Farmers Dainik Gomantak
ब्लॉग

सत्तरीतील शेतकरी, बागायतदारांचे अस्तित्वच धोक्यात

शेतकरी-बागायतदारांना आज गोव्यात फक्त शेती-बागायती करून उपजीविका करणे अशक्य झाले आहे.

दैनिक गोमन्तक

Farmers: एक काळ असा होता, जेव्हा शेती-बागायती हा उत्तम व्यवसाय म्हणून गणला जात असे. कारण तो एकाचे हजार करतो. अन्नदाता म्हणून त्याचा गौरवही केला जात असे; पण अशा या शेतकरी-बागायतदारांना आज गोव्यात (Goa) फक्त शेती-बागायती करून उपजीविका करणे अशक्य झाले आहे आणि या शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाही, हे सर्वांत मोठे दुर्दैव आहे.

एक तप शेतकऱ्यांचा संघर्ष

संपूर्ण गोव्यातील शेतकरी अनेक समस्यांनी त्रस्त आहे. सत्तरी तालुक्यातील (Taluka) शेतकरी तर एवढा मेटाकुटीला आला आहे की पुढील काही काळात सत्तरीतील शेतकरी-बागायतदारांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या (News) आल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. गेली शेकडो वर्षे या ठिकाणचा शेतकरी-बागायतदार गरिबीत पण स्वाभिमानाने जगत आला आहे. तो अत्यंत मेहनती असल्याने व आपल्या कष्टावर त्याचा विश्वास असल्याने तो शेती-बागायती करीत राहिला आहे. पण आता जंगली उपद्रवी प्राण्यांनी मांडलेल्या उच्छादामुळे गेले जवळपास एक तप तो जगण्यासाठी संघर्ष करीत आहे; पण त्याचा आर्त स्वर अजून कोणालाच ऐकू आलेला नाही.

उपद्रवी प्राण्यांचा हैदोस

सत्तरीतील जंगली प्राणी आणि शेतकरी-बागायतदार आजपर्यंत सहचर्यानेच राहात आले आहेत. अगोदरच्या काळात वर्षातून ठरावीक काळात जंगली प्राण्यांची सामूहिक शिकार करून त्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवले जायचे. वानरांसारख्या उपद्रवी प्राण्याला मारणाऱ्या काही आदिवासी जमाती होत्या. त्या ठरावीक काळात येऊन या प्राण्यांची शिकार करीत असत. पण हे सर्व नैसर्गिक चक्र बंद पडले व या प्राण्यांची संख्या अतोनात वाढली. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. आज गवे, डुक्कर, मोर यांच्या उपद्रवामुळे भातशेती करणे अशक्य झाले आहे. तर खेती, वानर (Monkey), साळ, डुक्कर व शेकरू या जंगली प्राण्यांमुळे बागायतदारांचे मुख्य उत्पन्न असलेले नारळ व केळी हे उत्पन्न आता मिळणे दुरापास्त झाले आहे. शंभर-सव्वाशे माड असलेल्या शेतकऱ्याला नारळ विकत आणून खावा लागतो, या एकाच उदाहरणावरून ही भयानकता किती आहे हे लक्षात येईल. आता तर खेती कोवळी सुपारीदेखील चावून टाकू लागले आहेत. त्यामुळे शेती-बागायती करायची कशी? पिकवायचं काय आणि खायचं काय? असा बिकट प्रश्न शेतकरी-बागायतदारांसमोर उभा राहिला आहे.

बंदुकीचे परवाने द्या

शेतकऱ्यांची मुख्य मागणी बंदुकीच्या परवान्यांबाबतची आहे. शेती-बागायतीची नासधूस करणाऱ्या प्राण्यांना उपद्रवी ठरवून त्यांना मारण्याची परवानगी देण्याची त्यांची मागणी आहे. पोर्तुगीज काळापासून सत्तरीतील शेतकऱ्यांना उपद्रवी प्राण्यांपासून आपल्या शेती-बागायतीचे संरक्षण करण्यासाठी बंदुकीचे परवाने देण्यात आले होते. त्यामुळे शेती-बागायतीचे संरक्षण करणे त्यांना शक्य होत असे. पण आता सरकारने या परवान्यांचे नूतनीकरण करणे थांबवल्याने व नवीन परवाने देणे रद्द केल्याने शेतकऱ्यांसमोर शेती-बागायतीचे रक्षण करणे अशक्यप्राय झाले आहे. हल्लीच सरकारने रानटी डुकराला उपद्रवी घोषित केले आहे; पण त्याला मारायचे कसे? हा शेतकऱ्यांसमोरील प्रश्न आहे. बंदुकीचे परवाने न दिल्यास डुकरांना काठ्या-कोयते घेऊन मारावे का? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. त्यामुळे डुकरासोबत, खेती, माकड, शेकरू, साळ यांना उपद्रवी प्राणी म्हणून घोषित करा व बंदुकीच्या परवान्यांचे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुलभ करा, ज्या शेतकऱ्याकडे एका एकरपेक्षा जास्त जमीन आहे, त्यांना बंदुका वापरण्याचे परवाने द्या व निवडणुकीच्या काळातही शेतकऱ्यांकडील बंदुका काढून घेऊ नका, या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.

जंगली प्राण्यांचे संरक्षण सरकारने करावे

शेतकऱ्यांची आणखी एक महत्त्वाची मागणी म्हणजे गवे, हत्ती, वाघ इ. जे संरक्षित प्राणी म्हणून घोषित करण्यात आले आहेत असे प्राणी जंगलाची सीमा ओलांडून शेती-बागायतीत येणार नाहीत याची जबाबदारी सरकारने घ्यावी. त्यासाठी सरकारने कुंपण उभारून जंगलाच्या सीमा सुरक्षित कराव्यात व त्या सीमेच्या आत या प्राण्यांचे संगोपन करावे. तसेच जंगलात सायला, आकेशिया, निलगिरी यासारखी नको ती झाडे लावली आहेत. त्याऐवजी या ठिकाणच्या वातावरणाला व पर्यावरणाला पोषक अशी झाडे लावावीत, जेणेकरून या प्राण्यांसाठी त्या ठिकाणी अन्न निर्माण होऊ शकेल. तसेच सर्वत्र पसरून पर्यावरणाचा भयानक संहार घडवून आणलेल्या रानमारीचे समूळ उच्चाटन करावे. जेणेकरून जंगलात व माळरानावर पुन्हा गवत उगवेल व जंगली प्राण्यांची जैव साखळी अबाधित राहील.

पर्यावरणवाद्यांचे अरण्यरुदन

काही स्वयंघोषित पर्यावरणवाद्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांविरोधात अरण्यरुदन सुरू केले आहे. त्यांना प्राणी वाचवण्याची चिंता आहे; पण शेतकरी मरतोय त्याची मात्र काळजी नाही. आजपर्यंत कोणत्याच शेतकऱ्याने हौसेखातर जंगली प्राण्यांची शिकार केलेली नाही. आपलं हातातोंडाशी आलेलं पीक नष्ट होतं आणि जगायचं कसं हा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा त्याच्यासमोर पर्याय उरत नाही. म्हणून तो या प्राण्यांना उपद्रवी ठरवा व त्यांना मारण्याची परवानगी द्या म्हणून मागणी करीत आहे. खऱ्या शेतकऱ्याला हातात बंदुकीपेक्षा खोरे-कुदळ घेणेच जास्त आनंददायी वाटते. जे या प्राण्यांना मारण्याच्या विरोधात आहेत, त्यांनी सत्तरीत येऊन प्रायोगिक तत्त्वावर, कोणत्या उपाययोजना करून या जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करावा, याचे प्रात्यक्षिक एक पूर्ण वर्ष शेती-बागायतीचे संरक्षण करून द्यावे. उगाच गार वारे अंगावर घेत फुकटच्या बाता करू नयेत.

गेली दहा वर्षे शेतकरी आपल्या मागण्यांचा पाठपुरावा सरकारकडे करून थकला आहे. आता त्याचा संयम संपला आहे आणि आता तो आपल्या अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी सिद्ध झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT