Environment  Dainik Gomantak
ब्लॉग

चला; निसर्गाशी अनुबंध सुदृढ करुया

आज जागतिक पर्यावरण दिन साजरा होत असून पर्यावरण, शिक्षण आणि जागृतीच्या दृष्टीने त्याला विशेष महत्त्व लाभलेले आहे.

दैनिक गोमन्तक

राजेंद्र पां. केरकर

निसर्ग आणि पर्यावरणाशी असलेले अनुबंध बिघडत गेल्यामुळे जंगली श्‍वापदांचे नव्हे तर गुराढोरांसारख्या पाळीव प्राण्यांचे संसार आम्ही उद्‍ध्वस्त करून मानव आणि जनावरांतला अस्तित्वासाठी चालू असलेला संघर्ष टोकाला नेला. वाघ, बिबटे, हत्ती, गवे, रानडुक्कर यांच्या सान्निध्यात शेती, बागायती करणाऱ्या मानवाने त्यांच्या नैसर्गिक अधिवासावरच अतिक्रमण केल्याने आज कणाकणात देवत्व अनुभवणाऱ्या समाजाने त्यांचे स्थलांतर करावे किंवा ठार करावे याचा घोषा लावलाय.

आज जागतिक पर्यावरण दिन साजरा होत असून पर्यावरण, शिक्षण आणि जागृतीच्या दृष्टीने त्याला विशेष महत्त्व लाभलेले आहे. ब्रम्हांडात "फक्त एक पृथ्वी"असून मानवाने निसर्गाशी सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करून जीवन जगावे, या संकल्पनेवर यंदाचा पर्यावरण दिवस साजरा होत आहे.

मानवी समाजाबरोबर समस्त प्राणिमात्रांचे जीवन निसर्ग आणि पर्यावरणाच्या संवर्धन आणि संरक्षणावर अवलंबून असून, भारतातल्या ऋषी महंतांनी ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, संन्यासाश्रमानंतर वानप्रस्थाश्रमाची सांगड घातलेली आहे. हिरव्यागार वृक्षवेलींनी, खळाळत्या ओहळ, झरे, नद्या यांच्या सानिध्यात जीवन जगणाऱ्या आदिमानवाला फळेफुले, कंदमुळे, जंगली श्‍वापदांचे मांस यांनी पोषण तत्त्वांनीयुक्त अन्नाचे स्त्रोत पुरवले होते. विवस्त्रावस्थेतल्या माणसाने शेतीचा शोध लावला आणि मानवाकडे अतिरिक्त अन्नाची उपलब्धता निर्माण झाली. अग्नीमुळे अन्नाला शिजवणे शक्य झाले आणि हिंस्त्र श्‍वापदांपासून आपले संरक्षण करणे शक्य झाले. परंतु अंगावर कपडे परिधान करून जेव्हा माणसाने घरात राहताना, नातेसंबंधातून समाजाची निर्मिती केली, तेव्हा त्याच्या जगण्याला अर्थ गवसल्याची भावना विकसीत झाली.

मानव जसजसा लौकिकार्थाने प्रगत होत गेला, तसतसा धनसंचय, मालमत्ता निर्माण करण्यामुळे जीवनात स्पर्धा, ईर्षा आली आणि त्यामुळे परिसरातल्या उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीची अमर्याद लूट सुरू झाली.

औद्योगिकरण, नागरीकरण, वसाहतवादामुळे राष्ट्राराष्‍ट्रांत दुसऱ्याच्या संपत्तीवरती डल्ला मारताना आसुरी स्पर्धा निर्माण झाली. त्यामुळे जल, जंगल, जमीन, जैविक संपदेचा ऱ्हास सुरू झाला. हवा, ध्वनी, माती, पाणी अशा प्रदूषणाने माणसाच्या जगण्याला अधिकाधिक व्याधीग्रस्त, तणावपूर्ण केले.

एकेकाळी नाचणी, कुळीथ, उडीद, वरी यांच्यावर जगणाऱ्या माणसाने नगदी पिकांच्या शेती बागायतींचे प्रस्थ निर्माण करून जंगलांचे ऱ्हासपर्व सुरू केले. पाणघळीच्या जागा, कांदळवने, देवराया, जंगले यांचे उच्चाटन करून गृहनिर्माण वसाहती, आलिशान बंगले, रस्ते, रेल्वेमार्ग आदी साधनसुविधा निर्माण करण्याला प्राधान्य दिले. त्यामुळे आज वाळवंटीकरणाची प्रक्रिया जोरात चालू आहे. पेयजल, जलसिंचनासाठी जलस्त्रोतांचे वारेमाप शोषण होत आहे. खनिजाच्या लालसेपायी जंगले, जलाशय ओस पडू लागलेले आहेत. वाढता उष्मा, तापमानाला सामोरे जाण्यासाठी आम्ही जंगले, उपवने, झरे, तलावांऐवजी वातानुकूलीत बंगल्यात राहण्याला प्राधान्य देत आहोत. झाडाझुडपांच्या शीतल सावलीत राहण्याऐवजी त्यांची तोड आरंभलेली आहे. एकेकाळी इथल्या लोकधर्माने दारात तुळशीचे रोप लावून तिच्या ठायी भूमातेचे रूप पाहिले. वृटवृक्षात शिव तर पिंपळात विष्णूचा अधिवास मानला. परंतु आज वृक्षांची तोड करून देवदेवतांना आलिशान वास्तूत पूजण्याबरोबर सण उत्सवांच्या माध्यमातून केरकचरा, सांडपाणी आदीने परिसराला ओंगळवाणे करायला प्रारंभ केलेला आहे. मॉन्सूनमध्ये वारंवार येणाऱ्या महापुराला, भूस्खलनाला नियंत्रित करण्यासाठी मूळ कारणमीमांसा करण्याऐवजी नदी-नाल्यांना, डोंगरांना सिमेंट काँक्रिटच्या जहरी विळख्यात बंदिस्त करण्यात धन्यता मानत आहोत. पावसातल्या बेडकांचे डरॉंव डरॉंव, काजव्यांचे लुकलुकणे यांचे विस्मरण होऊ लागलेले आहे. रिमझिमणाऱ्या पावसात, धो धो कोसळणाऱ्या धबधब्यांच्या प्रवाहात मनसोक्त, निर्भेळ भिजण्याऐवजी मद्यपान, भेसूर संगीतावर नाचगाणे करत मांसाहारात आनंद शोधत आहोत. अशा पार्श्वभूमीवर कोविड-19 च्या महामारीने अख्खी मानवजात नखशिखान्त हादरलेली आहे.

निसर्ग आणि पर्यावरण यांच्याशी सौहार्दाचे संबंध ठेवत, आपल्या मूलभूत गरजांची पूर्तता करत, आसुरीपणावर नियंत्रण आणण्याची गरज आहे. नदीनाल्यांतले देवडोह, मंदिरासमोरच्या देवतळ्या देवाचे अधिष्ठान असणाऱ्या देवराया यांच्या सान्निध्यातच आज जगणे सुंदर आणि समृद्ध करता येते, अशी जाणीव सुदृढ करण्याची गरज आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी असे म्हणणारे संत तुकाराम, क्रौंच पक्ष्याच्या जोडप्याची शिकार पाहून शोकविव्हळ झालेल्या वाल्मिकींनी आमच्यातली निसर्ग संवेदना जागृत केली आहे. पर्यावरण दिनापुरतेच नव्हे, तर अवघे आयुष्य आनंदित करण्यासाठी निसर्गाशी अनुबंध वृद्धिंगत केले पाहिजेत...

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT