Blog : फर्जीवाडा ते फजितवाडा!

शाहरूख हा सिनेसृष्टीतील एक मातब्बर ‘सेलेब्रिटी’ असतानाही, आर्यनला जाळ्यात पकडण्याचे धाडस वानखेडे यांनी दाखवले म्हणून इलेक्ट्रॉनिक मीडियाने त्यांना थेट हीरो बनवून टाकले होते.
Shah Rukh Khan & Aryan Khan
Shah Rukh Khan & Aryan KhanDainik Gomantak
Published on
Updated on

सुपरस्टार अभिनेता शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन खान गेल्या ऑक्टोबरमध्ये एका आलिशान ‘क्रूझ’वर ‘अमली पदार्थ’ प्रकरणी जाळ्यात सापडल्यानंतर उठलेल्या वादळाची परिणती अखेर थेट ‘बॉलीवूड’मधील कोणत्याही सिनेमाच्या ‘क्लायमॅक्स’च्या धर्तीवरच झाली आहे! आर्यनला अमली पदार्थ विरोधी पथकाचे (‘एनसीबी’) अधिकारी समीर वानखेडे यांनी मोठ्या नाट्यपूर्ण रीतीने ताब्यात घेताना, त्याच्यासमवेत आणखी काहींना ताब्यात घेतले होते.

शाहरूख हा सिनेसृष्टीतील एक मातब्बर ‘सेलेब्रिटी’ असतानाही, आर्यनला जाळ्यात पकडण्याचे धाडस वानखेडे यांनी दाखवले म्हणून इलेक्ट्रॉनिक मीडियाने त्यांना थेट हीरो बनवून टाकले होते. त्यामुळे मग या पटकथेतील खलनायक हा अर्थातच आर्यन आणि पर्यायाने शाहरूख ठरू पाहत होते. एवढेच नव्हे तर या प्रकरणामुळे संपूर्ण बॉलीवूड हेच कसे अमली पदार्थांच्या आहारी गेले आहे, अशा चर्चाना उधाण आले होते.

मात्र, आता त्यानंतरच्या सहा महिन्यांनी ‘एनसीबी’नेच वानखेडे लिहू पाहत असलेल्या या पटकथेत जबरी धक्कातंत्राचा वापर केला आहे! दस्तुरखुद्द ‘एनसीबी’ने आता केवळ आर्यनच नव्हे तर तर त्याच्यासमवेत ताब्यात घेतलेल्या अन्य सहा जणांवरील आरोप मागे घेत आर्यन आणि इतरांना ‘क्लीन चीट’ दिली आहे.

Shah Rukh Khan & Aryan Khan
गोव्यात तंबाखू निर्मूलन जनजागृतीसाठी सायक्लोथॉन

मात्र, एवढ्यावरच हा विषय ‘एनसीबी’ने संपवलेला नाही, ही या ‘क्लीन चीट’पेक्षाही अधिक महत्त्वाची बाब आहे. वानखेडे यांनी या प्रकरणाची प्राथमिक चौकशी केल्यानंतर या प्रकरणाची अधिक गांभीर्याने चौकशी करण्यासाठी ‘एनसीबी’ने एका विशेष पथकाची (‘एसआयटी’) स्थापना केली होती.

याच ‘एसआयटी’ने दिलेल्या एका अहवालानुसार वानखेडे हे ‘येनकेन प्रकारेण’ आर्यनला अमली पदार्थ प्रकरणी जाळ्यात गुंतवण्याचा प्रयत्न करत होते, असा ठपका ठेवला आहे. त्यामुळे अवघ्या सहा महिन्यांत या पटकथेतील तथाकथित नायक हाच खलनायक असल्याचे दिसू लागले आहे!

हे प्रकरण उजेडात आले तेव्हा सध्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या ताब्यात असलेले मंत्री नवाब मलिक यांनी या प्रकरणाची ‘फर्जीवाडा’ अशी संभावना केली होती! एवढेच नव्हे तर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रांपासून त्यांच्या अन्य व्यवहारांबाबत मलिक यांनी विविध प्रश्नही उपस्थित केले होते. त्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी या वानखेडे यांची पालखी खांद्यावर घेतली होती. मात्र, आता आर्यनला देण्यात आलेल्या या ‘क्लीन चीट’मुळे ‘एनसीबी’चाच फजितवाडा झाल्याचे दिसत आहे!

अर्थात, केंद्रीय तपासयंत्रणांचा गेल्या पाच-सात वर्षांत अशा प्रकारे फजितवाडा झाल्याचे हे पहिलेच उदाहरण नाही. सुशांतसिंह राजपूत या गुणी अभिनेत्याच्या आत्महत्येनंतर जो काही धुरळा उडवण्यात आला होता, त्यातून अखेर काय निष्पन्न झाले? बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा विषय प्रसारमाध्यमांनीही सतत ‘जागता’ आणि ‘तापता’ ठेवण्याचा प्रयत्न केला होता आणि बिहारचे पोलिस प्रमुखही या निमित्ताने काही विशिष्ट भूमिका घेऊन मैदानात उतरले होते.

तर आर्यन प्रकरणानंतर दीपिका पडुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आदी अनेक बॉलीवूड कलावंतांना ‘एनसीबी’ने गतवर्षी चौकशीस पाचारण करून समाजातील त्यांच्या स्थानाबाबत शंका निर्माण होतील, असे वातावरण तयार केले होते. प्रत्यक्षात यापैकी कोणाच्याही चौकशीतून काहीही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी ‘एनसीबी’ तोंडघशीच पडत गेली. मात्र, आर्यन खान प्रकरणानंतर उभे राहिलेले वातावरण हे केंद्रीय तपास यंत्रणांच्या या खेळापेक्षा अधिक गंभीर आहे. आर्यनला ताब्यात घेतल्यानंतर जे लोक हा एक डाव आहे, असे म्हणत होते, त्यांना आपले म्हणणे बरोबर ठरल्याचा आनंद जरूर मिळाला आहे.

मात्र, तेव्हा तारस्वरात आर्यन तसेच समस्त बॉलीवूड समूह हा अमली पदार्थांच्या आहारी गेल्याचे जे लोक सांगत होते., ते एनसीबीने आर्यनविरुद्ध पुरावे नसल्याचे स्पष्ट केल्यानंतरही आपली भूमिका बदलायला तयार नाहीत. आर्यनची ‘क्लीन चीट’ ही काही तरी तोडपाणी करून मिळवण्यात आली असावी, असा अनेकांचा समज आहे. त्यामागे अर्थातच आर्यन हा मुस्लिम आहे, एका ‘सेलेब्रिटी’चा मुलगा आहे, असे पूर्वग्रह त्यांच्या मनात असणार. अवघ्या काही वर्षांपूर्वीपर्यंत न्यायसंस्था वा तपास यंत्रणांनी काही निर्वाळा दिला की विनाकारण उठलेला धुरळा खाली बसत असते. निवाडा मान्य केला जात असे. आता ते वातावरण राहिलेले नाही आणि त्यामुळे समाजात निर्माण झालेली दुराव्याची दरी ही अमली पदार्थांच्या नशेपेक्षाही अधिक गंभीर आहे. या समाजविद्वेषास अर्थातच बहुमतशाही विरुद्ध अल्पसंख्याक असाही पदर आहे आणि तो धोकादायक आहे.

खरे तर समाजात असायला हवा तो विवेकाचा आवाज. न्यायालयांचा निकाल जो काही लागेल, तो पटणारा नसला तरी स्वीकारण्याचा विवेक बाळगायला हवा. त्यामुळे आर्यन प्रकरणातून ‘एनसीबी’च्या विशेष तपास पथकाने निष्कर्ष काढल्यानंतरही संबंधितांवर चिखलफेक चालू ठेवणे योग्य नाही. शिवाय, अशा प्रकारे तपास करून कोणालाही गजाआड डांबू पाहणाऱ्या अधिकाऱ्यावरही कठोर कायदेशीर कारवाई व्हायला हवी. केवळ त्याने माफी मागून वा त्याची बदली करून, हे प्रश्न सुटणारे नाहीत; कारण त्यामुळे आर्यनला त्याचे गजाआडचे 27 दिवस परत मिळणार नाहीत, हे ध्यानात घ्यायला लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com