Goa  Dainik Gomantak
ब्लॉग

आपलं तरल सुरक्षित कवच

कम्फर्ट झोनची घट्ट मिठी ही दुधारी तलवार बनू शकते. ती आपल्याला आकस्मिक घुसखोरीपासून वाचवते, परंतु ती आपली वाढ प्रतिबंधित करू शकते.

गोमन्तक डिजिटल टीम

चिमणा आणि चिमणीच्या अनेक गोष्टी आम्ही लहानपणी शिकलो. बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला, या गीतात चिमणा रावा, चिमणी मैना असा उल्लेख येतो.

सुंदरच. हल्लीच एक इंग्रजी पुस्तक वाचत होतो. लेखक सुरवातीलाच लिहितो. झाडाझुडपांच्या एका प्रांतांत एक युवा, वयावर आलेला चिमणा एका फांदीवर येऊन बसतो. मोठ्यामोठ्याने आवाज करत हाका मारत असतो. इतक्यात त्या प्रांतातील एक मोठा चिमणा कुहू, चिंव, चिंव, जा इथून असे आवाज करत त्याला प्रतिसाद देतो – ए बाळा, तू आमच्या मुलुखातला नाही. हा तुझा झोन नव्हे. जा जा तू बाळा.

त्या चिमण्यांचा झोन वा विभाग सरकार प्रशासनाने डिमार्केट केलेला नाही. पण तो बुजुर्ग चिमणा ओळखतो, साद घालणारा प्रणयाधीन युवा चिमणा, हा जोडीदार सहचर शोधणारा अनोळखी पाहुणा आपल्या वाड्यावरील नाही. बस्स.

ही गोष्ट सांगण्याचं कारण म्हणजे आमचा प्रत्येकाचा एक कम्फर्ट झोन असतो. एक सुरक्षा कवच असतं. गणितात जसं domain म्हणतो तसा हा अदृश्य तरल गहिरा विभाग. आपणच तो रेखांकित करायचा असतो. कारण घुसखोर, दरोडेखोर चिमण्या कुठून शिरकाव करतील याचा नेम नसतो. ते काय चोरतात? ते आपली बहुमुल्य शांती, समाधान चोरून पळतात. नंतर पश्र्चात्ताप करून फायदा नसतो.

फिर पछतावा क्या करें, जब चिडिया चुग गयी खेत, असं कबीर म्हणतात.

कम्फर्ट झोन ही दिनचर्या आणि सवयींच्या चक्रातील निवांत सुखरूप जागा. जिथं स्वत:ची सुरक्षा वसते. आपलं नियंत्रण असतं. या आश्रयस्थानात एक गोपनीयता व privacy म्हणजे खाजगीपण असतं.

सभोवतालच्या प्रत्येक घटनेला वा प्रसंगाला आपण प्रतिक्रिया वा प्रतिसाद द्यायलाच हवा असं नाही. विचारणाऱ्याची वैचारिक कुवत पाहावी. विसावा झोनाला हे समजरूपी कुंपण हवं.

हल्लीच काकूचा फोन आला. खबर घेवपाक केल्लो रे, असं म्हणत तिनं आपलीच खबर सांगायला सुरवात केली. नकारात्मक. चहाड्याच म्हणा. खबरबात राहिली बाजूला. सून असं करते, नातवांच्या तक्रारी, आरोग्याची कुरकूर.. सकाळी सकाळी असा कोणी आपल्या निवांत झोनात घुसला की काही तरी उपाय करून त्याला आटोक्यात आणावा लागतो.

अशा लोकांना समस्या नसतातच. उगाचंच मी ना असा बिझी असतो, मी ना अशी व्यग्र असते, हा व्याप, तो ताप.... असं कुरबूर करतंच जगायचं व इतरांना पिडायचं हा या लोकांचा स्वभाव. हे बिझी आणि आम्ही बेकार? आपल्या कम्फर्ट झोनचा परीघ, व्याप्ती, आवाका, नकाशा आपणाला स्पष्ट माहीत असायला हवा. घुसखोरांमुळे माझी सकाळ क्षणभर व कणभरसुध्दा का खराब करावी?

एक हिंदी कवन वाचलं होतं.

कैसे हो?

कुछ सिर्फ वजह ‘पूछेंगे’

कुछ को ‘वाकई’ जानना हैं.

आत विसावल्यावर विचार, भावना व वर्तन विचलीत होत नाही. कुठल्या गोष्टींपासून आपल्याला त्रास होतो आणि त्यापासून संरक्षण कसं करायचं हे आपण ठरवू शकतो.

आपण किती, कधी आणि कोणाशी व्यक्त व्हायचे ते निवडू शकतो. हल्लीच एक मित्र भेटले, रडगाणं सुरू. ही समस्या, ती व्याधी, वैताग आला, कोर्ट कचेरी... पाढा वाचत होते. मी हसलो. म्हटलं – तुम्ही तुमचं जीवनच नसलेल्या व असलेल्या समस्यांच्या खाटीला खिळवून ठेवलेलं आहे. लायफ इज बेड रीडन. चूप बसले. यांचा ओला, सुका कचरा आमच्या डोक्यात का हो?

कोविडनंतर कार्यक्रमांची रेलचेल जोरात सुरू झाली आहे. वाढदिवस असो की इतर कार्यक्रम, तो एसी हॉलमध्ये होतो. साठी असल्यास मित्रांची मुलं वॉट्सएप मेसेजीस पाठवतात. आम्ही मॉम-डॅडना ‘सर्प्रायज’ देण्याचं ठरवलं आहे वगैरे मजकूर.

मुळात काही मित्र सध्या कसल्याच संपर्कात नसतात. आम्ही चुकून घरी गेलो तर मुलं आपल्या कक्षातून बाहेर येऊन नमस्कार सुध्दा करत नाहीत. आणि आता आईवडिलांना सर्प्रायज देण्यासाठी आमच्याशी संपर्क? पालकांकडूनच तर यांनी आमचे फोन नंबर घेतलेत.

गेलोच प्रोग्रामला तर तो उशिरा सुरू होतो. नंतर बोंबलणारी डॉल्बी ध्वनी यंत्रणा. कानाचे पडदे दुखे पर्यंत. आपल्या कम्फर्ट झोनला भूकंपासारखे तडे जाऊन घुस्मट वाढू लागते. मध्येच कोण तरी येतो आणि खाजगीपणात अतिक्रमण करून व्यक्तिगत बाष्कळ प्रश्न विचारतो. उत्तर न ऐकता दुसऱ्याला हटकतो. निवेदकाची वटवट सुरू. गेम्स, खेळ. कधीकधी आयोजक पाणी सुध्दा द्यायला विसरतात. थंड पेय सोडून द्या. लोकांना भूक लागलेली असते.

रात्री गाडी चालवून घरी परतायची घाई असते. कम्फर्ट झोन समूळ उखडल्यामुळे जीव कासावीस झालेला असतो. वैताग नुसता. भाषणे वगैरे होतात. शेवटी एकदाचा बुफे कार्यक्रम सुरू होतो. तिथं जेवायला सुरू करणार इतक्यात, घरून फोन आला होता, जरा करा, असं एक नातेवाईक येऊन सांगतो.

त्या कर्णकर्कश ध्वनी प्रदूषणाच्या कोलाहलात खिशातील फोन ऐकू कसा जाणार? आपण संतपदाला पोहोचलेलो नाही. घरी आल्यावर व्यवस्था कशी बेशिस्त होती ते चडफडत व्यक्त करताना परत त्रास होतो आपल्यालाच. कोण चूक, कोण बरोबर याची शहानिशा नको. दोन दिवस डोकेदुखी होते ही वस्तुस्थिती.

तथापि, कम्फर्ट झोनची घट्ट मिठी ही दुधारी तलवार बनू शकते. ती आपल्याला आकस्मिक घुसखोरीपासून वाचवते, परंतु ती आपली वाढ प्रतिबंधित करू शकते. घट्ट बंद केलेला दरवाजा ज्याप्रमाणे थंडीपासून बचाव करतो, त्याचप्रमाणे सूर्यप्रकाशही रोखतो.

अस्सल कनेक्शनापसून वंचित होणं व कोशात मुडपणं आपल्या विकासास अडथळा आणू शकतात. समतोल हवा. मोसंबीची साल असते. त्याप्रमाणे आपली ही कम्फर्ट साल वयाच्या टप्याटप्यात दाट व्हायला हवी. पन्नाशी नंतर ती साल पपनसाच्या (तोरींग) सालीसारखी टणक व्हायला पाहिजे.

हे कवच हे आत्म-शोधासाठी एक विश्राम स्थळ. चिडचिड न करता काय टाळणं, शिताफीने कसं हाताळणं हे आपल्या हातात असते. घुसखोर चिमणा उडत आपल्या शांती विभागात आलाच तर त्याला आवाज चढवून वा इतर मार्गाने फटकारण्याची कला माहीत हवी. स्फटिकासारखा स्पष्ट समतोल हवा. बाह्य कनेक्ट व अंतर्गत जोडणी!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Online Cricket Betting: पर्वरीत क्रिकेट सट्टाबाजीचा पर्दाफाश; ५ जणांना अटक, सुमारे लाखभर रुपयांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त

Dudhsagar Jeep Committee: दूधसागर जीप असोसिएशनला माजी मंत्री पाऊसकरांचा जाहीर पाठिंबा; 'त्यांची मागणी रास्त...'

Goa Unemployment: गोव्यातल्या घरफोडीच्या घटनांचा बेरोजगारीशी संबंध? काँग्रेस नेत्याने मांडले तर्क

Migrants Problem in Goa: 'गोमंतकीयांचे' भवितव्य धूसर..! मुख्यमंत्र्यांनी मुद्द्यावर ठेवले बोट; 'काय बिघडलंय गोव्यात' नक्की वाचा

Goa Live Updates: फोटो पत्रकार संतोष मिरजकर मारहाणप्रकरणी दक्षिण गोवा पोलिसांना 7 दिवसांचा अल्टिमेटम!

SCROLL FOR NEXT