Goa Election 2022: फोंडा मतदारसंघात रवींना रोखण्यासाठी रणनीती
Goa Election 2022: फोंडा मतदारसंघात रवींना रोखण्यासाठी रणनीती  Dainik Gomantak
ब्लॉग

Goa Election 2022: फोंडा मतदारसंघात रवींना रोखण्यासाठी रणनीती

नरेंद्र तारी

फोंडा: अंत्रुज महाल अर्थात फोंडा तालुक्यातील शहरी भागातील फोंडा मतदारसंघात कायम सत्तेसाठी साठमारी चाललेली आहे. काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि मगो पक्ष यांच्यातच कायम सामना रंगत आला आहे. विद्यमान आमदार रवी नाईक यांना शह देण्यासाठी मगो आणि भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यात आता गोवा फॉरवर्ड पक्षाची भर पडली आहे.

या मतदारसंघाचे सर्वाधिक प्रतिनिधीत्व आमदार रवी नाईक यांनी केले आहे. नियोजनबद्धरीत्या विकासावर त्यांनी सातत्याने भर दिला आहे. त्यामुळे आताही विरोधकांना त्यांना टक्कर देणे तसे मुश्‍किलीचेच ठरणार आहे. मतदारसंघात 1963 ते 2017 पर्यंतच्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्वांत मोठा प्रादेशिक पक्ष ठरलेल्या मगोने सातवेळा प्रतिनिधीत्व केले आहे. त्यानंतर काँग्रेस या राष्ट्रीय पक्षाने चारवेळा प्रतिनिधीत्व केले आहे. त्यात एकवेळ काँग्रेस अर्सने तर तीनवेळा भारतीय काँग्रेसने बाजी मारली आहे. सुरवातीला प्रजा समाजवादी पक्षाने या मतदारसंघात आपले प्राबल्य सिद्ध केले होते, मात्र त्यानंतर मगो व काँग्रेसचाच वरचष्मा या मतदारसंघात राहिला आहे. रवी नाईक यांनी फोंड्याचा विकास साधताना पक्षांतरे केली ती विकासासाठीच, असे त्यांचे कार्यकर्ते सांगतात.

नाईकांवर नाईक भारी!

2002 च्या निवडणुकीत रवी नाईक यांच्या विरोधात केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक उभे ठाकले होते, पण रवी त्यावेळी भारी ठरले. दोन वर्षांपूर्वी आमदार रवी यांचे दोन्ही पुत्र रितेश आणि रॉय यांनी भाजप प्रवेश केला आहे. रितेश नाईक हे तर फोंडा पालिकेचे नगरसेवक आहेत, मात्र रवी हे अजूनही काँग्रेस पक्षातच आहेत. त्यामुळे त्यांचे पुढील धोरण काय आहे ते अजून स्पष्ट झालेले नाही.

रखडलेले प्रकल्‍प

फोंडा मार्केट संकूल पूर्णपणे खुले झालेले नाही, मलनिस्सारण प्रकल्पाचे रखडलेले काम, खराब रस्त्यांची डोकेदुखी, पालिका क्षेत्रातील रखडलेले अनेक प्रकल्प, रोजगाराचा जटील बनलेला प्रश्‍न हे मुद्दे आगामी निवडणुकीत प्रामुख्याने ऐरणीवर राहणार आहेत.

आता लक्ष 2022

अंत्रुज महालात इच्छुक उमेदवारांनी कामाला सुरवात केली आहे. मतदारही सध्या ‘सायलंट’ आहेत. त्यामुळे बाजी कोण मारील, हे येणारा काळच ठरवणार आहे.

विद्यमान राजकीय स्‍थिती

मगो पक्षातर्फे डॉ. केतन भाटीकर यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे यावेळेला काँग्रेसतर्फे रवी नाईक यांना की राजेश वेरेकर यांना हे ठरायचे आहे. फक्त गोवा फॉरवर्डचे उमेदवार म्हणून माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक व्यंकटेश ऊर्फ दादा नाईक निश्‍चित आहेत. पण गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेसची युती झाली तर कदाचित उमेदवारही बदलू शकतो, त्यामुळे आताच फोंडा मतदारसंघासाठी येत्या निवडणुकीतील उमेदवारांच्या नावांचा अंदाज बांधणे धाडसाचे ठरेल.

...म्‍हणून रवींची विजयी वाटचाल

फोंड्यात मगो आणि भाजपची जरी युती झाली तरी माजी आमदार लवू मामलेदार यांच्या कार्यकाळात भाजपवाल्यांनी त्यांना योग्य साथ दिली नाही, त्यामुळेच लवू मामलेदार आमदार म्हणून निष्प्रभ ठरले, हे सर्वश्रुत आहे. त्याचाच परिणाम म्हणून 2017 च्या निवडणुकीत मगो आणि भाजपवाल्यांनी एकमेकांची साथ सोडून एकला चलोचे धोरण ठेवले आणि रवी नाईक बिनधास्तपणे निवडून आले.

काँग्रेस काळात विकास

भाजपने आतापर्यंत या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी जंग जंग पछाडले, तरीही त्यांच्या पदरी अपयशच पडले. मतदारसंघात मगो पक्षाने सर्वाधिक काळ प्रतिनिधीत्व केले असले तरी या मतदारसंघाचा खरा विकास हा काँग्रेसच्या काळातच झाला. मगो व प्रजा समाजवादी पक्षाच्या उमेदवारांनी फोंड्याचा विकास केला असला तरी काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवी नाईक यांनी विकासावर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे आजच्या घडीला मतदारांसाठी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत, त्या रवी यांच्या कार्यकाळातच असे म्हणावे लागेल.

गठ्ठा मतांकडे लक्ष?

2022 च्‍या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातर्फे कोण, भाजपतर्फे कोण आणि मगो पक्षातर्फे कोण हे अजून ठरलेले नाही. रवी नाईक यांचे दोन्ही पुत्र भाजपवासी झाल्याने काँग्रेसच्या काही पुढाऱ्यांनी नवीन चाल खेळल्‍या. फोंड्याचे माजी आमदार व माजी मंत्री शिवदास वेरेकर यांचे पुत्र राजेश वेरेकर यांना पक्षात प्रवेश दिला आहे. भाजपतर्फे सुनील देसाई व संदीप खांडेपारकर आणि माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर यांची नावे चर्चेत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

District and Sessions Court: कोलवा येथील वेश्याव्यवसाय प्रकरणात दोषी ठरलेला विजय सिंगला 3 वर्षांची कैद

Panaji News : सांताक्रुझ मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलणार : आमदार रुडाॅल्फ फर्नांडिस

इंजिनिअरिंग ड्रॉपआऊट विद्यार्थ्याने Chat GPT च्या मदतीने सुरु केली बनावट कॅसिनो वेबसाईट, गोवा पोलिसांनी केली अटक

Goa And Kokan Today's Live News: 2024 - 25 वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण लागू होणार

PM Modi ON UCC: ‘’गोव्यातील लोक एक सारखे कपडे घालतात का?’’ समान नागरी कायद्याच्या प्रश्नावर मोदी स्पष्टच बोलले

SCROLL FOR NEXT