प्रमोद प्रभुगावकर-
मतदानानंतर प्रत्येक पक्ष आपलेच सरकार येणार, भाजपला अद्दल घडणार अशी स्वप्ने रंगवीत होते, पण मजेची गोष्ट म्हणजे २०१७ पेक्षाही अधिक चांगली कामगिरी भाजपने बजावली आहे. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे मतदारांनी पक्ष बदलूंना घरी पाठविले, पण ते करताना काहींना वगळले. कदाचित त्या नेत्यांच्या व्यक्तीगत करिष्म्याचा तो परिणाम असू शकतो. अन्यथा बाबूश मोन्सेरात व जेनिफर निवडून (Goa Assembly Election) आल्या नसत्या. गेल्या अनेक वर्षांचा बाबूंचा केपेतील व चर्चिल यांचा बाणावलीतील मक्ता संपुष्टात आला, पण त्याचबरोबर पक्षांतून बाहेर पडून दुसऱ्या पक्षांत गेलेल्यांना मतदारांनी तारल्याचेही यावेळी दिसून आले. रवी नाईक व मायकल लोबो ही उदाहरणे त्यासाठी घेता येतील. दुसरा एक मुद्दा उपस्थित होतो, तो हा की या बारा जणांनी केलेले पक्षांतर हे तांत्रिकदृष्ट्या चुकीचे नाही, असा निवाडा न्यायालयाने दिलेला असला तरी जनतेच्या न्यायालयाने मात्र या लोकांना त्याचे फळ दिले आहे.
दक्षिण गोव्याचेच उदाहरण घेतले तर अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले आहेत. केवळ केपेच नव्हे, तर काणकोण, सांगे, सावर्डे, फातोर्डा आदी ठिकाणी निकालाबाबत अनिश्र्चितता होती. खुद्द काणकोणमध्ये भाजप विरुध्द भाजप अशी स्थिती होती. पणजीत उत्पल पर्रीकर यांनी उमेदवारी दाखल केल्यानंतर तर काणकोणातील भाजपचे रमेश तवडकर यांच्यासमोर आव्हान उभे करण्याचा प्रकारही घडला होता, पण प्रत्यक्षात त्यात काहीच दम नव्हता, हे आता स्पष्ट झाले आहे. तीच बाब सांगेची. तिथे सावित्रींमुळे भाजप उमेदवार अस्वस्थ होता, पण झाले उलटेच. तिथे भाजप मतदार पक्षाबरोबर राहिले व काँग्रेसची मते सावित्रींकडे वळून त्या दुसऱ्या क्रमांकावर आल्या. सावर्डेत गणेश गावकर यांनी दिलेली लढत महत्त्वाची ठरली. मात्र, केपेत बाबू कवळेकरांची अवस्था केविलवाणी झाली. त्यांचे गेल्या तीन दशकांतील राजकारण संपुष्टात आले आहे.
बाबूंबरोबरच सासष्टीत सगळेच गणित उलटे पालटे झाले असून काँग्रेससाठी ती धोक्याची घंटा ठरली आहे. गोव्यातील सत्तेची वाट सासष्टीतूनच जाते, असे म्हटले जाते. जेव्हा तेथील पकड गेली तेव्हा तेव्हा काँग्रेस सत्तेपासून वंचित राहिली आहे व त्याचाच प्रत्यय यावेळी आला आहे. यावेळी कुंकळ्ळी, मडगाव व नुवे वगळता अन्य गड त्या पक्षाला राखता आले नाहीत व तिथेच तो पक्ष मागे पडला आहे. विशेषतः रेजिनाल्ड यांना उमेदवारी नाकारून त्या पक्षाने मोठी चूक केली हे त्या पक्ष नेत्यांच्या आता लक्षात आले आहे.
दक्षिण गोव्यातील निकाल भाजप तसेच काँग्रेससाठीही आत्मपरीक्षण करायला लावणारे आहेत. विशेषतः नावेलीतील भाजपचा विजय हा निसटता आहे, तिथे भाजप विरोधी मते काँग्रेस, तृणमूल व ‘आप’मध्ये विभागली गेली. अन्यथा तो काँग्रेसचा बालेकिल्लाच होता, पण आता तेथे आपने मुसंडी मारलेली आहे. तेच बाणावली व वेळ्ळीचे आहे. तिथे आपने मिळविलेला विजय लक्षणीय आहे.
काँग्रेसबरोबर मगोप व गोवा फॉरवर्ड यांनीही आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ या निवडणूक निकालाने आली आहे. कारण या सर्वांना मिळालेल्या मतांची टक्केवारी घटत चालली आहे व ती खरी चिंता करण्यासारखी बाब आहे. आता मगोप नेते जरी आपण कमी जागा लढविल्याने ती घटल्याचे सांगत असले, तरी ती सारवासारव आहे. या दोन्ही पक्षांनी आपल्या राजकीय भवितव्याचा विचार करण्याची वेळ आता आलेली आहे. स्थानिक पक्षांसमोर अनेक मर्यादा असतात व त्या या निवडणुकीमुळे दिसून आलेल्या आहेत. मगोप गोवा मुक्तीपासून जरी सातत्याने राजकारणात असला तरी त्याच्या समोरील मर्यादाही उघड झाल्या आहेत.
या निवडणुकीची आणखी एक खासियत म्हणजे ‘आप’बरोबर ‘आरजी’ म्हणजे रिव्होल्युशनरी गोवन्सने अन्य पक्षांबरोबर उभे केलेले आव्हान आहे. या पक्षाच्या पदरात एक जागा पडावी हे देखील एक मोठे आव्हान आहे. त्याचबरोबर विविध मतदारसंघात विशेषतः वाळपई व पर्येसारख्या मतदारसंघात पडलेली मते दखल घेण्याजोगी आहेत. त्यामुळे भविष्यात म्हणजे २०२७ मध्ये या दोन्ही पक्षांचे आव्हान मोठ्या प्रमाणात राहणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.