Sea
Sea  Dainik Gomantak
ब्लॉग

समुद्र दृष्टांत

गोमन्तक डिजिटल टीम

डॉ. सुबोध केरकर

डॉक्टर सुबोध केरकर आपली कलानिर्मिती आणि त्याच्या प्रक्रियेची छायाचित्रे/व्हिडिओ व्हाट्सअपवरून शेअर करत असतात. त्यातून गोव्याच्या विविध समृद्ध वारसाबद्दल असलेले त्यांचे उत्कट नाते सतत जाणवत असते.

एरवी आपल्या नजरेसमोरून फारसा गाजावाजा न करता सरकून गेलेली दृश्ये जेव्हा त्यांच्या चित्रांमधून रंगून येतात तेव्हा ती आपल्याही भावनांना आवाहन करत राहतात.

चित्रांप्रमाणे अलीकडच्या काळात समुद्रकिनाऱ्यावर त्यांनी उभारलेली इन्स्टॉलेशन, समुद्राबरोबर असलेल्या त्यांच्या अनुबंधांची जणू भव्य साक्ष बनवून समोर येतात. बालपणापासून समुद्राशी जडलेल्या मैत्रीला जागून, किनाऱ्यावर मांडलेल्या कृतज्ञता पूजेच्या जणू त्या प्रतिमा वाटतात.

सुबोध केरकर यांना समुद्राबद्दल इतकी असोशी का? हा प्रश्न केल्यावर ते सांगतात, 'मी स्वतःला समुद्र कलाकार मानतो. माझ्या लहानपणी वयाच्या सहाव्या वर्षापासून सोळाव्या वर्षापर्यंत मी माझ्या वडिलांबरोबर नेहमी दोन तास समुद्रकिनाऱ्यावर चालायला जायचो.

सुरुवातीला केरी नंतर मांद्रे आणि त्यानंतर कळंगुट या किनाऱ्यावर (जसजशी आम्ही घरे बदलली) हा फेरफटका चालला. समुद्रकिनाऱ्यावरच्या या दैनंदिन चालण्याने माझे माझ्या वडिलांबरोबर तसेच समुद्राबरोबर फार निकट असे नाते जुळले.'

'जेव्हा मी डॉक्टर बनलो तेव्हा माझे हॉस्पिटल देखील कळंगुट किनाऱ्यावरच होते. हॉस्पिटल किनाऱ्यावर असल्याने मला माझे बहुतेक पेशंट मच्छीमार समाजाचे लाभले. त्यांचे आयुष्य मला फार जवळून पाहता आले आणि मी त्यांच्याशी जुळला गेलो.

एक गोष्ट माझ्या तेव्हा लक्षात आली ती ही की त्यांचे आयुष्य समुद्रापासून वेगळे काढता येणे शक्य नाही. या साऱ्या गोष्टी ंनी मिळून मला समुद्र-कलाकार बनवले. सुरुवातीला मी समुद्राच्या लॅन्डस्केप बनवायचो. त्यानंतर मी त्यांच्या होड्या जलरंगातून रंगवायला सुरुवात केली. त्यानंतर अधिक पुढे जाऊन होड्यांच्या पृष्ठभागावरचे पोत मी चित्रात रंगवले.

समुद्राने होड्यांवर, बोटींवर जो पोत तयार केला होता त्याने मी मोहित झालो होतो. ते पोत चित्रात रंगवणे मला आवडत होते. त्यानंतर पुढचे पाऊल म्हणजे त्या होड्याच नंतर माझ्या शिल्पाच्या भाग बनवल्या. मी या होड्या विकत घ्यायचो आणि त्यातून शिल्प निर्माण करायचो.

कळंगुट किनाऱ्यावरचे मच्छीमार जे प्रथम माझ्या पोर्ट्रेटचा विषय बनले होते, त्यांच्याबरोबर काम करून त्यांना नंतर माझ्या इन्स्टॉलेशनचा भाग बनवले. माझ्या कलाकृतीत हे मच्छिमार 'परफॉर्मर्स' बनून आले.

त्याच्याही पुढे एक पाऊल टाकून, माझी शिल्पे मी समुद्राच्या पाण्यात तीन तीन वर्षे बुडवून ठेवू लागलो. त्यावर वाढलेले शंख-शिंपले माझ्या कलाकृतीचा भाग बनले. अशाप्रकारे माझ्या कला निर्मितीत, समुद्रही माझा जोडीदार बनला.

माझ्या अनेक निर्मिती समुद्राचा भाग बनून गेल्या. जेव्हा कुमार केतकर यांनी माझ्या या कलाकृती पाहिल्या तेव्हा उत्स्फूर्तपणे त्यांचे वर्णन त्यांनी 'अद्वैताचा सामुद्रिक अविष्कार' या शब्दांनी केले.'

सुबोध केरकरांच्या या साऱ्या कलाविष्कारात आपल्याला जिवंत नाट्याची अनुभूती मिळते. आता तर ते आणखीन एक पाऊल पुढे टाकून 'फिशरमॅन अँड ओशन' या विषयावर एक तासांची डॉक्युमेंटरी बनवत आहेत.

अर्थात, प्रतिमांच्या अंगाने आपल्या विषयाकडे पाहणाऱ्या एका चित्रकाराने या विषयावर तयार केलेली डॉक्युमेंटरी, दृश्य-रचनांच्या भाषेतली कलाकृती असेल हे नक्की.

जगातल्या साऱ्या महत्त्वाच्या चित्रपट महोत्सवात ही डॉक्युमेंटरी पाठवायची सुबोध केरकर यांची मनीषा आहे. या डॉक्युमेंटरीची सुरुवात त्यांनी पूर्वीच केलेली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

Goa Today's Live News Update: कोण होणार ताळगावचे सरपंच-उपसरपंच?

Mapusa Urban Bank: ''म्‍हापसा अर्बनच्‍या दयनीय स्‍थितीला पर्रीकरचं जबाबदार'', रमाकांत खलप यांचा सनसनाटी आरोप

Goa Drug Case: पिशवीत सापडला दोन लाखांचा गांजा; तिस्क उसगाव येथे तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT