Deep Sea Bioluminescence गोव्याला जो पर्वत, दऱ्याखोऱ्यांनी आणि वृक्षवेलींनी समृद्ध असा पश्चिम घाट लाभलेला आहे, तेथील निसर्गात एकापेक्षा एक चमत्कृतींचे दर्शन घडते. त्यात निसर्गातले काही पदार्थ विविध प्रकारे प्रकाशमान होतात. त्यात काही पदार्थ कमी तरंगलांबीचा प्रकाश शोषून, काही आण्विक प्रक्रियेनंतर काही सेकंदांत जास्त तरंगलांबीचा प्रकाश उत्सर्जित करतात याला ‘प्रतिदीप्ती’ म्हटले जाते.
अंधारात चमचमणाऱ्या काही घटकांत जास्त तरंगलांबीचा प्रकाश स्फुरदीप्तीमध्ये उत्सर्जित केला जातो. काही पदार्थांतील रासायनिक विक्रियेतून प्रकाश रासायनिक प्रतिदीप्तीत उत्सर्जित होतो. परंतु, काही सजीवांमध्ये ठराविक अशा जीवरासायनिक प्रक्रियेमुळे नैसर्गिक प्रकाश जीवदीप्तीत उत्सर्जित होतो.
गोव्याला जी घनदाट जंगले लाभलेली आहेत, तेथे काही प्राणी आणि वनस्पतींमध्ये जीवदीप्तीची प्रक्रिया दृष्टीस पडते. पावसात काजवे, काजव्याची अळी अशी प्रकाशनिर्मिती करत असते, जी मानवी समाजाला कित्येक वर्षापासून आकर्षित करत आलेली आहे.
निसर्गात काही भुंगेरे, जेलीफिश त्याचप्रमाणे काही कवके आणि जीवाणू जीवदीप्तीच्या प्रक्रियेचे दर्शन घडवतात. यापैकी काही सजीव असणाऱ्या प्रजाती स्वतःच जीवदीप्ती निर्माण करतात, तर काही सजीव यासाठी जीवाणूचे सहाय्य घेत असतात.
जीवदीप्तीमुळे निर्माण होणाऱ्या प्रकाशाचा उपयोग काही सजीव आपल्या संरक्षणासाठी तर काहीजण आपल्या सहचराला आकर्षित करण्यासाठी करतात. काही स्वतःच्या भक्ष्याला फसवून आकर्षित करण्यासाठी हा प्रकाश वापरतात.
काही कीटकांच्या पोटाच्या शेवटी असलेल्या भागात प्रकाश उत्सर्जित करणाऱ्या ग्रंथी असल्याचे स्पष्ट झालेले आहे.
काही काजव्यांतल्या प्रजातीत नर काजवा जेव्हा प्रकाश निर्माण करतो, तेव्हा त्या काजव्याची मादी तो प्रकाश पाहून, तशीच चमक निर्माण करून नराला मीलनासाठी आकर्षित करते आणि त्यातूनच नर आणि मादीचा संयोग घडतो. काही खेकड्यांच्या प्रजातींमध्ये सहचराला आकर्षित करण्यासाठी जीवदीप्तीचा उपयोग केला जात असल्याचे दिसून आलेले आहे.
काही सागरी प्राण्यांमध्ये मादी पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन प्रकाश उत्सर्जित करते आणि हा प्रकाश पाहून खोल पाण्यातील नर पृष्ठभागावरती येऊन मादीबरोबर प्रणयक्रीडेत रममाण होऊन प्रजननपेशी पाण्यात सोडत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. खोल पाण्यात वास्तव्य करणारे काही मासे भक्ष्य साध्य करण्यासाठी जीवदीप्ती प्रक्रियेचा उपयोग करत असल्याचे उघडकीस आलेले आहे.
काही जीवाणू, कवके सतत प्रकाश उत्सर्जित करत असल्याचे, तर जेलीफिश, भंगुरतारा यासारखे जीव उत्तेजित झाल्यावरती प्रकाश उत्सर्जित करत असल्याचे आढळून आले आहे.
जीवदीप्तीमध्ये अनेक रासायनिक क्रिया आणि त्यासाठी आवश्यक असणारी विकरे आणि त्या विकरांची जनुके महत्त्वाची असतात. बऱ्याच जीवदीप्तीच्या प्रक्रियेत ल्यूसिफेरीन विकराचा संयोग प्राणवायुशी झाल्यावरती प्रकाशनिर्मिती होत असल्याचे स्पष्ट झालेले आहे.
आपल्या पश्चिम घाटात बुरशी म्हणजे कवकाचे वैविध्य असून, मृत किंवा जिवंत वनस्पती, प्राणी व इतर सजीवांवरती कवके जगण्यासाठी अवलंबून असतात. जंगलातील जमिनीवर वर्षभर पडणारा पालापाचोळा, फांद्या आणि इतर सेंद्रिय कचऱ्याचे अपघटन कवके आणि जीवाणूमार्फत होत असते.
या कवकांच्या प्रजातींपैकी पश्चिम घाटात लॅम्पटेरोमायसीस ही अळंबी, त्यांच्या शरीरातून मंद निळसर, हिरवा, जांभळट प्रकाश उत्सर्जित करतात. या प्रकाशाच्या माध्यमातून बीजकणाच्या विकरणासाठी वाव मिळत असतो. गोव्याच्या पश्चिम घाटाप्रमाणे, त्याच्याशी संलग्न असणाऱ्या जंगलात पावसाळी मोसमातल्या रात्री कवकांतल्या लॅम्पटेरोमायसीस प्रजातीत ज्या विशेष ग्रंथी आढळतात.
त्या ल्यूसीफेरसयुक्त असून, प्राणवायूच्या उपस्थितीत त्यांच्या रासायनिक प्रक्रियेला प्रारंभ होऊन, काळ्याकुट्ट अंधारात त्यातून उत्सर्जित होणारा प्रकाश लक्ष वेधून घेतो. याविषयीचे संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या मते जीवदीप्ती अळंब्यांतून उत्सर्जित प्रकाशात बहुधा कृमी, कीटक आकर्षित होतात आणि या अळंब्यांचे बीजकण प्रसारित करण्यासाठी मदत करत असले पाहिजे.
जगभरात जीवदीप्ती कवकाच्या सुमारे नव्वदपेक्षा जास्त प्रजाती असल्याचे शास्त्रज्ञांचे मत असून, मेघालयातल्या खाशी पर्वतरांगात येणाऱ्या जंगलात शास्त्रज्ञांना रोरीडोमायसीस फायलो स्टाचिडीस ही जीवदीप्ती अळंब्यांची नवी प्रजाती आढळली होती.
दिवसा हे अळंबे सर्वसाधारण अळंब्यांसारखे दिसत असले तरी रात्रीच्या काळोखात त्यातून निळसर आणि हिरवी रंगछटा असणारा प्रकाश उत्सर्जित होत असतो. मेघालय या पूर्वांचलातल्या राज्यात घनदाट जंगलाचे वैभव असून, त्यात दृष्टीस पडलेले रोरीडोमायसीस फायलो स्टाचिडीस अळंब्यांची प्रजाती तिच्याठायी असणाऱ्या जीवदीप्तीच्या गुणधर्मामुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरलेली आहे.
गोव्यातल्या केवळ पश्चिम घाटातल्या जंगलातच नव्हे, तर अन्य जंगलातही जीवदीप्ती कवकाच्या वैभवाचे दर्शन झालेले आहे. पर्यावरणीय पर्यटनाच्या उपक्रमाशी निगडित वन्यजीव अभ्यासकांनी पश्चिम घाटात आढळणाऱ्या जीवदीप्ती कवकांचे दर्शन, निसर्ग सौंदर्याची निरीक्षण करण्याची आवड असणाऱ्या पर्यटकांना घडवण्यासाठी कार्यक्रम आयोजित केलेले आहेत.
धारबांदोडा तालुक्यात मोले राष्ट्रीय उद्यानात आणि महावीर अभयारण्य त्याचप्रमाणे त्यांच्या पर्यावरणीय संवेदनाक्षम क्षेत्रात जीवदीप्ती कवकांचा अभ्यास आणि संशोधन आरंभल्याने त्याचा फायदा ते देशविदेशातल्या पर्यटकांना करून देत आहेत. आषाढ, श्रावणातल्या मान्सूनच्या पावसाळ्यात कवकांच्या नाना प्रजातींच्या पैदाशीला पोषक वातावरण लाभते.
पौष्टिक खाद्यान्न म्हणून प्रामुख्याने उपयुक्त असणाऱ्या रोयण अळंबी, खुट अळंबी, फुगो, सोनयाळी, शिरंगार अशा कवकांबरोबर जीवदीप्ती अळंब्यांचे वैभव गोव्यात हमखास अनुभवायला मिळते. धारबांदोडा तालुक्यातल्या साकोर्डा येथील जंगलात जीवदीप्ती अळंब्यांचे दर्शन येथील जंगलनिवासी कित्येक वर्षांपासून घेत होते. परंतु त्यांचा शास्त्रीय अभ्यास झाला नव्हता.
पर्यावरणीय पर्यटन उपक्रमात गुंतलेल्या वन्यजीव अभ्यासकांनी जीवदीप्ती अळंब्यांच्या इथल्या प्रजातीचा जेव्हा अभ्यास केला, तेव्हा ते मायसेना क्लोरोफोस असल्याचे स्पष्ट झाले. मायसेना क्लोरोफोस ही कवकाची इथे आढळलेली प्रजाती जीवदीप्ती गुणधर्माने युक्त असल्याकारणाने काळोख्या रात्री आकाशात चंद्र नसताना तिचे दर्शन घेण्यासाठी पर्यटक, अभ्यासक उत्सुक असतात.
मोले राष्ट्रीय उद्यानात तर जीवदीप्ती कवकाची पावसाळ्यातल्या या मौसमात पैदासी होत असून, अमावस्येच्या रात्री तर मंद निळसर आणि हिरवट रंगाच्या प्रकाशाचे होणारे उत्सर्जन दर्शकाला आपल्या रंगरूपाची मोहिनी घालते. कोणाला रात्री प्रकाशमान झालेले हे झाड, अदृश्य रूपात वावरणाऱ्या आणि प्रसंगी हाती मशाल घेऊन ग्रामभ्रमंती करणाऱ्या देवचाराचे दर्शन घडवते.
सत्तरीतल्या म्हादई अभयारण्यात येणाऱ्या सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावर वसलेल्या सुर्ल गावात जी देवाची राय आहे, तेथे काळोख्या रात्री चमचमणारे जंगल दर्शकाला निसर्गातल्या दिव्यत्वाचा जणू काही साक्षात्कार घडवत असते.
गोव्याच्या सीमेवरती असलेल्या तिळारी नदीच्या काठावर वसलेल्या मणेरीतील बांबूच्या बेटातली अगदी छोटेखानी असलेली अळंबी आपल्यातल्या जीवदीप्तीच्या गुणधर्माचे विलोभनीय दर्शन घडवतात.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.