मोडकळीस आलेल्या घराच्या पलीकडे
पावसाळ्यात शेवाळ जडलेल्या क्रॉसमोर उभे राहून
ख्रिश्चन प्रार्थना करतात
पाऊस नसताना विस्तीर्ण निळे अवकाश
तेजस्वी प्रकाशात निशब्द असते आणि
मेणबत्त्यांच्या ज्योती डोलत असतात….
अशा प्रतिमा वासुदेव (नितांत) केंकरे यांच्या मनात, त्यांचे बालपण आठवताना येतात. त्यांच्या ‘इन लिव ऑफ अ मेमॉइर’ (in lieu of a memoir) या आपल्या आठवणी संदर्भातल्या पुस्तकात या ओळी अगदी सुरुवातीलाच येतात आणि कविता आणि गद्य या दोन्हीमधून वाचनीय शैलीतून ते आपले आयुष्य उलगडत राहतात. त्यांचे हे पुस्तक 19 ऑगस्ट रोजी प्रकाशित होत आहे.
पोर्तुगीज वसाहतीच्या काळात 1946 साली गोव्यात जन्मलेले वासुदेव केंकरे पुढे यूएसए मधील युनिव्हर्सिटी ऑफ न्यू मेक्सिकोमध्ये भौतिकशास्त्राचे प्रतिष्ठित प्राध्यापक बनले. संशोधक म्हणून भौतिकशास्त्रात त्यांनी स्वतंत्रपणे केलेल्या सुमारे 270 संशोधनाचे लेख प्रसिद्ध झाले आहेत.
जरी एका भौतिकशास्त्रज्ञाने हे पुस्तक लिहिलेले असले तरी त्यांच्या लिखाणात कुठल्याही प्रकारची रुक्षता अथवा बोजडपणा नाही. उलट त्यांचा मिस्कील स्वभाव त्यांच्या लिखाण्यात छानपणे उमटतो आणि पुस्तकातला आशय सहजपणे आकळत जातो. पुस्तकातील पहिल्या प्रकरणात, गोव्यात ते ज्या परिसरात वाढले ते वाचकांना स्पष्ट होते. दुसऱ्या प्रकरणात, त्यांच्याशी पुढील आयुष्यात ज्या व्यक्तींशी- विद्यार्थी तसेच वैज्ञानिक, संबंध आला त्यांच्याबद्दल ते लिहितात. ‘थॉट्स’ या प्रकरणात ते आपली भावनिक व आध्यात्मिक बैठक वाचकांसमोर ठेवतात.
‘फिजिक्स, अकॅडमिक्स’मध्ये ते त्यांच्या व्यावसायिक जीवनातील संशोधन उपक्रमांचे वर्णन करतात. ‘मेलोडीज’मध्ये आपल्या इतर कामासंबंधी, विशेषत:, भौतिकशास्त्र तत्त्वज्ञानासंबंधी त्यांनी लिहिलेल्या आणि प्रकाशित केलेल्या पुस्तकांचा ते विमर्श करतात. त्यांना ज्या गंभीर आजारांचा (मेलडीज) सामना आयुष्याच्या उत्तरकाळात करावा लागला त्याबद्दल ते लिहितात. ‘मिसलेनियस’ या प्रकरणात काही संकीर्ण लिखाणामधून, आपल्या आयुष्यातील काही मनोरंजक घटनांचा प्रवास ते गमतीदारपणे घडवतात.
गोव्याच्या लेखिका आणि नाटककार प्रा. इजाबेल रिटा वाच यांनी तसेच मरीलू रमण यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे. रमण लिहितात, ‘आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळालेले वासुदेव केंकरे आपल्या क्षेत्रातले तज्ञ आहेतच पण सखोल विचारांनी, नेमक्या स्पष्टतेने आणि भावनेने, मजेशीर शैलीत लिहिणारे ते एक लेखकही आहेत.’
प्रा. वास लिहितात, ‘शास्त्रज्ञ, प्राध्यापक, संशोधन मार्गदर्शक म्हणून त्यांची कामगिरी वाचताना मी थक्क होऊन गेले. ज्या शैलीने त्यांनी आपल्या जीवनाची कहाणी समोर ठेवली आहे त्यातून ती वाचताना मी मंत्रमुग्ध होऊन गेले. त्यांनी निर्माण केलेले विविध प्रभाव, त्यांच्या भोवतालची असंख्य पात्रे, अनेक देशांमधून त्यांचा झालेला प्रवास यातून त्यांनी अनुभवलेली वळणे त्यांनी आपल्या या पुस्तकातही जिवंत केली आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.