Portuguese in Goa
Portuguese in Goa Dainik Gomantak
ब्लॉग

पोर्तुगीजांचे धाडसी पलायन

दैनिक गोमन्तक

वाल्मिकी फालेरो

स्तरावर ठेवून भारतीय सैन्याची नजर चुकवत पोर्तुगीज नागरिक व सोन्याने भरलेली दोन विमाने नियतीच्या आधीन होऊन पाकिस्तानमधील कराचीच्या दिशेने निघालीं..

भारतीय हवाई दलाने दाबोळी विमानतळावर प्रचंड बॉम्बवर्षाव केला खरा, पण विमानतळाची विशेष हानी झाली नाही. काही जुजबी खड्डे तेवढे पडले. पण एकूणच हल्ल्यामुळे गोव्यात स्थायिक झालेल्या पोर्तुगीज अधिकाऱ्याना आपल्या कुटुंबकबिल्याच्या सुरक्षेविषयी अशाश्वती वाटू लागली. तशी अनेक कुटुंबे 12 डिसेंबर 1961 रोजी इंडिया या प्रवासी जहाजात कोंबून सुरक्षित स्थळी पाठवण्यात आली होती. पण आता निर्वाणीची वेळ येऊन ठेपली होती. दाबोळी विमानतळावर कार्यरत अवस्थेतली दोन नागरी विमाने उभी होती. काळोख पडल्यानंतर विमानांसाठीच्या रनवेवर पडलेले खड्डे तत्परतेने बुजवण्यात आले.

पोर्तुगालची राष्ट्रीय विमानसेवा ट्रान्सपोर्टीस अॅरोस पोर्तुगीजीस (टीएपी)च्या मालकीचे लॉकहीड मार्टीन सुपर कॉन्स्टेलेशन विमान तसेच स्थानिक विमानसेवा ट्रान्सपोर्टीस अॅरोस दा इंडिया पोर्तुगीजा(टीएआयपी) च्या मालकीचे डग्लस डीसी-4 स्कायमास्टर जातीचे विमान दाबोळीहून उड्डाण करेल असा निर्णय घेण्यात आला. पोर्तुगीजांची भारताकडून जमीन, हवा आणि जलमार्गे नाकाबंदी करण्यात आल्यानंतरही गव्हर्नर जनरल आणि मुख्य कमान अधिकारी मेजर जनरल व्हासाल ई सिल्वा यानी या धोकादायक उड्डाणांना परवानगी दिली.

पोर्तुगीज अधिकाऱ्यांच्या बायका मुलांबरोबरच राज्यकारभाराविषयीचे महत्त्वाचे दस्तावेज आणि बँको नाशियोनाल उल्त्रामारिनोमध्ये गोमंतकीयानी तारण ठेवलेले सोने भरून दोन्ही विमाने सज्ज केली गेली. अतिरिक्त वजनामुळे विमानाचा तोल बिघडू नये म्हणून काही खुर्च्यांसह अनावश्यक सामान काढून ठेवण्यात आले.

दिवे मालवून आणि नियामक झडपा अत्यंत कमी स्तरावर ठेवून भारतीय सैन्याची नजर चुकवत दोन्ही विमाने नियतीच्या आधिन होऊन निघालीं. विमानतळावरला एकही दिवा न लावता मध्यरात्रीच्या गुडुप काळोखात खराब रनवेचा केवळ 700 मीटरचा भाग वापरून आणि आवाज होऊ नये म्हणून इंजिनाचा अत्यंत मर्यादित वापर करून दोन्ही विमानांनी झेप घेतली. भारतीय सैन्याच्या रडाराना चुकवत त्याना इच्छित स्थळी जायचे होते. टीएपीचे सुपर कॉन्स्टेलेशन विमान कॅप्टन मानुएल कोर्रेया रेईश आपल्या नेहमीच्या सहकाऱ्यांसमवेत चालवत होते. (याच विमानाने आदल्या रात्री गोव्यात सॉसेजीस आणि महिला पॅराट्रुपर्स आणल्या होत्या.) या विमानाच्या मोठ्या आवाजामुळे सावध झालेल्या भारतीय युद्धनौकांनी दाबोळीच्या दिशेने घाऊक गोळीबार केला. पण काळोखातला हा दिशाहीन गोळीबार व्यर्थच होता.

लगोलग टीएआयपीच्या डीसी-4 स्कायमास्टरने उड्डाण भरले. पोर्तुगीज हवाईदलाचे मेजर ऑस्टेन गुडमेन सोलानो दी आल्मेदा हे विमान चालवत होते. हवाई दलाचा हा अधिकारी पोर्तुगालमधील आझोरीस इथल्या हवाईदलाच्याच लाजेस हवाईतळावर कार्यरत होता. त्याला स्थानिक विमानसेवेचा डायरेक्टर ऑफ ऑपरेशन्स म्हणून डेप्युटेशनवर पाठवण्यात आले होते. अत्यंत कमी आवाज करत हे विमान दाबोळीवरून उडाले. दोन्ही विमानांना जायचे होते पाकिस्तानातील कराची विमानतळाकडे. कारण मित्रराष्ट्राचा सर्वात जवळचा असा तोच विमानतळ होता. नेहमीच्या हवाईमार्गाने जायचे तर हे अंतर होते, 1300 किलोमीटरचे. पण आताची वेळ असाधारण होती. त्यामुळे उत्तरेकडे जाण्याऐवजी दोन्ही विमाने पश्चिमेकडे- समुद्राच्या दिशेने झेपावलीं.

त्याची कल्पना आल्यावर दोन्ही विमानांनी दोन दिशांनी जात शत्रूला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न केला. इकडे पुण्यातून भारतीय हवाई दलाने आपले व्हॅंपायर एनएफ५४ नाईट फायटर विमान स्कायमास्टरच्या मागावर सोडले. पण तत्पूर्वीच मेजर सोलानो दी आल्मेदाना आपले विमान भारतीय हवाई हद्दीच्या बाहेर नेण्यात यश आले होते. भारतीय रडारांना चुकवण्यासाठी दोन्ही विमाने लंबवर्तुळाकार हवाई मार्गाने अत्यंत कमी उंचीवरून ("जवळजवळ झाडांच्या शेंड्यांच्या उंचीवरून") उडत बऱ्याच विलंबाने कराचीला पोहोचली. विमानतळावर उतरल्यानंतर ह्या धाडसी उड्डाणासाठी दोन्ही विमानांच्या कर्मचाऱ्यांचे जल्लोषांत स्वागत करण्यात आले.

मेजर सोलानो दी आल्मेदा (नंतर लेफ्टनंट जनरलपदी बढती) यानी नंतर गोव्यात राहाणाऱ्या सेलेस्ट व्हिदीगाल या युवतीशी विवाह केला आणि निवृत्तीनंतर 1980च्या दशकांत ते एअर माल्टा या विमानसेवेसाठी बोईंग 737 विमान चालवत होते. प्रस्तुत लेखकाचे मित्र आंतोनियो पाल्हिनो माशादो यांच्या लिस्बनस्थित निवासस्थानानजीकच त्यांचे घर होते.

या कारवाईत हवाई दलातर्फे भाग घेतलेले हवाईदल उपप्रमुख एलरिक विल्मोट पिंटो तसेच ग्रुप कॅप्टन ट्रेव्हर जोजेफ फर्नांडिस यांचा उल्लेख याआधी आलेला आहेच. त्यांच्या व्यतिरिक्त ऑपरेशन विजय-१मध्ये सहभागी झालेल्यांत सावर्डेचे विंग कमांडर विश्वनाथ बाळकृष्ण सावर्डेकर तसेच सुकूर- पर्वरी येथील विंग कमांडर मर्विन (ओस्प्रे) ज्यूड पिंटो यांचाही समावेश होता, मात्र त्यांना नेमकी कोणती जबाबदारी देण्यात आली होती, याचा तपशील उपलब्ध नाही.

दोन्ही विमानांनी भारतीय हवाई हद्द ओलांडण्याआधीच त्याना भारतीय रडारांनी टिपले होते. थिवीचे फ्लाईट सर्जंट (नंतर विंग कमांडरपदी बढती) रेमेजियस व्हिक्टर पॉल पुण्यातून उड्डाण भरलेले 6 स्क्वाड्रनचे लिबरेटर बॉम्बर विमान चालवत होते. अन्य काही गोमंतकीयांनी थेट कारवाईत भाग घेतला नसला तरी कारवाईशी संबंधित अन्य जबाबदाऱ्या पेलल्या, उदाहरणार्थ कावेलोसी येथील विंग कमांडर राउल दा सिल्वा रॉड्रिगीज हे फायटर पायलट होते आणि त्याना पूर्व पाकिस्तान (आताचे बांगला देश)च्या समीप असलेल्या डमडम येथे सीमारक्षणाची जबाबदारी देण्यात आली होती. पोर्तुगालच्या वतीने पाकिस्तान सैनिकी हस्तक्षेप करील अशी शक्यता त्यावेळी व्यक्त होत होती.

दरम्यान भारतीय हवाई दलातर्फे हाती घेण्यात आलेली कारवाई नियोजनाप्रमाणे पार पाडण्यात आली, मात्र येथेही दोन अनपेक्षित घटना घडल्या आणि त्यांचा संबंध 50 पॅरा ब्रिगेडच्या भुदळाशी होता.

18 डिसेंबर 1961 रोजी दुपारच्या सुमारास दक्षिण कमानीच्या सामरिक मुख्यालयाचा ब्रिगेडिअर सगत सिंग यांच्याशी असलेला रेडिओ संपर्क बराच वेळ होत नव्हता. याचे कारण, सिंग यांच्या 50 पॅराने केले अविश्वसनीय मार्गक्रमण. मग सामरिक मुख्यालयाने ब्रिगेडियर सगत सिंग याना निरोप देण्यासाठी बेळगावच्या सांबरा विमानतळावरून 122 स्क्वाड्रनचे एक विमान पाठवले. त्या विमानाने ब्रिगेडिअरना शोधून काढून तो निरोप आकाशातून खाली जमिनीवर टाकावा, अशी योजना होती. मात्र हे विमान भारतीय हवाई दळाच्या मालकीचे असल्याचे दर्शवणारे कोणतेही चिन्ह विमानाच्या तळभागावर रेखांकित केले नव्हते. विमान भारतीय सैन्याचे की शत्रूचे याची कल्पना न आल्याने 2 सिख लाईट इन्फंट्रीच्या जवानांनी त्याच्या दिशेने गोळीबार केला. त्यामुळे विमानाच्या तळभागाला दोन भोके पडलीं.

दुसऱ्या घटनेतील गैरसमजामुळे हवाई दळाला वरील घटनेचे उट्टे काढण्याची संधी मिळाली. टेहळणी करण्यासाठी आलेल्या पोर्तुगीज चिलखती वाहनांवर हल्ला करण्याकरिता व्हँपायर जातीची चार विमाने पाठवण्यात आली. मात्र त्यानी प्रत्यक्षात पिळये - धारबांदोडा येथे उभ्या असलेल्या 50 पॅराच्या 17 पॅरा रेजिमेंटच्या वाहनांना लक्ष्य केले. सुदैवाने या हल्ल्यात कुणीही दगावले नाही. मग कॅप्टन जॉर्ज न्युटन यानी घाईघाईने आपल्या रेडिओ संचाद्वारे बेळगावशी संपर्क साधला आणि गोळीबार थांबवण्याचे आदेश देणाची विनंती केली.

नंतर आकाशवाणीने पोर्तुगीज रेडिओ- एमिसारो दी गोवा- च्या बांबोळी येथील उद्ध्वस्त रेडिओ केंद्रातील उपकरणे मिळवण्यासाठी सेनादलाशी संपर्क साधला. सैनिकी गव्हर्नरच्या निर्देशावरून कॅप्टन जॉर्ज न्युटन याना आकाशवाणीच्या मदतीला देण्यात आले. 25 ते 29 डिसेंबर, 1961 या कालावधीत त्यानी 5 किलोवॅट क्षमतेचा ट्रान्समीटर बांबोळी येथे कार्यान्वित करण्यात यश मिळवले.

याच दरम्यान हवाई दलाने उद्ध्वस्त केलेल्या बांबोळी रेडिओ केंद्रावर दोन उच्च क्षमतेचे फिलिप्स रेडिओ ट्रान्समीटर सैन्याच्या हातात सापडले. हे ट्रान्समीटर गोव्याच्या कॉस्मे मातियाश मिनेझीस समूहाने (सीएमएम) आयात केले होते. ते मांडवी नदीपार नेत असताना अपघाताने नदीत पडले. सीएमएम समूहाने भारत सरकारच्या विरोधात याचिका दाखल केली आणि खटला जिंकलाही. त्याना व्याजासह ट्रान्समीटरची किंमत द्यावी लागली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco News : सहा नद्यांचे राष्ट्रीयीकरण कोळशासाठी : कॅ. विरियातो फर्नांडिस

Lok Sabha Election 2024: ‘’चिदंबरम यांनी भ्रष्टाचार वाढवला, आरबीआयकडून सांगण्यात यायचे...’’; राजीव चंद्रशेखर यांचा हल्लाबोल

Cashew Farmer : निवडणुकीच्या धामधुमीत काजू उत्‍पादक वाऱ्यावर; उत्पादन कमी १६ हजार जणांना फटक

Heavy Rainfall in UAE: मुसळधार पाऊस अन् जोरदार वादळाने UAE पुन्हा बेहाल; उड्डाणे रद्द, इंटरसिटी बस सेवाही ठप्प

Loksabha Election 2024 : शिरोडा मतदारसंघातून धेंपेंना मताधिक्य देणार : मंत्री सुभाष शिरोडकर

SCROLL FOR NEXT