंडारी समाजातील सुमारे तेरा हजार, तर ख्रिस्ती समाजातील सुमारे साडेपाच हजार मतदार आहेत. रामनगर, बेती भागात मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात आहेत.
राजेश दाभोळकर पुन्हा इच्छुक
गेल्या निवडणुकीतील मगो-शिवसेना युतीचे उमेदवार राजेश दाभोळकर पुन्हा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. पण ते नवीन पक्षाच्या शोधात आहेत. आप अथवा अपक्ष म्हणून संदीप पेडणेकर निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. अनेक वेळा पंचायत निवडणूक लढवूनही त्यांना यश आले नाही, ही वस्तुस्थिती आहे.
भीष्मप्रतीज्ञा अंगलट येणार का?
वर्ष 2017 मधील निवडणुकीत गोवा फॉरवर्ड पक्षाचे जयेश साळगावकर पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून आले होते. ‘मी भाजपसारख्या जातीयवादी पक्षात कधीच सामील होणार नाही व जर मला भाजपमध्ये जावे लागले तर सर्वांत प्रथम मी आमदारकीचा राजीनामा देऊन मोकळा होईन’, असे त्यांनी प्रचारावेळी जाहीर केले होते. मात्र, तशी भीष्मप्रतिज्ञा करणारे आमदार साळगावकर नंतरच्या काळात भाजप सरकारात सामील होऊन नदी परिवहन खात्याचे मंत्रीही झाले, अशी टीका करून त्यांच्यावर ख्रिस्ती समाजातील मतदार नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. साळगावकर हे नजीकच्या काळात काँग्रेस किंवा भाजपमध्ये प्रवेश करतील, अशीही चर्चा सुरू आहे. वास्तविक, ते पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे कार्यकर्ते. उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द लक्षणीय होती. स्वच्छ प्रतिमा, शांत, मनमिळावू या त्यांच्या स्वभावगुणामुळे ते मतदारसंघात परिचित आहेत. परंतु, निवडणुकीनंतर स्वत:ची भूमिका त्यांनी बदलल्याने त्यांच्या विरोधात बऱ्याच प्रमाणात चीड व्यक्त होत आहे.
भाजपमध्ये गट-तट!
येत्या विधानसभा निवडणुकीत दिलीप परुळेकर यांना भाजपकडून पुन्हा उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा आहे; पण, सध्या साळगाव भाजप मंडळात सरळ सरळ दोन गट पडलेले आहेत. एका गटाला परुळेकर यांचे नेतृत्व मान्य नाही, तर दुसरा तरुण पदाधिकाऱ्यांचा गट नवीन नेत्याच्या शोधात आहे. दुसऱ्या बाजूने जिल्हा पंचायत सदस्य रूपेश नाईक, पिळर्णचे माजी सरपंच अजय गोवेकर, रेईस मागूसचे सरपंच केदार नाईक, पिळर्णचे सरपंच संदीप बांदोडकर हे भाजपतर्फे निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. ते आपापल्या परीने मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत.
मतदारसंघ इतिहास
गोव्याच्या राजकारणातील भीष्माचार्य म्हणून ओळखले जाणारे माजी मुख्यमंत्री डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांना साळगाव मतदारसंघात पराभूत करून भाजपच्या उमेदवारीवर निवडून येऊन दिलीप परुळेकर यांनी विधानसभेत प्रवेश केला होता. त्यापूर्वी डॉ. डिसोझा चार वेळा कळंगुटचे आमदार म्हणून निवडून आले होते. परुळेकर यांनी लागोपाठ दोन वेळा अर्थांत वर्ष 2007 आणि 2012 मध्ये विधानसभा निवडणुकांत बाजी मारली होती. ते पर्यटनमंत्रीही झाले; पण, त्यानंतर त्यांच्या काही वादग्रस्त वक्तव्यांमुळे मतदारही नाराज झाले होते व अखेरीस 2017 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
काँग्रेसमध्ये इच्छुक अनेक
काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर अनेक जण दावा करीत आहेत. त्यात डॉ. विली डिसोझा यांचे जावई तुलिओ डिसोझा, गोवा प्रदेश काँग्रेसचे सचिव यतीश नाईक, पिळर्णच्या उपसरपंच सोनल मालवणकर, माजी मंत्री आग्नेल फर्नांडिस, उत्तर गोवा काँग्रेसचे सरचिटणीस भोला घाडी यांचा समावेश आहे. डॉ. डिसोझा ज्या वेळी या मतदारसंघाचे (पूर्वाश्रमीचा कळंगुट मतदारसंघ) नेतृत्व करीत होते तेव्हा काँग्रेस कार्यकर्त्यांची फौज कार्यरत होती. पण त्यानंतर सक्षम नेतृत्वाच्या अभावाने सर्व कार्यकर्ते विखुरले गेले आहेत. काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री चिदंबरम यांनी अलीकडेच या मतदारसंघाला भेट देऊन कार्यकर्त्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.