जेमतेम आठवड्यापूर्वीं गिरीश चोडणकर (Girish Chodankar) प्रभुती युतीशिवायच काँग्रेसचा (Congress) वारू चौखूर उधळणार असल्याची ग्वाही देत होते. गोव्याची नाडीपरीक्षा करण्यासाठी आलेल्या चिदंबरम यांनीही युतीविषयी बोलण्याचे टाळले होते. किंबहुना काँग्रेस चाळीसही मतदारसंघांत सक्षम असल्याचा त्यांचा गैरसमज करून देण्यात आला होता. आता म्हातारवयातल्या लुईझिन फालेरोंनी राज्यसभा सदस्यत्वाच्या बोलीवर आपली काँग्रेसनिष्ठा आवरती घेतल्यानंतर दिनेश गुंडू रावांना (Dinesh Gundu Rao) अटळ भविष्याचा अंदाज आलाय आणि त्यातूनच युतीचे पिल्लू त्यांनी सोडून दिले आहे. पण प्रश्न असा राहातो की ज्या काँग्रेसच्या उरल्या सुरल्या मतांचेही विभाजन अटळ आहे, त्याच्याशी कुणी आणि का युती करावी?
सध्या तृणमूलच्या नादी लागलेल्यांत लुईझिन हा एकमेव बंदा रुपया आहे तर अन्य सुटी नाणी. पण या सुट्या नाण्यांना काँग्रेसविषयीच्या नाराजीचे बळ मिळणार आहे. प्रशांत किशोर यांचे निर्देशन मिळणार आहे आणि कोलकाता येथून आलेला निवडणूक निधीही मिळणार आहे. यातून ते काँग्रेसच्या वाटेत काटे पेरतील. गिरीश चोडणकर, दिगंबर कामत यांचे पक्षांतले स्थान दोलायमान करण्याकडेच लुईझिन फालेरोंच्या राजकारणाचा रोख राहील. याविषयी कुणीही शंका बाळगण्याचे कारण नाही. अशा परिस्थितीत समविचारी पक्षांकडे युती करण्याचा इरादा जेव्हा दिनेश गुंडू राव व्यक्त करतात तेव्हा त्या युतीत तृणमूलही समाविष्ट असेल असे गृहीत धरावे लागेल. याचे कारण, आपला भाजपाविरोध किती हिंसक पातळीवर जाऊ शकतो हे ममता दीदी आणि त्यांचा तृणमूल नित्यनेमाने दाखवत आहेत. त्यांचा विरोध राहुल गांधींप्रमाणे विलंबित तालात नसतो, हे तर खरेच.
साहजिकच भाजपाला आत्यंतिक विरोध असलेला गोमंतकीय मतदार आता काँग्रेसपेक्षा तृणमूलकडे आकृष्ट होणार आहे. गोव्यातील मुसलमान मतदार ममतांच्या मागे खंबीरपणे उभे राहातील, अशी हाकाटी तर आताच सुरू झालीय. ही नवी समीकरणे नाकारून काँग्रेस युती करणार असेल तर त्यासाठी गोवा फॉरवर्ड किंवा राष्ट्रवादी तयार होतील, असे मानणे खुळेपणाचे ठरेल. भाजपाविरोधी मतांचे विभाजन टाळण्याच्या बाबतीत गांभीर्याने विचार करणाऱ्यांना तृणमूलचे अस्तित्व मान्य करूनच आता आपली रणनीती आखावी लागेल, हे आणि इतकेच लुईझिन नाट्याचे सार आहे आणि नवा दावेदार आल्यामुळे काँग्रेसची वाटाघाटींची शक्ती अधिकच क्षीण होणार आहे.
दिनेश गुंडू राव जेव्हा युतीची शक्यता बोलून दाखवतात तेव्हा त्यांच्याकडे कोणता ‘रोडमॅप’ आहे, असाही प्रश्न उपस्थित होतो. काँग्रेसने आपली शक्ती असलेले मतदारसंघ कुठले, कुठले मतदारसंघ समविचारी पक्षांना दिल्यास बंडखोरीची विशेष झळ लागणार नाही, कुठल्या मतदारसंघात युतीसाठी उत्सुक असलेल्या पक्षांचा खरोखर जोर आहे, यावर काही ठोस माहिती गोळा केलीय का? केली असल्यास या माहितीचे स्रोत ते कोणते? काँग्रेसने राज्यव्यापी मतदार सर्वेक्षण तरी केलेय का? लक्षात घ्यायला हवे की आज तृणमूलच्या शिडात वारे भरण्याचे काम एकटे प्रशांत किशोर आणि त्यांच्या आयपॅक संस्थेने केलेय. काटेकोर सर्वेक्षणांत काय क्षमता असते हे प्रशांत किशोर गेले दीड दशक दाखवून देत आले आहेत. तेही जर काँग्रेसच्या नजरेतून निसटले असेल तर त्या पक्षाला राजकारणात राहायचा हक्कच नाही. गोव्यातल्या काल्या-जत्रांतून दुकाने थाटणारे आयत्या दिवशी येतात आणि रस्त्याकडेने आपला पसारा मांडतात. काँग्रेस त्याच वळणाने जाते आहे. जर आपली शक्तिस्थळे, त्रुटी, संधी आणि धोका यांचा शास्त्रशुद्ध अभ्यासच पक्षाने केलेला नसेल तर तो आपल्या उमेदवारांना आणि युतीलाही कसला न्याय देईल?
लुईझिन फालेरोंचे कारनामे म्हातारचळ या सदरात घाला किंवा स्वार्थाच्या चौकटींत बसवा, काँग्रेस पक्ष भरकटल्याच्या त्यांच्या निरीक्षणातले तथ्य नाकारताच येणार नाही. एका गिरीश चोडणकरांच्या कलानुसार हा पक्ष चालतो हेही लपून राहिलेले नाही. आज जे चार आमदार पक्षाकडे शिल्लक राहिलेत त्यातले किमान दोघेजण येत्या निवडणुकीत पक्षाचे उमेदवार नसतील, राहिलेले दोघे नव्या समीकरणांकडे पाहून उगवत्या सूर्याला नमस्कार करणारच नाहीत, याची खात्री चोडणकरही देऊ शकणार नाहीत, इतका विसंवाद आहे. भिंती ढासळू लागलेल्या घरांत का कुणी आश्रय घेते? आता तर गोवा फॉरवर्ड आणि राष्ट्रवादीला तृणमूलचा पर्याय उपलब्ध झालाय, असा पर्याय जो बराच धुरळा तरी उडवू शकेल. ममता बॅनर्जींना भेटून आलेल्या शरद पवारांनी काँग्रेसची तुलना हल्लींच वतने गमावलेल्या जहागीरदारांशी केली होती, याचे स्मरण इथे करून द्यायला हवे. गोव्यात वतने नाहीत, मोकाशांचे अवशेष मात्र शिल्लक आहेत. बहुधा त्यांचीच मनधरणी काँग्रेसला करावी लागेल.
कोणताही पक्ष हा संघटनशक्तीतून उभारी घेत असतो आणि संघटनशक्ती क्षीण झाली की पक्षही अस्तित्वहीन होतो. अशा पक्षांत केवळ प्यादीच शिल्लक राहातात. आज गोव्यातला काँग्रेस त्याच वळणावर उभा आहे. त्याची जी स्थिती झालीय तिचे भाकीत आम्ही तरी किमान पाच महिन्यांआधी केले होते. पण कुणीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. काही वेळा शाब्दिक मारापेक्षा प्रत्यक्षात कंबरेत घातलेलीच अधिक परिणामकारक ठरते. तेवढे श्रेय तरी श्रीमान लुईझिन फालेरो यांना द्यावे लागेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.