Does International Film Festival of India benefit local businesses in Goa  Dainik gomantak
ब्लॉग

गोव्यात ‘इफ्फी’चे आयोजन कोणासाठी?

इफ्फी चा फायदा इथल्या हॉटेलमालकांना, रेस्टॉरंटचालकांना, टॅक्सीवाल्यांना, स्थानिक कलाकारांना होतो का? या दिवसात स्वच्छ आणि चकचकीत पणजी दिसते, त्याचं मूळ कारण इफ्फीच आहे.

दैनिक गोमन्तक

एका वर्षात दोन वेळा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) होण्याची ही पहिलीच वेळ. कोविडच्या महामारीमुळे 2020मध्ये 51वी इफ्फी होऊ शकली नाही. पण चित्रपट महोत्सव संचालनालय (DFF) आणि गोवा मनोरंजन संस्था (ESG) यांनी मोठ्या हिमतीनं आणि धिरानं 2020च्या जानेवारीत इफ्फीचं आयोजन केलं. खरंतर त्यावेळी कोविडवरच्या लसीचं संशोधन पूर्ण झालेलं नव्हतं. आंतरराष्ट्रीय बाजारात कोविडवर खात्रीलायक कोणतंच औषध उपलब्ध नव्हतं. कोविडच्या संसर्गाचा प्रचंड तणाव आयोजकांवर व प्रेक्षकांवर होता. तरीही अशा परिस्थितीत कोविडच्या सगळ्या सुरक्षा नियमांचं काटेकोरपणे पालन करून आयोजकांनी 51वा इफ्फी सुरळीतपणे पार पाडला, याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. अर्थात या यशात प्रेक्षकांचाही सहभाग होता, ही गोष्ट दृष्टिआड करून चालणार नाही.

2004 पासून गोव्यात-पणजीत इफ्फी साजरी केली जातेय, म्हणजेच आतापर्यंत पणजीत 16 इफ्फी पार पडल्या आहेत. प्रत्येक इफ्फीला देश-विदेशच्या कलावंतांसह आठ ते दहा हजार प्रतिनिधी सहभागी होतात, (अपवाद गेल्या इफ्फीचा) अर्थात ह्याचा फायदा इथल्या हॉटेलमालकांना, रेस्टॉरंटचालकांना, टॅक्सीवाल्यांना, स्थानिक कलाकारांना होत असावा. याशिवाय मांडवी नदीतील कॅसिनोचालकांना आणि पर्यटन व्यवसायालाही याचा लाभ मिळत असावा. या दिवसात स्वच्छ आणि चकचकीत पणजी दिसते, त्याचं मूळ कारण इफ्फीच आहे.

एखाद्या ठिकाणी सातत्याने इफ्फी भरवणं, साजरी करणं खरंतर आयोजकांच्या दृष्टीनं सहज, सोपी गोष्ट आहे असं मला वाटतं. कारण इफ्फीच्या तारखा ठरलेल्या असतात. एक इफ्फी संपली की पुढच्या इफ्फीकरता संपूर्ण वर्ष आयोजकांच्या हातात असूनही याचा योग्य प्रकारे उपयोग आयोजक करताना दिसत नाहीत. प्रत्येक इफ्फीमध्ये काहीना काही त्रुटी राहिलेल्या दिसतात. त्यावर काहीही उपाय न करता त्या तशाच पुढल्या इफ्फीमध्येही अनुभवायला येतात. खरंतर ह्या त्रुटी इतक्या सामान्य असतात की माझ्यासारख्या अनेक प्रेक्षकांच्या त्या लक्षात येतात. पण वर्षानुवर्षं इफ्फीचं आयोजन करणाऱ्या आयोजकांच्या कशा लक्षात येत नाहीत, हे एक कोडचं आहे.

आयनॉक्स आणि कला अकादमीमध्ये सगळीकडे दिव्यांचा झगमगाट असतो. मात्र मोबाईल किंवा लॅपटॉप चार्जिंगसाठी पुरेसे पॉईंट इथे नसतात. दोन सिनेमांमध्ये जो काही थोडा वेळ असतो, त्यावेळी निवांतपणे बसण्यासाठी सावलीची जागा नसते. इफ्फी नोव्हेंबरमध्ये होत असली तरी गोव्यात ह्या दिवसांत उन्हाचा चांगलाच तडका असतो. अश्यावेळी पातळ पांढऱ्या किंवा फिकट रंगाचे कापड छताला लावून सावलीचा आभास निर्माण करण्याची सुपीक कल्पना कोणाच्या डोक्यातून निघते, कळत नाही. इफ्फीला येणाऱ्या प्रेक्षकांत सिनियर सिटिझन्स पण असतात. सर्वांनाच मोबाइलवरून सिनेमाच्या तिकिटांचं बुकिंग करता येत नाही. खोटं कशाला बोला, सुरुवातीला मला पण हे जमत नव्हतं. तर अश्या प्रेक्षकांसाठी सिनेमागृहातील कमीतकमी 15% तिकिटं बुकिंग विंडोवर उपलब्ध असावीत. चित्रपटगृहात प्रवेश देण्याचे व रशलाईन सोडण्याचे नियम सर्व ठिकाणी सारखे असावेत व ते कठोरपणे पाळावेत. इफ्फीत दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांचा दर्जा चांगला असतो. चित्रपटांच्या दिग्दर्शकांशी संवाद साधण्याची संधी पूर्वी प्रेक्षकांना मिळत असे, ती पुन्हा सुरू व्हावी.

सिनेमामधील एखादी व्यक्तिरेखा, दिग्दर्शकांचे व चार समजून घेण्यासाठी अशा संवादांचा प्रेक्षकांना उपयोग होतो. प्रिंटिंगचा खर्च कमी करण्याच्या हेतूने इफ्फीमध्ये कॅटलॉग देणं गेल्या दोन वर्षांपासून बंद केलं. प्रसारमाध्यमांच्या आजच्या आधुनिक सोईंनुसार वीज, कागद इत्यादी खर्च अवाजवी वाटत असला तरी, सिनेमांचे संदर्भ, सारांश प्रत्येकवेळी मोबाईल किंवा लॅपटॉपवर बघण्यापेक्षा हातात कॅटलॉग असेल तर ते सोईचं पडतं. शिवाय इफ्फीनंतरही सिनेमांचे सारांश, संदर्भ वाचता येतात. सोव्हिनिअर म्हणूनही हे कॅटलॉग ठेवता येतात. आंतरराष्ट्रीय सिनेमा, इंडियन पॅनोरमा आणि हँडबूक असे एकूण तीन वेगवेगळे कॅटलॉग छापण्याऐवजी एकच कॅटलॉग छापावा. जरूर पडल्यास त्याचे योग्य ते मूल्य आकारण्यात यावे. पण कॅटलॉग छापावेत, ही आयोजकांना नम्र विनंती.

पूर्वी आयनॉक्सच्या परिसरातील ओल्ड मेडिकल कॉलेजच्या इमारतीमध्ये तळमजल्यावर 100 ते 125 रुपयांना व्हेज-नॉनव्हेज जेवण मिळत असे पण, काही वर्षांनी ते बंद करण्यात आले. त्यांनतर त्याच परिसरात बचत गटाच्या महिलांच्या स्टॉलवर अत्यंत वाजवी किमतीत रुचकर आणि चविष्ट जेवण मिळत असे, परंतु आयोजकांनी दुसऱ्याच वर्षी त्यांना बाहेर घालवलं. त्या ठिकाणी ‘यारा दि ढाबा’ नावाचा स्टॉल आणला. गोव्यात येऊन पंजाबी पदार्थ कोणाला खावेसे वाटणार? नंतर आयोजकांनी पंचतारांकित हॉटेल चालकांना स्टॉल दिले, तिथे 200 ते 250 रुपयांना भेळ आणि पाणीपुरी खाऊ घालण्याचा आयोजकांनी घाट घातला. कला अकादमीमध्ये तीच तऱ्हा, बिर्याणी, फ्राईड राईस, चिकन लॉलीपॉप या काय गोव्यात येऊन खायच्या गोष्टी आहेत का? इथल्या कॅन्टीनमध्ये तर बसायलाही पुरेशी जागा नसते, केंद्राकडून भरपूर पैसै मिळूनही आयोजक स्टॉलची भाडी भरमसाट का घेतात, कळत नाही. बऱ्याच वेळा खर्चाचा ताळमेळ न जुळल्याने चार-पाच दिवसांतच काही स्टॉल बंद होतात, ही गोष्ट आयोजकांच्या लक्षात येत नाही का?

इतकी वर्षं गोव्यात इफ्फीचं यशस्वीरीत्या आयोजन करूनही ESGला काही अधिकार नसतील, स्वतःची मतं नसतील तर ही गंभीर बाब आहे. कारण इफ्फीच्या आयोजनाची संपूर्ण जबाबदारी ESGची असते आणि मग इतके कष्ट घेऊन, खटाटोप करून, इफ्फीवर दरवर्षी सरासरी 13 कोटी रुपये खर्च करून, इफ्फीला येणाऱ्या प्रेक्षकांच्या क्षुल्लक गरजाही जर ESG पूर्ण करू शकत नसेल, तर मग इफ्फीचं आयोजन कोणासाठी?

- केदार वैद्य

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Syed Mushtaq Ali Trophy 2025: ईशान किशनचं वादळ अन् झारखंडचा ऐतिहासिक विजय; फायनलमध्ये हरियाणाचा धुव्वा उडवत पटकावलं विजेतेपद! VIDEO

Goa Robbery Incident: गेस्ट हाऊसमध्ये घुसून जर्मन पर्यटकाची लूट, 18 वर्षाच्या भामट्याला बेळगावात अटक; कळंगुट पोलिसांची कारवाई

गोव्यात नाताळची जय्यत तयारी! बाजारपेठांमध्ये 'ख्रिसमस'ची धूम; 10 फुटी झाडांनी वेधलं लक्ष

Budh Chandra Yuti: 2026 च्या सुरुवातीलाच 'बुध-चंद्र' युतीचा धमाका! धनु राशीत राजकुमार आणि मनाचा कारक एकत्र; 'या' 3 राशींच्या लोकांचे पालटणार नशीब

मसाजसाठी गेली अन् नकोसा अनुभव आला, गोव्यातील स्पा सेंटरमध्ये महिला पर्यटकाचा विनयभंग; वर्का येथील प्रकाराने खळबळ

SCROLL FOR NEXT